गेला आठवडाभर राधे मॉ नावाच्या कुणा बुवाबाजी करणार्या महिलेच्या विरोधात माध्यमातून धुमाकुळ चालू आहे. त्यात गैर काहीच नाही. किंबहूना अशा कुठल्याही अंधश्रद्धा माजवणार्या व्यक्ती वा बाबा-बुवांच्या विरोधात सामान्य भोळ्या लोकांना जागवणे, हेच माध्यमांचे व पत्रकारांचे कर्तव्य असते. मात्र असे कर्तव्य काही निवडक बाबतीत जोमाने करणे वा काही बाबतीत लपवाछपवी करणे, नक्कीच गैरलागू असते. लोकांची फ़सवणूक करणारा कोणीही असो आणि दिशाभूल कुठल्याही स्वरूपातली असो, त्याचा मुखवटा फ़ाडणे समान न्यायाने व्हायला हवे. त्याला तटस्थपणा किंवा न्याय्य कृती म्हणता येईल. पण त्याच राधे मॉ हिच्यासारख्याच विविध अंधश्रद्धा गरीब गांजल्या लोकांमध्ये पसरवून त्यावर आपली पोळी भाजून घेणारा अन्य कोणी असेल व उजळमाथ्याने वावरत असेल, तर माध्यमांनी तिकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करणे ही चक्क बनवेगिरी नाही काय? किंबहूना त्याहीपेक्षा मोठा गुन्हा अशा बाबतीत हेतूपुर्वक होणार्या लपवाछपवीला म्हणता येईल. म्हणजे असे की आजही इतक्या गोष्टी चव्हाट्यावर आणून राधे मॉचे अनेक भक्त त्यांच्या पावित्र्याचे गोडवे गायला पुढे येतच असतात. मग आपण त्यांना साथीदार किंवा भक्त म्हणून हिणवतो. पण जे असे हिणवण्यात आघाडीवर असतात, त्यांना पत्रकार माध्यमे म्हणून ओळखले जाते आणि ते समाजात उजळमाथ्याने वावरत असतात. ते तसेच व तितकेच फ़सवे वर्तन करीत असतील, तर काय करायचे? सामान्य लोकांची वा साथीदारांची असते ती राधे मॉ म्हणून तिची हेटाळणी करून, तिला आरोपीच्या पिंजर्यात उभे केले जाते. तीच आणि नेमकी तशीच फ़सवणूक गांजलेल्या लोकांनी तीस्ता सेटलवाड यांनीही केल्याचा आरोप आहे आणि यावर कायदेशीर कारवाई होत असताना, माध्यमे चिडीचुप का आहेत? माध्यमांना ती आपली ‘वांधे मॉ’ वाटते काय?
राधे मॉ नावाच्या महिलेने आपण कुणी पुण्यवंत साध्वी असल्याचा देखावा उभा केला. लोकांना आशीर्वाद देत सत्संग भरवले आणि लाखो रुपयांची लूट व चैन केली असाच आरोप आहे ना? गरीब गांजलेल्यांना उद्धाराचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळणे वा त्यांच्या भावना श्रद्धेचा धंदा करणे आणि येणार्या कमाईतून मस्त चैन उधळपट्टी, असाच त्या राधेवर आरोप आहे ना? शिवाय असे नाटक करताना तिने फ़सवणूक केली, छळ केला असाही आरोप एका कुणा भक्त मुलीकडून झालेला आहे. त्याचा नुसता एफ़ आय आर दाखल झाला आहे. पण पोलिसांनी पुढले कुठलेही पाऊल अजून उचललेले नाही. तर तमाम माध्यमे व पत्रकार शोधून शोधून राधे मॉ हिची पापे व पुरावे लोकांसमोर मांडायला व त्यावर चर्चा करायला उतावळे झालेले आहेत. त्यांना प्रश्न इतकाच, की नेमके अशाच स्वरूपाचे आरोप तीस्ता सेटलवाड यांच्यावर होऊन अडीच वर्षे झालीत. पण कुणा माध्यमकर्मी पत्रकाराने त्यातला तपशील उघड असताना त्याबाबतीत चर्चेची तसदी कशासाठी घेतलेली नाही? अहमदाबाद येथील गुलमर्ग सोसायटीतील मुस्लिमांचे दंगलीत हत्याकांड झालेले होते. माजी खासदार अहसान जाफ़री यांची जाळून हत्या झालेली होती. त्या आणि तत्सम अनेक प्रकरणात दंगापिडीतांना न्याय देण्याचा धंदा तीस्ता सेटलवाड यांनी एका संस्थेद्वारे चालविला आणि त्यातून जमलेल्या पैशावर ऐषाराम चैन केली; असा त्याच पिडीतांचा दावा आहे. तशी रीतसर तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली आणि त्याबाबतीतले हिशोबही तीस्ता देत नाही, म्हणून पोलिसांना कोर्टात जाऊन अटकेचे आदेश मिळवण्य़ाची पाळी आली. राधे मॉ अशाच प्रकारे गरीबांची उद्धारासाठी दिशाभूल व लूट करते, तर तीस्ता न्यायाचे गाजर दाखवून गरीबांच्या न्यायासाठी निधी जमवून त्यातून चैन करते. मग दोघीमध्ये कुठला फ़रक आहे?
