पंतप्रधान पदाची जबाबदारी सोडण्याच्या आधीच मनमोहन सिंग नव्या निवासस्थानी निघून गेले होते, तर ती जबाबदारी स्विकारल्यावर नरेंद्र मोदी पहिल्याच महिन्यात नव्या निवासस्थानी जाऊन सौजन्य म्हणून मनमोहन सिंग यांना भेटले होते. त्याला अजून एक वर्ष पुर्ण व्हायचे आहे. मात्र मोदींचा शपथविधी झाला, त्याला वर्ष पुर्ण होत असताना चमत्कार घडला आहे. अकस्मात माजी पंतप्रधान आजी पंतप्रधानांना त्यांच्या सरकारी निवासस्थानी जाउन भेटले आहेत. काही तास अगोदर याची कोणाला कल्पनाही नव्हती. म्हणून या दोन नेत्यांची या आठवड्यातील बैठक हा मोठा चर्चेचा विषय झाला. त्याला अर्थात संदर्भ भलताच होता. मोदींच्या कारकिर्दीला वर्ष पुर्ण होत असताना ट्राय नामक दूरसंचार प्राधिकरणाचे निवृत्त प्रमुख प्रदिप बैजल याचे एक पुस्तक काही काळापुर्वी प्रसिद्ध झाले असून त्याचा कुठे गाजावाजा झाला नव्हता. पण मोदींच्या वर्षपुर्तीचा मुहूर्त साधून एका इंग्रजी वर्तमानपत्राने त्या इ-बुकमधील काही वादग्रस्त भागाला ठळक प्रसिद्धी दिली. त्यात बैजल यांनी स्पेक्ट्रम घोटाळ्याची मनमोहन यांना पुर्ण कल्पना दिली होती व त्यांनीच घोटाळा रोखण्यास प्रतिबंध केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तोच मजकूर प्रसिद्ध झाला आणि त्यावर चर्चा चालू असतानाच मनमोहन सिंग मोदी भेटीला अकस्मात गेल्याने त्याला राजकीय रंग चढला. अर्थातच हा विषय इतकाच नाही. त्या आरोपावर चर्चा चालू झाली आणि मनमोहन सिंग आपले मौनव्रत सोडून मैदानात आले व त्यांनी सर्व आरोप फ़ेटाळून लावत पत्रकार परिषद घेतली. पण कॉग्रेसतर्फ़े त्यांच्या बचावाला कोणी मोठा नेता पुढे आलेला नव्हता. सोनिया वा राहुल गांधी यांनी त्याबद्दल मौन धारण केले होते. तर मनमोहन सिंग यांनी आरोप फ़ेटाळून लावत नवे सरकार महत्वाचे विषय सोडून नगण्य विषयात शक्ती खर्च करत असल्याचे पत्रकारांना सांगितले होते. थोडक्यात त्यांनी आपला बचाव मांडताना भाजपाच्या सरकारला शिंगावर घेतल्याचे मानले जात होते. पण तो दिवस मावळण्यापुर्वीच सिंग ७ रेसकोर्स रोड येथे पोहोचल्याने गावगप्पांना उधाण आले. मोदी सरकारशी काही तडजोड करायला सिंग तिथे पोहोचले काय, असाही सूर लावला गेला. त्याला बिनबुडाचा संशय म्हणता येणार नाही.
यापुर्वी हिंडलको या कंपनीला युपीए कारकिर्दीत कोळसा खाण बहाल केल्याच्या प्रकरणी खालच्या कोर्टाने मनमोहन सिंग यांच्यावर समन्स बजावले आहे आणि सुप्रिम कोर्टाने त्याच्या पुढील कारवाईला स्थगिती दिलेली आहे. सहाजिकच भरपूर घोटाळे झाले असले, तरी मनमोहन सिंग निर्दोष असल्याच्या प्रतिमेला तडा गेलेला आहे. त्यात ए. राजा यांनी यापुर्वीच सर्व वाटपाची मनमोहन सिंग यांना कल्पना असल्याचे जाहिरपणे म्हटलेले होते. आता त्यालाच प्रदीप बैजल यांच्या पुस्तकाने दुजोरा दिला आहे. आणि कितीही नाकारले गेले, तरी सिंग यांना आता या जंजाळातून सुटणे अवघड होणार आहे. त्याचे कारण ते घोटाळा काळात देशाचे पंतप्रधान होते आणि त्यात हस्तक्षेप करून लूटमार थांबवणे ही त्यांची घटनादत्त जबाबदारी होती. मात्र प्रत्यक्षात ते नामधारी पंतप्रधान होते आणि बहुतेक निर्णय सोनिया गांधीच परस्पर घेत असत, हे आता लपून राहिलेले नाही. सतत नाकारले गेलेले ते सत्य आता लक्तरे होऊन चव्हाट्यावर येत आहे. शिवाय रखवालदाराने चोरी थांबावायची असते. तिकडे त्यानेच काणाडोळा करायचा आणि एक पैसा चोरलेला नाही असा दावा त्याला निर्दोष ठरवण्यासाठी पुरेसा नसतो. कुठल्या एटीएम यंत्रातून पैसे चोरले जाताना दिसतही असताना, तिकडे काणाडोळा करणार्याला कोणी निर्दोष म्हणू शकतो काय? कारण दरोडा-चोरी रोखणे हेच तर रखवालदाराचे प्रमुख काम असते. देशाचा पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेला माणूस त्याबद्दल बेफ़िकीर रहातो व लूट होऊ देतो, ह्याला कर्तव्यनिष्ठा म्हणायचे काय? मनमोहन सिंग यांनी शपथ कसली घेतली होती? भ्रष्टाचार करणार नाही अशी नव्हेतर देशाच्या हिताचे संरक्षण करण्याची शपथ होती ना? मग त्यातच नाकर्तेपणा झालेला दिसतो आहे आणि संगनमताने लूट झाल्याचेही दिसत आहे. मग रखवालदाराला निर्दोष असल्याचा दावा करून भागेल काय? आणि त्याच्याही पुढे जाऊन पत्रकारांना सिंग म्हणतात, मोदी सरकार नगण्य गोष्टीत वेळ दवडते आहे. लाखो कोटी रुपयांची लूटमार व त्याच्याशी संबंधित घोटाळे नगण्य गोष्टी आहेत काय? की आपण तिकडे काणाडोळा केला आणि नव्या सरकारनेही तसेच करावे, असे मनमोहन सुचवत आहेत? त्यालाही हरकत नाही. पण मग दिवस मावळताना पुन्हा त्याच नव्या पंतप्रधानांची भेट घेण्याचे कारण काय होते?
