“Any fool can make things bigger, more complex, and more violent. It takes a touch of genius and a lot of courage to move in the opposite direction.” Albert Einstein
भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेद्र मोदी यांनी गेल्या दोनतीन महिन्यात प्रचारसभांचा जो झंजावात निर्माण केला; त्यातून त्यांनी वा अन्य लोकांनी गुजरात विकास मॉडेल या शब्दावलीचा अखंड वापर केला आहे. प्रचार असो किंवा चर्चा वादविवाद असोत, त्यात ही शब्दावली हजारो नव्हे, लाखो प्रसंगी वापरली गेलेली आहे. प्रामुख्याने भाजपाचे नेते, प्रवक्ते यांनाही खोदून खोदून हे गुजरात मॉडेल म्हणजे काय, त्याचा तपशील विचारला गेलेला असेल. पण कोणीही अजून तरी त्याबाबत नेमके स्पष्टीकरण देऊ शकलेला नाही. उलट कॉग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी व अध्यक्षा सोनिया गांधींपासून विविध नेत्यांनी त्या मॉडेलची सातत्याने टवाळी केलेली आहे. राहुलनी तर अदाणी नावाच्या उद्योगपतीला हजारो एकर जमीन फ़ुकटात देण्याचे हे टॉफ़ी मॉडेल असल्याची टिंगलही केलेली आहे. तर दुसरीकडे काही जाणत्यांनी केवळ भांडवलदारांचा विकास व बाकी गरीब भकास; अशा शब्दात मोदींच्या विकास आराखड्याची खिल्ली उडवलेली आहे. त्याचा बचाव भाजपा नेत्यांनाही करता आलेला नाही. पण मग असा प्रश्न येतो, की ज्याची इतकी टवाळी व हेटाळणी झाली, त्याच मॉडेलची जादू जनमानसावर कशी झाली व कोणी केलेली असावी? त्याचेही उत्तर कुठल्या चर्चा वा लेखातून मिळू शकलेले नाही. ज्याची मांडणी मोदी वा अन्य भाजपा नेता करू शकला नाही, पण प्रसार माध्यमातून ज्याची लक्तरेच काढली गेली, ते मॉडेल देशाच्या विविध राज्यात मोदींना विकासपुरूष ठरवायला कसे उपयोगी ठरले? मोदी आपल्या भाषणातून ते सांगतात, असा भाजपावाल्यांचा दावा आहे. पण तसे असेल तर जाणत्या पत्रकार अभ्यासकांना त्याचे आकलन कशाला झालेले नाही? मग त्याचा नेमका अर्थ सामान्य श्रोते व सभेतल्या गर्दीला कसा कळू शकतो? की सभेला जाऊन मोदींचे भाषण ज्यांनी ऐकलेले सुद्धा नाही, त्यांना आधीच हे विकासाचे मॉडेल पसंत पडलेले आहे? ते त्यांना सांगितले कोणी आणि समजावले तरी कधी? तीनचार महिन्यातले हे सर्वात मोठे राजकीय कोडेच आहे. त्याचे उत्तर परवा अकस्मात मिळाले.
सीएनएन आयबीएन या इंग्रजी वाहिनीच्या सागरिका घोष नावाच्या पत्रकार आहेत. त्यांनी दोन महिने देशाच्या विविध भागात जाऊन लोकांशी मनमोकळ्या गप्पा केल्या. ओपन माईक नावाच्या या कार्यक्रमात नागरिकांची गर्दी घोळका जमा करून सागरिका त्यांच्याशी निवडणूका व राजकारणाविषयी बोलतात. त्यांना प्रश्नरुपाने बोलते करून त्यांचे मन जाणुन घेतात. लोकांनी व्यक्त केलेल्या मताचे खुलासे मागतात. असाच एक कार्यक्रम याच आठवड्यात त्यांनी बिहारची राजधानी पाटणा येथे केला. गंगेच्या किनारी जमलेल्या घोळक्याला नितीश व मोदी यांच्या संदर्भात प्रश्न विचारले गेले. नितीशने उत्तम कारभार केला असेल तर मोदींकडे बिहारी लोकांचा झुकाव कशाला? विकासाचे मॉडेल नितीशकुमार यांचेही आहे. गुजरात मॉडेल व नितीश मॉडेल यात फ़रक कुठला? इत्यादी प्रश्नांची सरबत्ती केली असताना, समोरच्या घोळक्यातून दिली गेलेली उत्तरे वा स्पष्टीकरणे राजकीय अभ्यासकालाही लाजवणारी होती. त्याचा सगळा तपशील इथे देण्याची गरज नाही. पण समजावणार्यापेक्षा समजून घेणारा किती अगत्याचा असतो, त्याची त्या कार्यक्रमातून प्रचिती येते. लालूंचे जंगलराज संपवण्यासाठी नितीशला कौल दिला होता. मोदींच्या विरोधासाठी पाठींबा दिला नव्हता. पण आज नितीश द्वेषाने पेटलेला आहे, म्हणुन त्याला धडा शिकवायला हवा असे सांगणार्या त्या घोळक्यातील एका नागरिकाने मोदींनाही समजावता आलेले नाही, इतक्या सोप्या भाषेत गुजरात मॉडेल पेश केले. त्याचा गोषवारा असा.....
