मागले दोन अडीच महिने अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण खुप गाजते आहे. त्याचा मृत्यू ही आत्महत्या की हत्या, असा वाद सुरू झाला आणि आता तो विकोपास गेलेला आहे. वाद होता की त्याच्या कुटुंबियांना ती हत्या वाटत होती आणि मुंबई पोलिसांनी मात्र पहिल्या दिवसापासून ती आत्महत्या ठरवुनच त्यावर चौकशी चालवली होती. वास्तविक अशा बाबतीत आप्तस्वकियांनी शंका जरी घेतली, तरी त्यानुसार तक्रार दाखल करून तपास होण्याची गरज होती. पण मुंबई पोलिस व त्यांच्यावर राज्य करणारी शिवसेना आणि महाविकास आघाडी; ती आत्महत्याच असल्याचा हट्ट करून बसली. यावरून राजकीय वाद रंगला तेव्हाही अकारण शिवसेनेने त्याला प्रतिष्ठेचा प्रश्न बनवला आणि त्याला राष्ट्रीय स्वरूप येते गेले. किंबहूना जनमानसातील शंकांचे निरसन करणे, राज्यकर्त्यांची पहिली जबाबदारी असते. अन्यथा राईचा पर्वत होत जातो आणि तो उपसणे अशक्य होऊन जाते. इथेही नेमके तेच घडलेले आहे. कारण सुशांतच्या वडीलांनी मुलाची हत्या झाल्याची व त्याच्या पैशाची लूटमार झाल्याची तक्रार बिहारची राजधानी पाटणा येते नोंदवली. तिथून या विषयाला कलाटणी मिळालेली होती. त्याला राजकीय रंग देण्याचा मुर्खपणा प्रथम शिवसेनेच्या प्रवक्त्याने केला आणि सेनेच्या नेतृत्वानेही तो प्रतिष्ठेचा विषय बनवून सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीपेक्षा सरकारलाच आणुन आरोपीच्या पिंजर्यात उभे केले. त्यानंतरही पाटण्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे घेऊन तपास हाताळता आला असता. विषय आटोक्यात राहिला असता. पण सत्तेची नशा चढल्यावर शुद्ध कशाची उरते? परिणामी ती एक राजकीय आत्महत्या होऊन गेली. पण नंतरही अनेक लोक आत्महत्येला उतावळे झालेले होते आणि आता चार दशकांहून अधिक काळ संपादन केलेली विश्वासार्हता ‘इंडिया टुडे’ या वृत्तसमुहाने रियाची पोरकट मुलाखत दाखवून गमावली आहे. त्यालाही आत्महत्याच म्हणावे लागेल. सुशांतचे ठाऊक नाही, पण या प्रतिष्ठीत माध्यमाने व्यावसायिक आत्महत्या नक्कीच केलेली आहे.
पहिली गोष्ट म्हणजे देशातली बहुतांश माध्यमे सुशांतच्या संशयास्पद मृत्यूविषयी गदारोळ करीत असताना याच ‘इंडिया टुडे’ समूहाच्या इंग्रजी वृत्तवाहिनीवर सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई याने अत्यंत हिणकस भाषेमध्ये सुशांतचा तुच्छतेने उल्लेख केलेला होता. हा कोणी मोठा स्टार नव्हता, मग त्याच्या आत्महत्येचा इतका गदारोळ कशाला, असा प्रश्न त्याने दोनतीनदा आपल्या पाहुण्यांना विचारला होता. त्याच्याही पुढे जाऊन सुशांतच्या विरोधात बोलतील अशाच लोकांना आमंत्रित करून आपण दुसरी बाजू मांडत असल्याचा त्याने आव आणलेला होता. पण त्यात दुसर्या बाजूपेक्षाही जनमताला छेद देण्याचा प्रयास त्याने चालवला होता. अशाच बातमीदारी वा विश्लेषणाने त्याची जुना पत्रकार असूनही लोकप्रियता घटत गेली. विश्वासार्हता संपत गेली. त्यामुळेच त्याच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या न्युज१८ या वृत्तसमुहातून त्याची हाकालपट्टी करण्याची पाळी संबंधित कंपनीवर आली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल लागण्यापर्यंत राजदीपने आपल्या पक्षपाती अजेंडा पत्रकारितेने त्या वृत्तसमुहाला दिवाळखोरीत नेलेले होते. परिणामी रिलायन्सला तो वृत्तसमुह विकून मालकाला पळ काढावा लागला. त्यापुर्वीही आजतक व इंडिया टुडे अशा दोन वाहिन्या जोरात चालू होत्या. पण नंतर तिथे आलेल्या राजदीपने आता त्याही समुहाला धुळीस मिळवण्याचा चंग बांधला असावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पहिल्या अमेरिकन दौर्यात तिथल्या अनेक भारतीयांनी मोठा सोहळा साजरा केलेला होता. जिथे हा सोहळा झाला त्या मेडीसन स्क्वेअरमध्ये मुठभर विघ्नसंतुष्ट काळे झेंडे घेऊन उभे होते. सोहळ्यासाठी तिथे जमलेल्या हजारो लोकांकडे पाठ फ़िरवून राजदीप त्या विघ्नसंतुष्टांकडे गेला व मोदींच्या नावाने उद्धार करतील त्यांच्याच मुलाखती घेऊ लागला. सहाजिकच मोदी समर्थकांनी त्याची हुर्यो उडवली व त्यांच्याशी चोंबडेपणा करायला गेल्यावर बाचाबाचीचाही प्रसंग उदभवला. ही राजदीपची ख्याती आहे.
