आधीच्या रविवारी ‘टाईम्स नाऊ’ या वाहिनीवर भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांची अर्णब गोस्वामीने घेतलेली मुलाखत प्रक्षेपित झाली. त्यात हा माणूस छाती ठोकून आपल्याला बिहार विधानसभेत दोनतृतियांश बहूमत मिळणार असे सांगत होता. अर्णबने त्याला वारंवार त्यामागचे तर्कशास्त्र व समिकरण विचारले होते. तर निकाल लागल्यानंतर सांगतो, असे म्हणत शहांनी उत्तर टाळाले होते. ही टाळाटाळ कुठल्याही पक्षाच्या अध्यक्षाला न शोभणारी होती. कारण अर्णबच्या प्रश्नाला उत्तर दिल्याने शेवटच्या फ़ेरीतली मते फ़िरण्याची शक्यता नव्हती. किंवा कुठल्याही पक्षाला आपली ताकद ठाऊक असते आणि त्यावर जिंकण्याचे मनसुबे रचलेले असतात. म्हणूनच आपले बळ कशात आहे, त्याचे विवरण देण्यात कुठली अडचण नव्हती. पण शहांनी तेच टाळले. त्यामागे पराभवाची खात्री होती, यात शंका नाही. अन्यथा दोनतृतियांश बहुमताच्या थापा त्यांनी मारल्या नसत्या. २०१४ च्या ऑगस्ट महिन्यातल्या पोटनिवडणूकात प्रथम नितीश व लालू एकत्र आले. त्याचे परिणाम तेव्हाच दिसले होते. आणि ते दोघे आपला राजकीय जीव वाचवण्यासाठीच एकत्र आले होते. कारण एकमेकांच्या विरोधात लढून आपण मोदी व भाजपाचे काम सोपे केले, याची त्यांना खात्री पटलेली होती. त्यातून सावरण्याचा एकच मार्ग होता आणि तो एकत्र येण्य़ाचा व त्यासाठी आपापले अहंकार गुंडाळुन ठेवण्याचा. त्यांनी त्या पोटनिवडणूकीत प्रयोग म्हणुन एकमेकांना साथ दिली आणि त्याचे योग्य परिणाम दिसताच बिनतक्रार पुढल्या काळात ते एकत्र आले व नांदले. आज दिवाळीच्या काळात ते दिवाळी म्हणूनच करत आहेत आणि अमित शहांसह बिहारची रणनिती आखणार्या भाजपा नेत्यांनी पक्षाचे पुरते दिवाळे वाजवले आहे. त्यांना लोकसभेत का जिंकलो हे कळलेले नाही आणि आता कशामुळे पराभूत झालो, त्याचा थांग लागलेला नाही.
निकालानंतर एका वाहि्नीवर बोलताना केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभेपेक्षाही मतांची टक्केवारी कशी वाढली आहे, त्याचा बचाव मांडला होता आणि म्हणून पक्षाचा कसा दारूण पराभव झालेला नाही, त्याची सारवासारव चालविली होती. यांचाच दावा मान्य करायचा, तर मागल्या लोकसभेत कॉग्रेसनेही फ़ारसा मार खाल्लेला नाही. कारण त्यांची मतेही २००९ च्या तुलनेत फ़क्त दहा टक्केच कमी झाली. पण जागा मात्र १६० कमी झाल्या. त्याला ‘सुपडा साफ़’ असे भाजपावालेच म्हणत होते ना? कारण कायदेमंडळात मतांच्या टक्केवारीनुसार प्रतिनिधीत्व वा सदस्यसंख्या वाट्याला येत नसते. त्या त्या मतदारसंघात पहिल्या क्रमांकाची मते मिळवणरा जिंकत असतो. त्यांची संख्या बहुमताचा निर्णय घेत असते. नुसत्या मतांच्या टक्केवारीचे कौतुक सांगायचे असेल, तर मागल्या लोकसभा निवडणूकीत कॉग्रेससह लालू व नितीश यांची टक्केवारी बेरीज भाजपापेक्षाही अधिक होती बिहारमध्ये. मग त्यांचा पराभव झालेला नव्हता, असे कोणी भाजपावाला म्हणाला होता काय? नसेल तर आज टक्केवारीबद्दल बोलणे आणि तेव्हा जागांमुळे आपणच बाजी मारल्याचे दावे करणे, निव्वळ भंपकपणा असतो. दिल्ली पाठोपाठ दुसरा तितकाच दणका बसला असताना भाजपाच्या प्रवक्ते नेत्यांनी मांडलेला बचाव म्हणूनच पराभवापेक्षा भयानक चिंतेचा विषय आहे. अर्थातच त्या पक्षात कोणाला भवितव्याची चिंता असेल तर! पण एकीकडे असे फ़सवे दावे तुम्ही करू लागलात, की दुसरीकडे तुमच्या पाठीराखे व कार्यकर्त्यांना विचलीत करणार्यांनाही नवनवी कारणे सांगणे सोपे होऊन जाते. म्हणूनच बिहारचे निकाल लागल्यावर पुरस्कार-वापसी, असंहिष्णूता वा काही वाचाळ नेत्यांची बेताल विधाने; अशी कारणे पुरोगामी विश्लेषकांनी पुढे आणली आहेत आणि भाजप समर्थक त्यानेही गोंधळुन गेला आहे. वास्तव त्यापेक्षा खुपच भिन्न आहे.
