Sunday, March 15, 2015

पाय जमिनीला लागले?



सगळे समान असतात, पण त्यातले काही अधिक समान असतात, अशी एक इंग्रजी उक्ती आहे. तिचा साधारसळ अर्थ म्हणजे, मुठभर लोक सर्वसामान्यांच्याही वर असतात आणि त्यांना तुमचे आमचे सर्वसामान्य नियम लागू होत नाहीत. म्हणून तर प्रत्येकजण व्हीआयपी व्हायला धावत सुटलेला असतो. आता तर व्हीआयपी लोकांचीच इतकी वर्दळ वाढली आहे, की त्यांच्यातल्या समानतेचाही त्यातल्या अनेकांना खुप त्रास होऊ लागला आहे. त्यातून मग व्हीव्हीआयपी नावाच्या मुठभरांना समानतेच्या व्याख्येतून बाहेर काढले गेले आहे. असे जे अधिक समान असतात, त्यांच्यासाठी सर्व नियम व कायदे गुंडाळून ठेवले जातात. मग त्यात कुणा सामान्य नागरिकावर अन्याय झाला तरी बेहत्तर. अलिकडेच एका वाहिनीने अशा मुठभर अधिक समान बड्या लोकांच्या अरेरावी वा अत्याचारी सुविधांच्या विरोधात बातम्यांचा सपाटा लावला होता. त्यात बडा नेता जाणार म्हणून रस्ते रोखण्यात आल्याने रुग्णवाहिका अडल्या आणि त्यात एका गंभीर प्रकृतीच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचेही सांगितले गेले. पण पुढे काय झाले? अशा लोकांच्या जीवावर उठलेल्या सुविधा वा खास वागणूक देण्याबाबत अधूनमधून आवाज उठवला जात असतो. कोणी त्याच्याविरोधात कोर्टात धाव घेतो. सुप्रिम कोर्टाने लाल दिव्याच्या गाड्या कोणी वापराव्यात, यावर निर्बंध आणले आहेत. मुद्दा असे निर्बंध लावणे किंवा आदेश जारी करून काय साधले जाते, इतका आहे. कारण चार दिवस त्यांची नाटके चालतात आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या उक्तीप्रमाणे जुन्याच गोष्टी अनुभवायला मिळतात. सचिन तेंडुलकर याने अलिकडेच मुख्यमंत्र्यांना टोलविषयी खरमरीत पत्र लिहिल्याचे वाचण्यात आले. त्याच्या रसभरीत बातम्या वाचून हसू आल्याशिवाय राहिले नाही. कारण सचिनने राज्यभरच्या टोल प्रश्नाला म्हणे हात घातला. म्हणजे नेमके काय केले?

सचिन हा त्याच मुठभर अधिक समान भारतीयांमध्ये समाविष्ट होतो. त्याला सहसा सामान्य माणसाप्रमाणे वागवले जात नाही. कधी त्याला अनधिकृत बांधकामातून सवलत दिली जाते, तर करविषयक बाबतीत सवलत दिली जाते. तीच सवलत अन्य कुणा गरजूला हवी असेल, तर कित्येक वर्षे नियमांचे पारायण करूनही हक्काची अशी सवलत मिळू शकत नसते. पण सचिनला मात्र हक्क नसलेल्या नियमात बसवून सवलत दिली जाते. अशा सचिनने सामान्य व्यक्ती, नागरिकांच्या समस्येला वाचा फ़ोडली, ही म्हणूनच ब्रेकिंग न्युज व्हायचीच. पण ज्या विषयाला वाचा फ़ोडली, तो विषय अगदीच नवा आणि कालपरवाचा आहे काय? मुंबईकर वा महाराष्ट्रातली जनता टोलनाके व टोलवसुली यामुळे अलिकडेच हैराण झाली आहे काय? काही आठवड्यांपुर्वी कोल्हापुरात कॉम्रेड गोविंद पानसरे नावाच्या कम्युनिस्ट नेत्याची हत्या झाली. त्याने मागल्या दिडदोन वर्षात उतारवयात कशासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता? पानसरे यांनी टोल नव्हेतर कुठल्या विषयाला वाचा फ़ोडली होती? सचिन तेंडुलकरला असा कोणी माणूस होता आणि तो हकनाक मारला गेला, हे तरी महिती आहे काय? असते तर निदान त्याच्या पत्रात पानसरे यांचा उल्लेख तरी आलाच असता. तर आपल्या देशात टोलवसुली होते आणि त्यासाठी कित्येक तास गाड्या अडकून पडतात, ह्यावर तो खुप आधीच बोलला असता. त्याने तेव्हाच मुख्यमंत्री व पंतप्रधानांना पत्रे लिहीली असती. पण तसे केव्हा वाचनात आले नाही. मग अकस्मात त्याने असले पत्र का लिहावे? सामान्य नागरिकाने सचिनचा जयघोष करावा आणि त्यात सचिनने भारावून जावे, यापेक्षा दोघांचे अन्य काही नाते आहे काय? असेल तर त्याची आजवर प्रचिती कशाला आलेली नव्हती? आताच सचिनला ही सुबुद्धी कुठून व कशामुळे झालेली आहे?

