महायुतीमध्ये राज ठाकरे यांना समाविष्ट करून घेण्य़ाचा आटापिटा भाजपावाल्यांनी चालविला होता. पण उद्धव ठाकरे यांच्या अट्टाहासामुळे त्यात यश आले नाही. नंतर माजी भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी कृष्णकुंजाच्या आडोशाला बसून आपले ‘इस्पित’ साध्य केले. तिथून मग मध्यंतरीच्या काळात थांबलेली भाऊबंदकी उसळून आली. एकमेकांवर तेलकट वडे आणि चिकन सुप फ़ेकण्यापर्यंत मजल गेली. मात्र त्यातून पुन्हा एकदा मराठी राजकारणातली भाऊबंदकी ऐरणीवर आली. दोन भिन्न पक्षाच्या प्रमुख असलेल्या भावांमुळे मनसे व सेना यांच्यातल्या भांडणाला वारेमाप प्रसिद्धी मिळाली. पण तितक्याच हमरातुमरीने जिल्हा वा मतदारसंघात होणार्या भाऊबंदकीचा अन्यत्र फ़ारसा गाजावाजा होत नाही. महाराष्ट्रातच कशाला; देशाच्या सर्वच राज्यात व जिल्ह्यात असे घरातले भेदी वा छेदी एकमेकांच्या उरावर बसायचे, प्रयोग राजकारणात अखंड चालूच असतात. इथे महाराष्ट्रातच सोलापूर सातारा जोडणार्या माढा लोकसभा मतदारसंघात काय वेगळा प्रयोग चालू आहे?
वीस वर्षापुर्वी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे विश्वासू म्हणून दुसर्या क्रमांकाचे नेता असलेले विजयसिंह मोहिते पाटील मागल्या दहा वर्षात साफ़ झाकोळून गेलेले होते. आधी त्यांनीच पवार साहेबांसाठी माढा मतदारसंघाचे आमंत्रण दिले. पण सहाच महिन्यात त्यांना विधानसभेत बंडखोराकडून पराभव पत्करावा लागला. आता पवारांनीच माढा सोडल्याने विजयसिंहांचे पुनर्वसन होऊ घातले होते. तर घरातच समस्या उभी ठाकली. त्यांचेच धाकटे बंधू प्रतापसिंह मोहिते अपक्ष उमेदवारी घोषित करून मैदानात उभे ठाकले. तसे बघितल्यास प्रतापसिंह यांनी सेना भाजपा युतीच्या कारकिर्दीत भाजपात प्रवेश करून सत्ता भोगली होती. अलिकडेच त्यांनी राष्ट्रवादीच्या राजकारणाने आपले घर फ़ोडल्याचा आरोप करीत अपक्ष उमेदवारीची गर्जना केली. एक मात्र मान्य करायला हवे. या दोन्ही भावांनी घरातल्या खाण्यात वा ताटात काय पडते, त्याचा उल्लेख कधी जाहिरपणे केलेला नाही.
जो आरोप प्रतापराव मोहित्यांनी राष्ट्रवादी पक्षावर केला, त्याचाच एक नमूना पलिकडे मराठवाड्यात बघायला मिळतो. नव्याने राज्यात उदयास आलेल्या नेत्यांपैकी गोपिनाथराव मुंडे यांच्याही कुटुंबाला सत्तेची बाधा झाली. तसे बघितल्यास त्यांनी आपल्या पुतण्याला राजकारणातला वारस म्हणून पुढे आणलेले होते. पण जोपर्यंत मुंडे विधानसभाच गाजवत होते, तोपर्यंत कुटुंबात कुठले वाद नव्हते. मागल्या लोकसभा निवडणुकीत गोपिनाथराव यांनी दिल्लीचा दरवाजा ठोठावला आणि त्यांची विधानसभेतली खुर्ची मोकळी झाली. आता क्रमवारीने तिथे पुतण्या धनंजय मुंडे यांचीच वर्णी लागणार, असे सर्वांनाच वाटत होते. पण लाडकी कन्या सासुराला गेली म्हणून माया आटते थोडीच? मुंडे यांनी विधानसभेची उमेदवारी पंकजा पालवे या कन्येकडे सोपवली आणि तिचा चुलतभाऊ धनंजय मुंडे अस्वस्थ झाला. तिथून मग सुंदोपसुंदी सुरू झाली. त्यावर पांघरूण घालण्य़ासाठी गोपिनाथरावांनी पुतण्य़ाला विधान परिषदेत आणून बसवले. पण म्हणून तुटलेली मने जुळतात थोडीच? एके दिवशी या अस्वस्थ पुतण्याला दुसरा तसाच पुतण्या भेटला आणि धनंजयरावांनी कुटुंबवाद सोडून राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे पकडले.
