बिहारच्या निवडणूकीत असाउद्दीन ओवायसी यांनी अखेरच्या क्षणी झेप घेतली आणि मोजक्याच जागा लढवण्याची घोषणा केली आहे. इस्लामी कट्टरवाद सांगणार्या त्यांच्या इत्तेहादूल मुसलमीन पक्षावर भाजपाने टिका केली तर समजू शकते. पण या घोषणेने सेक्युलरांचे धाबे दणाणले आहे. कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते चाको यांनी तर भाजपानेच ओवायसीचे कळसुत्री बाहुले बिहारमध्ये आणल्याचा आरोप केला आहे. यासारखा हास्यास्पद प्रकार कुठला नसेल. ओवायसी हे भूत मुळात आपले बहुमताचे गणित जमवताना कॉग्रेसनेच उभे केलेले आहे. सत्ता मिळवताना ओवायसींना सेक्युलर ठरवून कॉग्रेसने सोबत घेतले. देशाची सत्ता असो किंवा आंध्रातील राजकारण असो, ओवायसीला सेक्युलर प्रमाणपत्र द्यायला भाजपा नव्हेतर कॉग्रेसच पुढे आली होती आणि बाकीच्या सेक्युलर पक्षांनी ओवायसीच्या धर्मांधतेवर पांघरूण घालण्याचा प्रयास केला आहे. मग आताच ओवायसी भाजपाचे कळसुत्री बाहुले कशाला होईल? मोजक्या दोन डझन जागा ओवायसी लढवणार आहे आणि अर्थात त्या मुस्लिम बहुल भागातच लढणार आहे. त्यामुळे तिथे आजवर ज्यांनी मुस्लिमांकडे फ़क्त मतांची पतपेढी म्हणून बघितले, अशा सेक्युलर पक्षांचे धाबे दणाणले तर चुकीचे नाही. कारण ओवायसी त्याच मतांवर दावा करणार असून तितकी मते नितीश-लालू वा कॉग्रेसला गमवावी लागणार. पण मागली तीनचार वर्षे ओवायसी त्याचीच तयारी करत होता, तेव्हा हे सेक्युलर पक्ष कुठे झोपा काढत होते? या कालखंडात अनेक विषयांवरच्या चर्चेत ओवायसी टिव्ही वाहिन्यांवर आला. त्याने सहसा भाजपा किंवा हिंदूत्वावर टिका केली नाही. तर सेक्युलर म्हणून मुस्लिमांचे प्रेषित बनलेल्या पक्षांवरच झोड उठवलेली होती. हे मुस्लिमांचे पक्ष नाहीत आणि ते मुस्लिमांना फ़क्त मतांचा गठ्ठा म्हणून वापरतात, हाच ओवायसीचा आरोप राहिला आहे.
त्याच्या म्हणण्यात तथ्य नक्कीच आहे. कारण मुस्लिमांचे सेक्युलर पक्षांनी जितके नुकसान केले, तितके हिंदूत्ववादी पक्षांनी केलेले नाही. नेहमी हिंदुत्वाचा भयगंड उभा करायचा आणि त्याच्या बदल्यात मुस्लिमांची मते लुटायची, इतकेच होत राहिले. पण मुस्लिमात सुधारणा घडवून आणणे वा मुस्लिम समाजाला धर्ममार्तंडांच्या जाळ्यातून सोडवण्यासाठी सेक्युलर पक्षांनी कधीच काही केले नाही. उलट मतांसाठी धर्ममार्तंडांचेच लांगुलचालन सेक्युलर पक्ष करत राहिले आणि पर्यायाने मुस्लिमांना अधिकाधिक धर्माच्या गुलामीत ढकलत राहिले. ओवायसीने त्याच दुखण्यावर बोट ठेवले आहे आणि जोडीला मग पर्यायी मुस्लिम पक्षच मुस्लिमांना न्याय देऊ शकेल असा प्रचार चालविला आहे. त्याच्या गळाला मोठ्या प्रमाणात मुस्लिम लागत असल्याचे महाराष्ट्रातील निकालांनी दाखवून दिले आहे. आणि त्याने राज्यातील मुस्लिम वस्त्या जिथे लक्ष्य केल्या, त्याचा हेतू स्पष्ट होता. तो यापुर्वीच आम्ही स्पष्ट केला होता. महाराष्ट्रात उत्तर भारतातून स्थलांतरीत झालेल्या मुस्लिम वस्त्यावरच ओवायसीने लक्ष्य केंद्रित केलेले होते आणि त्यातून त्याला उत्तर भारतीय मुस्लिम प्रदेशात आपला पाया घालायचा आहे, असे विश्लेषण आम्ही महाराष्ट्र विधानसभेचे निकाल पाहुनच केलेले होते. त्यातून प्रत्यक्षात सेक्युलर पक्षांना ओवायसी कसे आव्हान म्हणून उभे राहिल, त्याचा धोकाही दाखवला होता. पण इथले वा एकूणच देशातील पुरोगामी कायम भूतकाळात रममाण झालेले असतात आणि मागे बघून पुढे चालत असतात. मग समोरून येणारा धोका त्यांना दाखवून तरी काय लाभ होता? व्हायचे तेच झाले आहे आणि आजही इथले पुरोगामी आपल्याच व्याख्येतले पुरोगामीत्व उमजू शकलेले नाहीत. कालपरवा प्रा. शेषराव मोरे यांच्या विधानांचा समाचार घेताना लिहीलेल्या लेखात डॉ. कुमार सप्तर्षी यांनी पुरोगामीत्वाची केलेली व्याख्या त्यांना तरी उमजली आहे का?
