Thursday, December 18, 2014

धर्मांध राजकारणाचे हकनाक बळी


मंगळवारी पाकिस्तानात घडलेली घटना तिथल्या राज्यकर्त्यांनीच आपल्या जनतेवर लादलेली म्हटले तर वावगे ठरू नये. याचे कारण जो भस्मासूर त्याच पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी मागल्या सहा दशकात उभा केला आहे, त्यानेच आता पाकिस्तानचा घास घ्यायला सुरूवात केली आहे. पहिली गोष्ट म्हणजे पाकिस्ता
नची निर्मितीच धर्माच्या आधारावर झालेली होती. ब्रिटीशांपासून स्वातंत्र्य मिळत असताना आपण भारतीय वा हिंदूस्तानी नसून मुस्लिम म्हणूनच एक वेगळे राष्ट्र आहोत, असा दावा करण्यात आलेला होता. तिथून या समस्येचा आरंभ होतो. एकदा अशा फ़ुटीर प्रवृत्तीला शरण गेलात, मग ती तिथेच संपत नाही तर फ़ोफ़ावत जात असते. आपण वेगळे आहोत, ही भावना एका लोकसंख्येपुरती मर्यादित नव्हती. तर पुढे तिचे आणखी तुकडे पडत जातात. त्याप्रमाणे मग चार दशकापुर्वी पाकिस्तानचे दोन तुकडे पडलेच. त्याचे कारण तरी काय वेगळे होते? बंगाली लोकसंख्या अधिक असताना अधिक खासदार संसदेत निवडून आल्यावरही अधिकार त्यांना नाकारले गेले. त्यातून बंगाली अस्मिता उफ़ाळून आलेली होती. त्यावेळी तिथे बंदोबस्तावाठी असलेल्या पाकिस्तानी सेनेने यापेक्षा कुठले वेगळे वर्तन केले होते? त्यांनीही असहाय व नि:शस्त्र मुले व महिलांची कत्तल केलीच होती ना? तेव्हा ती पाकिस्तानी फ़ौज होती आणि मंगळवारी पाकिस्तानी लष्करी तळावर हल्ला झाला, तिथे तालिबान म्हणून ज्यांनी अत्याचार हिंसा केली, तेही पाकिस्तानीच होते. दोघांची मानसिकता तितकीच अमानुष व पाशवी होती. आपल्यापेक्षा वेगळे इतक्याच समजूतीतून हल्लेखोरांनी कोवळ्या पोरांची निर्धृण हत्या केली. शाळकरी पोरांना असे ठार मारताना त्यांच्या काळजाला पाझरही फ़ुटला नाही. कसा फ़ुटेल? बालवयापासून तशी मानसिकताच घडवलेली असेल, तर यापेक्षा वेगळे कोणी अपेक्षितच धरू शकत नाही.

आता असे झाले, मग सगळे इस्लामिक दहशतवाद म्हणून त्याकडे बोट दाखवणार, हे नेहमीचेच झाले आहे. जगभरची ती आता फ़ॅशन झाली आहे. पण खरोखरच ह्या घटनेला धर्म वा शर्मशिकवण कारणीभूत आहे काय? आजवर अशा घटना सहसा बिगर मुस्लिमांच्या बाबतीत घडत होत्या. पण आता तशीच कत्तल थेट मुस्लिमांचीच झालेली आहे. त्याचे कारणही तहरिके तालिबान यांनी दिलेले आहे. आपल्यावर पाकिस्तानी सेनेचे हल्ले चालू आहेत, त्याचा सूड म्हणून आपण हे हत्याकांड घडवल्याचा दावा तालिबान प्रवक्त्याने केला आहे. त्याचा अर्थ असा, की बलुचिस्थानच्या वजिरीस्थान भागात बराच काळ पाकसेनेने तालिबानांचे अड्डे उध्वस्त करण्याच्या मोहिमा राबवल्या आहेत. त्यात द्रोन व हवाई हल्ल्यांच्या समावेश होतो. अशा हल्ल्यात एखादे स्थान लक्ष्य केले जाते. त्यात व्यक्तीपेक्षा परिसरात असलेल्यांची हिंसा होते. हे हल्ले टोळीवाल्यांच्या भागात होत असल्याने जिहादींच्या बरोबरच त्या भागातील नागरिक व मुले महिलाही बळी पडत असतात. त्याचा बदला म्हणून लष्करी तळावरच हल्ला चढवून ही कत्तल करण्यात आली. पण अशी परिस्थिती पाकिस्तानवर कशामुळे आलेली आहे? त्याची अनेक कारणे आहेत. एक म्हणजे अफ़गाण युद्धाच्या वेळी जे मुजाहिदीन निर्माण करण्यात आले, ती अनधिकृत सैनिकी फ़ौज पाकिस्तानने त्या युद्धाच्या शेवटाबरोबर निकालात काढायला हवी होती. पण तसे न करता अमेरिकन मदतीने उभारलेली ही फ़ौज, पाकिस्तानने पुढे धर्माच्या नावाने काश्मिर मुक्तीसाठी वापरण्याचा आंधळेपणा केला. तिथे मग अशा गनिमांचाही गोंधळ उडाला. आपण नेमके कुठल्या देशाचे नागरिक, ही भावनाच निकालात निघाली. त्यात जगभरच्या कुठल्याही देशातले मुस्लिम तरूण होते आणि त्यांच्याशी पाकिस्तानी लोकांची सरमिसळ होऊन गेली. क्रमाक्रमाने अवघा पाकिस्तानच जिहादी गनिम बनवण्याचा कारखाना होऊन गेला.

