Saturday, May 30, 2015

पर्रीकरांचा ‘कहीपे निगाहे कहीपे निशाना’


शांत स्वभावाचे व अभ्यासू असे विद्यमान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर अलिकडे अनेकदा विविध वादात फ़सलेले दिसतात. अर्थात त्यात वाद माजण्यासारखे काहीच नसते. म्हणूनच विनाविलंब असे वाद मागे पडतात. पण पुन्हा पर्रीकर काही बोलतात आणि त्यातून विवाद माजलेला दिसतो. जानेवारी महिन्यात त्यांनी काही माजी पंतप्रधानांनी देशाच्या सुरक्षेशी तडजोडी केल्याचा उल्लेख केला होता. लगेच त्यावरून काहुर माजले. मात्र अशा विधानावर वादंग माजवताना पर्रीकर नेमके काय बोलले आणि त्यामागे काय हेतू असू शकतो, याचा कल्लोळ माजवणार्‍याना कधीच प्रश्न पडलेला नाही. मग निरर्थक वाद व्हायचेच. पण तिकडे जाण्याच्या आधी असे वादग्रस्त वा शंकास्पद बोल मोठी महत्वाची माणसे कशाला बोलू शकतात, ते तपासायला हरकत नाही. मध्यंतरी असाच वाद जयपुरच्या कार्यक्रमात प्रसिद्ध फ़ौजदारी वकील उज्वल निकम यांनी ओढवून घेतला होता. कसाबला तुरूंगात बिर्यानी वगैरे दिली जात नव्हती. तर आपणच जाणिवपुर्वक तसे जाहिर विधान करून विषयाला कलाटणी दिली होती, असे निकम म्हणाले आणि तात्काळ त्यावरून त्यांना धारेवर धरायला मुर्ख लोक पुढे सरसावले होते. मुद्दा असा होता, की निकम खोटे बोलले असतील तर कुठे बोलले आणि त्यातून त्यांनी साधले काय होते असा आहे. त्यावर कोणी बोललेच नाही, असे हे निरर्थक वाद चालू असतात. त्यातून मनोरंजनापेक्षा अधिक काहीही साध्य होऊ शकत नाही. आपला शहाणपणा मिरवण्याची हौस असलेल्यांना तशी संधी साधण्यापेक्षा काहीही मिळत नाही. निकम खोटे कुठे बोलले आणि कशासाठी बोलले, त्याचा खुलासा त्यांनीही केला होता. पण त्याकडे वळून बघायला कुणाला वेळ होता? असे शहाणे शब्दात फ़सले आणि भरकटत गेले. त्यामुळे निकम यांना कुठे पकडणे कोणाला शक्य झाले नाही.

कसाबच्या बिर्यानीचा नसलेला विषय मात्र अनेक दिवस माध्यमातून चर्चिला गेला आणि त्यावरून जनमानसात संतापाची लाट उसळली होती. कसाबच्या खटल्यात एकदा त्याच्या डोळ्यात अश्रू आले, म्हणून माध्यमातून त्याचे उदात्तीकरण सुरू झाले. म्हणे त्याला रक्षाबंधनाचा दिवस असल्याने बहिणीची आठवण आली आणि कसाब रडला. अशा बातम्या रंगवल्या जातात, तेव्हा गुन्हेगारांविषयी जनमानसात सहानुभूती निर्माण होते. मुळात पाकिस्तानी मुस्लिम असलेल्या कसाबच्या घरात वा धर्मात रक्षाबंधनाचा उत्सवच नसेल, तर बहिणीची आठवण येऊन त्याचे रडण्याचा मुद्दाच कुठे येतो. पण माध्यमात हा मुर्खपणा सुरू झाल्यावर त्याला बगल देण्यासाठी निकम यांनी ‘तो मस्तपैकी बिर्यानीवर ताव मारतोय’ आणि तशी मागणी करतो अशी लोणकढी थाप माध्यमांच्या समोर सोडून दिली. झाले, रक्षाबंधन विसरून माध्यमे बिर्यानी खाण्यात गर्क झाली आणि कसाबच्या डोळ्यातले अश्रू व रक्षाबंधनातली बहिण कुठल्याकुठे गायब झाले. मात्र हे विधान त्यांनी कोर्टात केले नव्हते. म्हणूनच त्याचा काही परिणाम सुनावणी वा निकालावर होऊ शकत नव्हता. पण त्यातून सहानुभूती निर्माण होण्याचा धोका टाळला गेला होता. म्हणूनच शब्द कोणाचे व कशासाठी ते वापरलेत, त्याचा अभ्यास आवश्यक असतो. त्यामागचा हेतू तपासणे गरजेचे असते. आपल्या माध्यमातले विद्वान तिथेच कमी पडतात. उथळ पाण्याला खळखळाट फ़ार या उक्तीप्रमाणे गडगडाट खुप होतो आणि सत्याचे चार थेंबही बरसत नाहीत. पर्रीकरांच्या विविध वादग्रस्त विधानाची गोष्टही फ़ारशी वेगळी नाही. त्यामागचा हेतू बघितला जात नाही वा साधले काय गेले, त्याचाही शोध कोणी घेत नाही. काही प्रमाणात पर्रीकरही निकम यांचेच तंत्र वापरतात असे दिसते. मुर्खासारखा गदारोळ करीत सुटणार्‍या माध्यमाचा पर्रीकर मोठ्या धुर्तपणे आपले संकेत पाठवण्यासाठी उपयोग करीत असतात का?

