Saturday, August 15, 2015

या स्वातंत्र्यसैनिकांना ओळखणार कधी आपण?



कालच्या स्वातंत्र्यदिनी अनेक मोठमोठ्या गोष्टी ऐकायला वाचायला मिळाल्या. दरवर्षी तीच साजरेपणाची सवय आता आपल्या अंगी जडली आहे. झेंडा फ़डकवणे, नेत्यांची देशप्रेमावरची प्रवचने ऐकणे, किंवा एकमेकांना त्या दिवसाच्या शुभेच्छा देण्यापासून स्वातंत्र्य चिरायू होवो असे बोलणे नवे राहिलेले नाही. एकप्रकारची औपचारीकता त्यात आलेली आहे. मग त्या निमीत्त मिळालेल्या राष्ट्रीय सुट्टीचा आनंद लुटणार्‍यांची हेटाळणी करण्यातूनही आपले राष्ट्रप्रेम व्यक्त होत असते. बहुतांश वेळी स्वातंत्र्य योद्धे वा स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण व त्यांचे फ़ोटोही झळकवण्याची स्पर्धा चालते. पण व्यवहारत: त्यातून आपल्याला देशाचे उद्धारक म्हणून पेश करण्याची एक नाकर्ती आपमतलबी प्रवृत्ती अधिक ओंगळवाण्या पद्धतीने सादर होण्याचा दिवस, यापेक्षा अशा दिवसाची महत्ता आपण शिल्लक ठेवलेली नाही. म्हणून तर ‘मुझे चाहिये स्वराज’ अशा टोप्या घालून कुठल्याही सभेत ‘वंदे मातरम’चा घोष करणार्‍या दिल्लीच्या केजरीवाल यांनी शाळकरी मुलांच्या संचाकडून आपल्याच नावाचा नाविन्यपुर्ण ‘उद्धार’ करून घेतला. त्यांच्यावर टिका होत असली, तरी बाकी आपण कितीजण त्यापेक्षा वेगळे असतो? सामान्य नागरिक म्हणून आपण देशाविषयी किती आस्था बाळगतो वा थोर स्वातंत्र्यसैनिकांचे किती प्रामाणिक अनुकरण करतो? त्या दिवशी हे विचार डोक्यात घोळत असताना फ़ेसबुकवर एक छायाचित्र मित्राने पेश केले आणि गरीबशहा नावाचा तो माणूस बघून गांधी-पटेल वा अन्य मंडळी ब्रिटीश सत्तेला कुठल्या बळावर आव्हान देवू शकली, त्याचे प्रत्यंतर आले. त्याचे छायाचित्र बघून मग दोन दिवस आधी कुठल्या वृत्तवाहिनीवर बघितलेला चेंबुरच्या दुकानातला नासिरुद्दीन मन्सुरीही आठवला. त्याच्याही आठवडाभर आधी उधमपुर का कुठल्या भागातल्या खेडूतांनी आपला जीव धोक्यात घालून पकडलेला उस्मान उर्फ़ कासिम आठवला.


बुलडाणा ते मलकापुर या घाट रस्त्यावर कोसळलेल्या एका इवल्या दरडीने रस्त्याचा काही भाग अडला होता. तर आपली मोटरसायकल बाजूला लावून तो गरीबशहा नावाचा एक नगण्य भारतीय नागरीक एकटाच रस्ता मोकळा करण्याच्या कामी गर्क होता. इतर लोक आजूबाजूने वहाने घेऊन जात होते आणि त्यापैकी एकाने त्याच्याकडे जाऊन विचारणा केली. तर गावोगावी फ़िरून घरसामान विकाणारा हा एक सामान्य विक्रेता होता. मग रस्ता सुरक्षित करण्याचे हे उद्योग त्याला कोणी सांगितले होते? एकजण त्याच्या मदतीला थांबला तर गरीबशहाने एकहाती करीन, म्हणून काम सुरूच ठेवले. ज्या दिवशी गरीबशहा ते काम कर्तव्य म्हणून करत होता, तो दिवस स्वातंत्र्यदिन असल्याचे तरी त्याला ठाऊक होते की नव्हते देवजाणे. कोणी कॅमेरा घेऊन त्याचे चित्रण करत नव्हता, की कुठे त्याला प्रसिद्धी मिळणार नव्हती. गरीबशहाची ती अंगवळणी पडलेली सवय असावी. जशी आपल्याला काहीही न करता नुसती देशहिताची पोपटपंची करायची सवय जडलेली आहे. आपण अशाच अनेक प्रसंग अनुभवातून जात नसतो का? त्यात आपले कर्तव्य काय असते? गरीबशहा असा एकटाच नाही. चेंबुरच्या एका दुकानात गुंड मारेकरी घुसले तेव्हा नासिरुद्दीन मन्सुरी तिथे मोबाईल चार्जिंगसाठी आलेला होत. दुकानदाराशी त्याचे बोलणे चालू असताना एक तलवारधारी दुकानदारावर हल्ला करायला पुढे सरसावला. तर पाऊलभर मागे सरकलेला हाच नसरुद्दीन पुढल्या क्षणाला हल्लेखोरावर चाल करून गेला आणि त्याला जखडण्याची हिंमत त्याने दाखवली. सीसीटिव्हीने त्याचे चित्रण केल्याने घटना जगासमोर आली. कशासाठी नासिरने आपला जीव धोक्यात घातला? आपल्यापैकी कितीजणांनी तितकी हिंमत केली असती? नासिर वा गरीबशहा असे कशामुळे वागतात? त्यांचे चेहरे आपल्यासमोर कधीच का आणले जात नाहीत?