फ़टाक्याच्या कारखान्यात अकस्मात कुठेही स्फ़ोट होऊ शकतो, तशा घटना मग पाकिस्तानात घडणे अपरिहार्य होते. अफ़गाण युद्ध संपल्यावर पाकने तो देश आपल्या आधिपत्याखाली ठेवण्याचा डाव खेळला. त्यासाठी बलुची व टोळीवाल्यांच्या मदतीने तालिबान जन्माला घातले. त्यात अफ़गाणांप्रमाणेच टोळीवाले व जगभरच्या कुठल्याही देशातले धर्मांध मुस्लिम होते. मग इस्लामिक भूमी काश्मिर मुक्त करायला त्यांचा वापरण्याची रणनिती तयार झाली. त्याचे चटके भारत मागली दोन दशके सोसतो आहे. पण पश्चिम सीमेवरच्या अशा घातपात्यांना पुर्व सीमेवर आणताना त्यांचा वावर संपुर्ण पाकिस्तानात खुलेआम होत गेला. हे घातपाती पाकिस्तानात सर्वत्र मुक्त फ़िरू लागले आणि सईद हाफ़ीजसारख्या तोयबांनी त्यांना हाताशी धरले. पुढे अशी स्थिती आली, की पाकिस्तानचे सरकार जो कायदा व्यवस्था राबवण्याचा प्रयास करते तो आपल्याला लागू शकत नाही, अशीच या जिहादींची धारणा झाली. परिणामी देशभर एक अराजक उभे राहिले. त्या अराजकाला इस्लामची फ़ोडणी देऊन पाक धर्ममार्तंडांनी त्या जिहादींना आपल्या पंखाखाली घेतलेले आहे. त्यातून हा भस्मासूर उभा राहिला आहे. त्यांचे व अफ़गाण तालिबानांचे साटेलोटे होते आणि पाकच्या आशीर्वादानेच सर्वकाही चालले होते. पण अफ़गाण सीमेपलिकडून होणार्‍या कुरापतींना अमेरिकन सेना चोख उत्तर देऊ लागल्यावर पाकला आपल्या हद्दीतील तालिबान समर्थकांचा बंदोबस्त करणे भाग झाले. कारण तालिबनी जिहादचे चटके सोसलेल्या अमेरिकेने ओसामाची लपलेली जागा शोधून, पाकमध्ये घुसून ओसामाचा काटा काढून दाखवला. तिथून मग पाकला टोळीवाले व तालिबान यांचा थेट बदोबस्त करायची पाळी आली. पण ज्यांनी आपल्याला तालिबान बनवले, त्यांची ही कारवाई तालिबानांना अन्याय वाटला तर नवल नाही. तेच या हल्ल्यामागचे दुखणे आहे.

 धर्माच्या नावावर सामान्य घरातल्या पोरांना व टोळीवाल्यांना जिहादी बनवले ते लढवय्ये आहेत आणि त्यांनी आता पाकिस्तानी सेना व सरकारलाच आपला शत्रू मानले आहे. शिवाय तोयबा, मुहाजिद किंवा जैशे महंमद असे आपले समर्थक आहेत, अशीच या तहरिके तालिबांनांची समजूत आहे. काश्मिरात घुसून निरपराध लोकांची कत्तल करण्यात काही गैर नसेल, तर पाकिस्तानातही कोणाची हकनाक हिंसा कशाला गैर असेल? अशी जिहादी आत्मघाती मंडळी माणसे नसतात तर यंत्रवत चालणारी स्फ़ोटके असतात. त्यांना भावना नसतात की माणुसकीशी त्यांचे नाते शिल्लक उरलेले नसते. सहाजिकच बंदुकीतून सुटलेली गोळी जशी मरणारा कोण, त्याचा विचार करीत नाही, तसेच हे जिहादी भावनाशून्य असतात. त्यांना मरणार्‍याशी वा त्याच्या कृत्याशी कर्तव्य नसते. समोर दिसेल त्याला मारायचे आणि परिणामांची पर्वा करायची नाही. जे काही करायचे त्याला धर्माचे लेबल लावणारे दिवटे असल्यावर या हल्लेखोरांनी वचकायचे तरी कशाला व कोणाला? सहा वर्षापुर्वी त्यांच्याच भाईबंदांनी मुंबईत अशीच सामुहिक कत्तल केली होती. नेमकी त्याचीच पुनरावृत्ती या आठवड्यात पेशावर येथे झाली. दिसेल त्याला मारायचे आणि मरेपर्यंत जितके जीव घेता येतील तितक्या हत्या करायच्या, हीच त्यांना दिलेली शिकवण आहे. कालपर्यंत त्यांनी बिगर मुस्लिमांची कत्तल करण्यात धर्म बघितला. आता भले मुस्लिम मारले जात असतील. पण ज्यांच्याकडून मारले जात आहेत, त्यांना विचारल्यास सोपे उत्तर कानी येईल. जे इस्लामिक रितीरिवाज पाळत नाहीत, ते मुस्लिम नसतातच. मलाला या शाळकरी मुलीवर गोळ्या झाडल्या गेल्या, त्याचे पाकिस्तानात किती निषेध झाले होते? ते झाले नाहीत व तिथला सुशिक्षित समाज त्या हिंसेच्या विरोधात उभा ठाकला नाही, त्याची किंमत पेशावरला मोजायची पाळी आली. म्हणून म्हणावे लागते, याची सुरूवात धर्मासाठी वेगळे राष्ट्र मागण्यापासून झाली होती. धर्माचे राजकारण केल्यास यापेक्षा वेगळे काही संभवत नाही.

1 comment:

  1. धर्म ही अफुची गोळी असते हे खरे होत आहे!

    ReplyDelete