आपण वा आपल्या कुटुंबाला एकही पैशाचा लाभ झालेला नाही असा दावा सिंग यांनी केला आहे. त्याबद्दल वाद व्हायचे कारण नाही. पण काही महिन्यांपुर्वी मनमोहन असेही म्हणाले होते, की कॉग्रेस कधीच सोडणार नाही, कारण कॉग्रेस हेच माझे कुटुंब आहे. मग इथे कुठल्या अर्थाने कुटुंबाला लाभ झालेला नाही? कुठला संदर्भ घ्यायचा? कारण ज्यांच्यावर गंभीर आरोप झालेत, त्यात मोठ्या संख्येने कॉग्रेसचे नेतेच सहभागी आहेत. म्हणजेच घोटाळ्यांचा लाभ कॉग्रेस कुटुंबाला झालेला आहेच ना? सिंग यांना यापैकी काय सुचवायचे आहे? की इतका गंभीर आरोप झाल्यावर सोनिया व राहुल बचावाला आले नाहीत वा एकही शब्द बोलले नाहीत, त्यांच्यावर दबाव आणावा असा मोदी भेटीमागचा हेतू असेल? काहीतरी गोलमाल नक्कीच आहे. कलमाडी, पवनकुमार बन्सल, अश्विनीकुमार, नविन जिंदाल. कोळसामंत्री जायसवाल असे अनेक कॉग्रेसनेते घोटाळ्यात फ़सलेले आहेत. त्यांनीही कोणी सिंग यांचा बचाव मांडण्याचे कष्ट घेतलेले नाहीत. म्हणून विचलीत होऊन सिंग यांनी आपले मौन सोडले आणि घराचा उंबरठा ओलांडला आहे काय? इतके घोटाळे होत असताना सिंग यांनी त्याकडे नुसता काणाडोळा केलेला नव्हता. त्याविषयी मौन पाळण्यातच धन्यता मानलेली होती. म्हणून त्यांची मौन-मोहन अशीही टवाळी होत राहिली. पदापासून दूर झाल्यावरही त्यांनी आपले मौन कायम राखले. मग सकाळी आक्रमक झालेल्या सिंग यांनी दिवस मावळताना मोदींची भेट कशाला घेतली? आजवरच्या घोटाळ्यातले मौन सोडायची ऑफ़र घेऊन तर ते ७ रेसकोर्स रोडवर पोहोचलेले नसतील ना? की मोदींची भेट घेऊन मौन सोडण्याचा दबाव सोनिया राहुलवर आणून त्यांना आपल्या बचावाला आणायचे डावपेच सिंग खेळत असतील? कुछ तो गडबड है भाई. कारण या दोघा आजीमाजी पंतप्रधानांमध्ये काय गुफ़्तगु झाले, त्याची वाच्यता कुठल्याच बाजूने उघडपणे केलेली नाही. की शरद पवार यांच्याप्रमाणेच मोदी दर आठवड्यात मनमोहन यांचा सल्ला घेत असतात?
मोदीजी मनमोहन सिंग यांना फोन करुन सांगतात की आपल्यासारख्या निष्कलंक माणसाला खुप त्रास होतोय याची मला जाणीव आहे. आपण यातून काहीतरी मार्ग नक्कीच काढू. तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा भेटायला या, नाहीतर मी येतो. सिंग बोलतात की नाही-नाही मीच येतो. दोघांची भेट ठरते. आणि नंतर मग दोघेजण भेटतात. मोदीजी सिंगांचे सांत्वन करुन बोलतात की आपल्यासारख्या मोठ्या अर्थतज्ज्ञाची भारताला गरज आहे. आपल्या संपूर्ण ज्ञानाचा काँग्रेसला फायदा करून घेता आला नाही. तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमच्या बाजूने आहे. मला खात्री आहे की कोणत्याही घोटाळ्यात तुमचा हात नाही. सर्वच कागदपत्रे मी पाहिली आहेत. माझ्या हे ही लक्षात आले आहे की खरा दोषी कोण आहे. तुम्ही निश्चित रहा. तुमच्यावरचे बालंट आपोआप जाईल. मै हूँ ना!'
ReplyDeleteअसे काहीतरी घडले असावे आणि मनमोहन सिंग आनंदात तिथून गेले असावेत. नंतरचा भाग पुढच्या भेटी वेळी ठरेल.