(मूळ लेख ७ जुलै २०१३ रोजीचा आहे)
गेल्या बुधवारी इशरत जहान चकमक प्रकरणात जे आरोपपत्र दाखल झाले आहे, त्याचा खुपच उहापोह चालू आहे. त्यात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व तेव्हाचे गृहराज्यमंत्री अमीत शहा यांना गोवले जाणार काय; याचीही चर्चा चालू आहे. पण खरेच तसे होऊ शकणार असेल, तर मग त्याच आरोपातून आज भारताचे गृहमंत्री असलेले सुशीलकुमार शिंदे व महाराष्ट्राचे विद्यमान गृहमंत्री आर आर आबा पाटिल यांची सुटका होऊ शकेल काय? कारण ज्या संबंधातून व अधिकारातून त्यात मोदी व अमित शहा आरोपी ठरवले जात आहेत; नेमके त्याच तर्कानुसार आबा व शिंदेही त्यात अडकू शकतात. किती चमत्कारीक बाब आहे ना? गेला आठवडाभर इशरत प्रकरणात मोदी अडकू शकतात किंवा नाही आणि त्यात मोदी यांची भूमिका; यावर खुपच उहापोह झाला आहे. परंतू ज्या तर्काच्या आधारे ही चर्चा चालू आहे, तो तर्क कोणता आहे? कुठलीही खोटी चकमक म्हणजे खुनच असून त्या कृतीमध्ये सहभागी झालेले वा त्यांच्या वरीष्ठ नेत्यांनाही आरोपी बनवले पाहिजे. इतकी सखोल चर्चा करणारे विद्वान पत्रकार आहेत; त्यापैकी एकानेही इशरत गुजरात व अहमदाबादला कशी पोहोचली; त्याचा शोध कशाला घेतलेला नाही? प्रत्येकवेळी या विषयाची चर्चा होते, तेव्हा इशरतसहीत उर्वरीत तीनही मृत पोलिसांच्या आधीपासून ताब्यात होते आणि त्यांचे अपहरण करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. सीबीआयच्या आरोपपत्रामध्येही तोच दावा केलेला आहे. तसे असेल, तर मग इशरतचे अपहरण कोणी व कुठून केले, असाही प्रश्न महत्वाचा होतो. इशरत कुठे होती? कुठून तिचे अपहरण झाले? कोणी अपहरण केले? मारणार्या चकमकखोरांच्या ताब्यात इशरतला देणारे हे अपहरणकर्ते कोण आहेत? त्यांचा नामोल्लेखही आरोपपत्रामध्ये कशाला नाही?
इशरतची आई व बहीण अशा दोघांनी सध्या देशाच्या कानाकोपर्यातल्या माध्यमांसमोर आपली कैफ़ीयत मांडायचा प्रयास चालविला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार इशरतचे अपहरण करण्यात आले. पण पाच दिवस उलटून गेल्यावरही त्यांनी कुठे पोलिस तक्रार कशाला नोंदवली नव्हती, हा प्रश्न कायम आहे. आपली इतकी शालीन गुणी मुलगी, पाच दिवस बेपत्ता असूनही घरच्यांना पोलिसात तिच्या बेपत्ता असण्याची तक्रार द्यावीशी वाटली नव्हती, चकमक होऊन इशरत मारली जाईपर्यंत तिचे कुटुंबिय शांत बसले होते. त्यांना इशरतला जिवंत वाचवण्यापेक्षा तिच्यासाठी अश्रू ढाळण्यातच अधिक स्वारस्य होते काय? नसेल तर त्यांनी पाच दिवस तक्रार कशाला केली नव्हती. पुढली नऊ वर्षे कोर्टात संघर्ष करणार्या या इशरत कुटुंबाने आज अपहरणाचे आरोप केलेत. पण अपहरण झाल्यावर ते शांत कशाला बसले होते? की अपहरण ही कायदेशीर अटक होती, अशा समजूतीने त्यांनी गप्प रहाणे निवडले होते? पण मुंब्रा तर गुजरातमध्ये नाही. म्हणजेच इशरतला ज्यांनी कोणी संशयाने ताब्यात घेतले; ते गुजरातचे पोलिस असतील तर परस्पर मुंब्रा महाराष्ट्रात येऊन इशरतला ताब्यात घेऊ शकत नाहीत. म्हणजेच मुंब्रा वा ठाणे पोलिसांनीच इशरतला ताब्यात घेतले असणार, नव्हे तसेच झालेले आहे. थोडक्यात ज्याला इशरतचे अपहरण असे आज म्हटले जात आहे, ते अपहरण गुजरात पोलिसांनी केलेले नसून मुंब्रा वा ठाणे पोलिसांनी ताब्यात घेणे असणार. राज्याबाहेरचे पोलिस इथे येऊन कोणाला अटक करू शकत नाहीत किंवा ताब्यात घेऊ शकत नाहीत. त्यांना स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी लागते. म्हणजेच गुजरात पोलिसांच्या ताब्यात इशरतला देण्याचे काम, महाराष्ट्र पोलिसांनीच पार पाडलेले आहे ना?
