Thursday, February 6, 2014

खरीखुरी युद्धभूमी


  अजून निवडणूक आयोगाने सोळाव्या लोकसभेच्या मतदानाचे वेळापत्रक बनवलेले नाही, की जाहिर केलेले नाही. पण भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मागल्या काही दिवसात देशाच्या कानाकोपर्‍यात विराट सभांचा सपाटा लावल्याने वातावरण मात्र निवडणूकीचेच होऊन गेले आहे. तसे पाहिल्यास मोदींची भाजपाने पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून निवड जाहिर केल्यापासून त्या पक्षाची व मोदींची अनेक टिकाकारांनी व विरोधकांनी टवाळीच केली होती. कारण त्यांनी अमेरिकन अध्यक्षीय लोकशाहीप्रमाणे या निवडणूकीला व्यक्तीकेंद्री बनवण्याचा प्रयास चालविल्याचा आरोप होत राहिला आहे. गेल्या महिन्याभरात तो आरोप मागे पडला आहे आणि बाकीचे पक्ष अनिच्छेने का होईना; मोदींच्या या खेळात सहभागी झाले आहेत. चार महिने आधीच सुरू झालेल्या चार राज्यांच्या विधानसभांचा आडोसा घेऊन मोदींनी आपल्या प्रचारमोहिमेचा आरंभ केला होता. त्यातून ते भले राज्याच्या उमेदवारांचा विधानसभेसाठी प्रचार करीत होते. पण प्रत्यक्षात त्यांच्या भाषणातील टिकेचा सगळा रोख सहा महिन्यांनी व्हायच्या लोकसभेवर आणि त्यातील संभाव्य विरोधकांवरच होता. मग अशा भव्य विराट सभांचे व मोदींच्या भाषणाचे वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपण सुरू झाले. त्याला मिळणारी लोकप्रियता बघूनच वाहिन्या सभांना प्रसिद्धी देत होत्या. पण त्याबद्दल तक्रारी होताच बाकीच्या नेत्यांना व पक्षांनाही तशीच थेट प्रसिद्धी मिळू लागली. परिणामी बाकीच्या पक्षांनाही लोकसभेच्या दिशेने वाटचाल करणे भाग पडले. एकप्रकारे आगामी लोकसभा निवडणूक अमेरिकन पद्धतीची व्यक्तीकेंद्री करण्यात मोदींचे डावपेच यशस्वी झाले म्हणायचे. कारण पक्षापेक्षाही थेट पंतप्रधान पदाची ही शर्यत बनवणेच हाच मोदींचा डाव होता.

   निवडणूकीवर होणार्‍या चर्चा आणि वादविवाद बघितले तर मोदींना हवे तसे घडत चालले आहे. पण म्हणून त्याच भोवती चर्चा रंगण्यातून मोदींच्या रणनितीचा उलगडा होतो काय? मोदींच्या सभा ज्या पद्धतीने व ज्या भौगोलिक रचनेत होत आहेत, त्याची किती गंभीर दखल घेतली जात आहे? देशाच्या लोकसभा निवडणूकीची खरी युद्धभूमी २९ पैकी १२ प्रमुख राज्यातच विभागली गेलेली आहे. तिथे खरी लढाई होईल. त्यात सहा मोठी राज्ये व सहा मध्यम राज्यांचा समावेश होतो. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, बिहार आणि तामिळनाडू ही त्यातली मोठी सहा राज्ये आहेत. तिथून लोकसभेतील २९१ जागा म्हणजे बहुमत निवडून येते. त्याखेरीज मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, ओरिसा व केरळ अशी सहा मध्यम राज्ये आहेत. त्यातून १४९ जागा निवडून येतात. अशा मिळून लोकसभेतील ५४३ पैकी ४४० जागा, या बारा राज्यातून निवडून येतात. त्यांचे प्रमाण ऐंशी टक्के इतके होते. म्हणजेच उर्वरीत १७ राज्यातून केवळ ११३ खासदार निवडून येतात आणि त्यांना पहिल्या बारा राज्यात प्रभावी ठरलेल्या पक्ष वा आघाडीच्या बाजूने उभे रहाणे भाग असते. थोडक्यात त्या मोठ्या मध्यम बारा राज्यात जो गट वा पक्ष दोनशेच्या आसपास जागा मिळवू शकतो; त्यालाच बहूमताच्या दिशेने वाटचाल करायचा मार्ग मोकळा होतो. मोदी यांनी मागल्या दोनतीन महिन्यात चालविलेली मोहिम नेमक्या त्याच बारापैकी दहा राज्यात फ़िरलेली दिसेल. गुजरात त्यांचा गड आहे आणि ते राज्य वगळता केवळ ओरिसात त्यांनी अजून सभा घेतलेली नाही. म्हणजेच जिथे लोकसभेची निर्णायक लढाई व्हायची आहे, त्या बहुतेक राज्यात मोदींनी आधीच मुलूखगिरी केलेली आहे.

