Sunday, November 8, 2015

बिहारच्या विधानसभा निकालांची शहा-निशा



१९७८ च्या आसपासची गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियाच्या कॅरी पॅकर याने क्रिकेटची एक सर्कस सुरू केली होती. मर्यादित षटकाच्या खेळांसाठी त्याने जगातल्या नामवंत खेळाडूंना विकत घेऊन अनेक देशाच्या राष्ट्रीय संघांचा पुरता बोर्‍या वाजवला होता. प्रामुख्याने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडीजच्या खेळाडूंना पोटभर पैसे मोजून त्याने खरेदी केले आणि चार संघात विविध स्पर्धांचे थेट चित्रण चालविले होते. त्याच्याकडे खेळणार्‍यांना राष्ट्रीय संघांनी बंदी घातली आणि नव्या खेळाडूंचे संघ तयार केले. त्यात नवखेपणा व अनुभवाचा अभाव होता. इंग्लंडने तर माईक ब्रियर्ली या उतर वयातल्या खेळाडूला कप्तान करून नव्या पोरांना त्याच्या हाती सोपवले. त्याने खरेच त्यातून उमद्या खेळाडूंची टिम तयार केली. मग त्यातून उदयास आलेल्या अष्टपैलू आयन बोथम याच्याकडे इंग्लंडचे नेतृत्व सोपवण्यात आले आणि चांगला तोच संघ असूनही इंग्लंड पराभूत होऊ लागला. त्या अपयशाची जबाबदारी घेताना बोथमने व्यक्त केलेले मत आज आठवले. तो उत्तम व सर्वात चांगला खेळाडू होता. पण नेतृत्व करायला आपण लायक नाही, याची त्याने कबुली देत नेतृत्व सोडले. पण तेव्हाच त्याने मांडलेला एक मुद्दा महत्वाचा होता. आपल्यातील गुणवत्ता ओळखून तिचा नेमका वापर ब्रियर्ली उत्तम करू शकत असे. मला स्वत:च्या गुणांचीही पारख नाही, की माझेच गुण मी उपयोगात आणू शकत नाही, अशी कबुली बोथमने दिली होती. लोकसभा निवडणूकीत उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याची जबाबदारी मोदींनी अमित शहांकडे सोपवली आणि त्यांनी चमत्कार घडवून दाखवला. पण त्या राज्यामध्ये शहांना धाडण्याचा निर्णय मोदींचा होता. त्यांच्याच रणनितीनुसार शहांनी उत्तर प्रदेशात मोठे यश मिळवून दाखवले होते. पण ते यश आपलेच असे शहांना वाटले आणि त्यांच्या पक्षातील चहात्यांना वाटले. त्याचे परिणाम समोर आहेत.

शहा यांना ठरवून दिलेल्या रणनितीनुसार उत्तम अंमलबजावणी करता येते. पण ते उत्तम रणनितीकार नाहीत. त्याची प्रचिती पक्षाध्यक्ष झाल्यापासून येत आहे. त्यानी प्रथम लोकसभेत झालेल्या आघाड्या व युत्या मोडून टाकण्याचा सपाटा लावला. त्यात नवी युती होती हरयाणातील आणि जुनी युती होती महाराष्ट्रातील! या दोन युत्या मोडल्या, तरीही भाजपाला बर्‍यापैकी यश मिळाले. कारण त्यांनी कॉग्रेस वा अन्य पक्षातून विजयी होऊ शकणारे उमेदवार आयात केले होते. अधिक मोदींच्या यशाला अजून ग्रहण लागले नव्हते, की विरोधक लोकसभेच्या पराभवातून सावरलेले नव्हते. पण त्यातून एक संदेश अमित शहांनी देशभर पाठवला. भाजपा शत्रूंच्या आधी आपल्या मित्रांचा काटा काढतो. दुसरीकडे शत-प्रतिशत भाजपाचा पवित्रा घेऊन शहांनी ‘पार्लमेन्ट टु पंचायत’ भाजपा अशा कॉग्रेसी भुमिकेत भाजपा नेला. म्हणजे देशात कुठल्याही अन्य पक्षाला स्थान असू नये, अशीच एकूण भूमिका घेतली गेली. ही अर्थात भाजपाची भूमिका नसेल, पण शहांनी तसे भासवले होते. थोडक्यात त्या भूमिकेतून त्यांनी आपल्या विरोधात सर्व पक्षांनी आपापले मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचीच सक्ती बहुतेक पक्षांना केली. दिल्लीत मग त्याचेच पडसाद उमटले. केजरीवाल हे तसे दिल्लीतले आव्हान नव्हते. सहज भाजपा तिथे विधानसभेत बहुमत व यश मिळवू शकला असता. पण अमित शहांनी दिल्लीची सुत्रे आपल्याच हाती घेतली आणि दिल्लीत आयुष्यभर पक्षासाठी राबलेल्यांना बाजूला फ़ेकून दिले. किरण बेदी यांना पक्षात आणून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार करताना, दिल्लीच्या कोणाही पक्षनेत्याला शहांनी विश्वासात घेतले नाही. थोडक्यात मुळचा दिल्लीतला कार्यकर्ता व पक्ष गारद करून टाकला. तर फ़ोडाफ़ोडीतून बाकीच्या पक्षांना व मतदारला केजरीवाल यांच्या आश्रयाला जाण्याची जणू सक्तीच केली.

