Saturday, April 18, 2020

येदीयुरप्पांचा कान कोण पकडणार?

Coronavirus lockdown India - TV9 Telugu

येस बॅन्केच्या घोटाळ्यातले आरोपी वाधवान कुटुंबियांना पोलिसी इतमामाने थेट महाबळेश्वरला पोहोचते करणार्‍या गृहसचिव अमिताभ गुप्ता यांच्या उचापतीनंतर महाराष्ट्रातच नव्हेतर देशभर काहूर माजले होते. मुद्दा एका घोटाळेबाजाला सुविधा देण्यापुरता नव्हता. देशात लॉकडाऊन असताना व सामान्य माणसाला आपल्या रहात्या घरातून बाहेर पडल्यावरची पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागतो आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या गृहखात्याकडून चुक झाली, म्हणून भाजपाचे तमाम समर्थक त्यांच्यावर तुटून पडलेले होते. त्याच्या पाठोपाठ विनय दुबे हा माणूस राष्ट्रवादीचा होता म्हणूनही बांद्रा घटनेनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात झोड उठली होती. त्यात काही गैरदेखील नाही. पण तशीच घटना कर्नाटकात घडल्यावर त्याच लोकांनी तितक्याच उत्साहाने तिथले मुख्यमंत्री व कारभारी येदीयुरप्पांनाही कचाट्यात पकडायलाही पुढे यायला हवे. कारण विषय आता तरी पक्षाचा नसून राष्ट्रीय संकटाचा आहे. तिथे कर्नाटकातही कोरोनाने थैमान घातले आहे आणि काटेकोर लॉकडाऊन चालू आहे. मग ते नियम व बंदोबस्त धाब्यावर बसवून माजी पंतप्रधान देवेगौडा व माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी तिथे लग्नाचा सोहळा पार कसा पाडतात? त्यावर लाठी कोणी उगारायची होती? ते काम भाजपाचे मुख्यमंत्री येदीयुरप्पांनी करायचे नव्हते का? आता ती घटना घडून गेल्यावर अहवाल मागवला आहे आणि कारवाई होणारच, असले खुलासे कामाचे नाहीत. कारण बांद्रा येथील घटनाक्रम आणि गौडा कुटुंबाने साजरा केलेला लग्नसोहळा; यात किंचीतही फ़रक नाही. त्यासाठी गौडा खानदान जितके जबाबदार आहे, तितकेच येदीयुरप्पाही जबाबदार आहेत. कारण तो घटनाक्रम दोनचार दिवस यथास्थित चालू होता आणि कर्नाटक प्रशासनाने त्यात कुठलाही हस्तक्षेप होऊ दिलेला नव्हता. म्हणजेच एकप्रकारे गुन्हा घडण्याला अप्रत्यक्षरित्या हातभारच लावलेला आहे. त्यांचा कान कोण पकडणार आहे?

