१९८०च्या दशकात संपुर्ण भारतात चार्लस शोभराज हा गुन्हेगार खुप गाजत होता. दिल्लीच्या तिहार तुरूंगातून त्याने रक्षकांच्या हातावर तुरी देऊन पलायन केलेले होते. मग त्याला गोव्यात मुंबईचे पोलिस निरीक्षक झेंडे यांनी शिताफ़ीने पकडले आणि त्यांचेही नाव खुप गाजले होते. या शोभराजने दोनतीन डझन देशात वेगवेगळे गुन्हे केलेले होते. पण प्रत्येक देशातून तो हातोहात निसटला होता. मात्र भारतातल्या कायद्याच्या कचाट्यातून निसटणे त्याला अवघड झालेले होते. त्या काळात कोणीतरी त्याची तुरुंगात जाऊन मुलाखत घेतली होती. त्यात शोभराजने भारतीय कायद्याविषयी बहुमोल मतप्रदर्शन केलेले आहे. भारतामध्येच मी पकडला गेल्यावर इतका काळ खितपत पडलो आहे, कारण इथे खोटे पुरावे निर्माण केले जाऊ शकतात आणि कायद्यातही अशा खोट्या पुराव्याच्या आधारावर तुम्हाला कित्येक वर्षे गजाआड डांबून ठेवणे शक्य असते, असे त्याचे मत होते. आज त्याच्याही पुढली परिस्थिती आलेली दिसते. कुठल्याही पुरावा किंवा साक्षीशिवाय कोणावरही वाटेल तो आरोप करायचा आणि त्यासाठी कोर्टातही जाणे शक्य नसल्याने खोट्या पुराव्यांचा गवगवा करून माणसाला आयुष्यातून उठवू शकणारी माध्यमे आता प्रभावशाली झालेली आहेत. त्याचा ताजा नमूना म्हणून आपण भारतातील ख्रिश्चन समाजावरील हल्ल्याच्या रुपाने बघू शकतो. कालपरवा मुंबई नजिकच्या पनवेल येथील एका चर्चच्या कॅमेरामध्ये मोटरबाईकवर बसून आलेल्या हल्लेखोरांनी दगड मारल्याचे चित्रणही समोर आले. काही दिवसांपुर्वी कोलकात्यातील एका ख्रिश्चन संस्थेमध्ये वयोवृद्ध सेविकेवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. तिचा गवगवा झाला. पुढे हरयाणात हिस्सार येथे नव्या बांधकाम होणार्या चर्चची मोडतोड झाल्याचा गदारोळ उठवण्यात आला. त्याच्याआधी इथे आलेल्या अमेरिकन अध्यक्षांनी तशी वाच्यता केलेली होती.
हा सगळा प्रकार आपल्या देशात प्रथमच घडतो आहे काय? ओबामा यांनी अशी पोपटपंची करणे समजू शकते. दोन दिवसांच्या दौर्यावर आलेल्या माणसाला कोणी काहीही सांगून चिथावणी देवू शकतो. पण अशा घटनांचा बंदोबस्त करण्यात अवघी उमेद खर्ची घालणार्या मुंबईच्या माजी पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांच्या सारख्या अनुभवी निवृत्त अधिकार्याने त्यावरून काहुर माजवावे, याचे नवल वाटते. त्यामागे काही कारस्थान शिजल्याची शंका येते. अशी शंकाही रिबेरो यांच्याच आरोपातून येते. मोदी सरकारने अमूकतमूक करावे, असे रिबेरो म्हणतात. तेव्हा यापुर्वी म्हणजे मोदी सत्तेत येण्यापुर्वी अशा घटनाच घडत नव्हत्या, असा त्यांचा दावा आहे काय? शिवाय अशा घटना खरेच त्यांनी म्हटल्याप्रमाणे केवळ हिंदूत्वाचे कोणी बोलघेवडे बरळतात म्हणून होतात काय? असेल, तर त्याही घटनांचे पोस्टमार्टेम व्हायला हवे. उदाहरणार्थ दिल्लीच्या पोलिसांनी त्या शहरी राज्यात धार्मिक स्थळांवर