एकूण लोकसभेत जे यश मोदी व त्यांच्या अन्य सल्लागारांनी गणित मांडून मिळवले होते. त्याच्या विपरीत कारभार शहा अध्यक्ष झाल्यापासून सुरू झाला. महाराष्ट्रात त्याचा पाया घातला गेला. राष्ट्रवादी वा अन्य पक्षातून उमेदवारांची आयात करून मोठा पक्ष होण्याची मजल भाजपाने मारली, तरी बहुमत हुकले. तिथेच शहानितीतला दोष समोर आला होता. त्याचे दुष्परीणाम असलेल्या जागा गमावण्यातून दिल्लीत दिसलेले होते. पण म्हणून सुधारणा कोणी करायची? मोदी म्हणजे व्हिसा एटीएम कार्ड, अशी काहीशी समजूत शहा व भाजपाच्या अनेक नेत्यांनी करून घेतली. मग मोदींना सभेत आणून उभे करायचे, की शेंदुर फ़ासलेला कुठलाही दगड निवडून येणार, अशा मस्तीत मागले दहा महिने भाजपा वावरतो आहे. म्हणून तर कालपरवाच आपण युती तोडण्याचा पराक्रम केला, असे एकनाथ खडसे कसे छाती फ़ुगवून सांगत होते ना? बिहारमध्ये त्याचीच किंमत मोजावी लागली आहे. कारण इथे झाले, तेच बिहारमध्ये केले. जीतनराम मांझी यांना सोबत घेताना आधीपासूनचा लोकप्रिय दलित नेता मित्र, रामविलास पासवान यांना अंधारात ठेवल्याने तेही नाराज होते. पण शहांना आवरणार कोण? उलट दुसरीकडे आपले अहंकार बाजूला ठेवून दोन दशकांची दुष्मनी गुंडाळून लालू व नितीश एकत्र आले होते. आपले ११६ आमदार असताना त्याहीपेक्षा कमी जागी लढायला नितीश राजी झाले. इतकेच नव्हेतर लालूचे २२ आमदार असताना त्यांना शंभर जागा देण्यापर्यंत नितीशनी लवचिकता दाखवली. पण अमित शहा मात्र जराही झुकायला राजी नव्हते. त्यांची अखंड मनमानी चालू राहिली. महाराष्ट्र वा दिल्लीतल्या अनुभवातून काहीही शिकायचे नाही, असा त्यांनी चंग बांधला होता. शत्रूमध्ये मित्र शोधायचे आणि मित्रांमध्ये शत्रू निर्माण करायची, नवी रणनिती वर्षभर बिनबोभाट राबवली गेली. बिहारमध्ये निकाल त्याच रणनितीचा लागला.

