Tuesday, December 3, 2013

अस्तनीतले निखारे?




  पाच वेळा लोकसभेवर निवडून आलेले व पहिल्या पिढीचे शिवसैनिक असलेले मोहन रावले, यांना पक्षातून हाकलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अस्तनीतले निखारे अशा शब्दाचा वापर केला आहे. त्यामुळे जुन्या दोन घटना आठवल्या. ठाण्याची महापालिका झाल्यावर पहिल्या निवडणूकीतच सेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या, तरी बहूमत मिळाले नव्हते. पण अपक्षांच्या मदतीने सतीश प्रधान यांना महापौरपदी बसवण्यात सेनेने यश मिळवले होते. पण ते पद पुढल्या काळात टिकवणे साधले नव्हते. पुढल्याच वर्षी सेनेच्या उमेदवाराचा पराभव करून आजचे विधान परिषदेचे उपाध्यक्ष वसंत डावखरे ठाण्याचे महापौर झाले होते. त्यांच्या निवडीत सेनेची एकदोन मते फ़ुटली होती. त्यामुळे शिवसेनाप्रमुख कमालीचे विचलीत झाले होते. पण कानपिचक्या देऊन त्यांनी ठाण्यातल्या शिवसेनेला क्षमा केली होती. मात्र पुढल्या वर्षी त्याचीच पुनरावृत्ती होऊन सेनेची मते फ़ुटली; तेव्हा त्यांनी धाडसी निर्णय घेतला होता. सेनेच्या तमाम नगरसेवकांनी आपल्या पदाचे राजिनामे द्यावेत, असा आदेश त्यांनी जारी केला होता. तेव्हा ठाण्याच्या काही मान्यवर पत्रकारांनी त्यात मध्यस्थी करायचा पवित्रा घेतला होता. पण आपल्याला भेटायचे असेल, तर सेनेच्या नगरसेवकांनी किंवा त्यांच्या पाठीराख्यांनी राजिनामे देऊनच मातोश्रीवर यावे, मगच बोलता येईल अशी अट त्यांनी घातली होती. पुढे पालिकेची मुदत संपण्यापर्यंत पालिकेत कॉग्रेसची एकमुखी सत्ता होती. म्हणून शिवसेना ठाण्यात पांगळी झालेली नव्हती. पाच वर्षाची मुदत संपल्यावर सेनेने तिथे स्वत:चे बहूमत मिळवून आपल्या बळावर महापौर निवडून आणला होता. इतकेच  नव्हेतर ठाणे शहरात सेनेने आपला आमदारही निवडून आणला होता. बंडाचा निचरा करण्याची साहेबांची ही पद्धत होती.

   दुसरा किस्सा १९९८ सालचा आहे. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी कारभार पहात होते. त्यांच्याविषयी आमदारात नाराजी दिसल्यावर त्यांनी आपल्या या जुन्याजाणत्या सहकार्‍याकडून राजिनामा घेतला होता. बहुधा आशिष चेंबुरकर नावाच्या शिवसैनिकाच्या हाती पत्र देऊन पंतांकडे धाडले होते. आपल्या पदाचा राजिनामा राज्यपालांकडे देऊनच मातोश्रीवर भेटायला या, असा आदेश दिला होता. पंतांनीही क्षणाचा विलंब न लावता वर्षा बंगल्यावरचा गाशा गुंडाळून राजिनामा दिला होता. त्याच्याही आधी बावीस वर्षापुर्वी भुजबळांनी पंतांच्या विरोधात काहुर माजवून सेनेत बंड केले, तेव्हा त्या आमदारांच्या संख्येची साहेबांनी पर्वा केली नव्हती. पण भुजबळांना हाकलताना त्यांनी पंतांनाही विधानसभेतील विरोधी नेतापदावरून तात्काळ बाजूला केलेले होते. अशा बाळासाहेबांना त्याच शिवसेनेत पुढल्या काळात झालेले उठाव किंवा बंडखोरीचा बंदोबस्त करता आला नाही, यावर कोणी विश्वास ठेवायचा? नारायण राणे असोत किंवा राज ठाकरे असोत, त्यांनी जेव्हा शिवसेनेच्या नेतृत्व किंवा निर्णय प्रक्रियेच्या विरोधात आवाज उठवला; तेव्हा शिवसेनाप्रमुख हतबल झालेले दिसले. त्याचे कारण सेनेचा कारभार त्यांच्याच नावाने चालू असला, तरी निर्णय घेण्याचे अधिकार त्यांच्यापाशी राहिलेले नव्हते, याचीच ती साक्ष होती. ज्यांना त्यांनी मोठे केले, नेते व मान्यवर बनवले; असे शिवसैनिक त्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊ शकत नव्हते. पण आपल्यावर लादल्या जाणार्‍या इच्छा किंवा आदेश साहेबांचे नाहीत, अशी शंका त्या पुढल्या काळातील बंडाची प्रेरणा होती. म्हणूनच त्यापैकी कोणी कधी आपल्या नाराजीचे खापर सेनाप्रमुखांच्या नावे फ़ोडू शकला नाही. रावले आजच्या नेतृत्वाला दोष देत आहेत, तर त्याची कारणमिमांसा म्हणूनच मोलाची ठरते.