मराठी राजकारणातले असे कितीतरी इतिहास आहेत. राज्याचे माजी अर्थमंत्री यशवंतराव मोहिते विरोधात त्यांचेच बंधू जयंतराव भोसले यांनी कारखान्याचे राजकारण केले होते. तशीच मुंबई नजिकच्या रायगड जिल्ह्यातली भावांची एक जोडी दिर्घकाळ प्रभावशाली होती. विधानसभेत विरोधी नेतेपदापर्यंत पोहोचलेले दत्ता पाटील आणि जिल्हा परिषदेचे दिर्घकालीन अध्यक्ष प्रभाकर पाटील आजच्या पिढीला आठवणार नाहीत. पण मनसेप्रणित तिसर्या आघाडीचे नेते जयंत पाटील त्याच प्रभाकर पाटलांचे सुपुत्र. या पुतण्याने पित्याचा वारसा मिळाल्यावर राजकारणावर इतका कब्जा मिळवला, की चुलता दत्ता पाटील यांना शेकाप सोडून उतारवयात शरद पवारांच्या आश्रयाला जायची पाळी आली. असाच काहीसा प्रकार पश्चिम महाराष्ट्राचे दांडगे नेता वसंतदादा पाटिल यांच्याही पश्चात झाला. त्यांचे पुत्र प्रकाशबापू पाटील विरुद्ध पुतणे विष्णूअण्णा पाटील असा संघर्ष दिर्घकाळ चालू होता. आज दोघेही हयात नाहीत आणि प्रतिक पाटील हे दादांचे नातू केंद्रात मंत्री आहेत. पण मागल्या पिढीतल्या दोन चुलत भावांच्या हमरातुमरीने वसंतदादांचा राजकीय प्रभाव आणि वारसा पुरता संपून गेला. राजीव गांधी यांच्याशी पटले नाही म्हणून तडकाफ़डकी मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा देणार्या दादांचा वारसा धुळीस मिळाला.
यातला सर्वात मजेशीर किस्सा निलंग्याच्या शिवाजीराव पाटलांचा असावा. १९८५ सालात मंत्रीपदी असून त्यांना विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांच्या जागी त्यांच्याच पुत्राला (त्याचे नाव बहुधा दिलीप पाटील) कॉग्रेसने उमेदवारी दिली, ते निवडूनही आले. पित्याला राजसंन्यास घ्यावा लागला असे म्हणायचे. पण राजकारणातले चमत्कार कसे असतात बघा. वसंतदादांनी १९८६ सालात राजिनामा टाकल्यावर ज्येष्ठतेमुळे त्याच शिवाजीरावांना मुख्यमंत्रीपदी बसायची संधी नियतीने दिली. पण आपल्याला अंधारात ठेवून मुलानेच पक्षाकडे तिकीट मागितल्याने शिवाजीरावांचे मन किती विषण्ण झाले असेल? अशा कितीतरी भाऊबंदकी व कुटुंबकलहाच्या राजकीय कहाण्या घडत असतात. त्यांना प्रसिद्धी मिळतेच असे नाही. सात वर्षापुर्वी कॉग्रेस खासदार प्रिया दत्त यांचा बंधू संजय दत्त, याने समाजवादी पक्षाच्या सोबत जाऊन कॉग्रेसवर दुगाण्या झाडल्या. तेव्हा बहिणीला राखीचे बंधन विसरायची वेळ आली असेल ना? मराठी प्रांताबाहेर तर यापेक्षा भीषण कथा आहेत.
No comments:
Post a Comment