Friday, May 2, 2014

तेलंगणातली दुहेरी लढाई

  काल बुधवारी सातव्या फ़ेरीसाठी ८९ जागांवर मतदान झाले. त्यामध्ये आंध्रप्रदेशातील १७ जागांचा समावेश होता. या प्रदेशाला आता तेलंगणा असे नवे नाव मिळालेले आहे. एक वेगळे राज्य म्हणून तिथले खासदार आता लोकसभेत बसणार आहेत. तिथे एकाच वेळी मतदाराला दोनदा मतदान करायचे आहे. त्यातही नवे काहीच नाही. मागल्या दोन्ही खेपेस या मतदाराने असेच एका दिवशी दोनदा मतदान केलेले होते. विधानसभेसह लोकसभेचे मतदान तिथे २००४ सालापासून चालू आहे. तेव्हा आपल्या लोकप्रियतेची झिंग डोक्यात गेलेले तेलगू देसम पक्षाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विधानसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणूकीचा घाट घातला होता. पण तात्कालीन निवडणूक आयुक्त जे. एम. लिंगडोह यांनी मतदारयाद्या अद्ययावत करण्याचे काम चालू असल्याचे कारण देऊन विधानसभेची निवडणूक लांबवली. परिणामी लोकसभेच्या सोबतच २००४ सालात आंध्रप्रदेश विधानसभेची निवडणूक झाली. त्याचीच पुनरावृत्ती मग २००९ सालात झाली. तेव्हा चंद्राबाबूंना शह देण्यासाठी २००४ सालात कॉग्रेस पक्षाने डाव्यांसह तेलंगणा राष्ट्र समितीला सोबत घेतले होते. मात्र नंतर वेगळ्या राज्याच्या मागणीला पाने पुसण्यात आली. मध्यंतरी २००९ च्या निवडणुका होऊन कॉग्रेसने प्रचंड यश मिळवले होते. ती मागणी आता इतक्या वर्षांनी पुर्ण केल्याने तिथला राजकीय रंग पालटला आहे. बुधवारी मतदाराने एक मत नेहमीप्रमाणे लोकसभेसाठी दिलेले असले, तरी दुसरे मत आंध्रप्रदेश विधानसभेसाठी दिलेले नाही. यावेळी तो मतदार दुसर्‍या मताने पहिली तेलंगणा विधानसभा निवडतो आहे.

   यातली गंमत अशी आहे, की तेलंगणा राष्ट्र समितीने आधी कॉग्रेसमध्ये विलीन होण्याचे मान्य केले होते. पण विभाजनाच्या लढाईत कॉग्रेस पक्षातच दुफ़ळी माजल्याने तो पक्ष विकलांग झाला आणि त्याच्यापाशी तेलंगणा प्रदेशात नाव घेण्य़ासारखा कुणी नेताच उरला नाही. त्याचा पाभ उठवत समितीचे नेते चंद्रशेखर राव यांनी विलीनीकरणास नकार देऊन आपला पक्ष स्वतंत्र ठेवला. त्यामुळे आज कॉग्रेस दोन्ही भागात दुबळी पडलेली आहे. तेलंगणात कॉग्रेसला समिती व तेलगू देसम-भाजपा आघाडीशी दुहेरी लढत द्यावी लागते आहे. तर उर्वरीत आंध्रप्रदेशात जगन रेड्डीचा फ़ुटीर कॉग्रेस गट अधिक तेलगू देसम असे आव्हान आहे. विभाजनाचा जो पोरखेळ करण्यात; त्यामुळे सीमांध्र भागात कॉग्रेसला नाव घेण्यापुरताही कुणी नेता राहिलेला नाही. म्हणूनच थोडीफ़ार आशा कॉग्रेसला आहे ती तेलंगणामधून यश मिळवायची. कारण आजही वेगळे राज्य दिल्याचे श्रेय घेऊन कॉग्रेस तिथे मते मिळवू शकते. सहाजिकच खरी लढाई समिती व कॉग्रेस यांच्यात आहे. त्यात समितीचे पारडे जड असले तरी तिरंगी लढतीमुळे समितीलाही विधानसभेत स्पष्ट बहूमताची हमी वाटत नाही. त्यामुळेच दोन्ही बाजू एकमेकांवर प्रचारातून थेट हल्ले चढवत नव्हत्या. निकालानंतर कुठल्यातरी दोनतीन पक्षांना सरकार बनवण्यासाठी एकत्र यावे लागण्याची शक्यता त्याचे कारण आहे.      

