"The whole problem with the world is that fools and fanatics are always so certain of themselves, and wiser people so full of doubts." - Bertrand Russell
अवघड प्रश्नांची उत्तरे हवी असतील, तर त्या प्रश्नाला थेट भिडावे लागते. निदान प्रश्नात भेसळ करून चालत नाही. चुकीचा प्रश्न विचारून मूळ खर्या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही. त्याचप्रमाणे समस्येला नाकारून तिच्यावरचे उपाय सापडत नसतात, की त्याच समस्येपासून मुक्ती मिळत नसते. अमेरिकेतील जुळ्या मनोर्यावर भव्य प्रवासी विमाने आदळून जो घातपात करण्यात आला, त्यानंतर जगभरच्या जिहादी धार्मिक संकटाकडे लोकांचे लक्ष वेधले गेले. पण म्हणून ते संकट अकस्मात उदभवलेले नव्हते, की ती नवीच काही समस्या नव्हती. जागतिक राजकारणात महाशक्ती व त्यांचे बगलबच्चे यांनी जे शह-काटशहाचे डाव चालविले होते, त्याचाच तो परिपाक होता. मात्र इतका भीषण अनुभव आल्यानंतरही त्यातून काही धडा घेतला गेला, असे दिसत नाही. कारण सामान्य माणूस ज्या बुद्धीमान जाणत्यांकडे आशेने बघत असतो, त्यांनीच समस्या अधिक जटील करून ठेवलेल्या आहेत. दोन निर्बुद्ध वा अडाण्याचे जितक्या वेगाने एकमत होऊ शकते, तितके शहाण्यांचे होऊच शकत नाही. किंबहूना कुठल्याही बाबतीत असहमती, हेच हल्ली शहाणपणाचे लक्षण बनले आहे. त्यामुळे कृतीशिलता शहाण्यांच्या हातून निसटली आहे आणि अडाण्यांना निर्णय घ्यावे लागत आहेत. मग त्याचे जे काही परिणाम असतील, ते सर्वांनाच भोगावे लागत असतात. ते गाव पातळीवर किरकोळ असतात, तर जागतिक पातळीवर भयानक असतात. कारण जगाच्या स्तरावर जे कोणी शहाणे निर्णय घेत असतात, त्यातून उदभवणार्या परिणामांना उर्वरीत जगाची संमती असायची गरज नसते. होईल ते भोगण्याशिवाय अब्जावधी लोकांसाठी कुठलाच पर्याय नसतो. शहाण्यांनी कालापव्यय करायचा आणि माथेफ़िरू वा अडाण्यांनी कॄती करायची; असाच एकूण कारभार होत चालला आहे. कारण बर्ट्रांड रसेल यासारख्या खर्या बुद्धीमंतानेच सांगून ठेवले आहे.
रसेल म्हणतो, मुर्ख आणि माथेफ़िरू नेहमीच आत्मविश्वासाने भरलेले असतात. याचा अर्थ त्यांना कुठलीही कृती करताना परिणामांची पर्वा नसते. जे काही होईल त्याची जबाबदारी घ्यायची त्यांनी पुर्वतयारी असते. जबाबदारी म्हणजे तरी काय असते? लोक त्यांना गुन्हेगार म्हणतील, मुर्ख ठरवतील. त्याने त्यांचे कुठलेही नुकसान होणार नसते. कारणही साधे सरळ आहे. शहाणे नसल्याने योग्य तोच निर्णय घेण्याचे बंधन त्यांच्यावर नसते आणि शहाणे ठरण्याच्या हव्यासाने त्यांना पछाडलेले नसते. सहाजिकच ते बेधडक कुठलाही निर्णय घेतात व अंमलात आणतात. पण शहाण्यांची मनस्थिती कायम द्विधा असते. अतिशय विचारपूर्वक शहाणे कुठलाही निर्णय घेतात. पण निर्णय घेतला म्हणून तो लगेच अंमलात आणतील याचीही शाश्वती नसते. मग आपल्याच निर्णयाविषयी ज्या शंका शहाण्यांना भेडसावत असतात, त्याची मनोमन फ़ेरतपासणी करण्यात त्यांचा वेळ जात रहातो आणि निर्णय धुळ खात पडून रहातो. कारण त्यातून जे काही चांगले परिणाम अपेक्षित असतात, ते पुर्णपणे हाती यावेत, किंवा त्यात काहीच त्रुटी राहू नये, असा शहाण्यांचा अट्टाहास असतो. सहाजिकच घेतलेला निर्णय परिपुर्ण नसल्याच्या न्युनगंडाने बांधलेले शहाणे आपलाच निर्णय अंमलात आणण्याविषयी साशंक रहातात. परिणामी काहीच होत नाही. कारण शहाण्यांना परिणामांपेक्षा श्रेयाची चिंता सतावत असते आणि चुकांची, त्रुटीची कुठली जबाबदारी नको असते. याच पोकळीचा मुर्ख वा माथेफ़िरू लाभ घेतात आणि मनमानी करू लागतात. शेवटी जगाला स्थितीशीलता मान्य नसते आणि काहीतरी करून दाखवणारा नेता हवा असतो. त्यातून लोकांचा ओढा शहाण्यांपेक्षा अडाणी वा माथेफ़िरू पुढार्याकडे झुकत असतो. निष्क्रीय शहाण्यापेक्षा लोकांना कृतीशील माथेफ़िरूही पसंत पडू लागतो. कित्येक शतके उलटली, तरी जग ह्या दुष्टचक्रातून बाहेर पडू शकलेले नाही.