प्रचारातला प्रमुख चेहरा वा भाजपा म्हणजे नरेंद्र मोदी असाच पेश केला जात असेल, तर पराभवही त्यांचाच झाला, हे नाकारता येणार नाही. पण म्हणून वास्तवात तो मोदींचा पराभव नाही. व्यवहारात तो शहा रणनितीचा दारूण पराभव आहे. अर्थात त्याची जबाबदारी शेवटी मोदींचीच आहे. त्यांच्या मतानेच शहांची निवड पक्षाध्यक्ष म्हणून झालेली असेल, तर शहांच्या प्रतापाची जबाबदारी मोदींना उचलावीच लागेल. पण सवाल नुसती जबाबदारी पत्करण्याचा नाही, तर त्यातून सावरण्याचा आहे. यातून पक्ष व मोदी निस्तरणार कसे? ज्याप्रकारे अमित शहा किंवा काही नेते तोंडपाटिलकी करून मित्रांना दुखावतात, त्यांच्या मुसक्या मोदी बांधू शकणार आहेत काय? जिथे पक्षाची शक्ती कमी आहे व जिथे मित्रांची गरज आहे, तिथे शत-प्रतिशत होण्यापेक्षा जिथे कोणी मित्रच नाही, तिथे पक्षाचे बळ वाढवण्याची रणनिती गरजेची आहे व होती. त्याऐवजी मित्रांना दुखावण्यापासून शहांनी सुरूवात केली. आत्मघात तिथे झाला आहे. मोदींनी आपल्या बारापंधरा वर्षाच्या राजकारणात केलेली एकमेव वा सर्वात मोठी चुक म्हणजे अमित शहांना पक्षाध्यक्ष पदावर आणणे. ती चुक स्विकारून दुरूस्त केली नाही, तर आगामी लोकसभेपर्यत शहा भाजपाची (राहुल) कॉग्रेस करून दिल्याखेरीज रहाणार नाहीत, इतकाच या निकालाचा अर्थ आहे. कारण बिहारमध्ये भाजपाने अपेक्षित भरारी घेतली नाही, इतकेच नुकसान नाही. मोदींचा राजकीय उदय होण्यापुर्वी व शहा भाजपाचे अध्यक्ष होण्यापुर्वी जी शक्ती बिहारमध्ये होती, त्याचाही बोजवारा शहांनी उडवून दाखवलेले आहे. काम नेमून दिल्यावर उत्तम रितीने पार पाडण्याची क्षमता शहांमध्ये आहे. पण स्वत: निर्णय घेऊन वा योजना आखून काम तडीस नेण्याची गुणवत्ता त्यांच्यापाशी नाही; याचा पुन:प्रत्यय बिहारी निकालांनी आणून दिला आहे. आणखी एकदा लोकसभा जिंकायची असेल, तर सर्वात आधी मोदींना शहाप्रकरणी शहा-निशा करावी लागेल. बाकी बिहार निकालाचे विश्लेषण सवडीने करू.

14 comments:

  1. absolutely correct!

    ReplyDelete
  2. भाऊ! आता शहांना बदलले तरी दुखावलेले जुने मित्र परत आपलेसे होणार नाहीत. महाराष्ट्रात शिवसेने बरोबर तरी संबंध सुधारण्यास मोदींना खुपच कष्ट घ्यावे लागतील.

    ReplyDelete
  3. भाऊ काका उत्तम विश्लेषण भाजपा जमिनीवर येणे गरजेचे आहे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व पुसायला निघालेल्या शहांना हा एक धडा आहे,

    ReplyDelete
  4. Bhau, I agree with you. This is realy defeat of Shah and BJP has to learn out of it.

    ReplyDelete
  5. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन एकदा म्हणले होते "लोकशाही सर्वोत्तम यात प्रश्नच नाही, पण देश लोकशाहीसाठी तयार आहे कि नाही हे महत्वाचे आहे". लोकशाहीत मतदार राजा असतो वगैरे गुळगुळीत झालेली वाक्ये आपण कायम वापरत असतो पण बिहारचे निकाल बघताना व्लादिमिर पुतीनचे हे वाक्य आठवते.