दीड वर्षापुर्वीची गोष्ट आठवा. तेव्हा दिल्लीत युपीए सरकार होते आणि तरूण तेजपाल या तथाकथित शोधपत्रकारावर एका मुलीने बलात्काराचा आरोप केला होता. गोवा येथे घडलेल्या या घटनेचा गवगवा झाल्यावर गुन्हा नोंदला गेला आणि तेजपाल भूमिगत झाला होता. त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. अशावेळी पोलिसांऐवजी तिथले मुख्यमंत्री असलेल्या पर्रीकरांनी एक जाहिर विधान केलेले होते. हॉटेलच्या ज्या लिफ़्टमध्ये हा प्रकार घडला, त्यातल्या सीसीटिव्हीचे सर्व फ़ुटेज ताब्यात घेतल्याचे विधान पर्रीकरांनी केलेले होते. ते ऐकून तेजपाल प्रथमच उघड्यावर आला आणि फ़ुटेज चॅनेलवर दाखवा, असे आव्हान त्याने दिलेले होते. मग लौकरच तो पोलिसांच्या हवाली झाला होता. मात्र त्याला ताब्यात घेतल्यावर पोलिस म्हणाले, की लिफ़्टमध्ये कुठलाही सीसीटीव्ही कॅमेराच नव्हता. मग पर्रीकर कशाला तसे खोटे बोलले होते? त्यातून काय साधले गेले होते? तर त्यातून तेजपालला आत्मविश्वास आला, की लिफ़्टचा मामला असेल तर आपण तिथे काहीच केलेले नाही, मग घाबरायचे कशाला? पोलिसांकडे आपल्या विरुद्ध कुठलाच पुरावा नाही, असा आत्मविश्वास त्याच्यात पर्रीकरांच्या त्या फ़सव्या विधानाने निर्माण केलेला होता. म्हणून तो पोलिसात हजर झाला. नंतर उघड करण्यात आले, की लिफ़्टमध्ये कॅमेराच नव्हता आणि पोलिसांनी इतरत्रचे चित्रण ताब्यात घेतले आहे. त्यात तेजपाल फ़सला. म्हणजेच आपल्यापाशी पुरावे नाहीत, असे भासवून गुन्हेगाराला गाफ़ील करण्यासाठी असे फ़सवे विधान गोव्याच्या मुख्यमंत्र्याने तेव्हा केलेले होते. ते खरे ठरले नाही, तरी त्यातून तेजपालला सापळ्यात ओढायचा हेतू साध्य झाला होता. आज पर्रीकर गोव्यात नाहीत, तर देशाचे संरक्षणमंत्री आहेत आणि अकस्मात ते असे काही बुचकळ्यात टाकणारे विधान करीत असतात. त्यामागचा हेतू काय व साधले काय, याचा बारकाईने तपास केला पाहिजे.

