Saturday, August 8, 2015

कोणाचे नाटक आणि कोणता अभिनय?

हम शायद अजीब दिशामे जा रहे है. पश्चिम द्वारे फ़ेके गये कचरे को अपने घरकी शोभा बना रहे है.

हे विधान कुणाचे आहे? कुणाला काही आठवते काय? ट्वीटरच्या माध्यमातून १० एप्रिल २०१५ रोजी प्रसिद्ध झालेल्या या विधानाने थोडी खळबळ माजवली होती. कारण ते सोनियानिष्ठ इतकीच गुणवत्ता असलेल्या डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांचे विधान होते. मात्र त्यांनी ते विधान सनी लेओन नामक जन्माने पाश्चात्य व हल्ली भारतीय चित्रपट क्षेत्रात काम करणार्‍या महिलेविषयीचे होते. अर्थात सनी लेओन कोणी मोठी अभिनेत्री वगैरे नाही. किंवा कुणा मोठ्या निर्माता दिग्दर्शकानेही सनीला मोठी महत्वाकांक्षी भूमिका कुठल्या चित्रपटात दिलेली नाही. किंबहूना कुठल्याही घरात एकत्र कुटुंब बघणार नाही, अशाच चित्रपटात सनीच्या भूमिका असतात. सहाजिकच सनी लेओनला कोणी भारतीयाने घराची शोभा वाढवण्याइतके महत्व दिले, असा दावा अजिबात करता येणार नाही. आंबटशौकी चित्रपट वा जाहिरातीमध्ये अंगप्रदर्शन करण्यापुरता तिचा उपयोग केला जातो, ज्याला शोभा वगैरे म्हणता येत नाही. असे असताना सिंघवी ‘पश्चिमेने फ़ेकून दिलेला कचरा’ असा आरोप कोणावर करतात, असा प्रश्न पडतो. कारण पाश्चात्यांनी फ़ेकून दिलेला बराच कचरा आपल्या देशातील बुद्धीमंत व जाणते शिरोधार्य मानून वागत व जगत असतात. कॉग्रेस सारख्या स्वदेशी भूमिकेवर स्वातंत्र्याची चळवळ लढलेल्या पक्षालाही सोनियांच्या रुपाने पाश्चात्य देशात जन्मलेला अध्यक्ष लागतो. त्याबद्दल सिंघवी बोलत असतील तर गोष्ट वेगळी. कारण सोनियांनी कधी पाश्चात्य व जन्म-देश इटालीत राजकारण केल्याचा दाखला नाही. फ़ार तरूण वयात त्या भारतीयाशी विवाह करून इथे आल्या आणि तब्बल पंधरा सोळा वर्षे नागरिकत्व न घेता, भारत अनुभवल्यानंतरच त्यांनी नागरिकत्व स्विकारले. हा इतिहास तपासला तर  पाश्चात्यांनी फ़ेकून दिलेला कचरा असा सिंघवी यांनी कोणाचा उल्लेख केला, असा प्रश्न विचारणे भाग नाही काय?


असो तर अशा या सनी लेओनची आण्खी एक टिकाकार आहे. तिचे नाव राखी सावंत. सिर्फ़ नाम काफ़ी है म्हणावे, इतकी राखीची ख्याती आहे. दुर्दशापुर्ण जीवनातून इतके ‘नाव कमावलेली’ राखी एक विदुषीच आहे. तर कुणीतरी राखीची तुलना सनी लेओनशी केल्याने राखी खवळली होती. स्वाभाविकच आहे. राखी हा काही पाश्चात्य कचरा नाही, तर सिंघवींच्या भाषेत ती भारतीय कुटुंब व्यवस्था व लाजलज्जेची शोभाच आहे. अशा राखीची सनीशी कोणी तुलना केल्यास त्या लोकलज्जेला संताप येणारच ना? म्हणून राखी चवताळली व तिने सनीशी आपली तुलना करू नये, असा सज्जड दम माध्यमांना भरला होता. कदाचित त्यामुळेच भारावलेल्या सिंघवींनी तसे ट्वीट केलेले असावे. पण त्यातून एकूणच आपल्या देशातील मान्यवर ख्यातमान लोक व माध्यमातील प्रतिष्ठेची नवी व्याख्या तयार झाली, हे मान्यच करायला हवे. जितकी म्हणून तुमची अब्रु चव्हाट्यावर येईल, तितके तुम्ही अधिक प्रतिष्ठीत व मान्यवर; अशी आजकालची अब्रुची व्याख्या झालेली आहे. त्यात बसत नाहीत ते देशी वा विदेशी कचरा असतात. आपण सगळे सामान्य लोक तसेच कचरा असतो. कारण आजच्या जमान्यात आपली कुठेही पुरेशी वा भरपूर बेअब्रु झालेली नसते. तसे नसते तर कॉग्रेस अध्यक्षा यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना नाटकी अशी उपाधी कशाला चिकटवली असती? ललित मोदी प्रकरणात आपण काहीही गैर केलेले नाही आणि आपल्या जागी सोनिया असत्या तर त्यांनी काय केले असते, असा प्रतिसवाल सुषमांनी विचारला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना सोनियांची सणसणित टोला हाणला आणि सुषमांना नाटकी ठरवून मोकळ्या झाल्या. आपणही ललितच्या आजारी पत्नीला शक्य ती सर्व मदत केली असती. पण त्यासाठी कुठला कायदा मोडला नसता, अशीही पुस्ती सोनियांनी जोडली आहे. 