   मोदींची रणनिती स्पष्ट आहे. जिथे भाजपाचे पारंपारिक प्रभावक्षेत्र आहे तिथे स्वबळावर अधिकाधिक जागा जिंकायचा त्यांचा मनसुबा आहे. जिथे आजवर तो पक्ष कमकुवत राहिला, तिथे हातपाय पसरण्याच्या कामाला मोदी लागलेले आहेत. म्हणूनच त्यांनी अशा राज्यात डोळे दिपवणार्‍या विराट सभांचा सपाटा लावला आहे आणि सभेच्या मागेपुढे तिथे उत्साहित झालेल्या कार्यकर्त्यांना कायमस्वरूपी निवडणूक प्रचारात गुंतवण्याच्या मोहिमा चालू ठेवल्या आहेत. आंध्र, तामिळनाडू, बंगाल, ओरिसा अशा राज्यात भाजपाचे सबळ संघटन नाही, तिथे अतिशय धुर्तपणे मोदींनी स्थानिक प्रादेशिक प्रभावी पक्षाला न दुखावता कॉग्रेस वा अन्य दुबळ्या पक्षाची जागा व्यापण्याचे डावपेच खेळलेले आहेत. म्हणूनच जयललिता वा ममतांना दुखावणारी भाषा त्यांनी केलेली नाही. चंद्राबाबूंना सोबत घेण्यात यश मिळवले आहे. तर उत्तरप्रदेश व बिहारमध्ये स्वबळावर अधिक जागा जिंकायचा बेत आखला आहे. या बारा राज्यांपैकी बंगाल, आंध्र, तामिळनाडू, ओरिसा व केरळ अशा पाच राज्यात भाजपा दुबळा आहे. तर भाजपाला स्थान असलेल्या उर्वरीत सात राज्यात लोकसभेच्या पावणेतीनशे जागा आहेत, तिथेच मोदींनी सर्वाधिक लक्ष केंद्रीत केलेले आहे. कारण उरलेल्या ११३ जागांपैकी किमान ६० जागी प्रभाव असल्याने त्यातून ३०-३५ जागी भाजपाला यश मिळवणे सोपे आहे. थोडक्यात मोठ्या मध्यम राज्यात दोनशेचा पल्ला पार करण्याचे लक्ष्य ठेवून मोदी आपली रणनिती राबवत आहेत. पण अजून तरी कुठल्या चर्चेत वा विश्लेषणात राज्यवार मोदी मोहिमेचा समाचार घेतला गेलेला दिसला नाही. साधारण चारशे जागी सर्वस्व पणाला लावल्यासारखे लढून त्यातून सव्वा दोनशे ते अडीचशेचा पल्ला गाठण्याची मोदींची रणनिती, त्यांच्या प्रचार मोहिमेचे भौगोलिक राजकीय आकलन केल्यास स्पष्टपणे दिसू शकते. त्यांनी लोकसभेची युद्धभूमी ठरवून घेतली आहे आणि त्या खिंडीत विरोधकांना आणायचे त्यांचे डावपेच दिसतात.

4 comments:

  1. Very precise and correct analysis.

    ReplyDelete
  2. Replies
    1. गौरव मुळात पूर्वोत्तर भारतात लोकसंख्या कमी असल्याने लोकसभेच्या जागा अत्यल्प आहेत . त्यातही ख्रिस्ती व मुस्लीम लोक भाजपाला मत देत नाहीत , असे ख्रिस्ती व मुस्लीम तिथे बहुसंख्य होण्याच्या मार्गावर आहेत . दुसरे म्हणजे या समूहांचे मतदान एकगठ्ठा असते . भाज्प्नी यांच्या दाढ्या कुर्वाल्ण्याचा प्रयत्न केला तर आहेत ती हिंदूंची फिक्स मतेही मिळणार नाहीत . तिथले उरलेले हिंदू स्थानिक प्रश्नांमुळे प्रादेशिक पक्षांच्या मागे आहेत . हे उघड सत्य आहे कि मोदींना फक्त हिंदू व हिंदूच मते देणार . भाजपचा मुस्लीम अनुयायांच कुठलाही लहानसा प्रयत्नही मोदींना सपाटून आपट्वू शकतो .हिंदू नाते स्वीकार्ह्य असणार नाही . हे कुणी मान्य करो वा न करो पण सत्य आहे .

      Delete
  3. भाऊ तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मोदींच्या जाहिरती शेअर्स ट्रेडिंग व कमोडीटी , करन्सी ट्रेडिंग शी सम्बन्धित वेब साईट वरही आहेत . त्यात ते जनतेला निवडणुकीसाठी फंड गोळा करण्यासाठी देणगी मागतात . थोडक्यात जिथे जायचे विरोधकांच्या स्वप्नातही येणार नाही , तिथे मोदी आधीच जावून पोचलेत . आज सकाळी मी त्यांना investment गुरु च्या करन्सी टीप्सच्या पेजवर पाहिले .

    ReplyDelete