Tuesday, October 27, 2015

कॉग्रेसचा सूर्यास्त जवळ आलाय?



साधारण दोन वर्षापुर्वी म्हणजे जेव्हा लोकसभा निवडणूकीचे वेध लागले होते तेव्हा कॉग्रेसचे एक अभ्यासू नेते जयराम रमेश यांनी, एक गंभीर विधान केले होते. ते इतके गंभीर होते, की कॉग्रेसवाल्यांनाही उमजले नाही. नरेंद्र मोदींची तेव्हा भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाली होती आणि मोदी हे कॉग्रेससाठी स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात मोठे अपुर्व आव्हान आहेत, असे विधान रमेश यांनी केले होते. पुढल्या निकालांनी ते खरे ठरवले. कारण इतिहासात कॉग्रेस पक्षाचा सार्वत्रिक निवडणूकीत इतका दारूण पराभव कधीच झाला नव्हता. विरोधी पक्ष म्हणूनही मान्यता मिळू नये, अशी स्थिती कॉग्रेसची झाली. म्हणजेच वेळच्या वेळी रमेश यांच्या इशार्‍याची दखल घेतली गेली असती, तर कॉग्रेसचा पराभव थांबला नसता. पण निदान इतकी दाणादाण उडाली नसती. पण दुर्दैव असे, की कॉग्रेस पक्षात हल्ली डोके असणे हाच गुन्हा आहे आणि डोके स्वतंत्रपणे वापरणे तर अक्षम्य गुन्हा आहे. सहाजिकच तेव्हा रमेश यांच्यावर अनेक घराणेनिष्ठ तुटून पडले होते. पक्षप्रवक्ते सत्यव्रत चतुर्वेदी यांनी तर रमेशना कॉग्रेस सोडून भाजपात जाण्याचा सल्ला दिलेला होता. अर्थात तसे काही झाले नाही आणि रमेश यांनी आपले डोके काढून पुन्हा कपाटात बंद करून ठेवले आणि उघड्या डोळ्यांनी पक्षाची नामुष्की होताना बघितली. पण रमेश यांच्या त्याच वेळच्या वक्तव्यात आणखी एक गंभीर विधान होते आणि त्याची आजपर्यंत कोणाला दखल घ्यावीशी वाटलेली नाही. किंबहूना आता पक्षात आपले स्थान टिकवण्यासाठी रमेशही ते विधान विसरून गेलेत. म्हणून त्यातले तथ्य संपत नाही. उलट जयरम रमेश यांच्या अभ्यासूवृत्तीची त्यातून साक्ष मिळते. काय म्हणाले होते दोन वर्षापुर्वी रमेश? आणि आजच त्याचे स्मरण करण्याचे कारण काय? तर तेच दुखणे रमेश यांनी पुन्हा बोलून दाखवले आहे.