उदाहरणार्थ अमेरिकेकडे बघू! ९/११ च्या हल्ल्याला आता चौदा वर्षे उलटून गेली आहेत आणि अजून जिहादी दहशतवादाच्या भोवर्यातून त्या देशाला आपली सुटका करून घेता आलेली नाही. जगाची स्थिती तर विचारू नका. त्यावेळी अफ़गाण जिहाद आणि ओसामा बिन लादेनचा काटा काढण्याला प्राधान्य होते व तसे धाडस करणार्या जॉर्ज बुश या नेत्याला तिथल्या जनतेने साथ दिली. त्याने आपली मोहिम अफ़गाण जिहादपुरतीच राखली असती, तर भागले असते. पण बुशचा साहसवाद त्याला इराकच्या युद्धात ओढणारा ठरला आणि आज त्यातून मध्य आशियात आगडोंब उसळला आहे. खरे तर बुशच्या पित्याने कुवेत मोकळे करताना थोडक्यात युद्धातून अंग काढून घेतले असते, तर पुढली जुळ्या मनोर्याची स्थिती उदभवली सुद्धा नसती. इराकच्या युद्धाने तेव्हा रागावलेल्या जनतेने बुशाना धडा शिकवताना क्लिन्टन यांना अध्यक्ष पदावर आणुन सत्तांतर घडवले आणि पुढल्या काळात अर्धवट सोडलेल्या युद्धाने इराकसह मध्य आशियात विचित्र परिस्थिती निर्माण केली. क्लिन्टननाही मग युद्धबंदीला झुगारून मध्य आशियात क्षेपणास्त्रे सोडायचा व कमांडो धाडण्याचा उद्योग करावा लागला होता. त्याचा परिपाक ओसामा नावाचा भस्मासूर निर्माण करण्यात झाला. थोरले बुश वा नंतर क्लिन्टन यांच्या अनिश्चीत धरसोडवृत्तीने पुढल्या घटनांना आमंत्रण दिले. आताही धाकट्या बुशच्या धश्चोट वागण्याने इराकची समस्या उभी केली होती. ओबामांनी ती संपवण्याचे आश्वासन देत सत्ता मिळवून आठ वर्षे उलटली आणि परिस्थिती जैसे थे आहे. कारण कुठलाही निर्णय शहाण्यांनी घेतला तरी त्यातल्या त्रुटीची जबाबदारी त्यांना नको व श्रेय हवे असते. लादेन वा आता उपटलेला बगदादी यांना जबाबदारी वा श्रेय, कशाचीही फ़िकीर नसते. करतोय तेच योग्य, याविषयी त्यांचा ठामपणा त्यांना कृतीची प्रेरणा व उर्जा देत असतो.
खरे तर कुठल्याही माथेफ़िरूपेक्षा शहाण्याने घेतलेला निर्णय भले त्रुटीचा असेल वा त्यात दोषही असतील. त्यात परिपुर्णता नसेल, पण त्यामुळे मानवतेचे फ़ार नुकसान होण्याची शक्यता नसते. म्हणूनच शहाण्यांनी एकदिलाने एकाच्या मागे उभे राहून निर्णयाचे समर्थन केले, तरी मानव जमातीचे कमी नुकसान होण्याची हमी असते. पण शहाण्यांना कुठल्या अन्य शहाण्यातल्या त्रुटी दाखवून त्याचा आत्मविश्वास खच्ची करण्यातच अधिक पुरूषार्थ वाटत असतो. परिणामी निर्णय घेणारा व तो राबवण्याचे धाडस करणारा शहाणाही डळमळीत असतो. पुर्ण शक्तीनिशी तो निर्णय राबवू शकत नाही. त्याची उर्जा राहिलेल्या त्रुटीचे खुलासे देण्यातच संपुन जात असते. मग त्याच त्रुटीचा फ़ायदा माथेफ़िरू उठवत असतात. त्यात सर्वच शहाण्यांची त्रेधातिरपिट उडत असते. थोडक्यात जगापुढे दोनच पर्याय असतात. अपुरा व सदोष असा शहाणा निवडणे व त्याच्यावर विश्वास टाकणे. किमान सत्ता व अधिकार माथेफ़िरूच्या हाती जाणार नाहीत, याची सामान्य माणसाला काळजी घ्यावी लागते. मग शहाणे अस्वस्थ होतात आणि सर्व शक्ती पणाला लावून सत्ता हाती घेतलेल्या किमान शहाण्याला खच्ची करायला राबू लागतात. परिणामी असे असंतुष्ट शहाणे माथेफ़िरूचे हात बळकट करण्यासाठी राबत असतात. अवघे जग वा सगळे शहाणे मिळून एकजुटीने माथेफ़िरूचा बंदोबस्त करू शकत नाहीत, ही दहशतवादी, माथेफ़िरू वा घातपात्यासाठी खरी ताकद असते. कारण सतत चालणार्या जगात स्थितीशील बुद्धीपेक्षा कृतीशील कर्तबगारीला महत्व असते. त्यासाठी निर्णायक आत्मविश्वास आणि त्यामागची शक्ती मोलाची असते. जी माथेफ़िरूकडे हमखास असते आणि शहाण्यांमध्ये त्याविषयीच मतभेद असतात. तसे नसते तर हिंसा थांबवण्यासाठी वा संपवण्यासाठी कायम हिंसेचाच आधार शांततावादी विचारांनाही घ्यावा लागला नसता. अहिंसेने जितके जीव घेतले, तितके हिंसेलाही घेता आले नसते.
ISIS is next part of this series ....show must go on
ReplyDelete