Wednesday, September 16, 2015

मांझी तो नैय्या डुबोये........



बिहारच्या राजकारणाचा एक विनोद होऊन बसला आहे. कारण एका बाजूला तत्वाचे राजकारण करणार्‍या नितीशचे पावित्र्य भंगले आहे आणि त्यांनी जंगलराज म्हणून हिणवले त्या लालुंशी आघाडी करावी लागली आहे. पण दुसरीकडे नितीश व लालुंची इतकी धांदल ज्यांच्यामुळे उडाली, त्या भाजपाला तरी आपल्या विजयाची कितपत हमी आहे, याचीच शंका येते. कारण भाजपाला खरेच आत्मविश्वास असता, तर त्यांनी जीतनराम मांझी यांना सोबत घेण्याचा उद्योग केलाच नसता. कारण नितीशनी पुढे केलेला एक महादलित चेहरा, यापलिकडे मांझी यांची शक्ती वा गुणवत्ता फ़ारशी नाही. त्यापेक्षा आधीपासून पासवान व कुशवहा अशा दोन नेत्यांशी असलेली आघाडी भाजपासाठी पुरेशी होती. मांझी यांना सोबत आणून अमित शहा यांनी दिल्लीच्या राजकारणाची पुनरावृत्ती करण्याचेच पाऊल उचलले म्हणावे लागते. दिल्लीतही अगदी अखेरच्या क्षणी शहांनी किरण बेदी यांना भाजपात आणले होते आणि त्यांनाच नंतर मुख्यमंत्रीपदाचे उमेदवारही बनवले होते. ती मोठी धुर्त खेळी असल्याचेही ठरवले गेले. पण त्यातून काय साधले व काय मिळवले, ते जगजाहिर आहे. असे असताना तोच फ़सलेला डाव बिहारमध्ये पुन्हा खेळण्यामागचे कारण उमजत नाही. किरण बेदी या अण्णा आंदोलनापासून केजरीवाल यांच्या निकटच्या सहकारी होत्या आणि केजरीवाल यांच्या इतकाच उजळ चेहरा आपल्यापाशीही आहे, असेच अमित शहांना त्यातून दाखवायचे होते. मात्र अशा खेळी करताना स्वपक्षाला पुर्णपणे विश्वासात घ्यावे लागते, त्याचाच अभाव असल्याने किरण बेदी आपटल्याच. पण त्यांनी भाजपाचाही कपाळमोक्ष घडवून आणला होता. त्यात कुठे व काय चुकले, त्याचे आत्मपरिक्षण शहा व भाजपा यांनी केले असते, तर आज त्याचीच पुनरावृत्ती बिहारमध्ये कशाला केली असती? मांझी भाजपाला नेमके काय मिळवून देणार आहेत?

आज तरी असे भासते, की नितीश यांना डिवचण्यापलिकडे जीतनराम मांझी यांची अधिक गुणवत्ता आगामी निवडणूकीत नाही. कारण त्यांनी मुख्यमंत्री असताना केलेला खेळ अतिशय बालीश व पोरकट होता. लोकसभेतील पराभवानंतर प्रायश्चित्ताचे जे नाटक नितीशनी केले, त्यात जीतनराम मांझी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली होती. ते मांझी यांचे कर्तृत्व नव्हते, की पक्षातील त्यांच्या संघटनात्मक बळाचा परिणाम नव्हता. अगदी थोडक्यात सांगायचे तर कळसुत्री बाहुली म्हणून नितीश यांच्या इशार्‍यावर कारभार करण्यासाठीच त्यांना नेमण्यात आलेले होते. अन्यथा त्यांच्यापेक्षा अधिक गुणी व पात्र नेते पक्षात होते. पण अशांना संधी दिल्यास त्यांनी लोकप्रियता मिळवली तर आपल्यालाच आव्हान होऊ शकतील, म्हणून नितीशनी अत्यंत अपात्र अशा मांझींना त्या सर्वोच्च पदावर बसवले. अधिक एका पददलिताला उच्चपदी बसवल्याचे श्रेय नितीशना उकळायचे होते. पण मांझी यांच्यात महत्वाकांक्षा जन्म घेईल आणि आपलाच डाव उलटेल, अशी नितीशनी कधीच अपेक्षा केलेली नव्हती. पण झाले तसेच आणि मांझींना बाजूला करताना नितीशची आणखी दमछाक झाली. त्यात पुन्हा महादलित नेत्यावर अन्याय केल्याचा डाग लागला, तो वेगळा! पण गंमत अशी, की त्यामुळे आपण अतिशय पात्र व शक्तीमान नेता आहोत, अशी समजूत मांझी यांनी करून घेतली आणि नितीश विरुद्धचे बंड फ़सले असतानाही ते नव्या राजकीय जुगाराला सिद्ध झाले आहेत. त्यासाठी त्यांना दोषी धरत येणार नाही. राजकारणात असलेल्याने कुठलीही महत्वाकांक्षा बाळगण्यात गैर काहीच नाही. पण अशा पोरकट जुगारात सत्तेच्या दारात उभ्या असलेल्या भाजपाने किती दाद द्यावी व साथ द्यावी, याला मर्यादा असते. कारण अजून तरी कधीही मांझी यांची राजकीय शक्ती वा कुवत सिद्ध झालेली नाही.