   राणे यांनी बंड केल्यावर रंगशारदा या सभागृहात झालेल्या बैठकीतून साहेबांना अर्धवट काढता पाय घ्यावा लागला होता. तिथे त्यांचे निष्ठावंत शिवसैनिकही त्यांचे संरक्षण करू शकले नाहीत, इतकी नामुष्की सेनेवर आली. आणि ती नामुष्की करणारे नारायण राणेच अखेरच्या क्षणी साहेबांची भेट घेता आली नाही, म्हणून आजही अश्रू ढाळतात. नेत्यावरील अनुयायाची निष्ठा आणि साहेबांवरील अशा शिवसैनिकांचे गाढ प्रेम, यातला फ़रक म्हणूनच लक्षात घ्यावा लागतो. अन्य पक्षातून बाजूला झालेले नेते आणि शिवसेनेतून नाराज होऊन बाहेर पडलेल्यांमध्ये फ़रक करावा लागतो. साहेबांनी बेशिस्तीला माफ़ केले नाही; तरी ज्यांच्यावर बडगा उगारला, त्यांना कधी अन्याय वाटला नाही. आजच्या सेनानेतृत्वाला त्याचेच भान उरलेले दिसत नाही. पंतांचा मुख्यमंत्री पदाचा राजिनामा घेतला तरी त्यांची जाहिर बेअब्रू होणार नाही याची काळजी साहेबांनी घेतली होती. ते पथ्य आजचे सेनानेतृत्व पाळू शकले आहे काय? आमदार किंवा सत्ता यापेक्षा आपल्या कार्यकर्त्याला व त्याच्या निष्ठेला साहेबांनी दिलेला मान आजची शिवसेना विसरलेली दिसते. ज्या अनुयायी व कार्यकर्त्याच्या खांद्यावर उभे राहून नेता उभारी घेतो, त्या नेतृत्वाचे सहाय्यक व मदतनीस निर्णयप्रक्रियेत महत्वाचे असतात. पण त्यांच्यामुळे नेतेपद मिळत नसते. नेतृत्वाची ताकद कार्यकर्त्यांच्या निष्ठेतून साठत व वाढत असते. त्या निष्ठाच पक्षाचे व नेत्याचे बाहूबल असते. त्यांनाच अस्तनीतले इखारे म्हणायचे काय? ज्या ज्वलंत निष्ठा पक्षाची उर्जा असतात त्याच निष्ठेला लाथाडून मदतनीस सहाय्यकांचे स्तोम माजले; मग नेतृत्वाला उतरती कळा लागते. प्रेम करणारेच नाराज होतात, त्यांना अस्तनीतले निखारे ठरवले मग आपली शक्तीच शत्रू होऊन जाते. कारण सत्तेचे लाभ उठवणारे अस्तनीतले निखारे असतात. त्यांच्यासाठी निष्ठेला शत्रू मानले मग धुराचा आगडोंब व्हायला वेळ लागत नाही.

1 comment:

  1. भाऊ असे सविस्तर विश्लेषण फक्त तुम्हीच करू शकता.त्यामुळेच आमच्या सारखे वाचक तुमच्या सत्यनिष्ठ लेखाची वाट पाहत असतो.

    ReplyDelete