माझ्या मॅट्रिक परिक्षेला यंदा अर्धशतक पुर्ण झाले. त्या काळात दहावी शालांत परिक्षा नव्हती. अकरावी यत्तेमध्ये शालांत परिक्षा व्हायची. मी १९६५ साली शाळा संपवली आणि कॉलेजमध्ये दाखल झालो. थोडक्यात पालकांच्या तावडीतून सुटायचे ते वय होते. तोपर्यंत अर्धा डझनही सिनेमा बघितलेले नव्हते. कारण सिनेमा बघायला जाणे कुठल्याही मध्यमवर्गिय कुटुंबातली इव्हेन्ट असायची. त्यातही मोठ्य़ांचा समावेश असायचा. बारा तेरा वर्षाच्या मुलांना सिनेमे दाखवले जात नसत. शाळेतून सिनेमा बघायला घेऊन नेले, तरच चित्रपटगृहाच्या काळोखातले अदभूत जग मुलांना अनुभवता घेता यायचे. तर त्यातून बाहेर पडून मी स्वतंत्रपणे सिनेमा बघायला मोकळा झालो तेच हे वर्ष. त्याच्या आधी दोन वर्षे एक चित्रपट खुप गाजला होता आणि तो ‘प्रौढांसाठी’ असल्याने पौगंडावस्थेतील मुलांना त्याबद्दल मोठे कुतूहल होते. त्याचे नाव ‘वह कौन थी?’ त्यातली साधना व मनोजकुमारची जोडी खुप गाजली होती. दोन वर्षात मग त्याचाच पाठपुरावा करीत दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा मी कॉलेजच्या प्रथम वर्षाला होतो. त्याचे नाव ‘गुमनाम’. त्यात मनोजकुमार याच्यासोबत नंदा ही नायिका होती. कुठल्या तरी गाजलेल्या जुन्या इंग्रजी चित्रपटावरून उचललेले कथानक होते. पण चित्रपट भयंकर उत्कंठावर्धक होता. चौपाटीवर एका उडत्या गाण्य़ावर उत्तान नाचलेली हेलन अजून आठवते. त्याच्यापुढे आजच्या तमाम आयटेम गर्ल व त्यांचे सर्व अंगविक्षेप झक मारतात. प्राण, मदनपुरी, मेहमूद, तरूण बोस अशी कलाकार मंडळीही अजून स्मरणात पक्की आहेत. कारण तो माझ्या आयुष्यात स्वतंत्रपणे बघितलेला पहिला चित्रपट होता. याच चित्रपटाने मेहमूदला नवी ओळख दिली आणि पुढल्या काळात हैद्राबादी दाक्षिणात्य हिंदीवर आधारीत विनोद मेहमूदने लोकप्रिय केले. इतक्या वर्षांनी ‘गुमनाम’ कशासाठी आठवला असेल?
मागले काही दिवस मध्यप्रदेशातील एका घोटाळ्याच्या तुटक तुटक येणार्या गुढ बातम्या. त्या सतत नजरेसमोर येत असतात आणि त्याबद्दल कुठलाच स्पष्ट खुलासा होत नाही. बातम्या तुकड्यात आणि तपशीलाची बोंब. आता लागोपाठ त्यात गुंतलेले वा संबंधित असलेले लोक मरत आहेत. कोणी आत्महत्या करतो, तर कोणी संशयास्पद रितीने मेल्याचे उघडकीस येते. कारणे कळत नाहीत, की उलगडा होत नाही. एका मृत्यूचा खुलासा होत नाही, इतक्यात तितक्याच रहस्यमय मार्गाने दुसरा म्रूत्यू झाला अशी खबर येते. त्याचा विचार करत असताना अकस्मात त्या ‘गुमनाम’ चित्रपटातले पार्श्वगीत आठवले. ‘गुमनाम है कोई, बदनाम है कोई, किसको खबर कौन है वोह, अंजान है कोई.’ एकूण व्यापम घोटाळ्याच्या बातम्या एकत्रित केल्या तर लतादिदीच्या याच ओळींपेक्षा अन्य काही हाती लागत नाही. सहज ते गाणे आठवले आणि त्याच चित्रपटाचे कथानक उलगडू लागले. काही लोकांना कुठल्या तरी एका समारंभात बक्षिस म्हणून दूरच्या सफ़रीला खास विमानाने पाठवायचा बेत असतो आणि ते विमान उडाल्यानंतर त्यात बिघाड होऊन एका निर्जन बेटावर ते उतरते. मग पर्याय निघेपर्यंत त्यातले प्रवासी तिथेच थांबतात. त्याला पर्यायही नसतो. तिथेच एक जुनाट भव्य हवेली असते आणि त्यात एक काळाकभिन्न नोकर असतो. तो या सर्वांची बडदास्त राखत असतो. मग एकामागून एक या पाहुण्यांचे खुन होऊ लागतात. पण कोणी कशासाठी खुन केला असेल, याचा काहीच अंदाज येऊ शकत नसतो. मग ते सर्व पाहुणे एकमेकांकडे संशयाने बघू लागतात. त्यातले दोघेतिघे एकत्र असले, मग नसलेल्या कोणाविषयी संशय घेऊन बोलत असतात. पण निष्पन्न काहीच होत नाही. आपापल्या परीने त्यातला प्रत्येकजण खुन्याचा शोध घ्यायला धडपडत असतो. जितका कसून शोध घ्यावा तितके त्या मृत्यूचे खुनांचे रहस्य अधिकच गडद होत जात रहाते.
