मुंबई महाराष्ट्रात पाकिस्तानी गायक गुलाम अली याचा कार्यक्रम होऊ देणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली आणि देशभरच्या पुरोगाम्यांनी किती आक्रंदन केले होते ना? भारतात व प्रामुख्याने महराष्ट्रात असंहिष्णूता वाढल्याचे साक्षा्त्कार अनेकांना झाले होते. शिवसेनेने काय केले? तर कार्यक्रमाच्या संयोजकांना आपली विरोधाची भूमिका पटवून दिली आणि त्यांनी कार्यक्रम रद्द केला. किती ही अरेरावी आणि हिंसा ना? मग ज्यांना यात असंहिष्णुता दिसली, त्यांच्या व्याख्येनुसार संहिष्णूतेची व्याख्या काय असेल? कित्येक दिवस सामान्य माणसाला असा प्रश्न पडलेला. पण कुणा पुरोगाम्याने त्याचे उत्तर दिले नाही, की शिवसैनिकांचे शंकानिरसन केले नाही. पण म्हणून प्रश्न संपत नसतो. बहुधा इराकमधल्या इसिसने भारतीय पुरोगाम्यांच्या वतीने ती जबाबदारी उचलली आणि पॅरीसमध्ये येऊन त्याचे उत्तर दिले. बाटाक्लान नावाच्या सभागृहात एक अमेरिकन कलापथकाचा गायनाचा कार्यक्रम होता. त्याला अर्थातच इस्लामचा विरोध आहे. कारण गीत-संगिताला इस्लाममध्ये स्थान नाही. आता हे शेकडो प्रसंगी मुस्लिम मौलवींनी घसा कोरडा करून सांगितले आहे. असे असताना पॅरीसमध्ये तसे कार्यक्रम योजणे, ही असंहिष्णूताच नाही काय? त्याला संहिष्णूतेने उत्तर देण्यासाठी मग इस्लामचे मोजके बंदे इसिसने पॅरीसला रवाना केले आणि त्यांनी अतिशय नम्रपणे सभागृहात जमलेल्या संगीतप्रेमींना आपली इस्लामी भूमिका समजावून सांगितली. इतक्या नम्रतेची बहुधा फ़्रेंच लोकांना सवय नसावी. म्हणून की काय, त्यांचा त्या नम्रतेने गळाच घोटला गेला, त्यांचा श्वास घुसमटला आणि तिथे जमलेल्यांपैकी ९० संगीतप्रेमी जागच्या जागी मरण पावले. आणखी शंभरावर संगीतप्रेमी जखमी झाले. याला संहिष्णूता म्हणतात. शिवसेनेला ही नम्रता शिकावी लागेल किंवा आपला पाकिस्तान विरोध गुंडाळणे भाग आहे.