तेव्हा रमेश म्हणाले होते. मोदींना येती लोकसभा निवडणूक जिंकलीच पाहिजे. अन्यथा मोदी राजकारणातून संपून जातील. पण राहुलचे तसे नाही. राहुलपाशी भरपूर वेळ व सवड आहे. राहुल गांधी नव्याने पक्षाची संघटना उभी करत आहेत. पण त्यांनी चालवलेली तयारी ही २०१९ सालसाठीची आहे आणि आम्ही कॉग्रेसजन २०१४ च्या लोकसभा निवडणूकीच्या चिंतेत आहोत. याचा अर्थ राहुलला आपण कुठली व कधीची निवडणूक लढवायची आहे, याचे भान उरलेले नाही. म्हणूनच कॉग्रेस पक्षाचा भयंकर पराभव होणार, याची रमेश तेव्हाच हमी देत होते. आज तेच रमेश नव्याने काय सांगत आहेत? राहुल गांधी आपली नवी टिम बनवत आहेत आणि येत्या मार्च महिन्यात कॉग्रेसचे नेतृत्व राहुल स्विकारतील. तेव्हा त्यांच्यासोबत सर्व नव्या पिढीचे नेते पक्षाची धुरा संभाळणार आहेत. साठी उलटलेल्या कॉग्रेस नेत्यांना मार्गदर्शक म्हणूनच पक्षात स्थान उरेल. मात्र असे सांगताना रमेश यांनी मोदींप्रमाणे ज्येष्ठांना अज्ञातवासात पाठवले जाणार नाही, असा टोमणाही मारला आहे. त्याची गरज होती काय? मुळातच ज्याप्रकारे राहुल मागल्या चारपाच वर्षात वागत आलेत, त्यातून अनेक जुन्याजाणत्यांना अपमानित होऊनच पक्षात रहावे लागले आहे. अज्ञातवासाचीच गोष्ट असेल, तर माजी मंत्री जयंती नटराजन यांना रमेश इतक्या लौकर कसे विसरले? राहुल यांनीच त्यांना तोंडी आदेश देवून पर्यावरणासाठी काही प्रकल्प रोखायला भाग पाडले. मात्र उद्योगपतींच्या मेळाव्यात जायची वेळ आली, तेव्हा तेच आदेश पाळल्याबद्दल जयंती यांचा तडकाफ़डकी राजिनामा घेण्यात आला होता. त्याविषयी खुलासा मागणारे प्रदिर्घ पत्र जयंती यांनी लिहीले होते आणि त्याला दिड वर्ष उत्तर मिळाले नाही, तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षात राहुल नेत्यांना कसे अपमानित करतात, त्याचा पाढाच वाचला होता. मग रमेश यांना मोदींवर मल्लीनाथी करण्याचे कारण काय?

असो, ती सक्ती आहे. मोदींना दोन अपशब्द वापरल्याशिवाय कॉग्रेस वा राहुलची मर्जी संपादन होत नाही, असे दिवस आहेत. पण ज्या निमीत्ताने रमेश पत्रकारांशी परवा बोलले, त्याचा वास्तव व्यवहारी अर्थ त्यांना तरी उमगला आहे काय? राहुल टिम बनवत आहेत याचा अर्थ काय? टिम म्हणजे तरी काय? एका मागून एक निवडणूका होऊन गेल्या आणि त्यात लागोपाठ पराभव पचवताना कॉग्रेस नामशेष व्हायची पाळी आलेली आहे. रमेशना याचेतरी भान आहे काय? दोन वर्षापुर्वी राहुल पक्षाची नवी संघटना उभारत होते आणि आता टिम बनवत आहेत, म्हणजे नेमके काय करत आहेत? राजकीय पक्षाच्या नेतृत्वाची टिम ही निवडणूक नावाच्या सामन्यात खेळायला तयार होत असते. असे बहुतेक महत्वाचे सामने संपून गेलेत आणि शेवटचा सामना बिहारमध्ये येत्या दोनतीन आठवड्यात संपणार आहे. म्हणजे सामन्याचा मोसमही संपून गेला, तरी राहुल टिम बनवत आहेत? मग ती सामना कुठला खेळणार? कारण बिहार विधानसभेची निवडणूक संपली, मग पुढले दिड वर्ष देशात कुठलीही मोठी निवडणूक होणार नाही. त्यानंतर मात्र पुन्हा पाठोपाठ निवडणुकांचा सिलसिला सुरू होईल. तेव्हा टिम तयार होऊन काय उपयोग असेल? २००९ सालात राहुलनी पक्षात सरचिटणिस हाती पद घेतले. तेव्हापासून त्यांचे टिम बनवणे चालूच होते. मग २०१३ च्या आरंभी त्यांना बढती देवून पक्षाचे उपाध्यक्ष करण्यात आले. या सर्व काळात राहुल नेमके काय करत होते? संघटना बांधणे, टिम तयार करणे अशी विविध कारणे देण्यात आली. पण त्याचे विपरीत परिणाम मात्र पक्षाला भोगावे लागलेले आहेत. तरीही संघटना उभी राहिलेली नाही, की टिम बनलेली नाही. अन्य कुणा निव्वळ चमचेगिरी करणार्‍या कॉग्रेस नेत्याने अशी बाष्कळ विधाने केली असती, तर विचारात घेण्याचे कारण नव्हते. पण रमेश हे तितके नगण्य वा उथळ नेता नाहीत. म्हणुन चमत्कारीक वाटते.

