Saturday, March 14, 2015

नागर समाजाचा दांभिकपणा



बुधवारी सातार्‍याहून मुंबईला आलो. रात्री उशीर झाला होता, शिवाजीपार्क गोखले रोडच्या भंडारी बॅन्क गल्लीतून येताना रस्त्यावर आणि बाजूला दुकानाच्या फ़ळीवर शंभर एक लोक अस्ताव्यस्त झोपलेले दिसत होते. मुंबईत हे दृष्य नवे नाही. एकेकटे कशीबशी गुजराण करणारे हे जीव दिवसभर राबतात आणि रात्री मिळेल तिथे अंग टाकून झोपतात. कष्टाने थकलेल्या जीवाला विश्रांती हवी असते. अशीच लोकसंख्या रोगराईसारख्या परसलेल्या महानगरात व त्यांच्या फ़ैलावलेल्या उपनगरात आहे. त्यातही काहीजण बेकायदा चाळी व झोपड्यात आपला आशियाना थाटत असतात. याला आजचा महानगरी समाज म्हणतात. तिथे बहुतांश म्हणजे ६०-७० टक्के लोकसंख्या गटारातल्या किड्यामकोड्यासारखी जीवन कंठत असते. तिच्याकडे मोबाईल असतो, आधुनिक म्हणता येईल अशी उपकरणेही असतात. पण जीवन मात्र पशूवत आहे. त्याच्या वरचा आणखी एक थर असतो २०-३० टक्के लोकसंख्येचा. ज्याला मध्यमवर्ग असे संबोधन आहे. तो अर्धवट पशूवत तर अर्धवट सुखवस्तू जगत असतो. थोडक्यात १० टक्के लोकसंख्या माणसासारखी शिस्तीचे सुसह्य जीवन जगत असते. बाकीचे वखवखलेल्या नजरेने त्याकडे बघत, तिथे पोहोचण्याची स्वप्ने घेऊन शहरात येतात आणि त्याच गटारी असह्य अशक्य जीवनाचा एक भाग बनून जातात. अशा लक्षावधी लोकांना आपण नागर समाज म्हणू शकतो काय? त्यांच्याकडून सभ्य सुसंकृत वर्तनाची अपेक्षा आपण कशी बाळगू शकतो? ट्रेनमध्ये बसमध्ये घुसताना वा जागा पकडताना मुले-वॄद्धांनाही चेपून, ढकलून पुढे धावणार्‍यांना माणूसकी नाही, असे म्हणता येईल काय? तिथे माणूसकी दाखवायची म्हणजे आपली शक्य असलेली संधी सोडून द्यायची. कोण त्यासाठी तयार असतो?

