तेजपाल व टहलका प्रकरण गाजत असताना कॉग्रेसने लावून धरलेले अमित शहा यांच्यावरील आरोप मागे पडले होते. त्यांनी गुजरातचे गृहमंत्री असताना कुणा तरूणीवर पोलिसांकरवी पाळत ठेवली आणि त्यामुळे त्या अज्ञात मुलीच्या खाजगी जीवनावर अतिक्रमण केले; असा कॉग्रेसचा आक्षेप आहे. वास्तविक त्या मुलीच्या पित्याने आपल्याच सांगण्यावरून मुलीवर पोलिसांनी सुरक्षेसाठीच पाळत ठेवली होती; असा खुलासा केलेला आहे. पण अशाप्रकारे पाळत ठेवणे वा पाठलाग करणे गुन्हा असून त्यासाठी गुजरातची शासकीय यंत्रणा वापरली गेली, हा सुद्धा आणखी एक आक्षेप आहे. कुठूनही भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना बदनाम करणे व त्यांना गोत्यात आणणे; हा कॉग्रेसचा गेल्या वर्षभरातला कार्यक्रम राहिला आहे. पण वास्तविक खाजगी जीवनातील अतिक्रमणाचा आरोप करताना जहिर आरोपबाजी करून कॉग्रेसच तिच्या जीवनात हस्तक्षेप करीत आहे. मात्र आठवडाभर गदारोळ करूनही उपयोग झाला नाही आणि अकस्मात तेजपाल यांच्या पापाचा घडा फ़ुटला; तेव्हा कॉग्रेसला माघार घ्यायची वेळ आली. कारण ज्या मुलीसाठी त्या पक्षाने गदारोळ चालविला होता, तिची मुळातच तक्रार नाही. शिवाय जे काही घडले, त्याचा सबळ पुरावा कोणी समोर आणू शकलेले नाही. त्यामुळेच ओरडाआरडा करण्यापलिकडे कॉग्रेसला काही करता आले नाही. पण भाजपा वा मोदींना अडचणीत आणण्यासाठी ज्याचा मोहर्याप्रमाणे वापर कॉग्रेसने गेल्या दहा वर्षात केला होता; असा एक मान्यवर संपादकच भाजपाच्या जाळ्यात अडकला होता. त्याच्या तमाशापुढे अमित शहा प्रकरण फ़िके पडले. तरी केंद्रामार्फ़त पाळत प्रकरणाची चौकशी करण्याचा घाट घातला गेला होता. आता तोही फ़सला आहे.
सोनिया गांधी यांची एक अशी अडचण आहे, की त्यांना बुद्धीमान व स्वत:ची अक्कल वापरू शकणारी माणसे चालत नाहीत. त्यामुळेच महत्वाच्या पदावर निर्बुद्ध माणसे नेमावी लागतात. अगोदर शिवराज पाटिल व आता सुशीलकुमार शिंदे त्यासाठीच गृहमंत्री होऊ शकले. या पदाचा भार घेतल्यापासून शिंदे यांना वारंवार माफ़ी तरी मागावी लागते आहे किंवा शब्द तरी फ़िरवावे लागते आहेत. आता पाळत प्रकरणातही नेमके तेच झाले आहे. सीबीआय वा केंद्राने त्या प्रकरणाची चौकशी करणे शक्य नाही, कारण कायदा सुव्यवस्था हा राज्यसरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. खुप ओरडा झाल्याने विरोधकांच्या समाधानासाठी गुजरात सरकारने चौकशी आयोग नेमला आहे. पण त्यावर कॉग्रेसचा विश्वास नाही. म्हणून त्यांना केंद्रामार्फ़त चौकशी हवी होती, त्यासाठीच मग राष्ट्रपतींना विविध महिला संघटनांतर्फ़े निवेदन सादर करण्यात आले. त्यांनी ते केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवून दिले. झाले, तमाम मोदी विरोधक त्यातून सुखावले, आता मोदी फ़सलाच, अशा बातम्याही रंगल्या. कारण राष्ट्रपतींनी निवेदन पाठवल्यावर आपल्या अधिकार्यांचा सल्ला घेऊन आपली औकात समजून घेण्याआधीच, शिंदे यांनी तात्काळ प्रकरणाचा छडा लावूच अशी गर्जना करून टाकली. मुंबईत ही डरकाळी फ़ोडून शिंदे सरकार दिल्लीत दाखल झाले आणि त्यांच्याच अधिकार्यांनी त्यांना लक्ष्मणरेषा दाखवून दिली. मुंबईतले शिंदे दिल्लीत पोहोचले आणि त्यांना कायदा सुव्यवस्था राज्याच्या अखत्यारीत असल्याचा नवा शोध लागला आणि आपण चौकशी करू शकत नसल्याचे त्यांनी सांगून टाकले. आपल्या साध्या मराठी भाषेत याला शेपूट घालणे म्हणतात. मग प्रश्न असा पडतो, की शिंदे यांना मुंबईत असताना आपले अधिकार ठाऊक नव्हते काय?
