गेला महिनाभर राजधानी दिल्लीत पहिल्याच निवडणूकीत नेत्रदीपक यश मिळवणार्या आम आदमी पक्षाचे अहोरात्र वाहिन्यांवरू्न कौतुक चालले आहे. इतके कौतुक, की दिल्लीपेक्षा मोठ्या अशा अन्य तीन राज्यातही तेव्हाच निवडणूका होऊन तीन नव्या मंत्रीमंडळांचा शपथविधी पार पडला; त्याच्याही बातम्या देण्य़ाचे भान कुठल्या वाहिनीला उरलेले नव्हते. राजस्थानात वसुंधराराजे दुसर्यांदा, मध्यप्रदेशात शिवराजसिंग चौहान आणि छत्तीसगडमध्ये डॉ. रमणसिंग तिसर्यांदा मुख्यमंत्री झाले. पण काही मिनिटांचे त्याचे चित्रण दाखवून त्या तीन मोठ्या राज्यांच्या तोंडाला वाहिन्यांनी पाने पुसली. तिथे नव्या मंत्रीमंडळात कोणाला वगळले वा कोणाची नव्याने वर्णी लागली; याचेही वृत्त देण्याची कोणाला गरज वाटली नाही. त्यापेक्षा दिल्लीच्या मुख्यमंत्र्याने सुरक्षाव्यवस्था वा बंगला गाडी नाकारण्याचे नाटक केले, तर त्याची नक्कल अन्य कोणा मुख्यमंत्र्याने केली; तेच रंगवून सांगण्यात वाहिन्यांचे पत्रकार धन्यता मानत होते. दिल्लीत केजरीवाल यांच्या रुपाने इतका प्रामाणिक माणूस मुख्यमंत्री झाला, की पुराणकथेतला राजा हरिश्चंद्रही त्याच केजरीवालांचा फ़ोटो उशाखाली ठेवून झोपत होता, एवढेच सांगायचे बाकी राहिले होते. इमानदारी म्हणजे आम आदमी पक्ष आणि त्याच्याशी संबंध नसेल, तो प्रत्येकजण बेईमान अशीच जणू गेल्या संपुर्ण महिन्याभरातली मानसिकता होती. पण आता त्या इमानदारीची लक्तरे त्यांच्यातलेच अन्य इमानदार वेशीवर आणून टांगू लागले आहेत. किंबहूना आपल्या इमानदारीच्या शपथा घेतानाच केजरीवाल किती धडधडीत खोटे बोलू शकतात, त्याचे त्यांनीच पुरावे निर्माण करून ठेवले आहेत. त्यामुळे केजरीवाल व ‘आप’नेत्यांच्या खोटेपणाचा शोध घेण्य़ासाठी कुठला आयोग नेमायचीही गरज उरलेली नाही. इतक्या या आधुनिक हरिश्चंद्रांनी करामती करून ठेवल्या आहेत.
