आज त्याला बरोबर चार महिने पुर्ण झाले. आज १५ डिसेंबर आहे आणि त्या दिवशी १५ ऑगस्टचा दिवस होता. भाजपाला लोकसभेत पुर्ण बहूमत मिळवून देणार्या नरेंद्र मोदी या पंतप्रधानांचे लालकिल्ल्यावरून पहिलेच भाषण चालू होते. आधी निवडणूक प्रचारात त्यांनी लालकिल्ल्याची प्रतिकृती असलेल्या व्यासपीठावरून गतवर्षी भाषण दिल्यावर मोदींची मनसोक्त टवाळी झाली होती. सहाजिकच खरोखरच्या लालकिल्ल्यासमोर पंतप्रधान होऊन मोदी भाषण देतात, हे त्या टवाळखोरांना रुचणारे नव्हते. सहाजिकच मग मोदींच्या प्रत्येक शब्दावर अशा टवाळखोरांची बारीक नजर होती. त्यावेळी देशाला उद्देशून भाषण करताना मोदींनी बोललेले एक वाक्य आज बहुतेकांच्या स्मरणात नसावे. ज्या महात्मा गांधींनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांना आपण भारतीय म्हणून काय दिले? असा सवाल करीत पंतप्रधानांनी स्वत:च त्या प्रश्नाचे उत्तर दिलेले होते. मात्र ते उत्तरही तितकेच प्रश्नार्थक होते. बापूंना स्वच्छता प्राणप्रिय होती. मग त्यांच्या स्मरणार्थ आपण स्वच्छ भारत नावाची अनुपम भेट महात्माजींना देऊ शकत नाही काय? येत्या काही वर्षात मोहिमा राबवून व प्रबोधन करून आपण महात्माजींची ही इच्छा पुर्ण करूया, असे आवाहन मोदींनी तेव्हा केलेले होते. त्यानंतर मोदींची जी हेटाळणी व टवाळी सुरू झाली, त्यातला एक मुद्दा असा होता, की शेवटी ह्या गोडसेच्या वारसाला महात्म्याचे नाव घ्यावेच लागले. ही काय भानगड आहे? मोदी हे गोडसेचे वारस कसे झाले? कारण त्यांचे गोडसे यांच्याशी कुठले रक्ताचे नाते नाही. मग त्यांच्यावर गोडसेचा वारस असा आरोप कसा होऊ शकतो? तर ज्यांनी असे आरोप केले, त्यांचा आरोप वैचारिक होता. मोदींना असे टवाळखोर गोडसेच्या विचारांचा वारस मानतात. म्हणूनच मग त्यांना गांधी विचारांचा शत्रू वा विरोधक मानतात. त्यातून अशा टवाळीची प्रेरणा मिळत असते.
हरकत नाही. आपण अशा टवाळखोरांच्या तर्कशास्त्राच्या आधारे त्यांचे वर्तन तपासायला काय हरकत आहे? चार महिन्यापुर्वी त्यांनी मोदींच्या विधानाला घेतलेला आक्षेप मान्य करायचा, तर त्यांनी गांधींच्या विचार वा तत्वज्ञानाचा वारसा चालवायला नको, अशी या टवाळखोरांची अपेक्षा होती काय? नसेल तर त्यांनीही इतरेजनांप्रमाणेच मोदींच्या लालकिल्ल्यावरील गांधीविषयक विधानाचे कौतुक करायला हवे होते, टाळ्या पिटायला हव्या होत्या. पण त्यांनी तर थेट छातीच बडवायला आरंभ केला होता. म्हणजेच त्यांच्या आक्षेपाचा अर्थ असा होतो, की मोदींनी गांधींना बाजूला टाकून स्वातंत्रदिनी सुद्धा त्याच किल्ल्यात चाललेल्या गांधी खुन खटल्यातील आरोपी नथूराम गोडसे याचेच गोडवे गायला हवे होते. जिथे अर्धशतकापुर्वी या हत्येतील आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली, त्यांचे गौरवगान २०१४ साली पंतप्रधानांनी करावे, अशीच ती अपेक्षा होत नाही काय? नसेल तर चार