व्यापम घोटाळ्याचा प्रकार काहीसा तसाच वाटू लागला आहे. शेकडो धागेदोरे आहेत आणि शंकेच्या जागाही शेकडो आहेत. एक धागा घेऊन शोध केला, तर भलताच नवा धागा हाती मिळतो आणि आधीचा धागा निरूपद्रवी वाटू लागतो. कालपर्यंत संशयित असलेला आज अकस्मात मेलेला आढळतो आणि आजचा साक्षिदार उद्या बेपत्ता होऊन परवा कुठेतरी मरून पडलेला आढळतो. त्या चित्रपटात पायलट म्हणून आलेला मनोजकुमार प्रत्यक्षात एक गुप्तचर असतो आणि पोलिसांना या सफ़रीबद्दल शंका असल्याने त्याला तिथे पाठवलेले असते, तोही मृतांचे रहस्य उलगडत असताना चक्रावलेला असतो. इथेही व्यापम घोटाळ्याचा गवगवा झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी थेट खास तपासणी पथक व आणखी एक तपास दल निर्माण केले. मात्र त्याना अजून कुठलाच नेमका आरोपी सापडू शकलेला नाही. नित्यनेमाने नवनवी नावे जाहिर होत असतात. राजकीय आरोप बाजूला ठेवले, तरी त्यात सर्वच पक्षांचे साटेलोटे दिसते. किंबहूना कोणालाच त्याचा उलगडा होऊ नये असे वाटते किंवा कसे; याचीही शंका येते. कारण तिथले राज्यपाल रामनरेश यादव भाजपावाले नाहीत आणि याच मामल्यात त्यांचाही मुलगा शंकास्पद रितीने मेलेला आढळला आहे. पण पुत्रहत्येनेही या कॉग्रेसी राज्यपालांना संवेदनशील बनवलेले नाही. त्यांनी कुठल्याही मार्गाने आपल्या मुलाच्या शंकास्पद मृत्यूचा पाठपुरावा करायचे टाळले आहे. म्हणजेच त्यांनाही व्यापमच्या तळाशी जाण्याची इच्छा दिसत नाही. ही बाब त्यांनाही संशयास्पद बनवित नाही काय? इतरांचेही तसेच असावे. वैद्यकीय विद्यार्थ्यापासून कॉलेजच्या डीनपर्यंत अनेकांचे शंकास्पद अवस्थेतील मृत्यू अगदी ‘गुमनाम’ चित्रपटाच्या कथेसारखे आहेत. प्रत्येक बातमी त्या सिनेमातल्या प्रसंगासारखी काळजाचा थरकाप उडवणारीच आहे. मात्र उलगडा कसलाच होत नाही. नुसत्या आरोपाच्या पलिकडे कथा सरकतच नाही.