राधे मॉ हिंदू साध्वी आहे आणि तीस्ता हिंदूत्वाच्या विरोधात उठलेली सेक्युलर साध्वी आहे, यापेक्षा अन्य कुठला ठळक फ़रक कोणी दाखवू शकेल काय? दोघींनी फ़क्त लोकांची फ़सवणूक केली आहे आणि त्यात तीस्ताच्या फ़सवणूकीमध्ये माध्यमांचा मोठा सहभाग आहे. राधे मॉ हिच्या भामटेगिरीत माध्यमांचा कवडीमात्र हातभार लागलेला नाही. याचा साधा अर्थ असा, की माध्यमे ही तीस्ताची किर्ती व प्रसिद्धी अगत्याने मागली दहा वर्षे करीत आली आणि त्याच काळात कुणीही राधे मॉ हिला तसूभर प्रसिद्धीही दिलेली नाही. राधे मॉ हिच्या भक्ती व सक्तीचे बळी म्हणून एक तरूण विवाहितेने तक्रार केली असेल, तर तिच्यावर माध्यमे डोळे झाकून विश्वास ठेवतात. पण जाहिरा शेख वा रईस खान यांनी तीस्ताच्या पापाचा पाढा वाचला, तरी माध्यमे त्याबद्दल अवाक्षर बोलत नाहीत. मग तीस्ता ही कोणाची राधे मॉ आहे? अर्थात तिला माध्यमांची वांधे मॉ म्हणायला लागेल, इतकाच फ़रक आहे. पण जो तेजीचा धंदा तीस्ताने गुजरातच्या दंगलीनंतर केला, त्याचा महिमा मुस्लिम समाजात तळागाळापर्यंत नेवून तिच्या भक्तीला गांजलेल्या मुस्लिमांना लावण्याचे पाप माध्यमांनीच केलेले आहे. आता कोर्टात तीच वांधे मॉ फ़सलेली आहे. सुप्रिम कोर्टानेही तिच्या निधी जमवणे व खर्च करणे याची कागदपत्रे पोलिसांना निमूट देण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार मध्यंतरी तीस्ताची कार्यालये व घरावर छापे पडलेले होते. पण कुठल्या पत्रकाराने ही जगजाहिर बातमी देण्याचे कष्ट घेतले का? कसे घेणार? ती तर माध्यमांची वांधे मॉ. कारण तिनेच माध्यमांचे वांधे केले आहेत. तिच्यावर भामटेगिरी वा अफ़रातफ़रीचे आरोप करायचे, तर तिला समाजसेवक साध्वी म्हणून पेश कोणी केली होती, असा सवाल माध्यमांना विचारला जाऊ शकतो. त्यापेक्षा याकडे पाठ फ़िरवून राधे मॉ हिचे भजन सुरू करणे सोयीस्कर नाही काय?
