Wednesday, October 28, 2015

राजन-दाऊद आणि खेळ सावल्यांचा!



हेरखात्यामध्ये काम करणार्‍यासाठी दोन महत्वाचे निकष असतात. पहिला म्हणजे तिथे खरे बोलणे पाप असते आणि दुसरे म्हणजे भरपूर बोलून काहीही न सांगणे! इथे मग पत्रकारांची व बातमीदारांची तारांबळ उडत असते. सामान्य पत्रकारिता करताना कुठल्याही व्यक्ती वा राजकारण्याला त्याच्याच शब्दात पत्रकार खेळवत असतात. पण गुप्तचर वा हेरखात्याशी संबंधित माहिती असेल, तर त्यापासून बातम्या बनवणे मोठे गुंतागुंतीचे काम असते. कारण त्यातले जाणकार वा माहिती देणारे संबंधित कुठलीही परिपुर्ण वा नेमकी माहिती देत नाहीत. ते विविध गोष्टींकडे संकेत करणारा तपशील देत असतात. एखाद्या कोड्याचे तुकडे मुलासमोर फ़ेकावेत आणि त्याला कोडे सोडवायला सांगावे, तशी ही माहिती तुकड्यातली असते. प्रत्येक तुकडा योग्य जागी ठेवून तर्काने त्यातले रहस्य उलगडता यावे लागते. अन्यथा अर्थाचा अनर्थ होऊ शकत असतो. बहुधा अशा गुंतागुंतीच्या विषयात बातम्यांचा असाच बोजवारा उडालेला दिसतो. सोमवारी दुपारी छोटा राजनला इंडोनेशियात अटक झाल्याची बातमी आल्यावर नेमके तेच घडलेले दिसते आहे. यातल्या जाणत्या व खास पत्रकारांनी मग आपापल्या गोटातून माहिती काढण्याचा प्रयत्न करून बातम्या रंगवल्या आहेत. पण प्रत्येकाचे निष्कर्ष किती भिन्न टोकाचे आहेत, ते दिसते आहे. एक बातमी म्हणते भारतीय सुरक्षा यंत्रणांनी मोठ्या शिताफ़ीने राजनला जाळ्यात ओढले तर दुसरी बातमी म्हणते, आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजन एकप्रकारे सौदा करून मायदेशी परत येणार आहे. तिसरी बातमी म्हणते दाऊदचा तपशील मिळवण्यासाठी राजनशी सौदा करण्यात आलेला आहे. पण दोन दशकाहून अधिक काळ दाऊदशी वैर पत्करलेला राजन कोणती माहिती देवू शकणार आहे? ही बातम्यांची फ़सगत पत्रकारांच्या अडचणी स्पष्ट करणारी नाही काय?

एक गोष्ट आता लपून राहिलेली नाही, की दाऊद जसा पाकिस्तानी आय एस आयसाठी काम करतो; तसाच मग छोटा राजनचा वापर भारतीय गुप्तचर खात्याने वारंवार करून घेतला आहे. सहाजिकच गरजेनुसार राजनला संरक्षण देणे वा त्याला मदत करणे, ही जबाबदारी टाळता येणारी नाही. मुळात अशा गुंड गुन्हेगारांची सरकारच्या गुप्तहेर खात्याने मदत कशाला घ्यावी? तर त्यामागचे कारणही महत्वाचे असते. कुठल्याही देशाचे गुप्तहेर खाते हे कायदेशीर कामे करण्यासाठी नसतेच. कायदेशीर कामे करायला सरकारचे नागरी प्रशासन सज्ज असते. पण अनेक कामे अशी असतात, की ती आपल्याच कायद्याला धाब्यावर बसवून उरकावी लागतात. त्यात सरकार कुठली जबाबदारी घेतल्याचे दाखवू शकत नाही. म्हणूनच दाऊद पाकिस्तानात सुरक्षित असला, तरी तिथले सरकार त्याच्या पाकिस्तानातील वास्तव्याचा चक्क इन्कार करत असते. इथेही एक गोष्ट लक्षात येईल, की ज्याला इंडिनेशियात अटक झाली, त्या भारतीय नागरिकाचे नाव छोटा राजन वा निकाळजे नसून मोहनकुमार असे आहे. १९८७ पासून परदेशी पळालेल्या या माणसाला वेगळ्या नावाचा पासपोर्ट कसा मिळू शकला? त्याचे उत्तर जसे कोणी देत नाही, तसेच आता मोहनकुमारला छोटा राजन कशाला म्ह्णायचे, त्याचेही उत्तर मिळणार नाही. मागूही नये. कारण अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सापडत नसतात आणि मागायचीही नसतात. सगळा संगनमताचा मामला असतो. पण नागरी व गुप्तचर खात्यातल्या बेबनावातून अनेक अशा गोपनीय गोष्टींचा बभ्रा होत असतो. मध्यंतरी गुजरातमध्ये झालेल्या एका चकमकीचे प्रकरण खुप गाजले होते. इशरत प्रकरणात गुप्तचर खात्याच्या एका अधिकार्‍याला गोवण्याचा राजकीय़ डाव खेळला गेला, तो त्याच विभागाच्या प्रमुखांनी टोकाची भूमिका घेऊन हाणून पाडला होता. कारण अशी अनेक कामे कायद्याच्या कसोटीवर तपासली जाऊ शकत नसतात.