एखाददुसर्या हत्येकडे काणा डोळाही करता आला असता. पण इथे चाळीसहून अधिक संबंधितांचे संशयास्पद मृत्यू झालेले आहेत. इतके होऊन कॉग्रेससारखा विरोधी पक्ष आकाशपाताळ एक करताना दिसत नाही. हे नवल नाही काय? जितक्या टोकाला जाऊन गुजरात दंगल, स्पेक्ट्रम घोटाळा, येदीयुरप्पा यांच्यावरचे आरोप तडीस लावायचा प्रयत्न झाला, तसे मध्यप्रदेशात होताना दिसलेले नाही. औपचारिक विरोध जोरात चालू आहे. तपासाच्या मागण्या होत आहेत. राजकीय आरोप चालूच आहेत. पण भाजपाच्या शिवराजसिंह चौहान यांना गोत्यात आणायला अतिशय उत्तम संधी असताना माध्यमांपासून विरोधकांपर्यंत सगळेच या विषयात मीठाची गुळणी घेऊन कशाला गप्प बसतात? हे आणखी एक रहस्य आहे. मागल्या दोन आठवड्यात ललित मोदीच्या भानगडीचा आधार घेऊन राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या विरोधात जी आघाडी उघडण्याचे सामर्थ्य माध्यमांनी दाखवले, तितका उत्साह व्यापम प्रकरणात कशाला दिसत नाही? वसुंधरा यांच्यावर कागदी घोडे नाचवले गेले आणि भानगड आर्थिक आहे. इथे जीव मुठीत धरून जगावे अशी व्यापमची भयसूचक कथा आहे. त्याबाबतीत माध्यमांचा निरुत्साह शंकास्पद नाही काय? सत्ताधारी भाजपा व विरोधी कॉग्रेससह तिथली माध्यमेही व्यापमचे भागिदार आहेत काय? नसतील तर चाळीसहून अधिक लोक मारले गेले वा मेले, तरी त्यावरून गदारोळ कशाला होत नाही? की सगळ्यांनाच शिवराजनी खिशात घातले आहे म्हणायचे? व्याप्ती व धागेदोरे बघता, यात खुप मोठमोठी माणसे गुंतली आहेत आणि त्यात सर्वच बाजूंची भागी असावी, अशीही शंका घ्यायला जागा आहे. म्हणूनच मग त्याच चित्रपटातले आणखी एक गीत आठवते, काळाकभिन्न मेहमूदने म्हटलेले, जणू ‘व्यापम’मध्ये गुंतलेल्या सर्वांच्या वागण्याला शोभणारे असेच ते गाणे असावे, हा योगायोग म्हणायचा.
हम काले है तो क्या हुवा दिलवाले है
हम तेरे तेरे तेरे चहानेवाले है
सत्याच्या विजयासाठी असत्याचा उपयोग करावाच लागतो !
ReplyDeleteमध्य प्रदेश मधे संघ/ भाजपने आपल्या माणसांना ओळ्खींच्या आधारे व राजकीय वजन वापरून ( लाच घेऊन नाही ) नोकर्या बिकर्या दिल्या असतील तर ते उत्तमच आहे.... हे केलंच पाहिजे होतं..... काँग्रेस अनेक वर्ष हेच करत आली आहे व सर्व सरकारी कार्यालयात सरकारी मुखवटा असलेलं परंतू आतून काँग्रेसचा राजकीय चेहरा असलेल्या नोकरशाहीचं सैन्य निर्माण करत आली आहे. शिवाय आरक्षणाच्या अतिरेकामुळे गुणवत्ता नसलेले अनेक बेइमान लोक उच्च पदापर्यंत पोहोचले. तर आता निदान संघ परिवाराने त्यांच्या ओळखी व राजकीय वजन वापरून गुणवत्ता असलेले प्रामाणिक हिंदुत्ववादी लोक सरकारी नोकर्यात सर्वत्र पेरलेच पाहिजेत. फक्त व्यापमं प्रकरणात कोणी भाजप/ संघवाले पकड्ले गेले तर वाईट होईल.....
>
काश मुझे भी ऐसा मौका और सपोर्ट मिलता !! महाराष्ट्रात मध्य प्रदेश सारखे नेते असते तर माझ्या सारखे लोक अनेक खोट्या खटल्यात मधे अडकवले जाऊन हिंदुत्वासाठी देशोधडीला नक्कीच लागले नसते...
माझी अशी तीव्र इ्च्छा आहे की व्यापमं प्रकरणात कोणी भाजप/ संघवाले सामिल असले तरी उपरोक्त कारणासाठी पकडले जाऊ नयेत आणि त्यांनी वशिला व राजकीय वजन वापरून त्यांची गुणी, प्रामाणिक हिंदुत्ववादी माणसं सर्व सरकारी नोकर्यात पेरली पाहिजेत :D :D :D जर कुणाला माझं हे मत पटत नसेल तर ..... गेला उडत.... :D :D :D