गेल्या दोन दिवसात घटनाक्रम अतिशय वेगाने बदलत चालला आहे. अकस्मात सेना व भाजपा यांच्यात ‘नकारात्मक’ जवळीक वाढताना दिसते आहे. आजवरच्या ‘सकारात्मक’ चर्चेतून जे विपरीत परिणाम समोर येत होते, त्याला छेद देणारे परिणाम थांबलेल्या चर्चेतून समोर येऊ लागले आहेत. चारपाच दिवस दोन्ही पक्षातली ‘सकारात्मक’ चर्चा थांबल्याचे संकेत मिळत होते. कारण तसे कोण भाजपा नेता बोलत नव्हता. म्हणजेच चर्चा थांबली असेच म्हणावे लागते. अशावेळी शिवसेना सत्तेच्या उंबरठ्यावर किंवा शपथविधीत सेनेचा सहभाग, असल्या बातम्या येऊ लागल्या. याचा अर्थ कसा लावायचा? सकारात्मक चर्चा नकारात्मक परिणाम देते आणि नकारात्मक चर्चा सकारात्मक परिणाम घडवून आणते, असे म्हणायचे काय? गेल्या दोन महिन्यात एकही भाजपा नेता शिवसेनेच्या गोटात वा मातोश्रीवर फ़िरकला नव्हता आणि सेनेचा नेता कुठेही भाजपा नेता वा कार्यालयाकडे फ़िरकला, मग सत्तेसाठी सेनेची घालमेल अशा बातम्या झळकायच्या. यावेळी उलटेच काही घडले आहे. सेनेचे माजी मंत्री व आजचे भाजपानेते व रेल्वेमंत्री प्रथमच मुंबईत आले आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन थेट मातोश्रीवर पोहोचले. दोन महिन्यात सेना किंवा उद्धव ठाकरे यांच्याशी समोरासमोर भेटणारा हा पहिलाच नेता आहे. त्यानंतर मग सेनेच्या सत्तेतील सहभागाच्या बातम्या सुरू झाल्या. अनेक बाजूंनी तशा वार्ता येऊ लागल्या. दिल्लीत मुख्यमंत्री राष्ट्रवादीच्या पाठींब्याने आपली कशी कोंडी झाली, त्याची कबूली देऊ लागले तर कोल्हापुरात पणनमंत्री चंद्रकांत पाटिल सेनेला पुढील विस्तारात सत्तेत आणायची हमी देऊ लागले. पण कोणीही प्रादेशिक भाजपा नेता सेनेकडे फ़िरकलेला दिसला नाही. म्हणजेच सकारात्मक चर्चा टाळली आणि युतीमधला तिढा सुटला, असेच म्हणावे लागते. मग ‘सकारात्मक चर्चा’ हा शब्दच संशयास्पद होऊन जात नाही काय?
गेल्या महिनाभर सत्तेसाठी सेनेतला एक गट उतावळा झालेला आहे. सत्तेसाठी सेनेतले आमदार फ़ुटू शकतात. सत्तेत सेना आली नाही, तर सेना फ़ुटणार इत्यादी अफ़वांचे पेव फ़ुटले होते. त्यापैकी किती अफ़वा खर्या ठरल्या? अर्थात त्यासाठी प्रयत्न झालेच नाहीत असे कोणी म्हणू शकत नाही. पण अशक्य गोष्टी करण्याचा मोह आवरत नसला, म्हणून त्या शक्य होतातच असे नाही. राष्ट्रवादीच्या पाठींब्याने काहीकाळ सत्ता हाती घेऊन आमदार फ़ोडायचे समिकरण मांडले जात होते आणि त्यासाठीच मग ‘सकारात्मक’ चर्चेचे गुर्हाळ लावून सेनेला झुलवत ठेवले जात होते. पण त्यातून जनमानसातली प्रतिमा मलीन होऊ लागल्यावर भाजपाला सुबुद्धी सुचली आहे. त्यासाठी आपण खुद्द देवेंद्र फ़डणवीस यांचीच साक्ष काढू शकतो. जो विश्वास व मते प्रत्यक्ष मतदानातून मिळवली होती, ती पुढल्या महिनाभरात आपण कशी गमावली, त्याची कबुलीच फ़डणवीस यांनी एका वाक्यातून दिली आहे. ते म्हणतात, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा घेताना आपण काहीसे अस्वस्थ होतो आणि २२ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत झाली नाही, तेवढी टीका विश्वासदर्शक प्रस्तावानंतरच्या तीन दिवसांत आपल्यावर झाली.’ ह्याला कबुली का म्हणायचे? तर महिनाभर प्रत्येक भाजपा नेता आपण राष्ट्रवादीचा पाठींबा घेतलेलाच नाही, याची ग्वाही देत होता आणि आज त्यांनीच विधीमंडळाचा नेता म्हणून निवडलेला मुख्यमंत्रीच तसा पाठींबा ‘घेताना’ अस्वस्थ होतो असे म्हणतोय. म्हणजेच महिनाभर भाजपाचे प्रवक्ते निव्वळ थापेबाजी करत होते. आपल्या स्वबळाच्या मस्तीमागचे खरे बळ लपवायची कसरत करीत होते ना? तसे नसेल, तर आज देवेंद्र काय म्हणत आहेत? याच एका कारणास्तव उद्धव ठाकरे यांच्या शब्दांना महत्व होते. राष्ट्रवादीचा पाठींबा नाकारा, अशी अट उद्धवनी विधानसभा अधिवेशनाच्या आदल्या दिवशी घातली, तिची महत्ता आता लक्षात येईल.
उद्धव किंवा त्यांच्या सहकार्यांनी मागल्या दोन महिन्यात कुठले राजकारण केले, त्याला महत्व नाही. पण देवेंद्र सरकारची स्थापना झाल्यावर विश्वासमताच्या नेमक्या क्षणी त्यांनी राष्ट्रवादीचा पाठींबा नाकारण्याची घातलेली अट आणि ती अमान्य झाल्यावर विरोधी पक्षात बसण्याची केलेला हट्ट, हीच निर्णायक खेळी ठरली. त्यातूनच मग भाजपा व राष्ट्रवादी यांच्यातली दिर्घकालीन व्याभिचारी सलगी उघडी पाडण्य़ाचे राजकारण सुरू होणार आणि तिथेच भाजपाचे नाक दाबले जाणार होते. सत्तेतला सहभाग हे सेनेला दाखवलेले आमिष होते आणि त्यात सेना काहीकाळ फ़सली, हे सत्य नाकारता येणार नाही. पण तेव्हा सेनेला आपल्या हातातला हुकूमाचा पत्तासुद्धा लक्षात आलेला नव्हता. त्यामुळे मग सेना सत्तेला आसूसली आहे आणि पंधरा वर्षे सत्तेबाहेर बसलेल्या सेनेच्या एका गटाला सत्तेत येण्याची घाई झालेली आहे, असल्या अफ़वा पसरवण्याचे खेळ सुरू झाले होते. सेनेच्या सतालोलूपतेच्या पांघरूणाखाली भाजपाला राष्ट्रवादीशी चाललेली मिलीभगत झाकायची होती. जोपर्यंत शिवसेना त्याच विषयाला हात घालत नव्हती, तोपर्यंत भाजपाची मस्ती रंगली होती. पण राष्ट्रवादीचा पाठींबा नाकारण्याच्या अटीने पावित्र्याचे धोतर सुटायला सुरूवात झाली आणि पुढे विश्वासमताच्या नाट्याने भाजपाची पुरती अब्रुच गेली. आता देवेंद्रच त्याची कबुली देत आहेत. ‘२२ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत झाली नाही, तेवढी टीका विश्वासदर्शक प्रस्तावानंतरच्या तीन दिवसांत आपल्यावर झाली.’ याचा अर्थ काय होतो? ज्या थापा भाजपाचे प्रवक्ते मारत होते, त्यावर त्यांचेच कार्यकर्ते, पाठीराखे व मतदार विश्वास ठेवायला तयार नव्हते. जर उद्धव ठाकरे यांनी ‘सकारात्मक’ पाऊल म्हणून विरोधात बसण्याऐवजी बिनशर्त पाठींबा दिला असता, तर भाजपाचा हा राष्ट्रवादी मुखवटा उतरला असता काय?
इथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे. देवेंद्र फ़डणवीस यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना केलेल्या प्रांजळ विधानांचे सर्वांनीच कौतुक करायल हवे. सहसा कुठलाही सत्ताधारी आपली चुक कबुल करत नाही. उलट आपल्या चुकांवर युक्तीवादची मखलाशी करून पांघरूण घालू पहातो. जनतेला मुर्ख समजण्यात धन्यता मानतो. देवेंद्रनी तो पायंडा झुगारून आपल्या चुकीची पहिल्याच महिन्यात कबुली दिली आणि आपण प्रचलित राजकीय बदमाशीला बळी पडणार नाही, याची साक्ष दिली आहे. बड्याबड्या मुरब्बी राजकीय नेत्यांना इतके धाडस दाखवता येत नाही. कारण चहूकडून मग टिकेची झोड उठण्याचा धोका असतो. देवेंद्रनी त्याची पर्वा केलेली नाही आणि आपल्यावर विश्वासमतानंतर टिका झाली, तिचे स्वागत करताना त्याच टिकेला शरण गेल्याचेही मानले आहे. इतका प्रामाणिक मुख्यमंत्री महाराष्ट्रालाच काय अवघ्या देशाला यापुर्वी कधी मिळाला नसेल. म्हणूनच त्या तरूण नेत्याची पाठ थोपटावीच लागेल. सच्चाईची जपमाळ अनेक वर्षे ओढणार्या केजरीवालना आपली चुक मानायला लोकसभा निवडणूक निकालाच्या खड्ड्यात पडावे लागले. त्याकडे बघता देवेंद्राचे मनमोकळे कौतुक प्रत्येकानेच करायला हवे. पण त्याचवेळी त्यांच्या त्याच कबुलीने सर्व भाजपा नेते व प्रवक्ते यांच्यावर प्रश्नचिन्ह लावले आहे त्याचे काय? आपण राष्ट्रवादीचा पाठींबा घेतलेलाच नाही, असे छातीठोकपणे सातत्याने दोनतीन आठवडे सांगणारे नेते-प्रवक्ते कुणाची फ़सवणूक करत होते? सामान्य जनता वा अन्य पक्षांचे सोडून द्या. ज्यांनी भाजपासाठी काम केले, इतरांशी वाद घातले, हमरीतुमरीची भांडणे करून पक्षाचे समर्थन केले, त्या भाजपाच्या हितचिंतकांचीच अशा प्रवक्त्यांनी दिशाभूल केली नाही काय? आपल्याच पाठीराख्यांना असे तोंडघशी पाडले नाही काय? त्यांनी अशा हजारो हितचिंतक पाठीराख्यांच्या सदिच्छांचा बळी दिला, त्याची भरपाई कशी व्हायची?
भाऊराव,
ReplyDeleteतुम्ही शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आज ना उद्या भाजप फुटणार. असंगाशी संग केल्याची किंमत भाजपला मोजवेच लागेल. ही फूट महाराष्ट्रापुरती मर्यादित राहते का देशव्यापी होते हे पाहणे मनोरंजक ठरावे.
आपला नम्र,
-गामा पैलवान
"अकस्मात सेना व भाजपा यांच्यात ‘नकारात्मक’ जवळीक वाढताना दिसते आहे." वा भाऊ वा! आपण आज मराठी भाषेला नविन शब्द दिला. 'नकारात्मक जवळीक.'
ReplyDeletegamaa pailwanji ...bhari ....
ReplyDeleteकितीही प्रयत्न करा - भाजपाचे राष्ट्रवादीबरोबर आधीच ठरले होते, वगैरे वगैरे. १३० जागा न देण्याची दूरदृष्टीहीन हाव शिवसेना आणि उद्धवला झाली, निवडणूकीत मिळालेल्या जागांनी कोण कुठे आहे हे लोकांनी दाखवून दिले. आता मारामारी ATM खात्यांसाठी चालू आहे.
ReplyDelete