त्याच्या पत्रकारितेविषयी एक नक्की सांगता येईल. राजदीप ज्यांची बाजू हिरीरीने मांडतो, ती दुसरी बाजू बिलकुल नसते. कारण त्याने ज्यांचे आजवर समर्थन केलेले आहे वा बाजू मांडलेली आहे, ते हमखास दोषपात्र ठरले आहेत. सहाजिकच आताही राजदीपने सध्याच्या वादात रिया चक्रवर्तीविषयी सहानुभूती दाखवणे वा तिची बाजू मांडणे, संयुक्तिक आहे. किंबहूना त्यामुळेच आपण रिया यातली खरीखुरी गुन्हेगार असल्याची छातीठोक खात्री देऊ शकतो. तसे नसते आणि रिया किंचीतही निरपराध असती, तर राजदीप तिच्याकडे फ़िरकला नसता. असत्याशी राजदीपचे कायम इतके सख्य राहिलेले आहे, की वस्तुस्थिती व सत्याचा त्याला असलेला तिटकारा तो कधीच लपवित नाही. त्याचे ट्वीट वा लेख वक्तव्य बारकाईने तपासले तरी त्याची साक्ष मिळू शकते. हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र लिहून आपला खोटेपणा कबुल केलेला तो बहुधा देशातला पहिलावहिला संपादक असावा. जेव्हा त्याला एखादी व्यक्ती निर्दोष असल्याचे दिसते वा कळते; तेव्हा राजदीप त्या व्यक्तीला दोषी ठरवण्यासाठी आपली सर्व शक्ती व प्रतिष्ठा पणाला लावत असतो. गुजरातमध्ये सोहराबुद्दीन नावाच्या गुन्हेगाराचा चकमकीत मृत्यू झाला तर त्यात पोलिसांना व गृहमंत्री अमित शहांनाच आरोपी ठरवण्याचा आटापिटा याच राजदीपने केलेला होता. त्यावर एका अधिकार्याने हैद्राबादच्या हायकोर्टात दाद मागितली, तेव्हा सत्याला सामोरे जाण्याखेरीज राजदीपला पर्याय उरला नाही. अखेरीस कोर्ट शिक्षा ठोठावण्याची शक्यता दिसली, तेव्हाच शेपूट घालून याच राजदीपने आपण धडधडीत खोट्या बातम्या सांगत होतो आणि त्याच आधारावर बदनामीची मोहिम चालवित होतो अशी कबुली दिलेली आहे. प्रतिज्ञापत्रावर आपला खोटारडेपणा कोर्टाला लिहून देणारा अन्य कोणी संपादक मला तरी माहिती नाही. त्यामुळे त्यालाच इतकी अगत्याने रियाने मुलाखत दिली असेल, तर तोच तिच्या गुन्ह्याचा सर्वात महत्वाचा पुरावा आपण मानू शकतो.