महिन्यापुर्वी मोदींच्या भाषणाची टवाळी कशाला झाली होती? त्यांना गोडसेचा वारस कशाला ठरवले जात होते? अत्याधुनिक गांधीवाद्यांचा हा आग्रह चमत्कारिक वाटला, तरी त्यांच्या तर्कशास्त्राला धरून आहे. म्हणूनच आता त्यांचा होणारा तीळपापड नवलाचा वाटतो. कारण मोदी यापासून दूर राहिले आणि कित्येक वर्षे निष्ठेने काहीजण आपल्या गोडसे भक्तीचे समारंभ आयोजित करतात, त्यांच्यावर या आधुनिक गांधीभक्तांनी आगपाखड केलेली आहे. त्याचे कारण उलगडत नाही. मोदींनी गांधींचे नाव घेणे पाप असेल, तर गोडसे भक्तांनी आपल्या गांधीहत्येचे समर्थन करण्यात गैर ते काय? कारण उघड आहे. तीच तर नव्या गांधीवाद्यांची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. कधीही कटाक्षाने गोडसे हे नाव ज्याने उच्चारले नाही, त्या मोदींवर गोडसेचा वारस म्हणून शिक्कमोर्तब करणार्यांनी स्वत:ला गोडसेचे वारस समजणार्यांवर आक्षेप कशाला घ्यायचे?
एका गोडसे वारसाने गांधीचे नाव घेतले व त्याच्या इच्छांना सन्मान द्यायचा म्हटला, तर हे गांधीभक्त विचलीत होऊन त्याला आव्हान देतात, त्याची टवाळी करतात. मग दुसर्या गोडसे वारसांनी गोडसेचे स्मरण केल्यास त्यांना पोटदुखी व्हायचे कारणच काय? एकदा त्यांनी आपल्या गांधीप्रेमाची व्याख्या तरी करून टाकावी. त्यांना गांधी या महात्म्याविषयी खरे प्रेम व आस्था आहे, की त्यांचे गांधीप्रेम हे गोडसेद्वेषातून पाझरणारी श्रद्धा आहे. त्यांचा गांधी हा विचार आहे, की गोडसेद्वेषाचे पर्यवसान आहे? कारण असे सर्वच गांधीप्रेमी गोडसे शिवायचा गांधी बघू शकत नाहीत वा गोडसेने हत्या केलेल्या गांधीपलिकडला गांधी, त्यांच्या बोलण्यावागण्यातून अनुभवास कधी येत नाही. तुम्ही त्यांच्यासमोर गांधीजी यांच्याबद्दल बोला की विनाविलंब त्यांच्यातला गोडसे द्वेष उफ़ाळून येतो. गोडसेचे नाव घेतल्याशिवाय त्यांना गांधींचे स्मरणही होत नाही. त्यांच्या आयुष्यातला गांधी हा गोडसेची पडछाया असतो. गोडसेशिवाय त्यांचा महात्मा अपुरा असतो. त्यांना मिठाचा सत्याग्रह आठवत नाही. त्यांना रोग्यांची सेवा करणारा गांधी ठाऊक नसतो. त्यांना स्वातंत्र्य चळवळीत झोकून देणारा, चरखा चालवणारा गांधी माहितीच नसतो. त्यांचा गांधी गोडसेपासून सुरू होतो आणि त्याच गोडसेपर्यंत येऊन अंतर्धान पावतो. अवघे जग २ आक्टोबर किंवा ३० जानेवारीला विविध कारणास्तव गांधी स्म्ररण करत असते. तेव्हा या गांधीवाद्यांना त्या महात्म्याचे सोयरसुतक नसते. गांधीस्मरण होण्यासाठी त्यांना गोडसे नावाची चावी द्यावी लागते. मग बघा कशी त्यांची गांधीभक्ती उफ़ाळून येते. गांधींचे गोडवे मोदींनी गायले मग त्यांना गोडसे आठवतो आणि गोडसेचे हौतात्म्य साजरे केले, मग त्यांना गांधी आठवतो. थोडक्यात अशा गांधीवाद्यांचा गांधीजी गोडसेने पुरता व्यापून टाकलेला आहे. गोडसे पुसून टाकला, तर त्यापैकी कोणी गांधींच्या वार्याला उभे रहाणार नाहीत.