कर्नाटकची राजधानी बंगलोरच्या बाहेर रामनगर या भागात एका फ़ार्महाऊसच्या आवारात हा शाही सोहळा पार पडला. देवेगौडांचे नातू व माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी् यांचे पुत्र निखीलकुमार यांचा हा विवाह होता. कॉग्रेसचे माजी मंत्री कृष्णप्पा यांच्या मुलीशी हा विवाह झाला. अवघ्या देशाला व कोट्यवधी जनतेला घरातल्या लहानसहान धार्मिक वा सांस्कृतिक सोहळ्यांपासून दुर रहाण्यासाठी सक्ती केली जात आहे. पाचसहा माणसांनीही परस्परांच्या नजिक येऊ नये, असा दंडक घातलेला आहे. कोणी भाजी किराणा घ्यायला बाहेर पडला तरी पोलिस त्याला लाठीचा प्रसाद देत आहेत. अशा कालखंडात खास व्यक्तींना सवलती असू शकत नाहीत. बांद्रा येथे परप्रांतीय मजूरांनी आपल्या गावी जाण्यासाठी गर्दी केली व गाड्या पकडायला ते घराबाहेर पडले होते. ते अकस्मात तिथे जमले नाहीत. क्रमाक्रमाने तिथे येत गेले. त्यांना पोलिसांनी आरंभापासूनच अडवले असते, तर इतकी अफ़ाट गर्दी जमली नसती हा युक्तीवाद अगत्याने झालेला आहे. त्यात भाजपाचे नेते पुढे होते. मग गौडांच्या या विवाहाची घटना कशी घडू शकली? कारण देवेगौडा व कुमारस्वामी हे महत्वाच्या व्यक्ती म्हणून कायम पोलिस संरक्षणात असतात. त्यांची सुरक्षा राखणार्‍या पोलिसांकडून हे वरीष्ठांना कळत नव्हते का? घटनास्थळी दोनतीन दिवस मंडप उभारणे वा सजावटीचे काम चालू होते. त्यासाठी सामानाची नेआण झालेली आहे. त्याविषयी जिल्हा प्रशासन काय करत होते? अगदी समारंभ चालू असतानाही तिथे पोलिस बंदोबस्त होता. म्हणजेच पोलिस संरक्षणात कायदा मोडला जात होता. म्हणूनच आता अहवाल मागवण्याची भाषा म्हणूनच फ़सवी आहे. भाजपाचे मुख्यमंत्री येदीयुरप्पांची संमती नसताना असे काही घडूच शकले नसते. मग त्यांना जाब कोणी विचारयचा? जितके अनिल देशमुख जबाबदार तितकेच येदीयुरप्पाही गुन्हेगार नाहीत काय? किंबहूना मर्कजचा मौलवी साद आणि देवेगौडांमध्ये फ़रक काय? पण कुठल्याही राजकीय मतलबाने प्रेरीत झालेले लोक असला प्रश्न विचारणार नाहीत.

आणखी एक बाब लक्षात घेतली पाहिजे. ज्या नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन भाजपाला देशाची सत्ता मिळालेली आहे व भाजपानेते ती सत्ता उपभोगत आहेत, त्यांच्या अपेक्षा स्वपक्षाचे नेतेही पायदळी तुडवित असतील, तर बाकीच्यांनी काय करावे? कारण कुठल्याही युद्धात परक्या शत्रूपेक्षा आपल्यातले भरभेदीच अधिक धोकेबाज असतात. खुद्द मोदींकडे बघा, ते कृतीतून आदर्श निर्माण करीत असतात. १४ एप्रिल रोजी लॉकडाऊनची मुदत वाढवायची असताना त्यांनी जे आवाहन व्हिडीओ माध्यमातून केले, तो कितीजणांनी निरखुन बघितला आहे? तसे तिथे बोलताना मोदींना मास्क लावण्याची वा तोंडावर आवरण घेण्याची काहीही गरज नव्हती. ते बंदिस्त जागेत होते आणि तरीही त्यांनी साध्या कपड्याचे आवरण आपल्या चेहर्‍यावर घेतलेले होते. अगदी भारत सरकारचे विविध अधिकारी रोज कोरोनाविषयक पत्रकार परिषद घेतानाही मास्क बाजूला करून बोलतात. त्यांच्या बाजूला वा समोर इतर माणसे असतानाही ते आपला मास्क काढून बोलतात. म्हणजेच इतक्या नियंत्रित बंदिस्त जागेवर मास्कची गरज नाही. तेच मोदींनाही व्हिडीओ चित्रणाच्या वेळी करता आले असते. पण त्यांनी जाणिवपुर्वक तसे केले नाही. आपला व्हिडीओ कोट्यवधी लोक बघणार आहेत आणि त्यातल्या दृष्याचा बहुतांश प्रेक्षकांच्या मनावर प्रभाव पडणार आहे, तर कृतीतून मोदींनी तोंडावर साधे का असेना कापडी आवरण असावे असा संदेश त्यातून दिला. हे मोदींना उमजत असेल तर पाव शतकापुर्वी त्याच पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या देवेगौडांना कशाला कळत नाही? येदीयुरप्पांना का समजू शकत नाही? तर तोच सत्तेचा माज असतो. जनतेला लागणारे नियम आपल्यासाठी नसतात, हा माज त्यामागे असतो. मोदी जनतेला आवाहन करताना आपल्या कृतीतून काही करून दाखवतात. म्हणून कोट्यवधी लोकांना त्रास सहन करूनही त्यांचे मानावे लागते. पण मोदींच्याच अनुयायांना मात्र त्यातला आशय समजून घेता येत नाही.