पहिली गोष्ट म्हणजे लोकसभा व विधानसभेच्या निवडणूकांची परिस्थिती भिन्न होती आणि लढतीची समिकरणेही वेगळी आहेत. तेव्हा देशाचा पंतप्रधान निवडायचा होता आणि म्हणुन लोकांचा मोदींकडे ओढा होता. भले नितीशबद्दल आकर्षण असले तरी तो नेता पंतप्रधान होण्याची शक्यता नसल्याने कॉग्रेसला पर्याय होऊ शकेल अशा मोदींविषयी लोकांचा कल झुकता होता. तरीही विधानसभेपेक्षा भाजपाला पडलेली मते व टक्के कमीच होते. पण समोरची मते अनेक गटात विभागली गेल्याचा लाभ भाजपाला मिळाला. ती त्रुटी लक्षात आल्यावर नितीश लालूंनी पोटनिवडणूकीत सावरले आणि मतविभागणी टाळली, तर भाजपाच्याच दोन आमदारांच्या जागा त्यांना मिळाल्या होत्या व भाजपाने गमावल्या होत्या. तिथेच येऊ घातलेल्या संकटाचा इशारा भाजपाला मिळाला होता. लालू-नितीश एकत्र आल्यास बेरजेनेच भाजपाला गारद करू शकतील, हे त्या पोटनिवडणूकांनी ऑगस्ट २०१४ मध्ये दाखवले होते. त्यानंतर पंधरा महिने त्याचा विचारही भाजपाने केला नसेल, तर दोष कोणाचा? कारण ते दोघे एकत्र आलेच, पण त्यांनी सोबत कॉग्रेसलाही घेतले होते. त्यांच्या मतांची बेरीजच त्यांना प्रचंड बहुमत देवून जाऊ शकेल अशी होती. त्यावर मात करण्यासाठी अमित शहांनी खेळलेला मोठा डाव म्हणजे जीतनराम मांझी यांना आपल्या गोटात आणले. हा दिवाळखोरीचा कळस होता. ज्याला नितिशनी मुख्यमंत्री पदावरून बाजूला केले आणि एकही आमदार त्याच्या सोबत पक्षातून बाहेर पडला नाही, त्या जीतनरामची काय मदत भाजपाला होणे शक्य होते? नितीशच्या गोटातीन महादलित आपल्या गोटात आल्याचा देखावा उभा करणे शक्य झाले. पण मते आली नाहीत, येणारही नव्हती. यालाच दिवाळखोरी म्हणातात. ज्या फ़ाटाफ़ुटीचा लाभ लोकसभेच्या वेळी मिळाला त्याचे आकलन योग्य केले नाही आणि मोदी म्हणजे मतांची खाण, अशा मस्तीत जाण्याने पुढली दिवाळखोरी अपरिहार्य ठरली.
भाजपाचा गल्लीतलाही नेता कार्यकर्ता इतका मस्तवालपणा करीत असताना अहंकारानेच बुडालेल्या नितीश लालूंनी किती लवचिकता दाखवावी? आधीच्या विधानसभेत ११६ आमदार असताना नितीशनी अवघ्या १०० जागांवर समाधान मानले आणि २२ आमदारांच्या लालूंना शंभर जागा दिल्या. अधिक चार जागा असूनही कॉग्रेसला ४० जागा दिल्या. याचे कारण, लढता किती त्यापेक्षा जिंकता किती त्याला महत्व असते. म्हणून १६०-१७० जागा लढून भाजपाला ५० जागांच्या पुढे मजल मारता आली नाही आणि लालू नितीश अवघ्या शंभर जागा प्रत्येकी लढून ७० च्या पुढे जागा जिंकू शकले. कारण जिंकू शकणार्या जागा लोकसभा मतदानाच्या विधानसभा मोजणीत दिसतही होत्या. त्यात ज्याचे पारडे जड त्याला ती जागा, इतकी सोपी वाटणी झाली आणि दोन महिने आधी उमेदवार कामाला लागले होते. सर्वात मोठा पक्ष झाल्यावर सुद्धा शब्दाला जागून लालूंनी नितीशच मुख्यमंत्री असे निकालानंतरही स्पष्ट केले. याला लवचिकता म्हणतात. बदलत्या परिस्थितीशी आपले समिकरण जुळवण्यातून निवडणीका जिंकता येतात आणि सोप्या होत असतात. नुसतेच डावपेच व रणनिती कामाची नसते. लोकसभा जिंकल्यापासून भाजपा रणनितीच्या खुप आहारी गेला आहे आणि त्याला आपल्या शक्ती, मते व समिकरणाचे भान उरलेले नाही. मग पराभवाला पर्यायच नव्हता. आधी दिवाळखोर व्हायचे आणि त्यात पुन्हा जुगार खेळावा, मग भवितव्य काय असणार? मतदान संपत आले असताना अमित शहा वास्तवापासून किती मैलोगणती दूर होते, त्याची साक्ष म्हणजे अर्णबला दिलेली मुलाखत! दोनतृतियांश बहुमताची भाषा अन्य कोणाची नाही, तरी पक्षाचीच फ़सवणूक करू शकली. किंबहूना त्यातून उभे राहिलेले प्रश्न व अडचणींना आगामी वर्षात तोंड द्यावे लागणार आहे. ऐन दिवाळीत ही दिवाळखोरी अमित शहांनाच लखलाभ होवो.
an eye opener for bjp.
ReplyDeletebhau u have categorically analysed AMIT SHAH , top to toe!
महाराष्ट्रात अमित शहा मुळेच गोंधळ झालाय भाजप आणि शिवसेनेचा
ReplyDeleteआता एकच नारा अमित शहा हटाव भाजपा बचाव
अमित शहा हटाव भाजपा बचाव
ReplyDelete