झालेल्या हल्ले वा गुन्ह्यांची यादीच प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मागल्या तीन वर्षात प्रत्येकी तीन हल्ले चर्चवर झालेले आहेत. यावर्षी ही पहिली एकमेव घटना आहे. पण त्याच काळात म्हणजे २०१५ मध्ये दिल्लीत १४ हिंदू धर्मस्थळे, पाच गुरूद्वारा व दोन मशिदीवर हल्ले झालेत. म्हणजेच ख्रिश्चनांच्या धर्मस्थानांच्या दुप्पट ते चौदापट अन्य धर्मस्थानांवर हल्ले झालेत. पण त्यापैकी एका तरी घटनेची बातमी धर्मस्थानावर हल्ला. अशी देण्यात आली का? नसेल तर तिथे घटनेतला धर्म लपवला गेला आहे, किंवा इथे मुद्दाम ख्रिश्चन धर्माचा उल्लेख हेतूपुर्वक करण्यात आलेला आहे. तसे करण्यामागे धर्माचे राजकारण करण्याचा बातमीदाराचा हेतू अजिबात लपून रहात नाही. दिशाभूल मात्र होते. अगदी रिबेरो यांच्याही पत्र लेखाबद्दल तसेच म्हणता येईल. ज्या वृत्तपत्राने तो लेख छापला, त्याने त्याची दुसरी बाजू लपवलेली नाही काय?
मंगलोर येथील राजकीय सामाजिक कार्यकर्ते व धर्माने ख्रिश्चन असलेले रॉबर्ट रोझारियो यांनी रिबेरो यांच्या लेखातील प्रत्येक मुद्दा खोडून काढणारा प्रतिवाद इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राकडे पाठवला होता. पण तो छापायला नकार देण्यात आला. त्यांनी तो इतरांकडे पाठविला. त्यापैकी ओपिंडीया नावाच्या वेबसाईटने तो प्रसिद्ध केलेला आहे. पण कुठलेही मुख्यप्रवाहातील माध्यम त्याची दखल घ्यायला राजी नाही. ह्याला सत्याचा शोध नव्हे, कोंबडे झाकणे म्हणतात. तेही असो. कोलकात्यातील ख्रिश्चन ननवरील बलात्काराचे आता काय झाले? आठवडाभर त्यातले आरोपी चित्रण असूनही पकडले जात नाहीत, म्हणून केंद्रातील मोदी सरकारवर आरोपांच्या तोफ़ा डागल्या गेल्या. बलात्कारी हिंदूत्वाशी संबंधित असणार हेच गृहीत होते. पण आता त्यांना पकडण्यात आल्यावर कोलकाता विषय कुणालाच नको आहे. कारण पकडण्यात आलेले आरोपी बांगलादेशी आहेत आणि ममता सरकार त्यांनाच पाठीशी घालायला आटापिटा करीत होते, हे स्पष्ट होते. ममता हिंदूत्ववादी नाही आणि बांगलादेशी हिंदू आरोपी नाहीत. मग कोणाला त्या ननच्या बलात्काराच्या वेदना व्हायच्या? रिबेरो यांना तरी आता सत्याची चाड आहे काय? की बांगलादेशी बलात्कारी मुस्लिम सुद्धा मोहन भागवत यांच्या आदेशानुसार तिथे हल्ला करायला गेले, असे या शहाण्यांना म्हणायचे आहे? आठवडाभर बलात्कारासाठी मातम करणार्यांची वाचा आरोपी पकडल्यावर का बसली आहे? तर त्यांचे आरोप आणि खोटेपणा तोंडावर पडला म्हणून ना? पनवेलचे हल्ल्याचे चित्रणही असेच मुद्दाम चित्रणासाठी हल्लेखोर पाठवून पुरावा निर्माण करावा, तसेच भासत नाही काय? चहूकडून काहूर माजवून दिशाभूल करण्यापेक्षा काय वेगळा प्रकार चालू आहे? हे सामान्य माणसाला कळते म्हणूनच मतदानात खोट्याच्या कपाळी गोटा बसावा, तसा सेक्युलर पुरोगामी पक्षांचा लोकांनी धुव्वा उडवला आहे.