जनता कर्फ़्यु यशस्वी केल्यावर आपल्या खिडकी बाल्कनी वा दारात येऊन टाळ्या थाळ्या वाजवण्याचे आवाहन मोदींनी केले होते. पण काही उत्साही लोकांनी मिरवणूका काढून गर्दी केल्यावर दुसर्‍या आवाहनाच्या वेळी मोदींनी अगत्याने त्यांना घरात वा दारातच राहून दिवे लावण्याचे आवाहन केलेले होते. अभिवादन करतानाही प्रसंगाचे भान विसरू नका, हा त्यातला संदेश आहे आणि तो जितका सामान्य जनतेसाठी आहे तितकाच पक्षाचे नेत्यांसाठी सुद्धा आहे. येदीयुरप्पा त्यातच येतात. त्यामुळे देवेगौडांना सवलत देणे वा त्यांच्या कृत्याकडे काणाडोळा करणे, हा येदीयुरप्पांचा गुन्हाच आहे. पण तेव्हा अनिल देशमुखांना लक्ष्य करणारे आज गप्प आहेत आणि वाधवान प्रकरणी देशमुखांचे समर्थन करणारे आता येदीयुरप्पांवर दोषारोप करताना आघाडीवर दिसतील. त्यापैकीच एक तनवीर अहमद नावाचे जनता दल सेक्युलरचे प्रवक्ते आहेत. अनेक वाहिन्यांच्या चर्चेत असतात. गेल्या चार आठवड्यात त्यांनी लॉकडाऊनवर बोलताना एकच प्रश्न सातत्याने उपस्थित केला होता. टाळ्या थाळ्या ठिक आहेत. पण अशा कर्फ़्युने चार कोटी गरीब स्थलांतरीत मजुरांच्या भुकेल्या पोटाचे काय; असला कळवळा दाखवणारा प्रश्न त्यांनी सातत्याने विचारलेला होता. काल त्यांचाच शीर्षनेता देवेगौडांनी लॉकडाऊनमध्ये विवाह सोहळा केला व जेवणावळी उठवल्या. त्यातून अशा किती उपाशी मजूरांची पोटे भरली? असाही प्रश्न तनवीरनी विचारला नसेल तर कोणी विचारायचा? एकूणच राजकारणात कार्यकर्ते व पत्रकार विश्लेषक इतके विभागले गेलेले आहेत, की आपल्या कुणाच्या पापावर पांघरूण घालायचे व विरोधातल्या कोणावर तोफ़ा डागायच्या; असा बुद्धीवाद रसातळाला गेला आहे. पण यातून कोरोना सोकावतो, त्याची कुणालाही पर्वा राहिलेली नाही. मुद्दा देवेगौडा वा अनिल देशमुखांना लक्ष्य करण्याचा नाही वा राजकारण खेळण्याचाही नाही. जे संकट घोंगावते आहे. त्यातून सहीसलामत जिवंत राहिलो तरच बाकीच्या गोष्टी शक्य आहेत. तेच जीवन धोक्यात असेल, तर पक्षाचा विचारसरणीचा विजय अंतिमत: विनाशच आहे.