या पक्षाचे कॉग्रेसच्या पाठींब्यावर सत्तारुढ झालेले सरकार अस्तित्वात येण्याच्या दोन दिवस आधी विनोदकुमार बिन्नी नामक त्यांचाच आमदार केजरीवाल यांच्या घरातून बैठकीतून उठून तरातरा निघून गेला गेला होता. तेव्हा तो मंत्रीपद नाकारल्याने नाराज असल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. मग मध्यरात्री दोन ‘आप’नेते त्याच्या घरी पोहोचले आणि पहाटे साडेतीन वाजेपर्यंत त्याची समजूत घालून नाराजीवर ‘इमानदारी’चा पडदा टाकण्यात आला. त्या अवेळी तिथे दबा धरून बसलेल्या पत्रकारांना ‘आप’नेत्यांसह भेटलेल्या बिन्नी भेटले. त्यांनी कुठलीही नाराजी नव्हती, तर उपरोक्त दोन्ही नेते खीर खायला आपल्या घरी आल्याचे सांगितले होते. त्याच दिवशी मग आपल्या ‘इमानदार’ शैलीत केजरीवाल यांनीही बिन्नी यांना मंत्रीपद वगैरे नको होते, याची कॅमेरासमोर ग्वाही दिली होती. ही २५ डिसेंबरची गोष्ट. पण त्याचीच पुनरावृत्ती १५ जानेवारी रोजी झाली आणि तेव्हा मात्र बिन्नी यांच्या घरी कोणी ‘आप’नेता खीर खायला अपरात्री आला नाही. त्यांनी मोठा खुलासा करण्याची घोषणा करून टाकली होती. तेव्हा खीर खायला नेते पाठवण्याऐवजी केजरीवाल यांनी बिन्नी हा माणूस कसा बेईमान व लालची आहे, ते जाहिर केले. बिन्नी शपथविधीपुर्वी आपल्याकडे मंत्रीपद मागायला आले होते, पण आपण त्यांची मागणी नाकारली होती आणि आता ते लोकसभेचे तिकीट मागायला आले होते, पण आपण तेही नाकारले; असा खुलासा देऊन शिजण्याआधीच खीर नासवून टाकली. मग १६ जानेवारीच्या सकाळी बिनी यांनी नासलेली खीर दाराशी जमलेल्या पत्रकारांना खाऊ घातली. यातून कोण किती खरा व कोण किती खोटा आहे, त्याचे चित्रण वाहिन्यांच्या कॅमेरात आपोपाप नोंदले गेलेले आहे. दोघांपैकी कोण किती खरा व खोटा आहे?
बिन्नी हा सामान्य आमदार आहे तेव्हा त्याच्या लोभी स्वभाव व खोटेपणाची कोणाला फ़िकीर नाही. पण ज्या केजरीवाल यांच्या इमानदारीची हल्ली भारतात लोक शपथ घेतात; ते कितपत खरे व इमानदार आहेत? २५ डिसेंबरला बिन्नी मंत्रीपद मागत नसल्याचे सांगत लोभी नसल्याची हमी केजरीवाल यांनी दिली होती; पण १५ जानेवारीला तेच बिन्नी लोभी असल्याचे सांगताना २५ डिसेंबरला मंत्रीपदाची मागणी केल्याची ग्वाही केजरीवाल देत होते. म्हणजेच तेव्हा किंवा आज, केजरीवाल एकदा तरी नक्कीच खोटे बोलले आहेत. दुसरी बाब लोकसभेचे तिकीट बिन्नी यांना नाकारताना पक्षाने नव्याने निवडून आलेल्या आमदारांना लोकसभेला उभे न करण्याचा निर्णय झाल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. पण दुसर्याच दिवशी त्यांचेच निकटवर्तिय ‘आप’नेते योगेंद्र यादव यांनी पक्षात असा कुठलाही निर्णय झाला नसल्याची पत्रकारांना ग्वाही दिली. म्हणजेच १५ जानेवारीला बिन्नी यांना खोटे पाडण्यासाठी आमदाराला तिकीट नाही, हा पक्षाचा निर्णय असल्याचे केजरीवाल धडधडीत खोटेच सांगत होते. याचा साधासरळ अर्थ बिन्नी यांच्या नाराजीवर खुलासा करताना केजरीवाल एका दमात दोन खोटी विधाने करीत होते. त्यांनी आपण बिन्नीला १५ डिसेंबरला दिलेले इमानदारीचे प्रमाणपत्र खोटे असल्याचे सांगितले आणि आज लोकसभा तिकीट नाकारताना पक्षाचा निर्णय झाल्याची शुद्ध लोणकढी थाप ठोकली होती. जो माणूस एका दमात व एका वाक्यात अशी दोन धडधडीत खोटी विधाने करू शकतो, त्याला इमानदारी म्हणायचे असेल; तर लोक बेईमान राजकारणी व भ्रष्टाचारालाही गळ्याशी लावतील. केजरीवाल व यादव इत्यादी सहकारी इतकेच व असेच प्रामाणिक असतील; तर या देशात डाकू दरोडेखोरांनी राज्य केले तरी लोकांना परवडेल.
No comments:
Post a Comment