उत्तरप्रदेश, बिहार, ओरिसा, बंगाल, झारखंड वा छत्तीसगड अशा मागास पिछड्या राज्यातून लाखो कष्टकरी महाराष्ट्र गुजरात या विकसित राज्यात मोलमजूरी करायला स्थलांतर करतात. तिथे काही महिने राबतात आणि गाठीशी चार पैसे बांधतात. तिथे वास्तव्य करून राबणार्यांना चांगला रोजगार उपलब्ध आहे. आपले पोट भरून पुन्हा हे कष्टकरी आपल्या कुटुंबाला गावी पैसे पाठवतात. मग मोसमी कामासाठी आपापल्या गावी परत येतात. तेव्हाही कष्टाच्या कमाईची शिल्लक गावाकडेच घेऊन येतात. मग त्यांच्या कुटुंबाचा सुखवस्तूपणा शेजार्यापाजार्यांच्या नजरेत येतो. त्यांच्याकडून गुजरातच्या विकासाच्या कहाण्या खेड्यापाड्यापर्यंत पोहोचल्या आहेत. त्याच कहाण्यांची तुलना स्थानिक परिस्थितीशी केली, मग गुजरात कधीच न बघितलेल्या स्थानिक रहिवाशी बिहारी, बंगाली, झारखंडी गावकर्यांना आपल्या राज्याचाही गुजरात व्हावा असे वाटू लागते. गुजरात वा मुंबईहून कनवटीला चार पैसे बचतीचे घेऊन येणारी माणसे इथे आहेत, तशी इथून बचत व कमाई करून माघारी गुजरात वा महाराष्ट्रात जाणारी किती मराठी वा गुजराती माणसे आहेत? बिहारमध्ये येऊन नशीब काढले असे सांगू शकणारा कोणी गुजराती कष्टकरी आहे काय? गुजराती माणूस आपल्या रहात्या गावात, तालुक्यात वा जिल्ह्यातही सुखवस्तू झालेला ज्यांनी आपल्या रोजगाराच्या निमित्ताने केलेल्या गुजरात भेटीत बघितला; त्यांनी त्याच्या कथा मागास पिछड्या राज्यात येऊन सांगितल्या. त्यातून गुजरात मॉडेल व मोदींविषयीचे आकर्षण निर्माण झाले. कुठल्याही वर्तमानपत्र वा वाहिन्यांवर कधीच सांगितल्या गेल्या नाहीत, अशा गुजराती रहिवाश्यांच्या सुखवस्तू सुसह्य जीवनाच्या कहाण्या हेच गुजरात मॉडेल आहे. त्याचीच उत्तर भारतातल्या मागास गरीबांबा भुरळ पडली आहे. म्हणुनच मोदींच्या आवाहनाला इथे प्रतिसाद मिळू लागला आहे.
गुजरातमध्ये इतर राज्यातून रोजगारासाठी येणारा कष्टकरी चार पैसे गाठीशी बांधून परत माघारी आपल्या गावी इतर राज्यात जाऊ शकतो, इतकी गुजरातची श्रीमंती वा विकास म्हणजे गुजरात मॉडेल, क्या बात है? कुठल्या आर्थिक जाणकार, राजकीय अभ्यासक वा भाजपाच्या नेत्यालाही जे सोप्या शब्दात कधी मांडता आले नाही; त्याची व्याख्या गंगेच्या काठी पाटण्यात त्या इसमाने सहजपणे सांगून टाकली. ज्यांना ती व्याख्या मांडता आली नाही, समजू शकली नाही, त्यांच्याकडून लोकसभेच्या निवडणूक राजकारणाचे वा मोदींच्या लोकप्रियतेचे विश्लेषण कसे होऊ शकेल? त्या गुमनाम बिहारी बाबूला सलाम.
nice
ReplyDeleteमस्तच, खुप आवडले.
ReplyDeleteछान ! मधे टीवी वर अमित शाहची मुलाखत झाली. त्यात त्यांनी हेच सांगितले की गुजरातला कामासाठी येणारे UP वाले आणि बिहारी यांनीच गुजरात च्या विकासाचा प्रचार केला आहे. आणि त्यामुळेच आम्हाला या राज्यात चांगले मतदान झाले.
ReplyDelete