जिथे ज्या पक्षाचा नेता वा कोणी मुख्यमंत्री, वा सत्ता असेल, त्याच्या यशावर देशाचे व राज्याचे भवितव्य अवलंबून आहे. महाराष्ट्रात कोरोना विरोधातली लढाई करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपेशी ठरले, तर तो विरोधातल्या भाजपाचा विजय असू शकत नाही. कारण त्या अपयशात महाराष्ट्रातल्या लाखो लोकांचे जीवन संपणार आहे आणि तोच निकष देश पातळीवर नरेंद्र मोदींच्या बाबतीतही लागू होतो. ट्रम्प चुकत असतील वा ते अपेशी ठरत असताना मरणारे कोणी त्यांच्याच पक्षाच्या अनुयायांपुरते मर्यादित नाहीत. कारण कोरोना वा तत्सम महामारी पक्षनिरपेक्ष असतात. त्यांना कुठल्याही विचारसरणीशी वा मानवी भेदभावाशी कर्तव्य नसते. जो त्याच्या सापळ्यात अडकला त्याला कुठलीही सवलत कोरोना देत नाही. वाधवान यांच्याकडे असलेला पैसा किंवा देवेगौडांची राजकीय प्रतिष्ठा यानुसार कोरोना पंक्तीप्रपंच करीत नाही. मुंबई दिल्लीच्या सामान्य कष्टकरी मजूराला जितक्या सहज मोरोना मरण देतो, तितक्याच तटस्थपणे तो कुणा मंत्री मुख्यमंत्र्यालाही आयुष्यातून उठवत असतो. म्हणूनच ही वेळ आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचा तो कारटा, असा भेदभाव करण्याची वेळ नाही. आपण महाराष्ट्रात कोरोनाला हरवायचे आहे तर उद्धव ठाकरे यांनाच यशस्वी व्हावे लागेल. त्यांच्या चुका वा दोषांमध्ये कुठल्याही पक्षाचा विजय असू शकणार नाही. येदीयुरप्पांची चुक पोटात घालून कर्नाटकात वा देशात भाजपाला लाभ होऊ शकणार नाही. राहुल गांधींच्या खुळेपणाचे समर्थन करून गुण गावून कॉग्रेसचेही कल्याण होऊ शकत नाही. ज्यांना गेले दहा महिने आपल्याच पक्षातला अध्यक्षपदाचा प्रश्न सोडवता आलेला नाही, त्याने कोरोनाची उपाययोजना सांगण्याचे धाडस करावे, ह्याला विनोदही म्हणता येत नाही. मग त्यांच्या गुणगानाचे अग्रलेख लिहून ‘सामना’ उद्धवरावांचे हात कसे मजबूत करू शकणार, ते भगवंतालाही सांगता येणार नाही. कारण ही वेळ पक्षीय मतभेदाचा डंका पिटण्याची नसून एकजुटीने कोरोनाला पराभूत करण्याची आहे. जीवनाला जगवण्याला अन्य कुठलाही पर्याय नाही. म्हणूनच त्यात चुकत असतील तर येदीयुरप्पांचा कान भाजपाच्या समर्थकांनीही तितक्याच उत्साहाने पकडला पाहिजे.

15 comments:

  1. मुद्दा एकदम बरोबर,मोदींची प्रतिमा खराब होते इकडे भाजप पक्षाने लक्ष द्यायला पाहिजे होते
    पण कुठेही गेलं तरी पळसाला पाने तीनच

    ReplyDelete
  2. Yes Yedigurrapa Should be removed.मातलेलाच आहे

    ReplyDelete
  3. परखड पण सत्य.

    ReplyDelete
  4. भाऊ,
    आजच्या परिस्थितीसाठी फारच समर्पक लेख.पण लक्षात कोण घेतो?अजुनही पक्षीय साठमारी चालू आहे.

    ReplyDelete
  5. श्री भाऊ हे होणे नाही बाहेरून कितीही देखावे केले तरी आतून ही राजकारणी मंडळी एकमेकांचे व्यक्तिगत संबंध जपत असतात हे त्याचे उत्तम उदाहरण, एरवीच्या दिवसात ह्याचा गवगवा झाला नसता असो

