निवडणूकीत अर्धेअधिक मतदान संपत आलेले असताना, प्रचारसभांमधून नरेंद्र मोदी यांची भाषा अकस्मात बदलली होती. त्यांनी कॉग्रेसविरोधी व भाजपाच्या बाजूची नुसती लाट नाही, तर त्सुनामी येऊ घातली आहे, असे सांगितले होते. पण कॉग्रेससहीत तमाम पक्ष व राजकीय जाणकारांनी त्यांची टवाळी करण्यातच धन्यता मानली. भाजपाची ताकद दक्षीणेत नाही, इशान्य व पुर्व भारतात भाजपाला स्थानही नाही. केवळ पश्चिम व उत्तर भारतातून मोदी कुठली त्सुनामी आणणार; असले सवाल केले जात होते. त्याच्याही पुढे जाऊन त्सुनामी म्हणजे सर्वनाश असतो आणि मोदी स्वत:च सर्वनाशाची हमी देत आहेत; अशी मुक्ताफ़ळे कपील सिब्बल यांनी उधळली होती. मग त्या टवाळीला उत्तर देताना मोदी यांनी तोच धागा पकडला होता. सर्वनाश विनाश नक्कीच होणार, पण तो देशाचा नव्हेतर विरोधात बकवास करणार्यांचा व कॉग्रेसचा होणार, असे प्रत्युत्तर मोदींनी दिलेले होते. वास्तविक राजकीय अभ्यासकांनी तरी त्यांचे शब्द थोडे गंभीरपणे घ्यायला हवे होते. दुर्दैवाने थिल्लरपणाच दिसून आला. सर्वांनी मोदींच्या शब्दांची हेटाळणी केली. म्हणून परिणाम बदलणार नसतात आणि बदललेही नाहीत. आज निकालानंतर भाजपा विरोधक पक्षांची जी अवस्था आपण बघत आहोत, त्यातून मोदींचे शब्द खरे ठरलेले दिसत आहेत. जो कोणी त्यांच्या त्सुनामीची हेटाळणी करीत होता, तोच मोदी लाटेमध्ये गटांगळ्या खाताना दिसतो आहे. मोदींना पराभूत करणे दूर राहिले, आपापले अस्तित्व टिकवण्यासाठी तमाम मोदी विरोधी पक्षांची तारांबळ उडालेली आहे. कारण त्यांना त्सुनामी समजून घ्यायची गरजही वाटलेली नव्हती. राजकीय त्सुनामी सोडून द्या, मुळात नैसर्गिक त्सुनामी म्हणजे तरी काय असते, याचे अशा राजकीय विद्वानांना कितीसे ज्ञान आहे याचीच शंका येते.
त्सुनामी हा शब्द आपल्या देशात २००४ पुर्वी मोजक्याच लोकांना माहित होता. कारण त्याची झळ भारतीयांना कधी लागली नव्हती. पण २००४ च्या अखेरीस इंडोनेशियाच्या पश्चिमेला समुद्रात भीषण भूकंप झाला आणि त्यानंतर जी भयंकर राक्षसी लाट उठली; तिने त्याच देशाला बुडवले नाही तर भारताच्या दक्षिणेला झोडपून पुढे आफ़्रिकेचा किनारा गाठला होता. तेव्हा भारताच्या पुर्व किनार्यावरील तामिळनाडूला त्या त्सुनामीचा फ़टका बसला होता. दक्षिण आशियातील काही लाखांचा त्यात बळी गेला. पण नवलाची गोष्ट अशी होती, की लाखो माणसे त्सुनामीचे बळी झाले तरी सामान्य पशूंचे त्यात किरकोळ मृत्यू झाले होते. त्या त्सुनामीचा सुगावा लागलेल्या पाळीव व जंगली जनावरांनी लाट अंगावर येण्यापुर्वीच उंच भूभागाकडे पळ काढला होता. त्याचे कारण सरळ होते. समुद्राच्या पोटात भूकंप होतो, त्यानंतर काही तासांनी त्यातून उठलेली लाट भूभागाकडे येत असते. त्या हादर्याने प्राणिमात्राला सावध करणार्या संवेदना पशूंमध्ये उपजतच असतात. पण हजारो वर्ष जगण्याची विविध साधने व सुविधा उभारणार्या माणसाने यंत्रतंत्रावर विसंबून रहाताना त्या उपजत जाणिवा व संवेदना गमवल्या आहेत. त्यामुळेच माणसे सरकारकडून धोक्याच्या इशार्याची प्रतिक्षा करीत असतात आणि जनावरे व पशू उपजत जाणिवेतून उंच भूभागाकडे धाव घेतात. त्यामुळे त्सुनामी येण्याच्या आधीच हे पशू सुखरूप सुरक्षित जागी जाऊन पोहोचतात. तेच तेव्हा झालेले होते आणि ‘बुद्धीमान’ प्राणी असलेली माणसे त्सुनामीच्या तडाख्यात सापडलेली होती. नैसर्गिक त्सुनामीच्या बाबतीत आपली अशी अवस्था असेल, तर जे राजकारण बौद्धिक तर्काच्याच आधारावर चालते, तिथे काय व्हायचे? मोदींनी राजकीय त्सुनामी येतेय, असे आधीच सांगितल्यावर त्याची कारणमिमांसा करण्यापेक्षा बहुतेक राजकीय नेते व पंडीत अनुभवाच्या मोजपट्ट्या घेऊन मजा करीत बसले आणि त्यांना बुडवून मोदी लाट अंगावरून निघून गेली. याचे कारण साधे सरळ आहे. त्सुनामीची लाट बुडवते, हे राजकीय शहाण्यांना नेमके ठाऊक होते. पण ती येऊ घातल्याचा पुरावा खुप उशीरा डोळ्यांना दिसतो, याचा त्यांना विसर पडलेला होता. म्हणून कुठे आहे लाट, आपल्याला तर कुठेच दिसत नाही, अशी मुक्ताफ़ळे उधळणार्यांची आता धांदल उडालेली आहे.