पहिली बाब म्हणजे शासकीय यंत्रणेचा वापर मोदी यांनी मुख्यमंत्री असताना आपल्या कुणा परिचिताला अवैध मार्गाने संरक्षण देण्यासाठी केला हा आक्षेप आहे. त्यासाठी वैधतेने आदेश देण्यात आले नाहीत, असे म्हटले जाते. पण मुळात एका तरूण मुलीशी मोदींचे गैरलागू संबंध असल्याची अफ़वा पसरावी, असाच या गौप्यस्फ़ोटाचा उद्देश होता. तो फ़सल्यावर पाळतीच्या वैधतेचा मुद्दा पुढे करण्यात आला. त्यालाही फ़ारशी सनसनाटी मिळाली नाही; तेव्हा त्याचा स्पष्ट उल्लेख प्रदीप शर्मा नावाच्या निलंबित सनदी अधिकार्याच्या प्रतिज्ञापत्रातून करण्यात आला. गुजरातमध्ये सत्ताधार्यांकडुन दुखावलेल्या अधिकार्यांची कतारच कॉग्रेसच्या दारात लागलेली आहे. त्यांच्याकडून मोदींना गोत्यात आणायचे डावपेच मागल्या दहा वर्षात अखंड चालू आहेत. प्रत्येक बाबतीत तोंडघशी पडूनही कॉग्रेसचे पुरते समाधान झालेले नाही. म्हणूनच हे नवे नाटक सुरू आहे. त्याची न्यायालयात डाळ शिजली नाही, तेव्हा राष्ट्रपतींमार्फ़त डाव खेळला होता, तोही आता फ़सला आहे. मात्र असे डाव खेळताना आपलेच वरीष्ठ मंत्री तोंडघशी पडत आहेत, एवढेही भान कॉग्रेसनेत्याना उरलेले नाही. मोदी यांच्या विरोधात राजकारण करणे हा कॉग्रेससह सर्वच पक्षांचा घटनादत्त अधिकार आहे. पण राजकारण आणि आळ घेऊन बदनामीचे डाव खेळणे, यात मोठा फ़रक असतो. मोदींना राजकारणात पराभूत करणे अशक्य वाटल्याने बदनामीचे खेळ दिर्घकाळ चालले. त्यातून तो माणुस अधिकच लोकप्रिय होत गेल्यावर तरी कॉग्रेसने आपल्या डावपेचांचा नव्याने विचार करायला हवा. पण विनाशकाले विपरित बुद्धी म्हणतात, तशीच कॉग्रेसची स्थिती झाली आहे. त्यात बिचार्या शिंदे वा अन्य नेत्यांना मात्र हकनाक तोंडघशी पडावे लागते आहे. ज्यांचे डाव त्यांनाच पेचात अडकावे लागते आहे
No comments:
Post a Comment