आता जरा आपण त्या मुलाखतीकडे वळूया. गुरूवारी अचानक या मुलाखतीच्या जाहिराती वा प्रोमोज आजतक व इंडीया टुडेवर सुरू झाले आणि माध्यमांच्या क्षेत्रात खळबळ उडाली. पण प्रत्यक्ष मुलाखत प्रक्षेपित होण्यापुर्वीच सगळे पितळ उघडे पडलेले होते. टाईम्स नाऊ वाहिनीची नाविकाकुमार हिने ‘आजतक’चा बुरखाच फ़ाडून टाकला होता. ज्या मुलाखतीच्या जाहिराती चालू आहेत, ती खास मुलाखत रियाला द्यायची आहे, असे कुणातरी पीआर कंपनीकडून आपल्या सांगितले जात होते. थोडक्यात टाईम्सने ती मुलाखत घ्यावी व प्रक्षेपित करावी म्हणून पाठलाग चालू होता. त्याला तिथून दाद मिळाली नाही, तेव्हा ‘इंडिया टुडे’कडे रियाचा मोर्चा वळला. ह्या पीआर कंपन्या म्हणजे आजकाल नामवंतांच्या प्रसिद्धीसाठी पैसे मोजून प्रतिष्ठीतांच्या प्रतिक्रीयांची सोय सुविधा उपलब्ध करून देणार्या सेवा असतात. त्या कोणाच्या विरोधात वा बाजूने प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी अनेक पत्रकारांना आपल्या दावणीला बांधून असतात. आपण अनेक मुलाखती वा सुत्रांकडून आलेल्या बातम्या ऐकतो, तेव्हा त्यांचा प्रवाह अशाच पीआर कंपन्यांकडून आलेला असतो. मराठीत त्याला जनसंपर्क सेवा असेही संबोधले जाते. म्हणजे शक्यतो रियाची बाजू मुळातच सुशांतच्या न्यायासाठी किल्ला लढवणार्या वाहिनीवर मांडली जाण्याची धडपड चालू होती. कारण त्या न्यायासाठी टाईम्स नाऊ आणि रिपब्लिक यांच्यात सध्या जोरदार स्पर्धाच चालू आहे. पण अर्णब दाद देण्याची बिलकुल शक्यता नसल्याने नाविकासाठी गळ लावून बघण्यात आले असावे. पण यासारखा शिकारीचा सुगावा लागताच राजदीप तात्काळ दिल्ली सोडून मुंबईला पोहोचला आणि त्याने सुपारी उचलली. मात्र ती मुलाखत प्रत्यक्ष हवा निर्माण करून प्रभाव पाडण्यापुर्वीच बोभाटा झाला व त्यातली हवाच निघून गेली होती. म्हणून मग मुलाखतीचे प्रसारण झाल्यावर लगेच इतरांनी पोस्टमार्टेम करण्यापेक्षा आजतक व इंडिया टुडेलाच त्या मुलाखतीचा खुलासा देण्याची नामुष्की आली.
प्रसारण संपताच आपल्याच वाहिनीवरच्या त्या मुलाखतीचे पोस्टमार्टेम करायला राहुल कन्वल याला पुढे करण्यात आले. त्याने राजदीप व सुशांतच्या पित्याचे वकील विकास सिंग यांच्याशी चर्चा केली. तेव्हा विकास सिंग यांनी लगेच ही मुलाखत बोगस व दोस्ताना पद्धतीची व रियाला सोज्वळ म्हणून पेश करण्यासाठीच झाल्याचा आरोप करून टाकला. त्याचा कुठलाही खुलासा राजदीप देऊ शकला नाही. आपण सर्वप्रकारचे प्रश्न विचारले अशी सारवासारव राजदीपने खुप केली. पण दोन दिवस आधी फ़ेकलेल्या जाळ्यात राजदीप आपणच अडकला. दोन दिवसांपुर्वी त्याच विकास सिंगना राजदीपने आपल्या कार्यक्रमात बोलावलेले होते आणि जणू तो वकील नसून आरोपीच आहे, अशा थाटात त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केलेला होता. अजून तपास झालेला नाही; मग माध्यमातून असा खटला कशाला चालवला जातोय, असा थेट आरोप वकीलावरच केलेला होता. पण मी तुझ्या वाहिनीवर खटला चालवायला आलेलो नाही, तूच बोलावले म्हणून बाजू मांडायला आलोय. सहाजिकच माध्यमातला खटला तूच चालवत आहेस, अशी सणसणित चपराक विकास सिंग यांनी मारली व ते कार्यक्रमातून उठून गेले. याला राजदीपचा बेशरमपणा म्हणता येईल. युट्युबवर त्याचे चित्रणही उपलब्ध आहे. हाच राजदीप दोन दिवसांनी प्रत्यक्ष तक्रारीतल्या आरोपीशी किती सौजन्याने बोलतोय, त्याची तुलना कोणीही सहज करू शकतो. त्यामुळे रियाच्या मुलाखतीत राजदीपचा तोच उर्मटपणा कुठे गायब होता; असा प्रश्न विकास सिंग यांनी केला आणि ह्या संपादकाची बोबडीच वळली. असो, तो त्याच्या पत्रकारितेचा विषय आहे. पण असल्या पत्रकारितेमुळे इंडिया टुडे समुहही अजेंडा वा सुपारी पत्रकारितेला बळी पडल्याची भावना आता निर्माण झालेली आहे. सोशल मीडियातून या वाहिनी वा वृत्तसमुहावर बहिष्काराची भाषा सुरू झालेली आहे. तिचा भडका उडायला वेळ लागणार नाही. आधीच आजतक वाहिनीच्या स्पर्धेत नवा रिपब्लिक भारत चॅनेल उतरलेला आहे आणि दोनच आठवड्यापुर्वी त्याने आजतकला शह दिलेला आहे. त्यातच रियाची ही राजदीपने केलेली ‘सरबराई’ त्या वृत्तसमुहाला गर्तेत घेऊन जाणारी आहे.