पहिली गोष्ट म्हणजे नुसत्या मतचाचण्या कुठल्या लाटेचे पुरावे देत नसतात. पण जेव्हा चाचण्यांच्या आकड्यांची आपण राजकीय वास्तवाशी सांगड घालू लागतो, तेव्हाच त्याचे खरे स्वरूप समोर येऊ शकत असते. मोदींच्या सभेला वा रोडशोच्या निमित्ताने लोटणारी उत्स्फ़ुर्त गर्दी किंवा वाहिन्यांवर त्यांच्या भाषणाच्या थेट प्रक्षेपणाला मिळणारा प्रतिसाद; हे राजकीय वास्तव होते. त्यातले सत्य समजून घेण्यापेक्षा मोदींनी पैसे ओतून आपली भाषणे थेट प्रक्षेपित करून घेतली किंवा सभेला भाडोत्री गर्दी जमवली, असे आरोप करून त्यांच्या लोकप्रियतेची खिल्ली उडवल्याने वास्तविकता बदलणार नव्हती. खेरीज भाजपा व संघाच्या कार्यकर्त्यांनी दहा कोटी कुटुंबात थेट संपर्क करण्याची हाती घेतलेली मोहिम किंवा जास्तीत जास्त मतदान घडवून आणायचा उचलेला विडा, हे संकेत होते. आरंभीच्या मतदानातून वाढ होत असल्याचे संकेत समोर आलेले होते. कधी नव्हे इतका मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडतो आहे, असे आकड्यातूनच दिसत होते. पण त्यासाठी संघाला त्याचे श्रेय देण्यापेक्षा आयोगाने केलेल्या प्रचारामुळे मतदान वाढल्याचे दावे स्वत:ची फ़सवणूक करून घेण्यासारखे होते. आपल्या प्रचार मोहिमेत नुसती भाषणे व प्रसिद्धी, इतकेच उद्दीष्ट मोदींनी ठेवलेले नव्हते. जोडीला मतदानात भरघोस वाढीची रणनिती आखलेली होती. पहिल्या काही फ़ेर्यांमध्ये ती रणनिती यशस्वी होत असल्याचे संकेत आकड्यातून मिळाल्यावरच मोदी यांनी त्सुनामीचे शब्द वापरात आणले होते. म्हणूनच त्याचा गर्भितार्थ राजकीय नेत्यांनी नव्हे; तर निदान राजकीय अभ्यासकांनी समजून घ्यायला हवा होता. तर माध्यमांनाही मोदींची लाट दिसू व जाणवू शकली असती. मगच त्सुनामीचा नेमका अर्थ उलगडू शकला असता. पण दुर्दैवाची गोष्ट अशी, की राजकीय अभ्यासक व राजकीय नेते-पक्ष यांच्यातली लक्ष्मणरेषाच हल्ली पुसट झाली आहे. त्यामुळे त्सुनामीच्या वेळी जीव वाचवायला उंच भूभागाकडे पळायचे असते, तसेच राजकीय त्सुनामीत फ़सव्या राजकीय गोत्यातून सुटायचे असते. मोदीच्या त्सुनामीतून सुटण्यासाठी चुकलेले मुद्दे व विषय तात्काळ बदलण्याची गरज होती. त्याऐवजी तिथेच ठाण मांडून बसले, तर बुडण्याला पर्याय होता काय? आज जे आपले अस्तित्व शोधण्याच्या गटांगळ्या खात आहेत, त्यांना अजून तरी कुठल्या त्सुनामीत बुडालो, याचा थांगपत्ता लागला आहे काय, याचीच शंका येते.
हे एव्हड़े सगळे घडूनही कुमार केतकर सारखे याला त्सूनामी म्हणायला तयार नाहीत याला काय म्हणावे ?
ReplyDeleteयाला म्हणतात गिरे तो भी टांग उपर..!!!
DeleteZopeche song ghenarya la uthavane kathin ahe
DeleteStunami madhe saglyanchech aadakhe wahun gele.....Modi ani Sanghacha swayansevakani kelela karishma hi changala jamun aala..
ReplyDeletehttp://bhautorsekar.blogspot.in/2014/03/blog-post.html
ReplyDeletekumar ketkar va tatsam lokanbaddalachya sarv prashnanche uttar ithe aahe.