आणखी एक गोष्ट सुधींद्र कुलकर्णी यांची! त्यांनी मुंबईत पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन योजले होते. शिवसेनेने त्यालाही विरोध केला. तो कार्यक्रम रद्द करण्याचा आग्रह धरला. पण तो मानला गेला नाही आणि शिवसैनिकांनी असंहिष्णूतेचा कहर केला. त्यांनी आयोजक सुधींद्र कुलकर्णी यांच्या अंगावर शाई फ़ेकली, तोंडाला काळे फ़ासले. यापेक्षा अधिक कुठली असंहिष्णूता असू शकते? आपल्याला जे नको आहे वा आवडत नाही, ते करणार्याचे थोबाड काळे फ़ासून त्याला सोडून देणे, ही भयंकर असंहिष्णूता नाही काय? इसिस या जिहादी संघटनेची नम्रता बघा! ते असे कोणाला काळे फ़ासून सोडून देत नाहीत, की आणखी असंहिष्णुता करायला मोकळाही सोडत नाहीत. ते त्याला पापकर्मापासून थेट मुक्ती देतात. म्हणजे पुन्हा पाप होण्याची शक्यताच संपून जाते. पुरोगामी संहिष्णूतेचा हा भाग शिवसेनेला अजून उमजलेला नाही. कारण कुणा पुरोगाम्यांनी तो कधी समजावण्याचे कष्टच घेतले नाहीत. इसिसला तेही काम पार पाडावे लागले. शुक्रवारी इसिसने पॅरीस येथील दारूच्या बार, हॉटेल व स्टेडीयम येथे बॉम्ब फ़ोडले व बेछूट गोळ्या घालून तशा कार्यक्रमात सहभागी होणार्यांना थेट मोक्षच देवून टाकला. जे लोक पाप करत असतात असे आपल्याला वाटते, त्यांना पापापासून परावृत्त करण्याचे पवित्र कार्य उरकणे, म्हणजे संहिष्णुता असते ना? शिवसैनिक नुसतेच धुडगुस घालतात. पाप करणार्याला पुन्हा पुन्हा पाप करण्यासाठी मोकाट सोडुन देतात. तसे नसते, तर मुंबईनंतर सुधींद्र कुलकर्णी पाकिस्तानात जाऊन त्याच पुस्तकाचे आणखी एकदा प्रकाशन करू शकले असते काय? संहिष्णूतेचा हा कार्यभाग शिवसेनेला शिकणे आवश्यक आहे. तरच आपल्या देशातली असंहिष्णुता संपुष्टात येऊ शकेल. पण तशी काही शक्यता अजिबात दिसत नाही.
कारण सरळ आहे. असे काही करायला शिवसेना धर्मग्रंथामध्ये मार्गदर्शन शोधणार आणि त्यांना याप्रकारचे उपाय हिंदू धर्मग्रंथामध्ये सापडू शकत नाहीत. ते एकतर मार्क्सवादी पुरोगामी ग्रंथात सापडतील, किंवा एकेश्वरी इस्लाम-ख्रिश्चन धर्मातच शोधावे लागतील. म्हणजेच पुरोगाम्यांना अपेक्षित असलेली संहिष्णुता अंगी वाणवायला शिवसैनिकांना हिंदूधर्म सोडून अन्य एकेश्वरी धर्मात सहभागी व्हावे लागेल. थोडक्यात आपल्या देशात संहिष्णुता आणायची व नांदवायची असेल, तर हिंदूधर्माचे प्राबल्य संपवायला हवे. मगच पाकिस्तान, इराक वा सिरीया वा अफ़गाणिस्तान यासारख्या देशातील संहिष्णुता इथे येऊ शकेल. पुरोगामी तत्वज्ञान समजून घ्यायचे, तर आधी आपले आजवरचे शब्दकोश व त्यातल्या व्याख्या टाकून दिल्या पाहिजेत. त्यामुळे आपला गोंधळ होत असतो. आपण पुर्वापार चालत आलेल्या शब्दार्थाने विविध गोष्टी व वक्तव्ये समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि पुरोगामी शब्दकोषात त्याचे विरोधातले भलतेच अर्थ कथन केलेले असतात. तसे नसते तर शिवसेनेने तोंडाला काळे फ़ासल्याने विचलीत झालेले कुलकर्णी वा त्यांचे पुरोगामी सहकारी असंहिष्णुतेची भाषा कशाला बोलले असते? पॅरीसमध्ये दिडशे लोकांना हकनाक मरावे लागले असताना, पुरोगाम्यांनीच त्याचे खापर इस्लामवर फ़ोडू नका असली भाषा कशाला केली असती? जमावाने तोंडाला काळे फ़ासणे, ही आपल्या भाषेत दंगल असते. पण पुरोगामी भाषेत त्यालाच हिंसाचार म्हणतात. उलट कुठेही घुसून सरसकट किडामुंगीप्रमाणे निरपराध माणसांना धर्माच्या नावाने ठार मारण्याला पुरोगामी शब्दकोषात बहकणे वा धर्माचा चुकीचा अर्थ लावण्याची समस्या म्हटलेले आहे. थोडक्यात आभाळाएवढा बुटका व मुंगीइतका अजस्त्र अशी पुरोगामी तर्कभाषा आहे. आपल्याला त्यातला तर्क समजून घेता येत नाही, हा पुरोगाम्यांचा दोष कसा असेल?
