बिहारच्या निवडणूकांची रणधुमाळी एव्हाना सुरू झाली आहे आणि प्रत्येक पक्ष आपापल्या जागा शोधून बालेकिल्ले वाचवण्याच्या कामात गर्क आहे. त्यासाठी आधीपासून रणनितीही आखण्यात आलेली होती. त्याच रणनितीनुसार भाजपा असो किंवा त्यांचे विरोधक असोत, त्यांनी वाटचाल सुरू केली आहे. त्यात मग मुलायम बाजूला झाल्याने भाजपाचा किती लाभ होईल वा मतविभागणी पुरोगामी पक्षांना कशी त्रासदायक होईल; याचे आराखडे मांडण्यात जाणकारही मग्न आहेत. पण त्या मतदानाची पत्रिका मांडताना एका ग्रहाला कोणीच विचारात घेतले नव्हते आणि तो आता अकस्मात तिथे दाखल व्हायच्या तयारीत आहे, त्याचे नाव असाउद्दीन ओवायसी असे आहे. मूळात आंध्रप्रदेशची राजधानी असलेल्या हैद्राबादचा हा मुस्लिम पक्ष आहे. बहुमताचे गणित जमवताना कॉग्रेसने मागल्या दहा वर्षात त्याला जवळ घेतले होते. त्यातून या नेत्याला वा त्याच्या पक्षाला थोडीफ़ार मान्यता वा ओळख मिळाली. देशातल्या कुठल्याही मुस्लिम राजकीय पक्षापेक्षा अतिशय कट्टर जातियवादी धर्मांधांचा पक्ष, असे त्याचे स्वरूप आहे. तीन वर्षापुर्वी नांदेड व लातूरच्या महापालिका निवडणूकीतून त्याने महाराष्ट्रात हातपाय पसरायला सुरूवात केली. पण तरीही त्याचे उद्दीष्ट महाराष्ट्र कधीच नव्हते आणि आम्ही त्याचा वेळोवेळी खुलासा केलेला आहे. ह्या नेत्याचे खरे लक्ष्य उत्तर भारतातील मुस्लिम मतांवर राजकारण खेळण्याचे आहे. त्यात महाराष्ट्रातून हायवे निघू शकतो, असा विश्वास असल्याने त्याने नेमक्या व मोजक्या जागी महाराष्ट्रात आपले बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला व यश मिळवले होते. त्यात मग दोन आमदार निवडून आणणे व औरंगाबाद महापालिकेत लक्षणिय यश संपादन करणे आले. पण त्यातून त्याला बंगाल, बिहार व उत्तर प्रदेशच्या मुस्लिमांना आपल्या गोटात ओढायचा डाव खेळायचा आहे.
दक्षिणेत मुस्लिमांची लक्षणिय संख्या असली, तरी तिथे मुस्लिमही भाषिक अस्मितेच्या पक्षातच कार्यरत असतात. म्हणूनच रझाकारांचा वारसा सांगणार्या ओवायसी व त्याच्या पक्षाला हैद्राबाद बाहेर प्रतिसाद दिर्घकाळ मिळाला नव्हता. उत्तर भारतातील मुस्लिम धर्माचे राजकारण करण्यात बिलंदर असले, तरी त्यातला कोणी ओवायसीला प्रतिसाद देत नव्हता. म्हणूनच त्याने महाराष्ट्रातून उत्तरेतल्या मुस्लिमांना नेतृत्व देण्याचा प्रयोग चालविला आहे. त्यासाठी त्याने महाराष्ट्रातील औद्योगिक वसाहतीच्या परिसरात उत्तरेतून येऊन वसलेल्या मुस्लिमांमध्ये पक्षाचा पसारा मांडला. पण जिथे मूळचे मराठी मुस्लिम बहुसंख्य आहेत, अशा भागात ओवायसीने ढुंकूनही बघितले नाही. याचे कारण उत्तरेतून महाराष्ट्रात रोजगारासाठी आलेले उत्तर भारतीय कायम गावाच्या संपर्कात असतात. त्यात मुस्लिमांचाही समावेश होतो. म्हणूनच मतदानाच्या वेळी मोठ्या प्रमाणात हे स्थलांतरीत माघारी गावीही अगत्याने जातात. अशा स्थलांतरीतांना इथे उपरे म्हणून वागणूक मिळते, त्यांना संघटित करायचे आणि त्यातून उत्तर भारतीय मुस्लिमांचे दुय्यम नेतृत्व उभे करायचा आराखडा घेऊनच ओवायसीने मागल्या तीन चार वर्षात काम केले आहे. त्याची पहिली चाचणी त्याला बिहारच्या विधानसभेत घ्यायची आहे. म्हणूनच त्याने कुठलाही गाजावाजा मधल्या दोन महिन्यात होऊ दिला नाही आणि आता ऐनवेळी मोक्याच्या जागी उमेदवार उभे करायचा मनसुबा जाहिर केला आहे. अर्थातच मुस्लिम बहुल भागातच ओवायसी उमेदवार उभे करणार आहे. त्यातून खरा धक्का सेक्युलर म्हणून मुस्लिम मतांवर कायम हक्क सांगत आलेल्यांना धोका आहे. थोडक्यात मुस्लिम मतांची विभागणी म्हणजे सेक्युलर मतांची विभागणी ओवायसी करणार आहे. त्याचे महाराष्ट्रातील यश बिहारपर्यंत घेऊन जायला मागल्या दोन वर्षातील निकाल पुरेसे आहेत.
