Tuesday, May 20, 2014

मोदी, सिर्फ़ नाम काफ़ी है



   निवडणूकीचे निकाल लागले आणि एनडीए व भाजपाला स्पष्ट बहूमत मिळाल्यानंतरच्या चर्चा एका ठराविक दिशेने चालू आहेत. त्यावरून अफ़वा व बाजारगप्पांना ऊत आलेला आहे. पण त्या सर्वच गप्पा हवेतल्या किंवा बिनबुडाच्या आहेत, असेच म्हणावे लागते. कारण ज्या नेत्याच्या भोवताली आजचे सर्वच राजकारण घुमते व घुटमळते आहे, त्याला जाणून न घेताच सगळ्या चर्चा रंगलेल्या आहेत. कापड जसे लिटरमध्ये मोजता येत नाही आणि द्रवपदार्थ जसा फ़ुटात मोजता येत नाही; तशाच ह्या चर्चा आहेत. कारण आजवरचे नेते वा पक्ष कसे वागले, त्यावर आधारीत अशा चर्चा चालू आहेत. मोदी यांच्या वर्तनशैलीकडे डोळेझाक करून आजच्या राजकारणाचे व घडामोडींचे विश्लेषण होऊ शकत नाही, याचाच जणू सर्वांना विसर पडला आहे. त्यामुळे मग त्यांच्या पक्षात मंत्रीपदे मिळण्यासाठी कशी धुसफ़ुस होईल वा गटबाजी कशी चालली आहे, त्यावरून चर्चा होते. किंवा निवडणूक प्रचारात वा जाहिरनाम्यात दिलेली आश्वासने अफ़ाट आहेत आणि मोदींना ती कशी पुर्ण करता येतील, त्याबद्दलच्या चिंता व्यक्त होत आहेत. नेहमीच अशी चर्चा होते यात शंका नाही. पण यावेळी नेहमीच्या नेत्यांसारखा नेता केंद्रस्थानी नाही. हा नेता नियमाला अपवाद म्हणावा असा आहे. म्हणूनच त्या अपवादाला अनुसरून विश्लेषण आवश्यक आहे. दुर्दैवाने त्याचाच विश्लेषण करणार्‍यांना थांगपत्ता अजून लागलेला नाही. म्हणूनच सगळ्या चर्चा व विवेचन भरकटल्यासारखेच होते आहे. अजून मोदींनी आपल्या पदाची शपथ घेतलेली नाही, की सत्तासुत्रे हाती घेतलेली नाहीत. पण त्यापुर्वीच अनेक गोष्टी आपोआप हलू लागल्या आहेत. त्याकडे कोणाचे लक्ष आहे काय? मोदींनी काय करावे व काय करू नये, याच चर्चा रंगवणार्‍यांचे, परस्पर कशी सुत्रे हलू लागली आहेत, त्याकडे लक्ष का गेलेले नाही? अनेक असे मुद्दे इथे मांडता येतील.

   येत्या सोमवारी मोदींचा शपथविधी व्हायचा आहे. संसदीय पक्षाने त्यांची नेतेपदी निवड करण्याची औपचारिता पार पडल्यावर राष्ट्रपतींनी त्यांना तसे आमंत्रणही दिले आहे. पण जेव्हा निकाल लागायचे होते आणि शेवटच्या फ़ेरीतले मतदान बाकी होते; तेव्हाच अनेक सरकारी खात्यांना मोदींच्या यशाचा सुगावा लागला होता. त्यांनी नव्या सत्ताधीशाच्या आकांक्षा ओळखून कामाला आरंभ केला होता. त्यापैकी एका विभागाचे नाव आहे, राष्ट्रीय गंगा स्वच्छता अभियान. याच संस्थेकडे गेली कित्येक वर्षे ही योजना सोपवण्यात आलेली होती आणि त्यावर हजारो करोड रुपये खर्च झाले. पण किंचितही काम होऊ शकलेले नाही. पण वाराणशीत मोदींनी उमेदवारी अर्ज भरला; तेव्हाच गंगेच्या सफ़ाईची भाषा वापरली होती. ‘मा गंगाने मुझे बुलाया है’, असे बोलल्यावर त्याचे अनेक राजकीय अर्थ लावले गेले आणि त्यावर मल्लीनाथीही खुप झाली. पण म्हणून खरेच गंगा स्वच्छतेला चालना मिळू शकेल अशी कोणी अपेक्षा केली नव्हती. पण निकाल लागून मोदींनी त्यात लक्ष घालण्यापुर्वीच, त्यांच्या आगमनाचा सुगावा लागल्याने गंगा अभियानाला कित्येक वर्षांनी जाग आली आहे. मतदानाच्या शेवटच्या दोन फ़ेर्‍या बाकी असताना, अभियानाच्या अधिकार्‍यांनी नागपूरला ‘निरी’ या पर्यावरण संस्थेला भेट दिली. गंगा योजनेचा आराखडा बनवण्याची मागणी केली. दोनच दिवसात म्हणजे शेवटची मतदानाची फ़ेरी पार पडण्यापुर्वीच तो आराखडा केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याकडे पोहोचला होता. याला माणसाच्या व्यक्तीमत्वाची किमया म्हणता येईल. मोदीच पंतप्रधान होणार, हे जसजसे स्पष्ट होत गेले, तसतशी शासकीय यंत्रणा आपोआपच कामाला लागल्याचे संकेत आतापासूनच मिळायला लागले आहेत. केवळ भारतातल्याच शासकीय व अन्य यंत्रणा वेगाने कार्यरत झालेल्या नसून, जगभर त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत.