मागला महिनाभर असंहिष्णूता म्हणून आकाशपाताळ एक करणारे तमाम शहाणे पुरोगामी आज कसे शांतचित्ताने आपापल्या घरात वामकुक्षी घेत पहुडले आहेत ना? पलिकडे बैरूट वा पॅरीस या शहरात कित्येक लोक हकनाक मारले गेलेत. त्यामुळे संहिष्णूंपैकी कोणी किंचित तरी विचलीत झाला आहे काय? कशाला होईल? त्यांनाच अपेक्षित असलेली संहिष्णुता इसिसने प्रात्यक्षिकातून जगाला सादर करून दाखवली आहे. इसिसने शिवसेनेसारखा विचका करून टाकलेला नाही. ज्यांना यमसदनी धाडले तेही कसे शांत पहुडलेत बघा. अवघ्या जगाची झोप उडवून दिली ना, इसिसने? याला संहिष्णूता म्हणतात. आपल्याला अमान्य असेल वा आपल्या विचार तर्कानुसार चालणार, जगणार नाही; त्याला या जगातून हद्दपार करणे, म्हणजे संहिष्णुता! हे जोवर आपण समजून घेत नाही, तोवर ही असंहिष्णुता अशीच सतावत राहिल आणि डोके वर काढत राहिल. तमाम हिंदू पंडितांना काश्मिरमधून हद्दपार करून आता पाव शतक लोटले आहे. काश्मिरात किती शांतता नांदते आहे ना? कुठे म्हणून त्या असंहिष्णूतेचा लवलेश शिल्लक आहे काय? पलिकडे त्या पाकिस्तानात बघा. किती मनोरम शांतता आहे ना? शियापंथीयांना सुन्नी प्रत्येक शुक्रवारी मशिदतच बॉम्ब फ़ोडून मारत आहेत. तालिबान सामान्य नागरिकांना जगणे असह्य करीत आहेत. नित्येनेमाने हिंसाचाराचे थैमान माजले आहे. ज्यांना तिथे संधी मिळत नाही, त्यांना शांतता संहिष्णुता प्रस्थापित करायला, तोयबा वा मुजाहिदीन म्हणुन भारतात पाठवले जात असते. हे पुरोगामीत्व जोवर आपल्याला समजून घेता येणार नाही, तोपर्यंत जिहादी हिंसाचाराचे समर्थन इथले पुरोगामी का करतात, त्याचा उलगडा आपल्याला होऊ शकत नाही. दोष पुरोगाम्यांचा, जिहादींचा वा इसिसचा नाही. सगळा गोंधळ आपल्या जुनाट कालबाह्य शब्द व समजुतींचा आहे. म्हणून आपणही पुरोगाम्यांशी ‘संहिष्णू’ वागत नाही. मग त्यांचा दोष कसा असेल?
very apt.
ReplyDeleteहा लेख फेसबूकवर का नाही?
ReplyDeleteBhau ha lekh fecebook var nahi
ReplyDeleteEmail kara amhi aamchya account varun wall karto
Email-yogeshshirore5711@gmail.com
भाऊ आपला लेख आवडला. भारतीय समाजमन ज्या जोखडात अडकले आहे त्याचे यथार्थ विश्लेषण केलेले आहे
ReplyDeleteFacebook var share kela ahe ha bhau
ReplyDeleteआणि कोणीतरी शिवसेनेला "terrorist outfit" घोषित करा, अशी मागणी केली होती. Irony at its best!
ReplyDelete