जानेवारीत देशाच्या डीप असेटना माजी पंतप्रधानांनीव वार्‍यावर सोडले, असे पर्रीकर म्हणाले होते. त्याचा दुसरा अर्थ असा होता की तसे असेट असतील तर भारतात उघडपणे मिरवणार्‍या पाक हस्तकांची माहिती मिळवू शकू व त्यांना पकडू शकतो, असेच त्यांना सुचवायचे होते. किंबहूना आपण तसे भारताचे हस्तक पाकिस्तानात निर्माण करत आहोत, अशीच ती गर्भित धमकी होती. चार महिन्यांनी पर्रीकरांचे ताजे विधान त्याच संदर्भात तपासून बघायला हवे. आता ते म्हणतात, दहशतवादाला रोखायचे असेल तर काट्याने काटा काढण्याची निती अवलंबायला हवी. आपण तेच करत आहोत, जिहादींमधले नाराज व वैफ़ल्यग्रस्त पकडून त्यांच्या मदतीने हल्ल्यापुर्वीच जिहादींचा खात्मा करण्याची मोहिम हाती घेतली आहे. आपले सैन्य शांतीचे प्रवचन देण्यासाठी सज्ज ठेवलेले नाही. जशास तसे उत्तर द्यायला आपण मागेपुढे बघणार नाही, अशी विधाने काय सुचवतात? नुसते जिहादी व अतिरेकी असा त्याचा अर्थ होत नाही. जे कोणी भारताच्या विनाशाची स्वप्ने रंगवत असतील व घातपाती डावपेच खेळणार असतील, त्यांना त्यांच्याच घातपाती मार्गाने आपण हाताळणार आहोत, असे त्यांना सांगायचे आहे. पण त्याचा अर्थ समजून घेतला तर इशारा निव्वळ दहशतवाद्यांना नाही, तर पाकिस्तानप्रेमी जे छुपे दलाल आहेत, त्यांनाही अभय मिळणार नाही, असा तो इशारा आहे. इथे बसून वा पाकिस्तानच्या मैत्री दौर्‍यावर जाऊन देशाशी दगा करणार्‍यांवरही आपले लक्ष आहे, त्यांच्याशी दगाबाजी करणार्‍यांकडून आपण माहिती मिळवू शकतो, असा तो खुला इशारा आहे. किंबहूना कराचीतील हत्याकांडानंतर पाक सरकारनेही भारतावर तसा आरोप केलेला आहे. तेव्हा पर्रीकर हुलकावण्या देणारे बोलून किती पक्षी एका दगडात मारत आहेत, त्याचा अंदाज करणे सोपे नाही. वाहिनीवर गदारोळ करण्याइतका तो साधा विषय नाही. म्हणतात ना, कहीपे निगाहे कहीपे निशाना.

4 comments:

  1. कसाबला फाशी दिली तेव्हादेखिल माध्यमं अशीच गाफील ठेवली गेली होती अशी शंका येते. कारण, कसाबला फाशी दिली जाणार एवढीच बातमी होती. दिनांक - वेळ ह्याबाबत काही नाही. मग अचानक बातमी आली की त्याला फाशी झाली आणि सगळ्या माध्यामांमधे त्याबाबत चर्चा होती.
    त्याच दरम्यान फाशीच्या शिक्षेबाबत काय कायदेशीर प्रक्रिया असते ह्याची बातमी (कदाचित महाराष्ट्र टाईम्समधे) आलेली. त्या प्रक्रियेनुसार फाशीच्या काही दिवस आधी गुन्हेगाराची पुर्ण वैद्यकीय तपासणी केली जाते. मग प्रश्न पडला कसाबचीसुद्धा अशी तपासणी केली गेलेली का? आणि तसं असेल तर त्याला फाशी होणार अशी कुणकुण कोणालातरी लागली असती आणि माध्यमांमधे किंवा कुठे ना कुठे ही बोंबाबोंब (नक्कीच) झालीच असती. मग असं का नाही झालं? एवढं नकळत हे प्रकरण कसं हाताळलं गेलं?
    नंतर अजुन एक गोष्ट ध्यानात आली. फाशी होण्यापुर्वी कसाबला डेंग्यु झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याला खरचं डेंग्यु झालेला का? की त्याला डेंग्यु झाल्याची बातमी उडवून त्याची वैद्यकीय तपासणी करुन त्याच्या फाशीची तयारी केली गेली?

    ReplyDelete
  2. आधीची उदाहरणे बरोबर आहेत पण शेवटचे जे विधान मी वृत्तपत्रांत वाचले ते होते पाकिस्तानात घातपात करायला पाठवून आपल्या सैनिकांचे प्राण का गमवायचे, त्या ऐवजी भाडोत्री जिहादी लढवय्ये (mercenaries) का वापरू नयेत असे ते म्हणाले होते. त्या उद्गारांचा पाकिस्तानने खूप दुरुपयोग करून घेतला! अशा गोष्टी गुपचुप करायच्या असतात, जाहीर करायच्या नसतात!

    ReplyDelete
  3. काही करण्यासाठी किंवा करण्यापूर्वी, विधाने करणे गरजेचे नसते वा नाही.तुमचे विश्लेषण अचूक आहे, तरीही, पर्रीकर जितके कमी बोलतील किंवा विधाने करतील तितके बरे.

    ReplyDelete
  4. भाऊ अगदी योग्य विविश्लेषण केलेत. माध्यमं एवढा खोलवर विचार करत नाहीत. उगीचच साप-साप म्हणून भुई थोपटत बसतात .

    ReplyDelete