भाजपाचे विधान परिषदेतील नवनिर्वाचित आमदार गोपिचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याविषयी हे उदगार काढले, त्याचे समर्थन कोणीही करू शकणार नाही. किंबहूना त्यातल्या चुकीचा भाजपानेही निषेधच केलेला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी त्या उदगारांना गैरलागू ठरवताना त्यांच्याविषयी वा फ़डणवीसांच्या बाबतीत असे शब्द उच्चारले गेले; तेव्हा असे सर्व संस्कृतीरक्षक कुठे होते, हा केलेला सवालही योग्य आहे. कारण शब्द वा भाषेची संस्कृती वा संयम फ़क्त एकाच बाजूपुरता मर्यादित असू शकत नाही. सार्वजनिक जीवनात काम करताना प्रत्येकानेच संयम राखला पाहिजे. लोकशाहीत प्रतिस्पर्धी असतात, शत्रू नसतात, याचेही भान सर्वांनीच राखले पाहिजे. पण जेव्हा ते भान एका बाजूने सोडले जाते आणि दुसर्या बाजूच्या तशाच अपराधांना पोटात घातले जाते, तेव्हा संयमाचा प्रभाव संपत असतो. अगदी ही बाब जितकी राजकीय व सार्वजनिक क्षेत्रातील लोकांना लागू पडते, तितकीच ती माध्यमातील शहाण्यांनाही लागू असते. म्हणूनच या निमीत्ताने सहासात वर्षापुर्वी घडलेला एक प्रसंग आठवतो. तेव्हा अण्णा हजारेंचे लोकपाल आंदोलन जोरात होते आणि भ्रष्टाचाराचा विषय ऐन रंगात आलेला होता. त्या काळात शरद पवार युपीए सरकारमध्ये कृषीमंत्री होते. दिल्लीतल्या एका समारंभामध्ये सहभागी होण्यासाठी ते कुठल्या भव्य इमारतीमध्ये गेलेले असताना तिथे घुसलेल्या एका शीख तरूणाने पवारांना थप्पड मारण्याची घटना घडलेली होती. त्यावर सगळीकडून निषेधाचे सुर उमटलेले होतेच. मग त्याचा संसदेतही जोरदार निषेध झालेला होता.
त्या निषेध प्रस्तावावर बोलताना शरद यादव हे ज्येष्ठ जनता दल नेते काय म्हणाले होते? संसदेत सर्व पक्षाच्या नेते व सदस्यांनी त्या हल्ल्याचा निषेध केला होता. त्यावरच्या प्रस्तावावर सर्वात उत्तम भाषण शरद यादवांनी केले होते. ते म्हणाले, ‘मारनेवालेने तो एकही थप्पड मारा. लेकीन मीडियाने तो दोतीन लाख भार थप्पड मार लिया.’ त्यांच्या म्हणण्याचा आशय सोपा होता. घडलेली घटना निषेधार्ह आहे आणि ती किती हिणकस आहे, ते सांगायला शब्द पुरेसे होते. त्याचे चित्रण सलग दोन दिवस अखंड पुनर्प्रक्षेपित करण्यातून माध्यमांनी काय साधले? काही वाहिन्या तर तितकेच आठदहा सेकंदाचे चित्रण सलग दहाबारा थपडा असाव्यात अशा पद्धतीने दाखवित होत्या. जणू पवारांच्या त्या अपमानाचे या वाहिन्यांना खुप कौतुक असावे. त्यातून कुठला विकृत आनंद अशा पत्रकार वा वाहिन्यांना मिळू शकत असतो? जी बाब निंदनीय आहे. ती इतक्या अगत्याने व सातत्याने दाखवून कोणता परिणाम साधला जाणार असतो? अशा रितीने त्याचे सातत्याने प्रदर्शन मांडून गांभिर्यच संपवले जात नाही काय? जर ती कृती निषेधार्ह आहे. तर ती शक्य तितकी दाखवू नये, कारण शब्दांपेक्षा दृष्याचा प्रभाव मनावर अधिक पडत असतो. त्याचेही भान यापैकी कोणाला नव्हते काय? शरद यादव यांनी मोजक्या शब्दात त्या दुखण्यावर बोट ठेवले होते. कारण मारणारा जो कोणी होता, त्याचा हेतू कोरकोळ होता. पण माध्यमांच्या हेतू अधिक कुटील वा लज्जास्पद होता. जणू त्यांनाच पवारांचा अपमानित व डागाळलेला चेहरा जनतेसमोर पेश करण्याचा हेतू असावा. अन्यथा अशा रितीने ती घटना पेश करण्याचे कारणच काय? नेमका तसाच काहीसा प्रकार गेल्या आठवड्यात पडळकर यांच्या विधानाच्या बाबतीत घडलेला नाही काय?
