दूर आफ़्रिका खंडातील केनियाच्या राजधानीत नैरोबी येथे एका मॉलमध्ये मुंबईसारखाच जिहादी हल्ला झाला आणि तिथे ओलिसांना त्यांचा धर्म विचारूनच ठार मारण्यात आले. त्यामुळे जणू काही नवेच घडले आहे, असे भासवण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचे कारण स्पष्ट आहे. ‘दहशतवादाला धर्म नसतो’, हे थोतांड या हत्यांमुळे उघडे पडले आहे. तसे बघितल्यास त्यात नवे काहीच नाही. पाच वर्षापुर्वी मुंबईत असाच हल्ला कसाब टोळीने घडवला होता. तेव्हाही त्यांना त्या हिंसाचारासाठी फ़ोनद्वारे बारीकसारीक मार्गदर्शन करणारे सुत्रधार होते, त्यांनी ओबेरॉय वा ताज हॉटेलमध्ये तावडीत सापडलेल्या ओलिसांपैकी मुस्लिमांना पळून जाण्याची संधी देण्यासंबंधी मार्गदर्शन केल्याचे ध्वनीमुद्रण आपण ऐकलेले आहे. भारतीय गुप्तचर विभागाने त्याचे रेकॉर्डींग केल्याच्या टेप्स वाहिन्यांनी ऐकवलेल्या आहेत. तेव्हा धर्माच्या आधारावरच व मार्गदर्शनानेच जिहादी हिंसा चालते; हे सत्य अजिबात नवे नाही. जेव्हा नैरोबीमध्ये हे हत्याकांड चालू होते, तेव्हाच पाकिस्तानच्या पेशावर शहरात एका चर्चमध्ये दोन स्फ़ोट घडवून पाऊणशे खिश्चनांची सामुहिक हत्या करण्यात आलेली आहे. त्यामुळेच दहशतवादाला धर्म नसतो, हे पाखंड आता उघडे पडलेले आहे. कारण दहशतवाद आणि जिहादमध्ये जमीन अस्मानाचा फ़रक आहे. राजकीय कारणास्तव हिंसाचार होतो, त्याला दहशतवाद म्हणतात. जिहाद ही बाब राजकीय नसून ती धार्मिक स्वरूपाची आहे. त्यामध्ये धर्माच्या प्रस्थापनेसाठी हिंसा होत असते आणि तेच जगात सर्वत्र घडते. ते दिसते, कानी पडते. पण आपल्याच मुर्खपणामुळे किंवा आपल्या डोक्यात भरवलेल्या मुर्खपणामुळे आपण जिहादला दहशतवाद असे नाव देऊन स्वत:ची फ़सवणूक करून घेत असतो. म्हणून व्हायचे परिणाम टाळता येत नसतात.
ज्यांची नैरोबीच्या हल्ल्यातून नशीबाने सुटका झाली, त्यांनी आतमध्ये ओलिसांची काय अवस्था आहे, त्याचे बाहेर वर्णन केले. त्यातून ही बातमी थेट सर्वत्र पसरली. तिथे घुसलेले जिहादी प्रत्येकाला धर्म विचारून व त्याची खातरजमा करून माणसांना मारत होते. आपण मुस्लिम आहोत असे सांगुन कोणाला जीव वाचवणेही शक्य नव्हते. त्यांना इस्लामविषयक अन्य प्रश्न विचारून खरेच मुस्लिम आहेत वा नाहीत, याची खातरजमा केली जात होती. आणि त्यात नवे काहीच नाही. कारण जिहादी धर्मासाठी व धर्माच्या शिकवणूकीनेच प्रवृत्त झालेले असतात. कसाबही नार्को चाचणीत काय सांगत होता? सुखरूप माघारी जायची त्याची कल्पनाच नव्हती. इथेच हिंसा करताना व बिगरमुस्लिमांना ठार मारताना मरून त्याला जन्नतमध्ये जायचे होते. त्याला तशीच धर्माची शिकवण देऊन ‘धर्मकार्यासाठी प्रवृत्त’ केलेले