   गेल्या दहा बारा वर्षात वेगळ्य़ा राज्याची लढाई आपण एकाकी लढवली असा राव यांचा दावा असला, तरी सोनियांनी कॉग्रेसचे बळ पाठीशी उभे केले म्हणूनच वेगळे राज्य शक्य झाले आहे. त्याची जाणीव राव यांना आहे, तशीच तेलंगणाच्या मतदारालाही आहे. पण लढवय्याकडे लोकांचा कल असतो. म्हणूनच समितीचे पारडे जड आहे. विधानसभेत बहूमतासाठी ६० किमान जागा आवश्यक असून त्याची राव यांना शाश्वती नाही. म्हणूनच बुधवारी मतदानाला सुरूवात होण्याआधीच समितीतर्फ़े बहूमतासाठी कुणाला सोबत घेता येईल, याची चाचपणी सुरू झालेली होती. तसे सगळेच पक्ष सीमांध्र व तेलंगणा अशा दोन्ही राज्यात लढत आहेत. पण समिती व जगन रेड्डीचा पक्ष यांना आपापल्या भागातच प्रतिसाद आहे. उलट कॉग्रेस, तेलगू देसम व भाजपा मात्र दोन्हीकडे सर्वशक्तीनिशी लढत आहेत. चंद्राबाबू म्हणूनच मोदींच्या लोकप्रियतेचा लाभ उठवून दहा वर्षाचा वनवास संपवायला उतावळे झालेले आहेत. त्यासाठीच त्यांनी घासाघीस करून का होईना भाजपाशी आघाडी व जागावाटप केलेले आहे. मतचाचण्यांचे अहवाल कुणालाच बहूमत द्यायला राजी नाहीत. शिवाय बहूतेक पक्षांनी आपापल्या मतचाचण्य़ा केलेल्या आहेत. त्यापैकी कुणी एका पक्षाला स्पष्ट बहूमत देत नाही. म्हणूनच तेलंगणातील सर्वच पक्ष निकालापुर्वीच अस्वस्थ दिसत आहेत. बुधवारच्या मतदानाने त्यांचे भाग्य मतदान यंत्रात बंदिस्त केले आहे. 

याबद्दलच्या चर्चा मोठ्या मनोरंजक आहेत. आज खांद्याला खांदा लावून लढलेले किंवा एकमेकांच्या विरोधात लढलेले, निकालानंतर तसेच आपापल्या भूमिकेवर ठाम रहातील; अशी कोणाला हमी वाटताना दिसत नाही. म्हणूनच असेल निवडणूक प्रचार सुरू झाला तेव्हा एकमेकांविषयी कठोर भाषा व शब्द बोलणार्‍यांचे शब्द अखेरच्या टप्प्यात मृदू होत गेले आहेत. भाषेतला कडवटपणा कमी झालेला आहे. एकूणच देशभरची लोकसभा निवडणूक इतक्या अटीतटीची झाली आहे, की त्यात तेलंगणा किंवा आंध्रप्रदेशातील राजकारणाकडे जाणकारांचे साफ़ दुर्लक्ष होऊन गेले आहे. खरे तर यावेळच्या मतदानातून दोन नवे चेहरे दक्षिणेतल्या राजकारणात ठळकपणे पुढे येणार आहेत. समितीचे चंद्रशेखर राव आणि जगन रेड्डी यांचे प्रादेशिक महत्व त्यातून सिद्ध होणार आहे.

2 comments:

  1. भाऊसाहेब जागता पहारा चे सेटिंग बदला . इथे फेसबुक शेअर चा पर्याय येत नाही . उलट तपासणी या ब्लॉग वर तो येतो . येथील पोस्ट शेअर करायच्या असतील तर फेसबुक ओपन करून url पेस्ट करावे लागते . त्यापेक्षा सेटिंग बदलून उलट तपासणी प्रमाणे इथेही f शेअर चा पर्याय येईल असे करावे हि नम्र विनंती .

    ReplyDelete
    Replies
    1. आपले म्हणणे अगदी रास्त आहे. मलाही ही समस्या नेहमीच सतावते.
      भाऊ कृपया वैभव यांच्या सुचनेचा विचार करावा ही विनंती.

      Delete