Wednesday, December 17, 2014

एकत्र येऊन साधणार तरी काय?

आपल्याकडे निवडणूकीच्या राजकारणाचे विश्लेषण नेहमी जातीपातीच्या चष्म्यातून होत असल्याने काही प्रमाणात राजकीय पक्षही त्याच समजुतीचे बळी झाले आहेत. किंबहूना त्याच समजुतीने गेल्या लोकसभेत नरेंद्र मोदी यांचा विजय खुप सोपा करून टाकला, असे म्हटल्यास गैर ठरू नये. लालू वा मुलायम म्हटले की त्यांना यादव जातीची मते हमखास मिळणार हे जसे गृहीत आहे; तसेच महाराष्ट्रात शरद पवार व कॉग्रेस म्हणजे हुकमी मराठा कुणब्यांची मते, असेही गृहीत आहे. त्या गृहितकाला संपुर्णपणे फ़ेटाळता येत नसले, तरी एकूण कुठलीही जात व तिचा लोकसमूह पुर्णपणे कुठल्या एका नेत्याच्या वा पक्षाच्या मागे धावत नसतो. आपापले हितसंबध ओळखून मतदार मतदान करतो आणि काही प्रमाणात जातीनिहाय मतदान होते. एकदा असे विभाजन लक्षात घेतले, मग जातीपातीनुसार निवडणूक निकालाचे अन्वय लावणे सोपे होऊन जाते. लोकसभा निवडणूक प्रचारात मोदी यांनी लोकांच्या मतात ज्या आशाआकांक्षा निर्माण केल्या, त्यातून बहुसंख्य मतदाराला जातीपातीच्या जोखडातून बाहेर काढणे त्यांना शक्य झाले. एका बाजूला विकासाचे व चांगल्या दिवसांचे स्वप्न आणि दुसर्‍या बाजूला विविध जातीपातीच्या उदयोन्मुख नेतृत्वाला संधी, यातून मोदींना जातीपातीच्या भिंती उध्वस्त करणे शक्य झाले. पण राजकीय पक्ष, त्यांचे नेते व विश्लेषकांना आपल्या समजुतीतून बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यांना निकालांनीच खडबडून जाग आली. पण तोवर निकाल लागले होते. निकालांनी जे नवे वास्तव समोर आणले, त्याचा अजून पुरेसा अभ्यास होताना दिसत नाही. विश्लेषकांनी अभ्यास करायला हवा तसेच राजकीय पक्षांनी आत्मचिंतन करायला हवे. तरच बदलत्या राजकीय वार्‍यांचा त्यांना परिचय होईल आणि झालेल्या भूकंपातून सावरणे शक्य होईल. तसे झाले असते, तर विविध जनता दलीयांनी एकत्र येण्याचा पर्याय निवडला नसता.

आजही या विविध जनता दल व समाजवादी गटांना असे वाटते आहे, की आपण मतविभागणीमुळे पराभूत झालो. आपल्या नाकर्तेपणामुळे पराभव झाला, याचे भान त्यांना आलेले नाही. ते आले असते तर त्यांनी लोकसभा निवडणूकीचा बारकाईने अभ्यास केला असता आणि मोदींच्या यशापेक्षा आपल्या पराभवाचे परिशीलन केले असते. त्यातून त्यांना पराभवाची कारणे उमगली असती. मग त्यांनी मोदींना रोखण्यासाठी एकत्र येण्याचा विचार करण्यापेक्षा स्वत:ला उपयुक्त राजकारणी बनवण्याचा अजेंडा हाती घेतला असता. त्यांचा पराभव त्यांच्या निरूपयोगीतेमुळे झालेला आहे. आजवर ज्या मतदाराने त्यांना बळ दिले व कौल दिला, त्याच्या आशाआकांक्षांसाठी आपण काय करू शकलो, याचा लालू, नितीश वा मुलायम इत्यादिकांनी विचार केला करायला हवा. तर त्यांना एक गोष्ट लक्षात आली असती. लोकांनी मोदींना निवडण्यापेक्षा अशा कालबाह्य नेते व पक्षांना फ़ेटाळले आहे. ज्या अपेक्षा असे नेते पुर्ण करू शकले नाहीत, त्या मोदी पुर्ण करतील अशा अपेक्षांनी मोदींना यश दिले आहे. मिळालेले यश ही मोदींची शक्ती वा ताकद नाही. त्या लोकांच्या शुभेच्छा आहेत. तेव्हा मोदींना रोखणे वा थोपवणे हा कुठल्याही राजकीय पक्षाचा अजेंडा असू शकत नाही. कारण मोदींना रोखणे म्हणजे त्यांच्या पाठीशी आलेल्या लोकांच्या अपेक्षा व स्वप्नांनाच रोखणे आहे. मग आपल्याच स्वप्नांना विरोध करणार्‍यांना मतदार कसा प्रतिसाद देईल? प्रतिसाद हवा असेल तर लोकांच्या अपेक्षा जाणून घ्यायला हव्यात आणि त्यानुसार आपण कसे त्यांची पुर्ती करू, हे लोकांच्या मनात ठसवावे लागेल. पण त्याचाच थांगपत्ता मोदी विरोधात एकत्र आलेल्या जुन्या समाजवाद्यांना लागलेला नाही. म्हणूनच त्यांच्या एकत्र येण्याने मोदींना रोखणारी शक्ती निर्माण होऊ शकत नाही. तसा एक भ्रम मात्र उभा राहू शकतो.