अर्थात केवळ त्याच निकालाकडे बघून चालणार नाही. त्याच कालखंडात अनेकदा ओवायसी विविध वाहिन्यांवर आपली भूमिका मांडायला वा कुठल्याही आरोपांना उत्तर द्यायला हजेरी लावून गेला आहे. त्यावेळी अन्य मुस्लिम नेत्यांप्रमाणे त्याने भाजपा, शिवसेना वा संघावर आगपाखड केलेली नाही. त्याच्या प्रत्येक विवेचनात अधिकाधिक टिका तथाकथित सेक्युलर पक्षांवर केलेली होती व असते. सहसा अन्य मुस्लिम नेते सेक्युलर पक्षांची तरफ़दारी करताना दिसतात. पण ओवायसीने कायम सेक्युलर पक्षांनाच मुस्लिमांचे प्रश्न वा अन्यायासाठी जबाबदार धरण्याचा हट्ट सोडलेला नाही. त्याच्या विवेचनात एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने मांडली जाते, ती म्हणजे भारतात मुस्लिमांचा कुठलाच आपला हक्काचा राजकीय पक्ष नाही. जे मुस्लिमांचे पक्ष आहेत, ते अन्य कुठल्या तरी पक्षाचे गुलाम झालेले आहेत. म्हणूनच ते सेक्युलर पक्ष मुस्लिमांना फ़क्त मतांचे गठ्ठे म्हणून वापरतात. आपल्याला न्याय हवा असेल तर हक्काचा संपुर्ण मुस्लिम हिताचाच एकमेव मुस्लिम पक्ष असायला हवा, अशी त्याची मांडणी राहिली आहे. अर्थात तसा पक्ष अन्य कुठला नसून मजलीस म्हणजे एम आय एम हाच तो पक्ष आहे, असेही ओवायसी सुचवत असतो. त्याचा जनमानसावर नेमका परिणाम होतो, हेही मान्य करायला हवे. त्याचेच परिणाम आपल्याला महाराष्ट्रात दिसून आले आणि मुस्लिमांचा मानल्या जाणार्या समाजवादी पक्षाकडे निदान मुंबई महाराष्ट्रात तरी मुस्लिमांनी पाठ फ़िरवली आहे. तेच ओवायसीचे बिहारमधील लक्ष्य आहे. त्याला तिथून याचवेळी किती आमदार निवडून येतील त्याची फ़िकीर नाही. किंबहूना त्यापेक्षा जितके म्हणून अन्य पक्षातले मुस्लिम उमेदवार पडतील व सेक्युलर पक्षांचे पानिपत होईल, तितके ओवायसीला हवे आहे. कारण त्यातूनच त्याला भक्कम अशी मुस्लिम मतांची मतपेढी देशभर उभी करायची आहे.
सवाल इतकाच, की त्याचा फ़टका कोणाला बसू शकतो? भाजपावर हिंदूत्वाचा आरोप असल्याने मुळातच त्यांच्याकडे कडव्या मुस्लिमांची मते वळत नाहीत. म्हणूनच हा धोका भाजपाला सतावणारा नाही. राहिले सेक्युलर पक्ष! ज्यात मुलायम व लालू नितीश आघाडीचा समावेश होतो. ज्या मुस्लिम मतांसाठी ह्या पक्षांनी आजवर हिंदूंचा राग ओढवून घेत मुस्लिमांचे लांगुलचालन केले, तीच मते कमी होणार असतील, तर धोका त्यांनाच असणार ना? मागल्या खेपेस अशा ‘सेक्युलर’ मतांची विभागणी झाल्याने मोदींचे फ़ावले होते. म्हणून लालू नितीशनी यावेळी सेक्युलर मतांची चिरेबंदी तटबंदी उभी केली आहे. त्यातून एकही मुस्लिम मत भाजपाकडे वा इतरत्र जाऊ नये, इतकी भक्कम सज्जता केलेली होती. त्याला कुठे तडा जाईल अशी शक्यताही नव्हती. इतक्यात ओवायसीने घात केला आहे. त्याने नितीश लालूंची मत‘पत्रिका’च नव्याने मांडण्याचा घाट घातला आहे. जो ग्रह सतावतो त्याला शनि म्हणतात. म्हणजेच ओवायसी या सेक्युलर आघाडीच्या पत्रिकेत शनि बनून घुसला आहे म्हणायचे. कारण तो दोनतीन डझन जागा लढवणार म्हणजे जिथे हक्काच्या सोप्या जागा आहेत, तिथेच सुरूंग लावणार आहे. पन्नास मुस्लिम बहुल जागी ओवायसीने उमेद्दवार टाकले तरी तितक्या जागी सेक्युलर आघाडीच्या उमेदवाराची मुस्लिम मते धोक्यात येतात. पर्यायाने तिथे सेक्युलर पक्ष दुबळे होऊन जातात आणि त्याच्या परिणामी तिथे भाजपा जिंकला, तर मुस्लिमांना एकमेव मुस्लिम पक्षाची संकल्पना मान्य करून सेक्युलर पक्षांना मूठमाती देणेच भाग पडणार. ओवायसीला आज कुठल्या जागा जिंकायच्या नाहीत, तर हक्काची व हुकमी आठदहा टक्के मुस्लिम मते मक्तेदार म्हणून आपल्या झोळीत आणायची आहेत. त्याच बळावर उद्याचे राजकारण करायचे आहे. म्हणजेच त्याला मुस्लिम मते सेक्युलर राजकारणापासून तोडायची आहेत. मग त्याला सेक्युलर मतपत्रिकेतला शनि नको म्हणायला?
Correct analysis Bhau.
ReplyDeleteउत्तम विश्लेषण, भाऊ...
ReplyDeleteSuperb Article !
ReplyDelete