याकुब, अफ़जल किंवा तत्सम मुस्लिमांच्या शिक्षा व फ़ाशीचे कोडकौतुक माध्यमातून कित्येक तास चालते, त्याच माध्यमाना नासिर वा गरीबशहा यासारखे मुस्लिम लोकांसमोर आणावे असे कशाला वाटत नाही? हे दोघे मुस्लिम आहेत आणि त्यांनी प्रसंगावधान राखुन केलेली कामे वा कृत्ये त्यांना कोणी शिकवलेली नाहीत. उपजत नैसर्गिक प्रतिक्रिया असल्यासारखेचे ते वागले आहेत. म्हणजेच कुठेही अशी वेळ आली तरी ते तसेच वागतील, याविषयी शंका बाळगण्याचे कारण नाही. तीच कथा मग उस्मान उर्फ़ कासिम या जिहादीला पकडून देणार्‍या उधमपूरच्या त्या दोन खेडूतांची आहे. तेव्हा बातमीत झळकलेल्या त्यांची नावेही आज आठवत नाहीत. पण सशस्त्र मारेकर्‍यांने ओलिस ठेवलेल्या बंधकांमध्ये हिंमत कुठून येत असते? आपल्यासाठीच नव्हेतर समाजासाठी आपण काही करायला हवे, अशी उपजत भावनाच त्यांच्याकडून अशी कर्तव्ये पार पाडून घेत असते. ज्याच्यासाठी कुठले बक्षिस वा सन्मान नसतो. आणि असे शेकडो लोक आपल्या आसपास वावरत असतात. आपल्याला त्याचा सुगावा लागतो. काही क्षण त्यांचे अप्रुपही वाटते. पण लौकरच आपण त्यांना विसरूनही जातो. मग स्वातंत्र्यदिन वा तत्सम कुठला दिवस उजाडतो आणि आपल्यासमोर इतिहासकालीन भगतसिंग, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक वा तसलेच चेहरे पेश केले जातात. त्यांच्या मागे आजचे लहानमोठे स्वातंत्र्यसैनिक वा खरे देशभक्त आपल्याला विसरायला भाग पाडले जातात. नासिरूद्दीन, गरीबशहा वा ते उधमपूरचे खेडूत आपल्याला १५ ऑगस्टला आठवू नयेत, म्हणून असे मार्केटींग चालते काय? ज्यांचे नाव आपल्या गल्ली गावाच्या पलिकडे कोणाला माहिती नाही, असे हजारो लाखो कर्तव्यदक्ष भारतीय आज आपल्या आसपास वावरत आहेत, राष्ट्रीय कर्तव्याची जितीजागती उदाहरणे पेश करीत आहेत. ज्यांच्या पायावर भारत नावाचा खंडप्राय देश एकात्म टिकून उभा आहे.