    लालू प्रसाद यादव हा माणूस खर तर कायद्याने सिद्ध झालेला गुन्हेगार आहे. ३० सप्टेंबर २०१३ रोजी न्यायालयाने ५ वर्षाची कैद सुनावल्यानंतर हा माणूस फक्त अडीच महिन्यानंतर bail वर सुटला तो अजून बाहेरच आहे. कायद्याने त्याला ६ वर्षांपर्यंत कुठलीही निवडणूक लढवता येत नाही, पण तो निवडणूक प्रचार करू शकतो, ८० उमेदवार निवडून आणू शकतो आणी सरकार चालवू शकतो. नितीशनी आधीची निवडणूक लालूच्या जंगल राज्याविरुद्ध लढवली व जिंकली आणि ह्या वेळी लालूशीच हातमिळवणी केली. सामान्य बुद्धीचा कोणीही माणूस म्हणेल की लालू खर तर जेलमध्ये पाहिजे आणि नितीशच्या सद्सद्विवेक बुद्धीवर शंका व्यक्त करेल, पण बिहारचा मतदार ह्या जोडीला प्रचंड बहुमताने निवडून देतो हि खरच भीतीदायक गोष्ट आहे. विकासात तळाला आणी गुन्हेगारीत प्रथम अशी बिहारची आज ओळख आहे पण लालूशी हातमिळवणी करण्यात ना नितीशना काही सोयर सुतक ना त्याला भरभरून यश देणाऱ्या मतदारांना. दुर्दैव्याने Joseph de Maistre याचं "Every nation gets the government it deserves." हे वाक्य बिहारच्या बाबतीत लागू पडत अस खेदानी म्हणाव लागत.

    ReplyDelete
    Replies
    1. बिहारच्या जनतेला भ्रष्ट्रचारी लालु हे मोदीपेक्षा जवळचे वाटतात मोदी व शाहा यांना आत्मपरीक्षणाची गरज आहेच .....

      Delete
  6. If Lau continues with his past record, then the problem of Bihari will become prominent in Maharashtra which may boost Raj Thakare again.

    ReplyDelete
    Replies
    1. I had same thought in my mind after the result. :-)

      Delete
  7. पण अमित शहाने याही खेपेस फक्त दिलेले काम तडीस न्यायचे (च) काम केले नसेल असे कशावरुन, महाराष्ट्र, दिल्ली व बिहार मधील रणनिती अमित शहानी (च) बनविली हे कशावरुन ?

    ReplyDelete
  8. शत प्रतिशत योग्य विश्लेषण !!!

    ReplyDelete
  9. खूप छान लिखाण आहे अप्रतिम अगदी अचूक विश्लेषण. मी आपला चाहता झालोय मला आपला ब्लोग जरा उशीरच माहित झाला पण मी आता आपला ब्लोग नियमित वाचतोय.

    ReplyDelete
    Replies
    1. वाजपेयी आणि अडवाणी नेतेपदी असताना त्यांनी जाणीवपूर्वक दुसरी फळी निर्माण केली होती. या दुसऱ्या फळीत प्रमोद महाजन, अरूण जेटली, सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू इत्यादींचा समावेश होता.तशी दुसरी फळी निर्माण व्हायला हवी. प्रत्येक वेळी मोदींच्या नावावर लोक मते देणार नाहीत हे जाणून घ्यायला हवे. आणि नुसत्या मोदींच्या नावावर मिळणारी मते यापुढच्या काळात law of diminishing marginal returns प्रमाणे कमी होत जाणार आहेत हे ध्यानात घेऊन अशी दुसरी फळी निर्माण करणे खूपच गरजेचे आहे हे नक्कीच.
      बिहारच्या निकालाचे परिक्षण भाजपा आपापल्या परिने करीलच, पण नरेन्द्र मोदिंना जे कमवायचे होते, ते त्यांच्याच पक्षाच्या वाचाळांनी घाल्विले हे नक्की. असल्या वाचाळवीरांना आपली खासदारकी पाच वर्षे टिकली तरी पुरेसे आहे, त्यांना पक्षाची कसलिहि फिकीर नाही

      Delete