होते. सवाल त्याला मिळालेली शिकवण योग्य की अयोग्य असा नसून, तो कशामुळे प्रेरीत झाला असा आहे. कोणत्या प्रेरणेच्या आहारी जाऊन त्याने असे डझनावारी लोकांचे बळी घ्यावे किंवा नैरोबीत त्या जिहादींनी धर्मासाठी बिगरमुस्लिमांना जीवे मारावे; हा गंभीर सवाल आहे. त्याचे उत्तर दहशतवादला धर्म नसतो, असे असूच शकत नाही. तर जिहाद हा दहशतवाद आहे, की धार्मिक हिंसाचार आहे, असा सवाल आहे. तुम्हाला योग्य उत्तर हवे असेल, तर चुकीचा प्रश्न विचारून चालत नाही. चुकीची प्रणाली वापरून चालत नाही. जिहादला दहशतवाद ठरवणे हीच मुळात फ़सवणूक आहे. तुम्ही त्यात फ़सलात, की पुढल्या हिंसक संकटाचे बळी व्हायला पर्याय नसतो. मारणारे मुंबईत व नैरोबीत कोणीही असोत, त्यांच्यापेक्षा तुम्हाला त्याबाबत गाफ़ील ठेवून त्या मृत्यूच्या सापळ्य़ात ढकलून देणारे खरे गुन्हेगार असतात.
म्हणूनच अशा मारल्या जाणार्यांना अंधश्रद्धेचे बळी म्हणणे योग्य ठरेल. मग कुलाब्याच्या नरीमन हाऊसमध्ये मारले गेलेले ज्य़ु प्रवासी असोत किंवा नैरोबीच्या मॉलमध्ये धर्माचे नाव सांगून जीवाला मुकलेले बिगरमुस्लिम असोत; आपण मुस्लिम नाहीत म्हणून जिहादसाठी बळीचे बकरे आहोत, हे वास्तव त्यांना ठाऊक नव्हते, म्हणून ते बळी गेले आहेत. सोमालीयामध्ये जिहाद चालू आहे. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी केनियाच्या सेनादलाने पुढाकार घेतला म्हणून सूडभावनेने त्या देशाच्या राजधानीमध्ये हे हत्याकांड करण्यात आले. त्यात मारले गेलेल्या बिगरमुस्लिमांचा संबंधच काय? त्यांचा गुन्हा काय? किंवा त्यांना अशा प्रकारे मारायला आलेल्या त्या जिहादींचा तरी सोमालिया वा केनियाशी संबंध काय? हे बहुतेक जिहादी हल्लेखोर युरोप वा अमेरिकेतून आलेले होते. म्हणजेच त्यामध्ये कुठल्या देश वा राजकीय हेतूचाही संबंध येत नाही. केवळ धर्म हाच त्या हल्लेखोरांना एकत्र आणणारा दुवा आहे. अधिक त्यात बळी पडलेल्यांकडे बघा. त्यातल्या कुणाचा राजकारण वा कुठल्या सरकारी धोरणाशी संबंध आहे काय? केनियाचे नागरिक असलेल्या मुस्लिमांनाही त्यात बळी पडावे लागलेले नाही. केनियावर सूड घ्यायचा असेल, तर त्याच देशाचे नागरिक असलेल्या मुस्लिम ओलिसांना मारायला हवे होते. परंतु तसे घडलेले नाही. मारणारे मुस्लिम आणि मरणारे बिगर मुस्लिम असाच मामला नाही काय? मग धर्माचा संबंध नाही, असे कोण म्हणू शकेल? दहशतवादाला धर्म नसतो, हे अर्धसत्य आहे. किंबहूना ती फ़सवणूक आहे. कारण दहशतवाद आणि जिहाद यात काडीमात्र साम्य नाही. जिहादला धर्म असतो. म्हणूनच नैरोबीत मारले गेले ते दहशतवादाचे बळी नाहीत तर ‘दहशतवादाला धर्म नसतो’ या अंधश्रद्धेचे बळी आहेत.
No comments:
Post a Comment