एखाद्या वर्तमानपत्र वा व्यवसायाला, प्रतिष्ठीत व्यक्तीला आपली समजातील पत संपादन करायला वर्षानुवर्षे खर्ची घालावी लागत असतात. पण ती पत किंवा विश्वास सातत्याने संभाळावा लागत असतो. चार दशकापुर्वी इंडिया टुडे नावाचे पाक्षिक सुरू झाले, तेव्हा त्यांच्या दर्जेदार प्रबोधनपर पत्रकारितेने त्याचे एका सन्मान्य वृत्तसमुहात रुपांतर झाले. ती विश्वासार्हता आता पणाला लागलेली आहे. आधीच या नव्या क्षेत्रात हिंदीतली आजतक वाहिनी आरंभ करून हा समुह इंग्रजीत अवतरला. त्याची पत्रकारिता विश्वासार्ह वाटली म्हणून प्रेक्षक जोडलेले गेले होते. नव्या धरसोड वा जनमताला धुडकावून अजेंडा चालवणार्या पत्रकारितेने ती चार दशकांची तपस्या आता पणास लागली आहे. म्हणून तर इंग्रजीत बाजी मारून हिंदीत आलेल्या रिपब्लिकने आजतकलाही मागे टाकून दाखवले. आपल्या खास मुलाखतीचा पंचनामा आपणच करण्याची नामुष्की या वृत्तसमुहावर आली. त्याला व्यावसायिक आत्महत्याच म्हटले पाहिजे. अर्थात राजदीपसाठी तो व्यापार आहे. त्याने यापुर्वी एनडीटिव्ही किंवा न्युज १८ ह्या वाहिन्या धुळीस मिळवून झालेले आहे. पण त्यात त्याचे काही तरी योगदान होते. सगळीकडून हाकलला गेल्यावर त्याने इंडिया टुडेमध्ये आश्रय घेतला आहे. त्याला या समुहाच्या प्रतिष्ठेशी काही घेणेदेणे नाही. पण त्याच्या आगावूपणाने लोकमत बिघडले तर या वृत्तसमुहाचाही एनडीटीव्ही व्हायला वेळ लागणार नाही. भारतात टिव्ही पत्रकारिता सुरू करणार्या त्या समुहाचे नामोनिशाण आज उरलेले नाही. त्याला कोणा भांडवलशहा वा राजकारण्याने संपवण्याची गरज भासली नाही. अजेंडा व सुपारीबाजीने आधी विश्वासार्हता गेली. नंतर उत्तम वा निदान सुसह्य पत्रकारिता करणारे पर्याय आले आणि त्या गर्दीत हा एनडीटिव्ही समुह उध्वस्त होऊन गेला. सुशांत प्रकरणातील आरोपीचे या मुलाखतीतून उदात्तीकरण करताना म्हणूनच आजतक व इंडिया टुडेने मात्र आत्महत्या केली, असेच म्हणावे लागेल. कारण सोशल मीडियातून आताच आवाज उठू लागले आहेत आणि अन्य वृत्तसमुहांनी त्यालाच खतपाणी घातले; तर इंडीयाटुडेची प्रतिष्ठा धुळीस मिळायला वेळ लागणार नाही.
No comments:
Post a Comment