पडळकर पंढरपुरच्या एकाच पत्रकार परिषदेत एकदाच सदरहू विधान बोलून गेलेले होते. त्याचा अखंड मारा करून माध्यमांनी व वाहिन्यांना त्यातून काय साधायचे होते? मुद्दा असा, की पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध जरूर झाला पाहिजे. पण जे वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचे दावे किती टाहो फ़ोडून केले जात होते? त्याचा पुनरुच्चार खुद्द पडळकरांनी नंतर केलेला नाही. पण वाहिन्यांच्या बातमीदारांनी पन्नासवेळा प्रत्येकी तेच वाक्य उच्चारलेले आहे ना? ते वाक्य सातत्याने बोलण्यातून त्यांना काय साधायचे होते? त्यावर चर्चाही झाल्या. त्यातही त्याचा पुनरुच्चार चालूच होता. नेमके वाक्य टाळूनही चर्चा व बातम्या होऊ शकल्या असत्या ना? की या पत्रकारांना व वाहिन्यांना आपल्या मनातली गरळ ओकण्यासाठी पडळकरांनी दिलेली संधी सोडायची नव्हती? हे प्रकार नवे नाहीत आणि एकदाच घडत नसतात. बारकाईने बघितले व तपासले तर प्रत्येकाला आपल्या मनातली गरळ ओकण्याची संधी त्यातून साधून घ्यायची असते. तीन दशकापुर्वी असाच एक गाजलेला प्रसंग आठवतो. तेव्हा कुठल्याशा सभेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगलीला गेलेले होते. त्यांच्या भाषणामध्ये घटनाकार बाबासाहेबांचा उल्लेख आलेला होता. त्यासंबंधीची जी बातमी लोकसत्तेत प्रसिद्ध झाली, त्यावरून गदारोळ उठलेला होता. त्या भाषणात सेनाप्रमुखांनी बाबासाहेबांना ब्रिटीशांचे हस्तक संबोधल्याचा आरोप होता आणि त्यावर कल्लोळ माजला. अगदी बातम्या निषेधाचा गदारोळ झाला. पण बाळासाहेबांच्या इन्काराची दखलही घ्यायला माध्यमे राजी नव्हती. त्याही पुढे जाऊन शिवसेनेवर चिखलफ़ेक करणारे अग्रलेख संपादकीय लेख लिहीले गेलेले होते. तो विषय कुठे संपला?
