आठ महिन्यांपुर्वी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक गोव्यात भरलेली होती. तिथेच मोदी यांची लोकसभा निवडणूकीतले प्रचारप्रमुख म्हणून नेमणूक झाली. पण त्याही आधी भाजपाच्या नव्या अध्यक्षांची निवड झाली होती आणि त्यांनी आपल्या नव्या कार्यकारिणीमध्ये अमित शहा यांना राष्ट्रीय संघटना पद दिलेले होते. तेव्हा त्याचा चुकीचा गाजावाजा माध्यमातून झाला. कारण अमित शहा म्हणजे गुजरातमध्ये दहा वर्षापुर्वी झालेल्या दंगली किंवा पोलिस चकमकी, इतकेच माध्यमातले समिकरण आहे. इशरत जहान प्रकरणात शहा यांना आरोपी करण्यात आलेले आहे. त्याचाच आधार घेऊन त्यांचे राजकीय मूल्यमापन होत राहिले आहे. पण त्याखेरीज या माणसाकडे कुठले गुण वा दुर्गुण आहेत; याची कुणाला दखल घ्यावीसे वाटले नाही. म्हणूनच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षांनी शहा यांना राष्ट्रीय सरचिटणीस केल्यावर मोदींचा माणूस; इतकीच प्रसिद्धी देण्यात आली व त्यातून भाजपाच्या पक्ष संघटनेवर मोदींचा वरचष्मा कसा सिद्ध होतो हेच सांगितले गेले. पण त्याच अमित शहा यांना तात्काळ उत्तरप्रदेशचे प्रभारी करण्यात आलेले होते. कॉग्रेसनेही तात्काळ उत्तरप्रदेशचे प्रभारी म्हणून गुजरातचेच मधूसुदन मिस्त्री यांची नेमणूक केली. हे खरे रहस्य होते. तीच खरी बातमी होती. कारण तिथूनच त्या राज्यात लोकसभा निवडणूकीची झुंज सुरू झाली होती. शहा यांच्याप्रमाणेच मिस्त्री हे जुने संघ व भाजपावाले होत. शहा यांना काटशह देण्यासाठीच मिस्त्रींना त्यांच्या समोर उभे करण्यात आले होते. मग शहा उत्तरप्रदेशात नेमके काय करतात, हे शोधणे पत्रकारांचे काम होते. पण त्यांच्या कपाळावर इशरत चकमकीचे खापर फ़ोडण्यातच धन्यता मानली गेली. म्हणूनच आता त्या राज्यात दिसणारे राजकीय चित्र माध्यमांना धक्का देणारे ठरले आहे.
अमित शहा उत्तम संघटक आहेत, म्हणून उत्तरप्रदेशात भाजपाची ताकद अकस्मात वाढणे शक्य नव्हते. म्हणूनच त्यांनी तिथे जाऊन चाचपणी केल्यानंतर प्रथम संघाकडे एक मागणी केली. त्या एकाच राज्याकरीता आणि शेजारच्या बिहारसाठी पाचशे संघ प्रचारक पाठवण्याचा आग्रह धरला. हे प्रचारक म्हणजे नुसते कार्यकर्ते नसतात. त्यांना वक्ता व संघटक म्हणून प्रशिक्षित केलेले असते. जमणार्या गर्दीला संघटनेचे स्वरूप देऊन कायम आपल्याशी जोडायचे काम हे प्रचारक अहोरात्र करीत असतात. त्यातून नवा कार्यकर्ता व त्याच्या मित्र परिचितालाही आपल्या विचारधारेशी जोडण्याचे काम त्यांच्याकडून विस्तारीत केले जात असते. परिणामी उद्याचा मतदार त्यातून जोडला जात असतो. जेव्हा असे प्रचारक वस्तीमधून ठाण मांडून बसतात, तेव्हा त्यांच्या प्रचाराचे फ़लक दिसत नाहीत. पण एक एक मतदाराला मत द्यायला प्रवृत्त करण्याचे मोठे काम होत असते. त्यातून उदासिन व त्रयस्थ मतदाराला मैदानात आणायचे काम होते. अलिकडेच झालेल्या पहिल्या मोठ्या फ़ेरीमध्ये उत्तरप्रदेशच्या ज्या दहा जागी मतदान पार पडले, त्यात मतदानाचे प्रमाण म्हणजे सरासरी खुप वाढली; अशा चर्चा माध्यमातून झाल्या व त्याचे अर्थ शोधायचाही प्रयास झाला. तीच किमया तिथे आठ महिन्यापासून ठाण मांडून बसलेल्या प्रचारकांची आहे. परंतू वाढलेल्या मतदानात त्याचा साधा उल्लेखही कुठे आलेला नाही. ही किमया मागल्या सात आठ महिन्यात कशी घडली व कशामुळे घडली ती मजेशीर गोष्ट आहे. मोदींच्या नावाची घोषणा पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून झाल्यानंतर एकट्या उत्तरप्रदेशात संघाच्या नव्या आठ हजार शाखा सुरू झाल्या, यात खरी बातमी दडलेली आहे. त्याच शाखांनी मतदान वाढवून दिलेले आहे.