खरे तर दोन महिन्यांपुर्वीच राहुल पक्षाध्यक्षपदाची धुरा संभाळणार अशी वदंता होती. पण तसे काहीही झाले नाही व पक्षांतर्गत निवडणूका पुढे ढकलून सोनियाच नेतृत्व पदी कायम राहिल्या. तेव्हा अशा बातम्या आल्या, की पक्षातल्या ज्येष्ठांनी व वयोवृद्धांनीच राहुलला अध्यक्ष होण्यापासून रोखलेले होते. म्हणजेच टिम बनवणे वगैरे फ़क्त थापा आहेत. पक्षात जुनेजाणते नेते आहेत त्यांना राहुल पक्ष पुरता बुडवणार असा आत्मविश्वास आता आलेला आहे. त्यामुळेच राहुल पक्षाध्यक्ष झाल्यास आपण पक्षात रहाणार नाही, असा इशाराच सोनियांना दिलेला असणार. म्हणून मुहूर्त ठरलेला असताना ऐनवेळी राहुल अध्यक्ष होऊ शकलेले नाहीत. मात्र त्याचे खरे कारण जाहिरपणे सांगता येत नाही, म्हणून टिम बनवणे असल्या कंड्या पिकवल्या जातात. राहुलचाच हटट करून जाणत्यांनी पक्षाबाहेर जाण्याचा धोका सोनियाही पत्करू शकत नाहीत, हे त्यातले वास्तव आहे. म्हणजेच आईला पुत्राने पक्षप्रमुख व्हावे अशी तीव्र इच्छा असली, तरी तो आपल्या कर्तृत्वावर कॉग्रेस चालवू शकेल, अशी खात्री वाटेनाशी झालेली आहे. म्हणूनच सोनियांनी ज्येष्ठांपुढे मन तुकवून राहुलच्या नावाची घोषणा टाळलेली असावी. रमेश यांच्यासारख्यांना तर २०१९ सालच्या निवडणूकीत तरी राहुल पक्षाला चांगले यश मिळवून देतील किंवा नाही, याची खात्री उरलेली नसावी. त्याचाच हा परिणाम आहे. म्हणून मग तोंडदेखले काहीतरी बोलावे म्हणून रमेश यांनी टिमची भाषा केलेली आहे. वास्तविक कॉग्रेस सध्या नेतृत्वाचा पेचप्रसंगातून जाते आहे. नवे नेतृत्व पुढे येत नाही. ज्याच्यावर आशा केंद्रित केल्या आहेत, त्यालाच त्याचे गांभिर्य नाही, ही समस्या आहे. बिहारसारख्या प्रमुख राज्यात विधानसभेचे मतदान सुरू झाले आहे आणि कॉग्रेसचे सुत्रधार राहुल तिथून बेपत्ता असतील, तर टिम कशासाठी बनवली जातेय? खुज्या माणसाच्या सावल्या लांबू लागल्या की सुर्यास्त जवळ आला म्हणतात, त्याचीच ही प्रचिती नाही काय?

6 comments:

  1. भाऊ,
    मी जागता पहारा चा नियमित वाचक आहे.
    अरुण शौरींच्या मतप्रदर्शनाबाबत आपलं विवेचन काय आहे ते कळला तर बरं होईल. त्यांच्या विधानाची दुसरी बाजू, कारणं, गर्भितार्थ काय असू शकतात हे आम्हास कळेल.

    ReplyDelete
  2. प्रमोद गानुOctober 27, 2015 at 11:36 PM

    "खुज्या माणसाच्या सावल्या लांबू लागल्या की सुर्यास्त जवळ आला म्हणतात, त्याचीच ही प्रचिती नाही काय?"........ a super conclusion

    ReplyDelete
  3. अचूक विश्लेषण

    ReplyDelete
  4. shevatcha prayog mhanayala harkat nahi, pan congress tikyala havi karan sashakta lokshahi karita paripakva virodhi paksha lagto, pan rahul gandhi ha paryay ahe ki nahi jara shanka ahe

    ReplyDelete
  5. अगदी बरोबर विश्लेषण. भाऊ तुम्ही great आहात.

    ReplyDelete