ख्रिश्चन समाज वा धर्मस्थळावरील अकस्मात होऊ लागलेले हल्ले ओबामा येऊन गेल्यावरच कसे होऊ लागले? त्याच्या बातम्या त्यानंतरच कशा ठळकपणे प्रसिद्धीच्या झोतात येऊ लागल्या? जे हल्ले आहेत आणि त्यातले संशयित आरोपी बघितले, तर त्यात कुठेही हिंदूत्ववादी व्यक्ती व संस्थेचा संबंध दिसत नाही. म्हणून मग त्याच्याशी भागवत यांचे मदर तेरेसा यांच्याविषयीचे विधान जोडायचे. यालाच वडाची साल पिंपळाला लावणे म्हणतात ना? हिस्सार येथे चर्चच्या बांधकामावर हल्ला झाला म्हणताना, ते बांधकामच मुळात अनधिकृत असल्याचा तपशील का लपवला जातो? घरासाठी भूखंड घ्यायचा आणि तिथे अनधिकृत चर्च उभे करायचे, ही वस्तुस्थिती लपवली गेलेली नाही काय? रिबेरो यांनी ज्या हल्ले व असुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे, त्या तमाम घटनांचा हिंदूत्ववादी जे काही बरळतात, त्याच्याशी दूरान्वयेही संबंध जोडता येणार नाही. आणि धार्मिक उन्मादाचा व झुंडीचाच मुद्दा असेल, तर दिमापूर येथे तुरुंगावर झालेला हल्ला धार्मिक ठरू शकतो. कारण त्या हल्ल्यात बळी पडलेला मुस्लिम आहे आणि ज्या झुंडीने त्याच्यावर इतका अमानुष प्राणघातक हल्ला केला, ती लोकसंख्या ख्रिश्चन आहे. त्यावेळी कोणी पाशवी जमावाच्या धर्माचा उल्लेख कशाला करत नाही? जिथे कुणा हिंदूचा संबंधही जोडता येत नाही, ते हल्ले हिंदु संघटनांनी केल्याची आवई उठवायची आणि नसलेल्या राईचाही पर्वत करायचा. उलट दिमापूर मध्ये पर्वताएवढा धार्मिक उन्मादाचा पुरावा असताना ख्रिश्चन झुंडशाहीबद्दल लपवाछपवी करायची. इथे आपली माध्यमे चार्ल्स शोभराजच्या व्याख्येत बसलेली दिसत नाहीत काय? खोटे पुरावे बनवायचे आणि तेच खरे असल्याचे काहूर माजवायचे. आणि पुरावेच खोटे पडले, मग त्याबद्दल शब्दही बोलायचा नाही. मौनाच्या पुरोगामी बिळात दडी मारून बसायचे.
==========================
रॉबर्ट रोझारियो यांचे रिबेरोंना खडसावणारे चोख उत्तर. हे छापायला इंडियन एक्सप्रेसने नकार दिला. यातून या माध्यमांना खोट्या बातम्या व अफ़वा पिकवायच्या आहेत त्याची खात्री पटू शकते. इथे त्याचा दुवा आहे. चिकित्सक वाचक तिकडे बघू शकतात.
http://www.opindia.com/2015/03/a-christian-responds-to-a-christian-who-felt-he-was-a-stranger-in-his-own-country/
Bhau...surek vishleshan.....media purn bikavu ahe...pan Hindu ch hakkach ek pan media nahi ka
ReplyDelete