कालपरवा ‘बदला म्हणून मतदान करा’, असे वाक्य अमित शहा बोलल्याचा खुप गवगवा झाला. त्यांच्यावर आयोगाने प्रचाराला प्रतिबंधही लावला आहे. पण शहा उत्तम वक्ता असण्यापेक्षा संघटक आहेत आणि त्यावर बंदी लागू झालेली नाही. ते आपल्या संघटित कार्यकर्ते व प्रचारकांच्या माध्यमातून सुत्रे हलवित असतात. उत्तरप्रदेशात संघाच्या नव्या आठ हजार शाखा त्याची प्रचिती आहे. मोदींच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन या नव्या शाखांना आकार दिला गेला आहे. आज त्या शाखांमध्ये सामील झालेले संघ स्वयंसेवक मतदार घराबाहेर काढण्यासाठी झटत आहेत. पण त्यातूनच उद्याच्या भाजपा कार्यकर्त्यांचे नवेकोरे स्थानिक नेतृत्व उभे करण्याचाही पद्धतशीर प्रयास केलेला आहे. मागल्या दहा पंधरा वर्षात सत्तेला चटावलेल्या कार्यकर्त्यांमुळे जी मरगळ भाजपामध्ये आलेली होती, त्यांना बाजूला सारून उत्तरप्रदेशात नवे तरूण नेतृत्व उभे करण्याचा दिर्घकालीन कार्यक्रम या निमित्ताने हाती घेतला आहे. आज त्याचे परिणाम फ़क्त वाढलेल्या मतदानातून दिसत आहेत. पण आणखी अडीच वर्षांनी त्याही राज्यात विधानसभा निवडणूका व्हायच्या आहेत. त्याच्या आधीच तिथे कार्यकर्त्यांची नवी फ़ळी उभारून लोकसभेत मोठे यश मिळवायचे आणि पुढल्या दोन वर्षात तिथे स्वबळावर विधानसभेत बहूमत मिळवण्याची सज्जता करायची; अशीच एकूण रणनिती दिसून येते आहे. पण त्याकडे कुणाचेही लक्ष गेलेले नाही. कल्याण सिंग, लालजी टंडन, कलराज मिश्रा, विनय कटीयार इत्यादी राममंदिर आंदोलनातील तरूण नेतृत्व आता थकलेले आहे. त्याच्या बळावर पुन्हा उत्तरप्रदेश जिंकणे शक्य नसल्याने आखलेली ही दिर्घकालीन योजना आहे. शहांनी जर या महिन्याभरात उत्तरप्रदेशमध्ये मतदानाचा चढलेला जोर कायम ठेवून दाखवला; तर एकदोन वर्षात याच उत्तरप्रदेशचा गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश व्हायला वेळ लागणार नाही. तिथे नाव घेण्यासारखा विरोधक भाजपाला शिल्लक उरणार नाही. ही आहे अमित शहा नावाची रहस्यकथा.
Agadi barobar. Tumhi mazya dokyat evdhe divas je hote te khare aslyache prove kele. Fakt sangh and Swayamsevak ch he karya karu shaktat...
ReplyDelete