  एका मुलाखतीमध्ये मोदींना प्रश्न विचारण्यात आला, की पाकिस्तानात बसून भारताविरुद्ध घातपाताचे उद्योग करणार्‍या दाऊद इब्राहिमचे काय? त्यावर त्यांनी दिलेल्या सोप्या उत्तराची इथल्या माध्यमांनी फ़ारशी दखल घेतली नाही. पण पाकिस्तानची मात्र तात्काळ पाचावर धारण बसली होती. ओबामा यांनी बिन लादेनवर कारवाई करण्यापुर्वी पत्रकारांना त्याची सुचना दिलेली नव्हती. अशा गोष्टी जाहिर बोलायच्या नसतात, हे भारताच्या गृहमंत्र्याला कळत नाही, याबद्दल मोदींनी फ़क्त नाराजी व्यक्त केली होती. पण भविष्यात मोदी देशाची सत्तासुत्रे हाती घेऊन, अशीच पाकिस्तानात कारवाई करण्याच्या भयाने पाकिस्तानची झोप उडाली. याला म्हणतात नावाची वा व्यक्तीमत्वाची किमया. मोदी या नावाने पाकिस्तानातही दबदबा निर्माण केला आहे. मग देशांतर्गत त्यांच्या नुसत्या आगमनानेच किती गोष्टी मार्गी लागतील; याचा निव्वळ अंदाजही पुरेसा असतो. गंगा अभियानची कहाणी जशी आहे, तशीच काहीशी गोष्ट भारत सरकारच्या नोकरशाहीत सुरू झाली आहे. मंत्रीमंडळ सचिवालयाने युपीए सरकारच्या कालखंडातील धोरणात्मक चुकांचा आढावा घेऊन अहवाल बनवण्याचे काम हाती घेतले आहे. नवा पंतप्रधान आसनस्थ झाला, मग आजवरच्या पापाचा हिशोब मागणार; याची किती खात्री असावी? अजून तरी मोदी वा अन्य कोणी तशा सूचना दिल्याची खबर नाही. पण खमक्या सत्ताधीश येणार म्हणताच सगळी यंत्रणा सावध झाली आहे. कार्यरत झाली आहे. ह्याला सत्ताबदलाची खुण मानता येणार नाही. त्याला स्थित्यंतराची चुणूक म्हणावेच लागेल. येणारा सत्ताधीश गलथान कारभार वा उडवाउडवी सहन करणारा नाही, याची जाणीव या हालचालीला कारण आहे. कुठल्या एका जाहिरातीचे शिर्षक आहे. ‘सिर्फ़ नाम काफ़ी है’. त्या मालाची माहिती नाही. पण इथे मोदी हे नुसते नावच किती परिणामकारक आहे, त्याची ही नुसती झलक आहे.

3 comments:

  1. भाऊ अगदी बरोबर आहे. शेषण यांच्या काळातही सरकारी बाबुंच्या पाचावर धारण बसली होती. आणखी एक दाऊदने कराची हुन पलायन केल्याची बातमी आपण ऐकाली असेलच. असा आहे मोदींच्या नावाचा परिणाम.
    ता.क.- ऐकली ऐवजी ऐ काली झाले आहे. क्षमस्व. अगोदरची टिपनीही अशा चुकांमुळे काढली आहे.

    ReplyDelete