११ जुन २००४ रोजी मुंब्र्यात असलेली इशरत १६ जुन २००४ रोजी अहमदाबादच्या वेशीवरच्या चकमकीत मारली गेली. मग मध्यंतरी तिला व इतरांना बेकायदा कोंडून ठेवण्यात आल्याचा गुन्हा नोंदलेला आहे. पण मग तिला मुंब्रा, ठाणे व महाराष्ट्रातून ज्यांनी ताब्यात घेतले व गुजरात पोलिसांच्या हवाली केले त्यांचे काय? आरोपींना असे थेट ताब्यात घेऊन अन्य राज्याच्या पोलिसांच्या हवाली करता येते काय? जेव्हा अन्य राज्याच्या पोलिसांना एखादा आरोपी हवा असतो, तेव्हा स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतला जाऊन दंडाधिकार्यांसमोर हजर केला जातो. त्याची कस्टडी म्हणजे ताबा कायदेशीर मार्गाने अन्य राज्यांच्या पोलिसांना दिला जात असतो. तसे इशरतच्या बाबतीत का झालेले नाही? मुंब्रा येथून तिला ताब्यात घेणार्या महाराष्ट्र पोलिसांनी तिला परस्पर गुजरात पोलिसांच्या हवाली (दंडाधिकार्याच्या संमतीशिवाय) केले असेल, तर त्यालाच अपहरण वा अपहरणाला मदत करणे असेच म्हणतात ना? म्हणजेच जो काही इशरत प्रकरणात गुन्हा झाला आहे, त्यात आयबी व गुजरात पोलिसांच्या बरोबरीने त्यात महाराष्ट्र पोलिसही गुन्हेगार होतात ना? त्यांनी चकमकीत भाग घेतलेला नसेल. पण एका ‘निरपराध’ तरूणीच्या हत्याकांडासाठी झालेल्या अपहरणाला हातभार लावलेला आहे. मग त्यापैकी कोणाचाच उल्लेख त्या आरोपपत्रात कसा नाही? वारंवार त्या चकमकीचे जे चित्रण दाखवले जात आहे, त्यात दिसणार्या गाडीचा नोंदलेला क्रमांक एम एच-२ असा दिसतो आहे. म्हणजेच ती गाडी मुंबईत नोंदलेली आहे. त्यातच संशयित बसून आल्याचा दावा आहे. म्हणजेच त्या गाडीसकट त्यांना ताब्यात घेऊन ठाणे वा महाराष्ट्र पोलिसांनी इशरतला गुजरात पोलिसांच्या हवाली केले आहे.