मोदी असोत किंवा पुर्वीचे विश्वनाथ प्रताप सिंग असोत, त्यांच्या आधीच्या इंदिराजी वा राजीव गांधी असोत; लोकांनी त्यांना भरभरून मते व सत्ता दिली. तेव्हा आपल्या अपेक्षांना पुर्ण करण्याची संधी दिलेली होती. ती संधी साधून त्या अपेक्षांची पुर्ती करताना अशा नेत्यांनी अन्य कुठले राजकारण केले असते वा इतर पक्ष वा नेत्यांना शह काटशह दिले असते, तरी मतदार त्यांच्यावर नाराज झाला नसता. कारण सत्तेचे कोणते लाभ नेते वा पक्ष घेतात, त्याच्याशी जनतेला कर्तव्य नसते. आपण ज्या अपेक्षा बाळगलेल्या आहेत, त्याची कितीशी पुर्तता होते, यावर मात्र मतदाराचे लक्ष असते. म्हणूनच निवडणूकीत यश मिळवणार्‍या पक्ष वा नेत्याने लोकांच्या अपेक्षांवर आधी लक्ष केंद्रित करायचे असते. त्यांच्या पुर्ततेचे काम मार्गी लावले, मग अन्य राजकीय डावपेच खेळायला काहीच हरकत नसते. कारण आपल्या अपेक्षापुर्तीचे काम आरंभ झाल्याने त्यांचा मतदार खुश असतो आणि त्यांच्याच मागे ठामपणे उभा रहाण्याची बेगमी होत असते. त्यानंतर असा सत्ताधारी अन्य पक्ष वा नेत्यांशी कोणते डावपेच खेळतोय, याबद्दल जनतेची नाराजी होण्याचे काही कारण उरत नाही. नितीश, लालू वा मुलायम इत्यादी नेत्यांना सत्ता व संधी मिळाली. त्यानंतर ते जनतेच्या अपेक्षा विसरून बेताल वागत गेले. राजकीय तत्वज्ञानाच्या आधारे डावपेच खेळण्यात त्यांनी आपली शक्ती खर्च केली. लोकांनी त्यासाठी बळ दिलेले नव्हते, तर आपल्या गरजा व समस्या यासाठी या नेत्यांना बळ दिलेले असते. तेव्हा त्यांना त्याचा विसर पडला होता. रथयात्रेचा राजकीय डाव खेळण्यात मुलायम किंवा लालूंनी जनतेच्या अपेक्षा दुर्लक्षित केल्या. नितीशनी मोदीना रोखण्यात आपली शक्ती पणाला लावली. त्याला जनतेचा विरोध नाही. पण त्यासाठी लोकांच्या अपेक्षांकडे काणाडोळा करण्याने जनता नाराज होत असते. आजतरी या शहाण्यांना त्याचे भान आलेले आहे काय?

आताही ज्या सहा जुन्या जनतादलीय वा समाजवादी नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांनी कुठेतरी लोकांच्या अपेक्षा वा समस्यांचा मुद्दा पुढे आणला आहे काय? त्यांचा अजेंडा पुर्वी इतकाच नकारात्मक आहे. मोदींना रोखण्यासाठी त्यांनी एकत्र यायचा निर्णय घेतला आहे. पण मोदींना कशासाठी रोखायचे आहे? मोदी सरकार जनतेसाठी समस्या आहे की धोका आहे? तो धोका असता, तर लोकांनी या नेत्यांच्या नव्या पक्षाला नक्कीच प्रतिसाद दिला असता. असे पक्ष व पुढारी लोकांना समस्या वाटू लागल्या होत्या. म्हणूनच त्यांच्यासह त्यांनी माजवलेली अनागोंदी दूर करण्याचे आश्वासन देऊन मोदींनी लोकांकडे मते मागितली होती. म्हणजेच मोदींना पराभूत करायचे असेल, तर आधी या नेत्यांनी आपणच समस्या नसून लोकांच्या हितासाठी झटणारे आहोत, असे लोकांना पटवावे लागेल. आपल्याला राजकारण नव्हेतर लोकांच्या अपेक्षा पुर्ण करायच्या आहेत, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण करावा लागेल. त्यासाठी मोदी सरकारकडून ज्या चुका होतील व लोकांमध्ये नाराजीचा सूर उमटेल, त्याचे भांडवल करावे लागेल. पर्यायाने या पक्षांविषयी लोकमत चांगले होत जाईल. नुसते मोदी वा त्यांच्या सरकारच्या नावाने खडे फ़ोडून काहीही साध्य होणार नाही. कारण असे जातीपातीच्या मतांवर शिरजोर झालेल्या नेत्यांचा पायाच लोकसभेत मोदींनी उखडून टाकला आहे. सर्व समाजघटकात त्यांनी आपल्याविषयी सदिच्छा निर्माण केल्या आहेत. त्यांना शह द्यायचा तर जातीपातीच नाही, तर गटातटाच्या डावपेचातून बाहेर पडून सर्वसमावेशक लोकहिताची कास धरावी लागेल. त्यात व्यक्तीगत अहंकारही गुंडाळुन ठेवावे लागतील आणि कुटुंबाचे स्वार्थ विसरावे लागतील. समाजवादी जनता दल स्थापन करायला निघालेल्या अर्धा डझन नेत्यांपैकी कितीजणांना असे अग्नीदिव्य पार पाडणे शक्य आहे? नसेल तर त्यांच्या एकत्र येण्याने काय साध्य होऊ शकेल?

1 comment:

  1. मोदींना रोखणे म्हणजे त्यांच्या पाठीशी आलेल्या लोकांच्या अपेक्षा व स्वप्नांनाच रोखणे आहे. मग आपल्याच स्वप्नांना विरोध करणार्‍यांना मतदार कसा प्रतिसाद देईल?"
    १००% सहमत भाऊ! कोणाच्या मनाला शिवला सुद्धा नसेल असा हा योग्य आणि समर्पक विचार आहे.

    ReplyDelete