कुठल्याही काळात व कुठल्याही देशात गुप्तचर विभागाचे प्रयोजन तेवढ्यासाठीच असते. त्यांना कायद्याच्या चौकटीपलिकडे जबाबदार्‍या पार पाडाव्या लागत असतात. मग असे विभाग गुन्हेगार वा गुंडांनाही हाताशी धरून काही कामे करून घेत असतात. देशातील असो वा परदेशातील असोत, अशा गुन्हेगार वा हस्तकांकरवी उचापती केल्या जात असतात. स्वातंत्र्य वा कायद्याचे राज्य नावाची बाष्कळ बडबड करणार्‍यांना सुखरूप जगता यावे, म्हणुन अनेकांना गुन्हेगारी कृत्ये करावी लागत असतात. आपल्या नावाने नाके मुरडणार्‍यांच्याच सुरक्षेसाठी असे बदनाम लोक धोके पत्करून कामे करत असतात. त्यांना कधी कुठली पदके सन्मान मिळत नाहीत वा त्यांच्या धाडसाचा कुठे गौरव होत नाही. कुठलाही गुप्तचर अधिकारी कधी अशा सन्मानाची अपेक्षाही करत नाही. पण आपल्या प्रामाणिकपणावर आणि देशभक्तीविषयी संशय घेतला जाऊ नये, इतकीच त्याची अपेक्षा असते. बदल्यात ते खतरनाक गुंड गुन्हेगारांशी संधान बांधून शत्रूशी सावल्यांचा खेळ खेळत असतात. कधी कधी जीवानिशी मारलेही जातात. काही महिन्यांपुर्वीच इराक व येमेनमध्ये यादवी युद्ध पेटले असताना, हजारो लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याची कामगिरी भारताने पार पाडली, हे काम नुसते कायद्याच्या सवलती घेऊन पार पाडणे शक्य नव्हते. तिथे कोणत्या मार्गाने या निरपराध नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, त्याचा तपशील कोणी विचारला नाही की कोणी सांगितलेला नाही. त्यात कोणाची मदत घेतली गेली वा कोणी मदत केली, त्याचीही कुठे वाच्यता झालेली नाही. अशी कामे हेरखात्याच्या हस्तकांकडून केली जातात. ते हस्तक गुंड गुन्हेगारही असू शकतात. कधी ते मित्र राष्ट्राचे घातपातीही असू शकतात वा शत्रू राष्ट्रातले देशद्रोही असू शकतात. प्रत्येक देश गुप्तचर कामात अशा लोकांचा सावधपणे वापर करत असतो.

छोटा राजन हे असेच एक आंतरराष्ट्रीय गुप्तचर संघर्षातले मोक्याचे पात्र होते व आहे. त्याच्याकडून कुठल्या कारवाया करून घेण्यात आल्या वा कुठे त्याची सरकारला मदत झाली, त्याचा तपशील नजिकच्या काळात तरी बाहेर येण्य़ाची शक्यता नाही. कित्येक वर्षे उलटली व परिस्थिती बदलली तर तोही तपशील उद्या बाहेर येऊ शकेल. अशा गोष्टी व घडामोडी दशकानु दशके गुलदस्त्यात पडून रहातात. तसे नसते तर आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयीचे धक्कादायक तपशील आपल्याला कशाला चकीत करू शकले असते? देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आपले नजिकचे सहकारी असलेल्या नेताजींच्या बाबतीत स्वातंत्र्योत्तर काळात कसे वागले होते? नेताजींच्या निधनाची बातमी पसरवून सत्याचा अपलाप करण्यात आला व त्यांच्याच आप्तस्वकीयांवर दिर्घकाळ पाळत राखली गेली. हे सर्व गोपनीय असते. तसे गोपनीय राखले जाते. नेताजी युद्ध गुन्हेगार होते, म्हणून तसे केल्याची सारवासारव आज केली जाते. त्यातले सत्य किती जीवापाड झाकले गेले, ते आता वेगळे सांगायला नको. मुद्दा इतकाच की सुरक्षा व राजकारणाचा गुंता इतका विलक्षण चमत्कारिक असतो, की त्यात गुन्हेगारही देशभक्त ठरवले जाऊ शकतात आणि खरेखुरे देशभक्तही गुन्हेगार ठरवले जात असतात. छोटा राजनचा मामला अजून कोवळा आहे. त्याचे शेकडो पदर उलगडायला खुप वर्षे जावी लागणार आहेत. देशाला उपयुक्त असे त्याने काय केले, किंवा एकूणच देशाच्या गुप्तचर खात्याने त्याला पाठीशी घातले असेल, तर त्यामागची कारणमिमांसा व्हायला दिर्घकाळ जावा लागणार आहे. पण दरम्यान आताच त्याला अशाप्रकारे ऑस्ट्रेलिया्त अटक न करता तिथून इंडोनेशियात आणून अटक करण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. तर पाकिस्तान भारतीय हेरखात्याने शरीफ़ व सईद हाफ़ीजच्या हत्येचे कारस्थान शिजवल्याचाही आरोप करतो आहे. त्याचा राजनच्या अटकेशी काही संबंध असेल का?

No comments:

Post a Comment