याला अभिनय म्हणतात. नाटक व अभिनय यात हाच फ़रक असतो. तुम्ही आपले अश्रू खोटे असून इतरांचे डोळे पाणावतील इतके बेमालूम वागता, तो अभिनय असतो. उलट तुमचे खरे अश्रू असूनही लोकांना खरे वाटत नाहीत, त्याला नाटक म्हणतात. आठवते निर्भयाकांड? अवघे दिल्लीकर संतप्त होऊन रस्त्यावर उतरले होते आणि एकही दिवस त्या लोकांचे वा निर्भयाच्या कुटुंबाचे सांत्वन करायला सोनिया आपल्या घरातून बाहेर आल्या नाहीत. पण पुढे निर्भयाचे निधन झाले आणि सिंगापूर येथून तिचा मृतदेह आणला गेला, तेव्हा त्याचे गुपचुप अंत्यसंस्कार उरकण्यात आले. तेव्हा अगत्याने सोनिया गांधी उपस्थित होत्या. आपल्या परीने त्यांनी निर्भयासाठी सर्वकाही केले ना? पण कुठला कायदा मोडला काय? हजारो लोक जंतरमंतरवर टाहो फ़ोडून आक्रोश करत होते. पण सोनियांच्या डोळ्यात अश्रू नव्हता. अंत्यसंस्काराचे वेळी होता किंवा नाही, ते कोणी बघू शकले नाही. पण तेवढ्याने निर्भयाचे कुटुंबिय भारावले ना? त्याला अभिनय म्हणतात. बाकी जंतरमंतर येथे चालली होती ती नाटके. सगळे एकजात नुसते नाटकी. सिंघवींच्या भाषेत नुसता कचरा. अभिनय करावा तर राहुल, प्रियंका व सोनियांनी. कशी कॉग्रेसजनांच्या घराची शोभा वाढवतात ना? तेव्हाही निर्भयासाठी न्यायाचा टाहो सुषमांनी संसदेत फ़ोडला होताच की. पण सोनिया कशा शांत बसल्या होत्या? त्यांची पापणी लवली नव्हती की डोळ्यात एकही अश्रू नव्हता. त्याला अभिनय म्हणतात. नाहीतर सुषमा वा अन्य लोकांची नाटके म्हणजे निव्वळ देशी कचरा. लोकसभा मतदान संपल्यावर निकालापर्यंत बेपत्ता रहाणारे परदेशी विश्रांतीला जाऊन येणारे राहुल, जेव्हा गरीबाच्या झोपडीत जाउन रात्रभर मुक्काम करतात, तो अभिनय असतो. नुसती त्या गावाला भेट देण्य़ाची नाटके काय कामाची? सोनियांनी कशी हाणली ना चपराक सुषमा स्वराजना?

आचार्य अत्रे यांच्या ‘तो मी नव्हेच’ नाटकाने त्या काळात प्रयोगांचा मोठा विक्रम केला होता आणि प्रभाकर पणशीकर नटसम्राट म्हणून तिथूनच नावलौकीक कमावून पुढे आले. त्यातले नाट्य जितके रंगतदार होते, तितकाच प्रभाकर पंतांचा अभिनय सुद्धा लाजवाब होता. त्यात एकाच प्रसंगात पणशीकर डोळ्याची पापणी लवते ना लवते इतक्यात नव्या पात्राचा वेश व अभिनिवेश घेऊन रंगमंचावर अवतीर्ण व्हायचे. या विंगेतून बाहेर जाणारा तोच कलावंत दुसरे रूप घेऊन काही क्षणात प्रेक्षकांपुढे हजर व्हायचा, त्याने रसिकांना थक्क करून सोडले होते. त्यानंतर तितक्या कुवतीचा अभिनय बहुधा कोणाला जमला नाही. मात्र अलिकडल्या काळात सोनिया गांधींनी पंतांनाही तोंडात बोट घालावे लागेल, इतक्या झपाट्याने आपल्या ‘भूमिका’ बदलून दाखवल्या आहेत. तितके सुषमा स्वराजना शक्यच नाही, कुठल्या क्षणी सोनिया रॉबर्ट वाड्राच्या सासू असतात आणि कुठल्या क्षणी त्या कॉग्रेस युपीए अध्यक्षा होवून निर्णय घ्यायच्या, त्याचा पंतप्रधानपदी बसलेल्या मनमोहन सिंग यांनाही दहा वर्षात पत्ता लागला नाही. त्यांच्या पुढे सुषमा स्वराज यांचा अभिनय म्हणजे निव्वळ नौटंकीच म्हणायला हवी. सिंघवी एप्रिल महिन्यात सनी लेओनच्या संदर्भात पाश्चात्यांनी फ़ेकून दिलेला कचरा असे का म्हणाले होते, त्याचा अर्थ आता लागू शकला. तेव्हा म्हणूनच सिंघवींच्या त्या ट्वीटबद्दल लिहीणे शक्य झाले नव्हते. कारण सनी लेओन कचरा तर उत्तम अभिनेत्री म्हणून सिंघवींच्या डोक्यात कोणाचे नाव किंवा चेहरा आहे, त्याचा अंदाजच येत नव्हता. सोनियांनी सुषमा स्वराज यांना त्यांची योग्य जागा (राखी सावंतप्रमाणे) दाखवल्यामुळे सिंघवींचा हेतू उलगडायला मदत झाली. खरेच सुषमांनी व अन्य भारतीय अभिनेत्रींनी सोनियांकडून अभिनयाचे धडे गिरवले पाहिजेत. अर्थात तेही इतके सोपे नाही. त्यापैकी कोणाला सिंघवी किंवा अन्य कोणी कॉग्रेसच्या सर्वोच्चपदी बसवण्याची शक्यता नाही ना?


1 comment:

  1. खास भाऊंच्या शैलीतला लेख!
    -गामा पैलवान

    ReplyDelete