खरे तर सचिनच्या पत्राचे गोडावे गाण्यापेक्षा पत्रकारांनी काही प्रश्न सचिनला खडसावून विचारायला हवेत. मागल्या आठदहा वर्षात महत्वाच्या व मोठ्या रस्त्यावरील टोल हा सामान्य माणसाला जाच होऊन बसला आहे. कुठल्याही सरकारचे मुख्य मूळ काम रस्ते, दिवाबत्ती, आरोग्य, प्राथमिक शिक्षण अशा मूलभूत सुविधांपुरते मर्यादित असते. त्यासाठीच वेगवेगळ्या मार्गा्ने सरकार करवसुली करून तिजोरी भरत असते. अशा सरकारने कोणाला कंत्राट देऊन नवा रस्ता बांधावा आणि त्याच्या बदल्यात टोलवसुलीचे अधिकार त्या ठेकेदाराला द्यावेत, ही काय भानगड आहे? तो टोल भरून रस्ता वापरायचा असेल, तर मग विविध करातून सामान्य जनतेने सरकारी तिजोरीत महसुलाचा भरणा कशाला करावा? टोलनाक्यावरची गर्दी किंवा त्याचे अन्यायकारक दर; हा नंतरचा विषय आहे. मूळ प्रश्न रस्ते बांधणे हीच आपली जबाबदारी दुसर्‍यावर सोपवून सरकार त्यासाठीचा कर मात्र वसुल करतेय, त्याचे काय? टोल भरायचा असेल आणि मोठ्या देणग्या देऊन चांगल्या खाजगी शाळेतच मुले घालायची असतील, तर सरकार नित्यनेमाने करवसुली कशासाठी करते आहे? महागड्या इस्पितळात उपचार घ्यायचे, तर विक्रीकर मालमत्ता कर इत्यादी गोष्टींसाठी लोक पैसे कशाला भरत असतात? सचिनने हा प्रश्न विचारला काय? त्याला वाचा फ़ोडली म्हणजे काय? टोलवसुली ही मुळात पाकिटमारी आहे आणि ती करताना सरकारने सुविधा द्याव्यात, ह्याला वाचा फ़ोडणे म्हणायचे काय? खिसा कापा हो, पण निदान ब्लेड मारताना मांडीला जखम होणार नाही, याची काळजी घेण्य़ाचा आग्रह, म्हणजे वाचा फ़ोडणे असते काय? सचिनने आवाज उठवला म्हणणार्‍यांना टोलरस्ते हीच मुळात फ़सवणूक आहे, याचे तरी भान आहे काय? त्याबद्दल सचिन अवाक्षरही बोलला नाही. मग या रसभरीत बातम्यांचा अर्थ काय लावायचा?

विषय टोलचा आहे आणि तो नवे रस्ते बांधल्यानंतर वसुल केला जात असतो. ह्याला कित्येक वर्षे उलटली आहेत. लोकांच्याही आता हा अन्याय, फ़सवणूक अंगवळणी पडलेले आहेत. टोल भरणारा माणूस बिनतक्रार आपल्यावरचा अन्याय सहन करायच्या रांगेत उभा रहातो आणि आपला वाटा उचलतो. हे सचिनला क्रिकेट सोडल्यावर कळले काय? मुंबईनजिक खारघर वा अन्य कुठे शहराच्या सीमेवर टोलवसुलीच्या रांगा सचिनला आज दिसल्या काय? मग आजवर कशाला दिसल्या नव्हत्या? जर सचिन रस्त्यावरच नसेल तर दिसायचे कुठून? विमानातून उडायचे आणि विमानातूनच फ़िरायचे दिवस होते, मग पाय जमिनीला लागणार कसे? पायच जमिनीवर नसतील तर रस्त्याची अवस्था उमगणार कशी? सहाजिकच रस्त्यासाठी टोल भरावा लागतो आणि त्यासाठी लांबच लांब रांगा लागतात, खोळंबा होतो, हे लक्षात कसे यायचे? त्यासाठी बिचार्‍या सचिनला क्रिकेटमधून निवृत्त व्हावे लागले. क्रिकेटमधून सवड मिळाली म्हणून रस्त्याने फ़िरायची संधी मिळाली. परिणामी टोलनाके व टोलची वसुली यातल्या सामान्य माणसाच्या यातना लक्षात आल्या. अन्यथा हे पत्र कशाला लिहीले गेले असते? एखादा दिवस सामान्य माणसाचे अनुभव घेतल्यावर सचिन इतके खरमरीत पत्र लिहीत असेल, तर रोजच्या रोज अशाच अनुभवातून जाणार्‍या सामान्य माणसाचे शब्द व प्रक्षोभ किती सणसणित असेल? कुणा माध्यमाने त्याची प्रतिक्रिया जाणून त्यावर प्रसिद्धीचा प्रकाश पाडला होता काय? कसा पाडणार? सामान्य नागरिकाला समानता दिलेली आहे. अधिक समानता दिलेली नाही. म्हणून त्या सामान्य नागरिकाच्या वेदना-यातना वा तक्रारींना कोण प्रसिद्धी देणार? सचिनचे पाय जमिनीला वा रस्त्याला लागले, तरी त्याच्यावर किती घोर प्रसंग ओढवला ना? मग माध्यमे त्याची दखल घेणारच. कारण सचिन व्हीव्हीआयपी म्हणजे अधिक समान असलेल्या मूठभरातला असतो ना?

3 comments:

  1. Lata Mangeshkar yanchya peksha barich sudharna she na pan. . Bhau, be positive!

    ReplyDelete
  2. खरे आहे भाऊ!
    मीडिया हा सुद्धा फक्त व्हिव्हिआयपी लोकांचा झाला आहे. त्यांच्या प्रत्येक गोष्टींबाबत मीडिया दखल घेतो, सामान्य लोकांची नाही.

    ReplyDelete
  3. bhau
    ekdam shaljoditale marlet....
    sachin, amitabh, lata mangeshkar he apale rastriya daiwat aahet

    ReplyDelete