खरेच उमजली असती, तर आज सेक्युलर पक्ष वा कॉग्रेसला ओवायसी हे भाजपाचे कळसुत्री बाहुले म्हणायची वेळ कशाला आली असती? ‘समाजहिताच्या आड येणाऱ्या गोष्टींच्या विरोधात प्रबोधन करणारा तो पुरोगामी. पुरोगामी म्हणजे पुढे पाहणारा. उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करणारा.’ अशी व्याख्या समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी यांनी केली आहे. ती खरी मानायची तर ओवायसी हा येणारा धोका लालु, नितीश वा कॉग्रेस अशा पुरोगाम्यांना आधीच कळायला हवा होता. त्यासाठी पुढे म्हणजे येऊ घातलेल्या भविष्याकडे बघावे लागते आणि असे काम त्या त्या चळवळ वा संघटनांचे विचारवंत करीत असतात. सप्तर्षी यासारखे पुरोगामी विचारवंत कायम मागे व भूतकाळातच रमलेले असतात. कोणी नेहरूचे गुणगान व सावरकरांची निंदानालस्ती करण्यात गर्क असतो, तर कोणी हिंदूत्वाची निंदा करत व स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास सांगण्यात गुंतलेला असतो. पण उद्याचे वा भविष्यातले राजकारण वा घडामोडींविषयी चर्चा करण्याचा विषय त्यांच्या मनाला शिवत नाही. मग ओवायसी कोणते हेतू घेऊन व लक्ष्य ठरवून महाराष्ट्रात आपले हातपाय पसरत होता, त्याचे भान यांना कसे यावे? मात्र तोच ओवायसी सेक्युलरांसाठी भविष्यात मोठा धोका आहे, असे आम्ही इथे बोंबलून सांगत असलो, तरी आम्ही प्रतिगामी असतो. हा विनोद नाही काय? जे भविष्यातले धोके पुरोगाम्यांना समजावू बघतात, तेच प्रतिगामी असतात आणि जे भूतकाळातच रममाण होतात, ते पुरोगामी मानले जातात. मागल्या तीनचार दशकात अशाच पुरोगामी विचारवंतांनी पुरती पुरोगामी चळवळ नामशेष करून टाकली आहे. कारण त्यांनी फ़क्त पुरोगामी प्रतिगामी शब्दाच्या व्याख्याच विटाळलेल्या नाहीत, तर प्रत्येक शब्दाचे अर्थ व निकषच हेराफ़ेरी करून चळवळीचा आत्माच ठार मारून टाकला आहे. प्रतिगामी असण्यालाच पुरोगामी ठरवून टाकले आहे.
मग आपल्याच अपयशाचा वा नाकर्तेपणाचा दोष अन्य कुणाच्या माथी मारून पळवाट काढणे, हाच बुद्धीवाद होऊन जातो. पुरोगामी म्हणजे समाजाचे प्रबोधन करणरा असेही सप्तर्षी प्रवचन देतात. त्यांचे शब्द खरे मानायचे, तर त्यांच्या प्रबोधन काळाच्या आधीपासून जितका भारतीय समाज सहिष्णू होता, त्याच्या तुलनेत आज धर्मांधतेचा धोका कशाला वाढलेला आहे? याचे प्रबोधन १९७० नंतरच्या जमान्यात सुरू झाले आणि त्याच्याआधी आजच्या इतकी धर्मांधता वा जातियवाद बोकाळला नव्हता. मग आज जे काही धोके त्यांना दिसत आहेत, त्याला प्रबोधनाचे परिणाम म्हणायचे काय? जितके यांचे प्रबोधन वाढत गेले वा आक्रमक होत गेले, तितके अधिकाधिक समाजघटक धर्माच्या जातीच्या आहारी गेले. त्याला पुरोगामी प्रबोधन म्हणायचे काय? ओवायसी असो किंवा हिंदूत्ववादी असोत, त्यांचा १९६०-७० पर्यंत सामाजिक व राजकीय क्षेत्रात फ़ारसा प्रभाव दिसत नव्हता. म्हणजेच आजच्यापेक्षा तेव्हाचा भारतीय समाज अधिक समजूतदार व समावेशक होता. म्हणूनच अशा धर्माधिष्ठीत राजकारणाला मतपेटीतही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर सप्तर्षी पॅटर्नचे पुरोगामी प्रबोधन इतके आक्रमक होत गेले, की समाजात अधिकाधिक प्रतिसाद सप्तर्षी दावा करतात, त्या धर्मांध शक्तींना मिळत गेला. तेव्हाच्या समाजवादी व पुरोगामी राजकारणाच्या तुलनेत दुबळ्या असलेल्या प्रतिगामी शक्ती आज प्रचंड प्रभावी झाल्या, ही त्याच पुरोगामी पॅटर्नची किमया नाही काय? मोदींचे अपुर्व यश असो किंवा ओवायसीने बिहारला मारलेली धडक असो, त्याचे श्रेय सप्तर्षीप्रणित पुरोगामी प्रबोधनलाच द्यावे लागते ना? अशांनी को्णते प्रबोधन केले माहित नाही, पण लोहिया, सानेगुरूजी वा कॉम्रेड डांगे, जयपकाशांनी केलेल्या सामाजिक प्रबोधनाचे नामोनिशाण यांच्या पुरोगामी प्रबोधनाने नष्ट करून टाकले हे निश्चीत! ओवायसीचा उदय हा त्याचे पुढले पाऊल आहे.
bhau tumi kitihi tyanna changle sangnyacha prayatn kela tari te sudharnar tar nahitch ulat tumhalach pratigami tharavun mokale hotil
ReplyDelete