गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी अमेरिकेतील भारतीयांसमोर थेट प्रक्षेपणातून भाषण करताना दहा वर्षापुर्वीचे एनडीए सरकार व आजच्या युपीए सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला. त्यातून त्यांनी वाजपेयी सरकारच्या कारकिर्दीत कशी आर्थिक प्रगती चालू होती आणि युपीए सरकारने देशाला कसे अधोगतीला नेले आहे; त्याचा पाढा वाचला. चोविस तास उलटण्यापुर्वी विद्यमान अर्थमंत्री चिदंबरम यांनी मोदींना खोटे ठरवण्यासाठी गेल्या दहा बारा वर्षाची आर्थिक आकडेवारीच सादर केली. त्यातून आजही कशी प्रगतीच चालू आहे आणि ती प्रगती वाजपेयी सरकारपेक्षा कशी काकणभर सरसच आहे; त्याचा खुलासा केलेला आहे. थोडक्यात अजून लोकसभा निवडणूकीची घोषणा झालेली नसली, तरी दोन्ही प्रमुख पक्षात त्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे. तसे नसते तर चिदंबरम यांच्यासारख्या जाणत्या अर्थमंत्र्याने मोदींच्या आरोपांची दखल सुद्धा घेतली नसती. ती ज्या कारणास्तव घेतली, त्यातूनच आज राजकारणाचे वारे कसे व कोणत्या दिशेने वहात आहेत; त्याची साक्ष एका ज्येष्ठ युपीए मंत्र्याने दिलेली आहे. तुम्ही मोदी विरोधात कितीही अपप्रचार करा वा आरोप करा; पण तेच खरे आव्हान असल्याने त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. कारण मोदीवर विश्वास ठेवणारा एक मोठा वर्ग भारतीय लोकसंख्येत निर्माण झालेला आहे. त्याला दिग्विजय सिंग यांच्यासारख्या वाचाळ नेत्याने शिव्याशाप देऊन संपवता येणार नाही, की पराभूत करता येणार नाही; याचीच ग्वाही चिदंबरम यांनी दिलेली आहे. धर्मांधता व जातियवादाच्या आरोपातून मोदीला संपवणे अशक्य झाल्यावर, आता त्याला खोटे पाडण्याची मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. चिदंबरम यांनी त्याचाच निर्वाळा यातून दिलेला आहे.
पहिली गोष्ट म्हणजे चिदंबरम हे अर्थविषयातले जाणकार आहेत. तेव्हा मोदी दिशाभूल करीत असतील, तर त्यांनी दुर्लक्ष करायला हवे होते. मोदी जसे कॉग्रेसच्या कुणाही नेत्या प्रवक्त्याने कितीही भयंकर आरोप केला, तर त्याकडे साफ़ काणाडोळा करतात. आणि मनमोहन सिंग, सोनियाजी व राहुल यांची मोदींना उत्तर देण्य़ाची हिंमत नाही. किंबहूना मोदींनी तसा देखावा यशस्वी रितीने उभा केलेला आहे. तो चिदंबरम भेदू शकणार नाहीत. त्यासाठी कॉग्रेसच्या तीन प्रमुख नेत्यांनाच मैदानात यावे लागेल. कारण आकड्यांचा खेळ सामान्य लोकांना कळत नसतो किंवा त्याच्याशी कर्तव्य नसते. सामान्य माणसाला जे अनुभव येत असतात, त्याला सुसंगत अशा गोष्टी ऐकायच्या असतात व समजू शकतात. मोदी नेमका त्याचाच लाभ उठवत असतात. त्यामुळेच लोकांपर्यंत जाऊन भिडणे महत्वाचे आहे. दुसरी तितकीच महत्वाची बाब म्हणजे लोकांचा विश्वास, जो आजच्या युपीए सरकारने व कॉग्रेसने साफ़ गमावला आहे. खरे तर त्यामुळेच त्या सरकारला जो कोणी आरोपीच्या पिंजर्यात उभा करील; त्याचे ऐकायला लोकांना आवडत असते. मोदी ते नेमके ओळखून आरोप करतात. त्यात तथ्य किती याला परिणामांच्या दृष्टीने महत्व नाही, हे मोदींनाही ठाऊक आहे. म्हणूनच अर्थकारणाचा जाणकार नसून मोदी त्यावरही बोलतात. तेव्हा जनतेला बोचणार्या कुठल्या गोष्टी आवडतील, पटतील व त्यासाठीचे आकडे कुठले; ते त्यांना कोणीतरी पद्धतशीर समजावून देत असणार. त्याचा प्रतिकार नुसत्या आकड्यांनी होऊ शकत नाही. कारण दुखावलेल्या व गांजलेल्या सामान्य माणसाला सत्यापर्यंत पोहोचण्यामध्ये स्वारस्य नाही, तर त्याच्या गांजलेपणाच्या विरोधात खंबीरपणे बोलणारा कोणी तरी हवा आहे आणि मोदी तीच भूमिका पार पाडत आहेत.
तिसरी बाब तितकीच नेमकी व महत्वाची आहे. मोदी सामान्य माणसाला उमगू शकेल व पटू शकेल; अशा भाषेत चुचकारून बोलतात. आपले मुद्दे अर्थशास्त्री खोटे पाडू शकतील, याची त्यांना अजिबात फ़िकीर नाही. पत्रकार, बुद्धीमंत, माध्यमे व जाणकारांना आपले मुद्दे पटवण्याबद्दल मोदी अजिबात गंभीर नाहीत. कारण अशा लोकांनी कितीही पाठ थोपटली; म्हणून आपण निवडणुका जिंकू शकत नाही, याची मोदींना पुरेपूर खात्री आहे. त्याचप्रमाणे आपला खोटेपणा अशा विद्वानांनी उघड केल्यानेही आपण निवडणूका हरू शकत नाही; हे सुद्धा मोदी पक्के जाणून आहेत. उलट लोकांना हवे ते बोलून जनमानस जिंकताना आपल्या विरोधात बोलणारे लोकांपासून दुरावण्याचा दुसरा डाव मोदी खेळत असतात. म्हणूनच माध्यमांनी तात्काळ मोदींना खोटे पाडणार्या अर्थमंत्र्याच्या खुलाश्याला कितीही ठळक प्रसिद्धी दिली, म्हणून मोदींचे काहीही बिघडणार नाही. किंबहूना मोदींनी तसा अंदाज आधीच बांधलेला असतो. म्हणूनच शनिवारच्या भाषणाच्या अखेरीच मोदी म्हणाले, ‘आता माझे भाषण संपताच भारतीय माध्यमातून मला खोटे पाडायची स्पर्धा सुरू होईल.’ म्हणजे चिदंबरम यांच्यापासून माध्यमांपर्यंत आपल्या विरोधकांकडून मोदींना काय अपेक्षित आहे; ते लक्षात येऊ शकेल. या तमाम प्रभावी विरोधकांनी सतत आपली निंदानालस्ती करावी व त्यातून आपण लोकांची सहानुभूती गोळा करावी; ही मोदींची गेल्या काही वर्षातली रणनिती राहिलेली आहे आणि त्यात त्यांचे विरोधक इमानदारीने भाग घेत असतात. राहिला सवाल मोदी चिदंबरम यांनी सादर केलेल्या आकडेवारीचा. त्यातून दोघेही जितके खरे, तितकेच लबाड बोलत आहेत, याबद्दल मनामध्ये शंका बाळगण्याचे कारण नाही. त्यालाच तर राजकारण म्हणतात.
No comments:
Post a Comment