    ReplyDelete
  6. भाऊ लेख चांगला आहे आणि मुद्दा पटला आपल्याला अजून एक विनंती श्रीयुत संजय राऊत यांनी राज्यपाल महोदयांना एक प्रकारे निर्लज्ज अशी निर्भत्सना केली आहे आपल्या लेखांमधून आपण श्रीयुत संजय राऊत यांचा कान धरावा ही अपेक्षा आणि दुसरे म्हणजे माननीय मुख्यमंत्री यांना सी एस आर च्या राजकारणात जायचे नाहीये असे ते म्हणतात परंतु तो कायदा 2013 मध्ये पास झाला होता यावरही प्रकाश टाकून एखादा लेख लिहावा ही विनंती

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय.... काय समजतो हा मनुष्य स्वतः ला... नस्ते उद्योग सतत सुरूच असतात

      Delete
  7. भाऊ अत्यंत सडेतोड लिखाण.मनःपूर्वक धन्यवाद व अभिनंदन!!👌👍💐

    ReplyDelete
  8. भाऊ, अत्यंत परखड. चूक कोणाचिही असो स्वपक्षाचा असो की विरोधी पक्षाचा कान पकडलाच पाहिजे. छान कानउघडणी केली आहात. देवेगौडा भाजपाचे नाहीत हे सागून कर्नाटकाच्या भाजप सरकारला सूट घेता येणार नाही हे नक्कीच.

    ReplyDelete
  9. येदीयुरप्पा स्वतः एका आमदाराच्या लग्नात सामिल झाले होते ... भाजपा आमदाराने मटण बिर्याणी आख्या गावाला वाढदिवसाच्या निमित्ताने खाऊ घातली ... देवेगौड़ांचे लग्न ... शिवराजसिंग कायम घोळका घेऊन मास्क न लावता हिंड़ताय ... किती सांगायचे ? निव्वळ बांड़गुळे आहेत ही

    ReplyDelete
    Replies
    1. याची तुलना तबलिगीशी होते काय?
      बोलघेवड्या बांडगुळानी चिथावणीखोर बोलणाऱ्यांची दखल घेऊन त्यावर आपलं ज्ञान प्रकट करावे

      Delete
  10. All animals are equal, but some animals are more equal than others. ---- A proclamation by the pigs who control the government in the novel Animal Farm, by George Orwell.

    सर, ही स्थिती सदा सर्वदा आणि सगळीकडे आहे.
    हित संबंध आले की ही स्थिती आलीच समजा.
    या वागण्यातुनच नाशाची बिजे रोवली जातात आणि उत्पती, गती आणि नाश हा सिद्धांत खरा होतो.
    महाभारतात कृष्णा सारखा मार्गदर्शक असुन ना पांडव कौरव वाचले ना यादव वाचले.
    कांग्रेस या सिद्धांताप्रमाणे लय स्थितीत आहे आणि बिजेपी गती मध्ये कारण मा. मोदी सारखा नेता आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघासारखी संघटना पाठिशी आहे.
    जो पर्यत समाजमन जाणुन कारभार होईल तोपर्यत ठीक. जेव्हा मनमानी सुरु होईल तेव्हा नाश ठरलेला.
    कुठल्याही संघटनेत मनापासुन काम करणारी लोक कमीच असतात आणि जिथे शिते तिथे भुते ही स्थिती असते.
    चांगल्या कामाला आपण पाठिबां द्यायचा एवढेच आपल्या सारख्या सामान्य माणसाच्या हातात असते.

    ReplyDelete
  11. अगदी बरोबर आहे.भाजपमध्येही तारतम्य न बाळगता फालतू बडबड करत बोलणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे.राणे तर त्यांचे शिरोमणी..! अगदी फडणवीसांनीही जरा दमाने घेतल्याची आवश्यकता आहे असे वाटते.दिल्लीहून सर्वांना समज देण्यात आली पाहिजे.

    ReplyDelete
    Replies
    1. ho.. fadnavisa, kirit somayya, mungantiwar ani chandrakant patil yanni ata thode divas gappa basave ani janatechya upyogi padel, dalasyache hoil ase kahitari kam karave. ugach badbad ani vad karat rahanyachi hi vel nahi.

      Delete
  12. भाऊ, येदी कुमारस्वामी च्या मुलाच्या लग्नाला गेले नव्हते...

    ReplyDelete