साध्या शब्दात सांगायचे, तर आपण दंगल सादृष अवस्थेत शहरी जीवन जगत असतो. त्यात टिकून रहायचे व आपले उद्दीष्ट गाठायचे, तर रानटी जनावरामध्ये शर्यत चालते तसे आक्रमक व्हावेच लागते. पशूवत वागावेच लागते. मात्र चर्चा वादविवाद रंगतात, तेव्हा या लाखोच्या संख्येला नागर समाज असे संबोधले जाते. मुंबई वा दिल्लीत एखाद्या मुली महिलेच्या वाट्याला जेव्हा त्यातले काही पशू येतात आणि एखादी भीषण घटना घडते; तेव्हा आपण सगळे चकीत झाल्यासारखे वागतो, बोलतो. जणू काही असे घडत नाही वा घडता कामा नये, यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो. अशा थाटात आपण उदात्त गोष्टी बोलू लागतो. खरेच तसे असते, तर अशा महानगरात कुठल्या मुलीवर ऍसिड फ़ेकले गेले नसते, की चारचौघात तिची छेड काढायला कोणी गुंड धजावला नसता. पण नित्यनेमाने अशा गोष्टी घडत असतात. पण त्याचा फ़ारसा गाजावाजा होत नाही. एखाद्या वृत्तपत्र वा वाहिनीने अशी घटना उचलून धरली, मग ते मोठे प्रकरण होऊन जाते. अन्यथा असेच घडणार हे आपण मनाने स्विकारलेले सत्य आहे, वास्तव आहे. त्याविषयी आपली तक्रार नसते. अशा कितीतरी घटना आपल्या आसपास नित्यनेमाने घडत असतात. आपण ठरल्याप्रमाणे त्याविषयी मौन असतो. कारण आपले मन त्याबाबतीत मरून गेले आहे, बधीर झालेले आहे. आपण इतके बधीर कशाला झालोय? संवेदनाहीन कशामुळे झालोय? आपण पळपुटे आहोत काय? नसेल तर जेव्हा असा गाजावाजा सुरू होतो, तेव्हा बोंबा ठोकणार्‍यांना आपापल्या गल्लीत, वस्तीत वा चाळीत हेच कधीपासून चालले आहे, असे ठणकावून सांगायला आपण पुढे कशाला येत नाही? कारण आपणही त्या दांभिकपणाचे एक सन्माननीय सदस्य झालेले आहोत. आपण त्याच दांभिक नागर समाजाचे एक घटक झालेले आहोत. जो अस्तित्वात नाही, ज्याच्याबद्दल नित्यनेमाने चिंता व्यक्त केली जात असते.

बुधवारी मध्यरात्री फ़ुटपाथवर बेवारसासारखे झोपलेल्या त्या एकाकी जीवांमध्ये कित्येकजण भावी बलात्कारी असू शकतात. त्यांच्यात वासना मारून जगणारे किती राक्षस असू शकतात, त्यांचे चेहरे मला भयभीत करून गेले. कारण असेच कोणीतरी कुठे घरदुरूस्ती कामगार, विक्रेता वा फ़ेरीवाल्याच्या रुपाने आपल्या वस्तीत येजा करीत असतात. ते स्वभावाने वा सवयीने गुन्हेगार नसतात. पण मारलेल्या इच्छा व दाबून ठेवलेल्या वासनांचा राक्षस त्यांच्यात वसलेला असतो. एका योग्य संधीची वाट बघत तो त्यांच्या समवेत घरोघरी फ़िरत असतो. त्या राक्षसाला खेळवणारे मनोरंजनाचे कार्यक्रमही होत असतात. ज्यात वासनांशी खेळणारी आयटेम गीते असतात चित्रपटही असतात. ज्यामधून त्या राक्षसाच्या कल्पनाविश्वाला जोजवले जात असते. त्याच्या मनात अनेक कल्पना रुजवल्या जात असतात. त्यातून तो मनातला राक्षस संधीची प्रतिक्षा करत आपल्याच आसपास वावरत असतो. कधीतरी त्याला तशी संधी मिळून जाते आणि धक्कादायक घटना घडून जाते. धारावी-गोवंडी वा तत्सम वस्त्यांमध्ये वासना इच्छा मारून जगणार्‍या, वयात येणार्‍या मुलीही असतात. त्यांना बेफ़िकीर हेरत असे राक्षस दबा धरून वावरत असतात. कधी ते कडेकोट सुरक्षित अशा कॉलनीत रोजगाराच्या निमीत्तानेही पोहोचतात. टिव्ही सिनेमाच्या आहारी गेलेली मुले-मुली त्यांच्यासाठी शिकार असतात. निर्भया दिल्लीपुरती नसते. मुंबईच्या झोपडपट्ट्यात डझनभर निर्भया एका आठवड्यात त्याच अनुभवातून जातात. त्याची कुठे वाच्यता होत नसते, कारण अशी प्रकरणे पोलिस, स्थानिक पुढारी व पालकांच्या संगनमताने मिटवली जात असतात. त्यामुळे अन्याय अत्याचार होऊनही आपला नागर समाजाचा मुखवटा अबाधित असतो. त्याला चिरा पडलेल्या आपण आसपास बघत असतो. पण त्याविषयी मौन धारण करणे आणि गाजावाजा झाल्यावर घोषणा द्यायला जमणे, आता आपल्या अंगवळणी पडले आहे. आपण कमालीचे दांभिक होऊन गेलो आहोत. गेंड्याला लाजवील अशी आपली कातडी जाडजुड झालेली आहे.