चार महिन्यांपुर्वी मोदींनी पंतप्रधान म्हणून पहिलेच लालकिल्ल्यावरील भाषण करताना गांधींचा उल्लेख केला. तसा तो आजवरच्या अनेक पंतप्रधानांनी केलेला आहे. पण त्या उल्लेखाने कोणा गांधीप्रेमीला गोडसे आठवला नव्हता. मग यावेळीच तसे गोडसेस्मरण या गांधीवाद्यांना कशाला व्हावे? उत्तर सोपे आहे. त्यांचा गांधी गोडसेपुरता आहे. इतकी वर्षे पुण्यात वा अन्यत्र काहीजण गोडसे यांच्या पुण्यतिथ्या वा कुठले दिवस साजरे करतात. त्याची बातमी पाठवूनही वृत्तपत्रात त्याला प्रसिद्धी मिळायची नाही. यावेळी तितकाच साधा समारंभ बंदिस्त जागेत तेवढ्याच लोकांनी साजरा केला. तर त्याला देशव्यापी प्रसिद्धी मिळून गेली. देशाच्या कानाकोपर्यातले गांधीवादी झोपेतून जाग आल्यासारखे खवळून रस्त्यावर आले. मोदी सरकार आल्यापासून गोडसेवृत्ती डोके वर काढू लागल्याचा शोध त्यांनी लावला. पत्रके पाठवून व बातमी देऊन सुद्धा छापली जात नव्हती, तेव्हाही हे समारंभ चालूच होते. पण तेव्हा यापैकी कोणाला त्यात गोडसेप्रवृत्ती डोके वर काढताना दिसली नाही. याचा अर्थ बातमी छापून येणे म्हणजेच डोके वर काढणे होतो आणि तसेच असेल, तर मग गोडसेप्रवृत्ती माध्यमात डोके वर काढू लागली असे म्हणावे लागले. त्याचे उत्तर सरकारकडे वा सत्ताधारी पक्षाकडे मागण्यापेक्षा संबंधित माध्यमांच्या संपादकांकडे मागणे उचित होईल. या लोकांनी मुळात अशा बातम्या आताच कशाला द्याव्यात? तसे काहीही होणार नाही. कारण त्यांचा आतापुरता गांधीप्रेमाचा कोटा संपलेला आहे. पुढले काही दिवस आता गांधीप्रेम धुळ खात कोपर्यात पडेल. शरद पोंक्षेच्या भूमिकेचे नाटक वा समारंभात त्याने गोडसे गुणगान केल्याखेरीज पुन्हा नजिकच्या काळात गांधीप्रेमाचे भरते आपल्याला दिसणार नाही. कारण या गळेकाढू गांधीभक्तांचा गांधी तुमच्यामाझ्याप्रमाणे विचारांचा प्रवाह नसून, ती गोडसेची निव्वळ पडछाया आहे.
असे सर्वच गांधीप्रेमी गोडसे शिवायचा गांधी बघू शकत नाहीत वा गोडसेने हत्या केलेल्या गांधीपलिकडला गांधी, त्यांच्या बोलण्यावागण्यातून अनुभवास कधी येत नाही. तुम्ही त्यांच्यासमोर गांधीजी यांच्याबद्दल बोला की विनाविलंब त्यांच्यातला गोडसे द्वेष उफ़ाळून येतो. गोडसेचे नाव घेतल्याशिवाय त्यांना गांधींचे स्मरणही होत नाही. त्यांच्या आयुष्यातला गांधी हा गोडसेची पडछाया असतो. गोडसेशिवाय त्यांचा महात्मा अपुरा असतो.
ReplyDeleteअगदी खरंय !!
हे लोक नाथुराम गोडसेला सुद्धा मोठा करणार!
ReplyDelete