घरदार संसार सोडून किंवा त्यावर तुळशीपत्र ठेवून ज्यांनी स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करले, तसाच जीव धोक्यत घालून चेंबुरच्या त्या दुकानात पुढे सरसावलेला नासिर किंचित वेगळा आहे काय? दुकानदाराला वाचवणे त्याचे नव्हे पोलिसांचे काम होते आणि पण नासिर पोलिस येण्याची वाट बघत दुकानदाराला मारला जाऊ देत नाही, आपला जीव धोक्यात घालून गुन्हेगाराला पकडतो. त्याला राष्ट्रीय सामाजिक कर्तव्य म्हणतात. त्याची कुठली कदर आपण करतो? पण असे हल्ले घातपात होत असताना आपापल्या सुरक्षित बिळात दडी मारून बसलेले व स्थिरस्थावर झाल्यानंतर कायदा, पोलिस वा नागरिकांच्या अधिकार हक्काचे प्रवचन झोडायला पुढे सरसावतात, त्यांना ज्या समाजात प्रतिष्ठा असते, तिथे स्वातंत्र्य व सुरक्षितता कायम धोक्यात असते. अशा पोपटपंची करणार्‍यांना स्वातंत्र्य व समाजाच्या न्यायासाठी काही किंमत मोजायची इच्छाही नसते. त्यांच्यामुळे स्वातंत्र्य बुलंद होत नाही तर दुबळेपांगळे होऊन जाते आणि जेव्हा असले दुबळे अशक्त लढवय्ये म्हणून स्वातंत्र्याचे रक्षण करायला पुढे केले जातात, तेव्हा कोणीही उपटसुंभ तुमच्या समाज देशाच्या स्वातंत्र्यावर हल्ले करायला धजावत असतो. मात्र गरीबशहा, नासिर वा उधमपुरच्या त्या सामान्य खेडूतांमुळे तेच स्वातंत्र्य अबाधित रहाते. ज्यांचा जगण्यात वागण्यात उपजत स्वातंत्र्य रक्षणाचे कर्तव्य सळसळत असते. ज्याची कसोटी चर्चा परिसंवादात नव्हेतर प्रत्यक्ष संकटप्रसंगी लागत असते. मुंबई पुणे रस्त्यावरच्या दरडी कोसळल्यावर कित्येक तास गाडीत बसणारे हजारो लोक उपयोगाचे नसतात, इतका गरीबशहा मोलाचा असतो आणि कोर्टात नागरी हक्कची लुटूपूटूची लढाई खेळणार्‍यांपेक्षा क्षणात पुढे येणारा नासिर भारतीय स्वातंत्र्याला अबाधित राखत असतो. स्वातंत्र्यदिनाने आम्हाला यंदा नवे व आजचे असे खंदे स्वातंत्र्यसैनिक बघायची बुद्धी दिली, यापेक्षा त्याची दिवसाची अन्य कुठली महत्ता असू शकेल?

4 comments:

  1. Hi pratikshipt kriya aahe ani ti phalkt ani phakt SANSKARA nech hote

    ReplyDelete
  2. Bhau Maharashtra Bhushan Puraskaravarun barich ulat sulat vidhane yet aahet - Aaple vichar janun ghyayala aavadel

    ReplyDelete
  3. १५ ऑगस्टचा ब्लोग वाचला .भाऊ तुम्ही अगदी मनातलं लिहिता म्हणूनच मी तुमचा FAN आहे - मंगलमुर्ती शास्त्री

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर लेख आणि योग्यच विचार. आपल्याकडे सध्या माध्यमांना कमी कष्टात जास्त फायदा देणाऱ्या बातम्या हव्या असतात. मग सलमान खान वर दिवसेंदिवस काहीही ऐकत बसावं लागतं. उघडा ट्विटर, कैक लोकांच्या गर्दीत उपद्रवमूल्य असलेलं काही तरी सापडतच. त्यांच्याच बातम्या करत २४ तास आणि सातही दिवस सहज काढता येतात. नासीर सारख्या लोकांना, खऱ्या बातम्यांना शोधणे हे कष्टाचे काम आहे, ते कोण करील?

    ह्यात अजून एक पैलू आहे. खऱ्या, आजच्या बातम्यांची गरज आहे. पिढी बदलत असताना, देशप्रेमाच्या, चांगल्या कर्तुत्वाच्या जुन्या उदाहरणांची धार बोथट होत जाते. भगतसिंग आणि लोकमान्य टिळक हे थोर आहेतच ह्यात वादच नाही पण एका मर्यादेनंतर अतिपरिचयात अवज्ञेला सुरुवात होते आणि इतिहासच कसा चांगला होता आणि ती माणसे आता होणे नाही अश्या नैराश्येचा सूरही लागण्याची शक्यता बळावते. अश्या प्रसंगी अश्या बातम्या आजचा सशक्त समाज उभा करण्यात मदत करू शकतात. अश्या योगदानांचे संस्कार रोजच होत राहिले तर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे ह्यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यांना अडवणारे हात तक्षणी समोर आले असते.

    म्हणून हा लेख मनाला भावला.

    ReplyDelete