वास्तव इतकेच आहे, की आपण बेशिस्त व बेछूट विस्तारलेल्या महानगरे उपनगराच्या अराजकात स्थिरावलो आहोत. तिथल्या यातना-वेदना व अन्याय-अत्याचार आता आपल्या अंगवळणी पडले आहेत. त्याची आठवण करून देणेही अधिक भितीदायक झाले आहे. त्याविषयी न बोलण्य़ात आपण सुरक्षित व सुखी असतो. म्हणूनच चर्चेत नागर समाज व सभ्यतेचा उल्लेख आपल्याला अगत्याने हवा असतो. मात्र तो नागर समाज खर्‍याखुर्‍या जीवनात आणायला आपण तयार नसतो. व्यसनी माणसाला जसे त्यातून येऊ शकणार्‍या आजारापेक्षा त्यातून मुक्तीचे भय वाटावे; तसे आपण आता या अराजकाला सोकावलो आहोत. जंगली व रानटी जगण्यालाच आपण नागर समाज असे लेबल लावून जगत असतो. त्यासाठी शहरात वाढत्या वस्तीतून आपण अधिकाधिक माणसांना पशूवत जीवनात वसवीत असतो. आपल्यापर्यंत ती वेळ कधीच येणार नाही, हा भ्रम आता आपल्या दांभिकपणाचा खरा आश्रयदाता झालेला आहे. मग नसलेल्या नागर समाजाच्या थोरथोर गप्पा आपल्याला आवडणे स्वाभाविक नाही काय?

 (खुसपट)  मी मराठी  Live    (१४/३/२०१५)

3 comments:

  1. भाऊ!
    आपल्याला कदाचित माझ्या म्हणन्याचा राग येईल, परंतु, हे जे जे रस्त्यावर झोपणारे आहेत, ते परप्रांतीय आहेत. महाराष्ट्रातील मराठी माणूस गावाला उपाशी राहील पण, मुंबईत असा रस्त्यावर झोपणार नाही. काही महाराष्ट्रातील लोकांच्या बाबतीत हे घडू शकते, घडते. तरीही तो मनुष्य आठ दिवसांपेक्षा अधिक अशा परिस्थितीत राहू शकत नाही, राहत नाही. सरळ गावाचा रस्ता धरतो.
    ह्या परप्रांतियांना पैसे कमवायचे असतात आणि त्यांची गावाची परिस्थिती या पेक्षा वाइट असते. हे सर्व भारतीय असले तरी यांच्यावर काहीतरी बंधने असायला हवीत. कारण त्यांच्यातील राक्षस जागा होऊन वाइट काम करुन आपापल्या प्रांतात पळून जातो.
    सरकार अशा लोकांवर बंधने आणू शकत नसले तरी त्यांची माहिती ठेवणे आणि परवाना घेणे आवश्यक केले पाहिजे.

    ReplyDelete
    Replies
    1. खर आहे,ह्या लोकांमधे तिकडचे तडीपार किंवा गुन्हे करून इकडे पळून आलेले लोक जास्त असतात.वर त्यांचे समर्थन करायला त्यांचे नेतेही इथे असतात, यांच्या गठ्ठा मतांवर ते निवडून येतात. महाराष्ट्रात मंत्री होतात. बिहार उत्तरप्रदेशात एखादा महाराष्टातला साधा सरपंच तरी होवू शकेल का?

      Delete