दोनतीन दिवस हे काहूर माजलेले असताना नामदेव ढसाळ व रामदास आठवले मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना भेटले. साहेबांनी दोघांनाही आपल्या सांगलीतील भाषणाची संपुर्ण टेप ऐकवली आणि त्याही दोघांनी नंतर असे काही शिवसेनाप्रमुख बोलले नसल्याची ग्वाही दिलेली होती. पण उडालेला धुरळा खाली बसला नव्हता. मग महाराष्ट्र टाईम्सचे सांगलीतील तात्कालीन वार्ताहर रविंद्र दफ़्तरदार यांनी एक छोटेखानी लेख लिहून बाळासाहेब तसे काहीही बोललेच नसल्याचे स्पष्ट केले आणि विषयावर पडदा पडला. पण दरम्यान त्यांच्याही वर्तमानपत्राने त्यावर उधळलेली मुक्ताफ़ळे कोणी मागे घ्यायची? त्यासाठी कोणी माफ़ी मागायची? जे लोक न बोललेल्या शब्द व वक्तव्यासाठी शिवसेनाप्रमुखांच्या जाहिर माफ़ीयाचनेची अग्रलेख लिहून अखंड मागणी करीत होते, त्यांनी आपल्या बेताल लिखाण व आरोपासाठी माफ़ी कधी मागितली आहे काय? पण मुद्दा वेगळाच आहे. दफ़्तरदार यांच्या साक्षीने विषय गुंडाळला गेला. मग मुळात न बोललेल्या शब्दातून कोणीतरी डॉ. बाबासाहेबांवर दुगाण्या झाडून घेतल्या त्याचे काय? ती शिवसेनाप्रमुखांनी केलेली टिप्पणी नव्हती, तर लोकसत्तेचा सांगलीतील वार्ताहर व त्याने धाडलेली बातमी मुंबईत छापणार्या संपादकांनी बाबासाहेबांची अवहेलना केलेली नव्हती का? त्यांना कोणी पकडले वा शिक्षा वगैरे दिली होती काय? मुद्दा बाबासाहेबांच्या अपमान व अवहेलनेचा तेव्हाही नव्हता आणि आज देखील नसतो. मुद्दा आपल्याला कोणाला लक्ष्य वा शिकार करायचे असते, त्यानुसार बातमी वा विषयाला फ़ोडणी घातली जात असते. त्याला कैचीत पकडता आले नाही, मग विषय गुंडाळला जातो. इथेही पडळकर हे निमीत्तमात्र असतात. इतरांनाच पवारांविषयीची गरळ ओकण्याची संधी साधायची असते. मात्र दरम्यान पडळकर व पवार सारखेच ह्या शिकार खेळात जखमी होत असतात.
भाऊ, आपली माध्यमे पूर्णपणे नासलेली आहेत. यांचा खत म्हणूनसुद्धा उपयोग राहिलेला नाही.
ReplyDeleteभाऊ प्रतीपक्ष ची वेळ १५ मिनिट करा जास्त वेळ काही दिवसांनी कंटाळा आणेल सांभाळा
ReplyDeleteमी पण सहमत आहे. अनेकदा त्यात तेच तेच बोलले जात आहे. स्वाती तोरसेकर अगदी नेमके आटोपशीर व आवाजावर ताबा ठेवून बोलतात तसे केल्यास जास्त परिणामकारक होईल असे सुचवत आहे. एरवी बरीच माहिती आपल्याकडून मिळते म्हणून प्रतिपक्ष आणि 'पहारा'च्या प्रतीक्षेत असते.
Deleteधन्यवाद
Patrakar Pawarana laksha karat aahet. Sattapalat honyachi shakkata vattey.
ReplyDeleteआता जितेंद्र आव्हाड यांनी परळकरांना त्यांनी केलेल्या विधानाबद्दल बघून घेऊ, अशा अर्थाचे विधान म्हणजे धमकी दिली आहे. अलिकडेच सोशल मिडियावर त्यांच्यबद्दल उलटसुलट विधाने करणाऱ्या व्यक्तीला घनघोर मारहाण केल्यानंतरही काकांनी हा रानटीपणा उदारपणे पोटात घातला म्हणून आव्हाडांना स्फुरण चढले असल्यास नवल नाही.
ReplyDeleteकाकांनीही योग्य वेळी प्रतिक्रिया देईन असे सूचक भाष्य करून विषय धगधगत राहील याची काळजी घेतली.
एकंदर, पाडळकरांचा तोल गेला पण इतरेजनही परिस्थितीतून कसा स्वार्थ साधता येईल त्यात तरबेज.
Tumhache sarv video mi pahato
ReplyDeleteChangal bolata
Tumach mla pattay
Pn bjp ch samarthan karu naka
Baki mast