आपल्याकडून तीस्ताने अनेक गुन्हे करून घेतले, असा रईस खान ह्या तिच्या जुन्या साथीदाराचा आरोप आहे. पण त्याबद्दल माध्यमांनी कायम गोपनीयता पाळलेली आहे. ज्या जाहिरा शेखला बडोद्याहून उचलून तीस्ताने मुंबईत आणली, त्या अल्पवयीन अशिक्षित मुलीला कायद्याच्या जंजाळात अडकवून न्यायाऐवजी कैदेत फ़ेकायचे नाटक तिस्ताने यशस्वीरित्या केलेले आहे. गुलमर्ग सोसायटीच्या पुनर्वसनाचा मामला तर कोट्यवधी रुपयांची अफ़रातफ़र आहे. त्याचे पुरावेही तिथल्या पिडीत जनतेने सादर केले आहेत. उघड उपलब्ध आहेत. पण कुठल्या माध्यम वा पत्रकाराने त्यावर प्रकाश टाकला आहे? कसा टाकता येईल? तसे केल्यास तमाम सेक्युलर माध्यमांचे वांधे होणार ना? माध्यमे आपल्याच मॉ तीस्ताला गोत्यात कसे आणतील? त्यापेक्षा राधे मॉ हिला झोडपण्यातला पुरूषार्थ मोठा नाही काय? त्या साध्वीच्या विरोधात कसलीही कायदेशीर कारवाई सुरू नसताना माध्यमे नवनवे शोध लावित आहेत. मात्र आपल्या वांधे मॉ तीस्ताने परदेशी जाऊन गरीबांच्या उद्धारासाठी जमवलेल्या पैशातून शॉपिंग सौंदर्यप्रसाधन नट्टापट्टा केला, त्याबद्दल कोणी बोलत नाही. कशी मजा असते ना? उद्या कदाचित दोन महिन्यांनी तीस्ताच्या जामिन अर्जावर सुप्रिम कोर्ट अटकेचा निवाडाही देईल, तेव्हा यातले तमाम भक्त पत्रकार आपल्या वांधे मॉ हिच्यावर कशी सूडाची कारवाई होते आहे, त्यावर रसभरीत चर्चा रंगवतील. पण चुकूनही कुठले पैसे कुठे खर्च झाले व कोणी केले, त्याबद्दल अवाक्षर बोलले जाणार नाही. कारण तीस्ता भामटेगिरी करीत असली तरी ती सेक्युलर आहे आणि अंधश्रद्धा सेक्युलर असेल तर तिला सर्व गुन्हे माफ़ असतात. नसते तर मागल्या अडिच वर्षात तीस्ताच्या याच अफ़रातफ़रीबद्दल माध्यमांनी कुठलाच गवगवा का केलेला नाही? कारण ती आमची वांधे मॉ आहे आणि तुम्हा सामान्यांची ती राधे मॉ आहे ना?
Bhau, no one progressive will ever dare to share this because they are party to it. Iam sending post shared by one of their activists about a rally organised in Pune. No one wants to remain impartial, neither RIGHT nor LEFT. They all want to make living through their stances.
ReplyDeleteतीस्ता सेटलवाड यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी ३० जुलै २०१५ रोजी पुण्यात लोक स्वतंत्रता संघटना (PUCL), जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय (NAPM), युवक क्रांती दल (युक्रांद) व इतर प्रगतीशील संघटनांच्या वतीने आयोजित निदर्शनाची क्षणचित्रे (सौजन्य विद्या कुलकर्णी )
Glimpses of a protest to support Teesta Setalvad organized PUCL, NAPM, YUKRAND and other progressive organizations in Pune on 30th July, 2015 (Courtesy Vidya Kulkarni ) — with Suniti Sulbha Raghunath and 4 others.
भाऊ , संसदेमध्ये सध्या चालू असलेल्या गोंधळाबाबत आपल्या लेखाची प्रतिक्षा करीत आहोत . कृपया लवकरात लवकर या विषयावर आम्हां पामरांचे प्रबोधन करावे ही नम्र विनंती .
ReplyDeleteExcellent
ReplyDeleteआज वांधे माँ ला मिळाला अटकपूर्व जामीन
ReplyDeletegood one
ReplyDelete