आता असा प्रश्न उरतो, की मग त्या अपहरणासाठी ठाण्याचे पोलिस गुन्हेगार म्हणून आरोपपत्रात उल्लेख कशाला नाही? आणि ज्या तर्काने त्यात अमित शहा व नरेंद्र मोदी यांना आरोपी ठरवण्याची घाई तमाम शहाणे करीत आहेत, त्याच तर्काने मग तात्कालीन महाराष्ट्राचे गृहमंत्री व मुख्यमंत्रीही इशरतच्या अपहरणातले गुन्हेगार वा आरोपी होत नाहीत काय? तेव्हा व आजही महाराष्ट्राचे गृहामंत्री आर आर आबा पाटिल होते. आणि या प्रकरणाचा गवगवा होताच त्यांनी मुंब्रा ठाणे पोलिसांकडून इशरत प्रकरणी अहवाल मागवल्याचेही जाहिर झालेले होते. मग त्यांना आपले पोलिस अपहरणाचा गुन्हा करतात हे ठाऊकच नव्हते काय? त्यांनी त्या अहवालाचे नऊ वर्षापुर्वी काय केले? आणि जर मुंब्रा येथून इशरतचे अपहरण करण्यापासून चकमक होईपर्यंत गुजरात पोलिसांच्या प्रत्येक कृतीला तिथला गृहमंत्री, मुख्यमंत्री जबाबदार असेल, तर मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री त्याच तर्काने अपहरणाचे आरोपी होत नाहीत काय? मुंब्रा येथून इशरतचे अपहरण झाले वा तिथल्या पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन गुजरात पोलिसांच्या हवाली केले असेल; तर त्याला इथले मुख्यमंत्री आणि गृहमंत्री तितकेच जबाबदार होतात ना? मग मोदी-शहा यांच्याप्रमाणेच महाराष्ट्रातले तात्कालीन सत्ताधीशही आरोपी होतात. तेव्हा आबा पाटिल गृहमंत्री व सुशीलकुमार मुख्यमंत्री होते. त्याकडे सीबीआयने बारकाईने लक्ष का दिलेले नाही? तीक्ष्ण बुद्धीचे आमचे पत्रकार व संपादक मुंब्रा येथून इशरतचे अपहरण कसे झाले, त्याचे उत्तर कशाला शोधत नाहीत? की त्यांना उत्तर नकोच आहे? सर्वांना मोदीना गुंतवण्यातच रस आहे? की आज खुद्द सुशीलकुमार शिंदेच सीबीआयचे वरीष्ठ असल्याचे ती तपास यंत्रणा मुंब्र्यातून झालेल्या अपहरणाचा विचार करायला धजावलेली नाही? ज्या आयबी अधिकार्यावर अपहरण व खुनाचा आरोप ठेवला जात आहे, त्याचे नाव अखेरच्या क्षणी कशाला टाळलेले आहे? त्याने इशरतला मुंब्रा येथून कोणी उचलले व गुजरात पोलिसांच्या ताब्यात कोणी दिले; त्याचा बोभटा केला तर काय होईल? मोदी-शहांना गोवायला निघालेले शिंदे व त्यांचे तात्कालीन गृहमंत्रीच इशरत प्रकरणात गोवले जाण्याचा धोका संभवतो ना? मोदी कसे गोवले जातील व त्यांच्या सोबत्यांना कसे गोवायचे; त्याचीच चिंता करण्यात गुंतलेल्यांना अधिक असल्या रहस्यातच मशगुल असलेल्यांना आपले शेपूटही त्यातच फ़सले आहे, त्याची जाणीव होईल; तिथून मग चक्रे उलटी फ़िरू लागणार आहेत. कारण त्यामध्ये गुंतलेला आयबीचा अधिकारी राजेंद्रकुमार सुखासुखी असल्या फ़डतूस चौकश्या व पोलिस तपासात फ़सणारा गडी नाही. त्याने तोंड उघडले तर काय होईल त्याचा सर्वांनीच विचार करून बघावा.
आपली मुलगी घरातुन ५दिवस गायब आहे , तरीही पोलीसात तक्रार केली नाही, कारण ति अशीच मदे मदे गायब होत असावी,
ReplyDelete