ज्याप्रकारे त्यांना आघाडीत आणायचा उतावळेपणा झाला, त्याने दिड वर्ष जुन्या आघाडीला धक्का बसला आहे. पासवान नाराज झाले आणि त्यांनी आपली नाराजी जाहिरपणे बोलूनही दाखवली. बिहारच्या दलित राजकारणात पासवान स्वत:ला मक्तेदार मानतात आणि एक ठराविक गठ्ठा मते त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी आजवर अनेकदा सिद्ध केलेले आहे. किंबहूना लोकसभा मतदानात बिहारमधील भाजपाच्या मोठ्या यशाला पासवान यांच्या समाजातील विखुरलेल्या मतांनी निर्णायक पल्ला गाठायला मदत केली होती. महादलित वा मांझी यांच्या समाजाची हुकूमी मते त्यांच्या सोबत फ़िरतात, असा कुठलाही पडताळा नाही. म्हणूनच त्यांना आघाडीत घेऊन पासवान यांच्या मनात शंका निर्माण करण्याची आज गरज नव्हती. पण विषय तिथेच संपत नाही. आजवर कुठली शक्ती सिद्ध केलेली नसताना मांझी यांनी जागांची मागणी करण्यापासून अटी घालण्याचा घेतलेला पवित्रा, येऊ घातलेल्या संकटाचा संकेत आहे. खरे तर मांझींना भाजपाने सोबत घेतले नाही, तर बिहारच्या राजकारणातून त्यांचे अस्तित्वच संपून जाणार आहे. म्हणजेच त्यांनी गरजू म्हणून सहभागी व्हायला हवे आणि त्याच अटीवर त्यांना आघाडीत आणायला हवे होते. कोणी मोठा मासा गळाला लागल्याच्या थाटात मांझींचा प्रवेश त्यांनी शेफ़ारून जायला पुरेसा होता. त्यातून मग पुर्वीपासून सिद्ध असलेल्या आघाडीत बेबनाव निर्माण होण्यापलिकडे काहीच सिद्ध झाले नाही. पण जी चलबिचल तयार झाली आहे, ती पत्यक्ष मतदानात किती महाग पडू शकेल, ते निकालातूनच स्पष्ट होईल. कारण असे होत राहिले, तर जागावाटपाने बिनसलेली घडी मतदानाच्या वेळी एकदिलाने घराबाहेर पडण्यात बाधा आणू शकते. म्हणजे जिथे आपला उमेदवार नाही, तिथे मित्रपक्षाला मतदान करायचा उत्साह कमी होत असतो.

राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणूकीत भाजपाच्या स्थानिक नेत्यांना अंधारात ठेवून अनेक निर्णय झाले आणि कोणालाही परस्पर पक्षात आणले गेले. कॉग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तीरथ वा किरण बेदी यांना पक्षात आणून उमेदवारी देताना स्थानिक कार्यकर्ते व नेत्यांनाही अंधारात ठेवले गेले होते. परिणामी हे उसनवारीचे नेते अधिकची मते आणू शकले नाहीत आणि उत्साहात राबणारे पक्षाचे जुनेजाणते नेते कार्यकर्ते घरातच बसून राहिले. परिणाम लोकसभेच्या वेळी मिळवलेली मतेही भाजपाला लोकसभेत गमवावी लागली होती. माणसे फ़ोडून आणणे व त्यातून प्रतिपक्षाला दुबळे करणे ही रणनितीच असते. पण तिलाही काही मर्यादा असतात. ज्यांच्या पक्षात येण्याने मतदार प्रभावित होऊ शकतो किंवा संघटनात्मक बळ वाढण्याची शक्यता असते, त्यांना आणणे योग्यच असते. पण जीतनराम मांझी यांच्याकडून तशी अपेक्षा करता येत नाही. पण म्हणून त्यांना भाजपाने आपल्याकडे ओढूच नये असेही नाही. पण त्यामागच हेतू स्पष्ट असला पाहिजे आणि तितकीच किंमत द्यायला हवी. मांझी यांना भाजपाच्य गोटात आणल्याने मते वाढणार नाहीत. पण नितीशच्या गोटाचे नैतिक खच्चीकरण होते आणि तोच डाव असायला हवा. पण त्यापेक्षा मांझी यांची अधिक शक्ती वा पात्रता नाही, असे त्यांनाही आधीच समजावणे आवश्यक होते. तसे झालेले नाही. म्हणूनच भाजपाच्या गोटात आल्याची अधिकृत घोषणा झाल्यापासून मांझी परस्पर बेताल बोलत सुटले आहेत. आणि नेमक्या अशाच बेताल वागण्या बोलण्यातून मांझींनी नितीशची नैय़्य़ा डुबवली होती. इथे आल्यावर त्यांचे बेताल वागणे बोलणे थांबलेले नाही. म्हणूनच येत्या दोन महिन्यात ते काय काय पराक्रम करतात ते बघण्यासारखे असेल. भाजपाच्या नेत्यांना व अमित शहांना आपली काही उर्जा त्याच मांझींना आवरण्यासाठी राखीव ठेवावी लागणार आहे. अन्यथा हा मांझी नैय़्या डुबवण्यात वाकबगार आहे, हे विसरता कामा नये.

1 comment:

  1. अहो भाऊ, हि भाजपची शहाणक्यनीति आहे.
    विरोधकांची ताकद कमी करून आपल्याकडे घ्यावी असे त्यांना अजिबात वाटत नाही..
    पण, आपल्या सोबत विरोधकांशी दोन हात करणाऱ्या आपल्या मित्राची ताकद कमी करून त्याला लुळापांगळा बनवायचे हे धोरण आहे.
    मांझीला दिलेल्या २० जागांमधून जर किमान १३-१४ जागा जरी आपल्याच पाठींब्यावर निवडून आल्या. तरी मग बिहारमध्ये भविष्यातला अजून एक दलित नेता जन्माला आला असेल. म्हणूनच दलितांचा नेता असलेल्या कुशवाहा व पासवान ह्यांची ताकद कमी करण्यासाठीच मांझीला प्रोत्साहन व रसद सुध्दा देत आहेत.

    ReplyDelete