Monday, November 2, 2015

उडाला तर पक्षी, बुडाला तर बेडूक



दोन महापालिका व ५०-६० नगर परिषदांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यावर एकूणच राजकीय अभ्यासकांच्या मतप्रदर्शनाला ऊत आला आहे. अभ्यासक आणि मतदार यातला हाच मोठा फ़रक असतो. सामान्य मतदार प्रत्यक्षात फ़ेरफ़ार वा उलथापालथ घडवून आणत असतो. पण आपण असे कशामुळे केले त्याच खुलासा मतदार कधी देत नाही. त्याच्या उलट स्थिती राजकीय अभ्यासक व विश्लेषकांची असते. त्यांना आपल्यालाच जनमानस उमगले आहे, हे सिद्ध करण्याची नेहमीच उबळ आलेली असते. म्हणूनच मतदाराने असे कशासाठी केले, त्याचे निदान असे अभ्यासक करत असतात. पण मतदार तसे कशाला करतो वा करील, याचा आधी कुठल्याच अभ्यासक विश्लेषकाला थांगपत्ता लागत नाही. थोडक्यात राजकीय विश्लेषण म्हणजे ‘उडाला तर पक्षी, बुडाला तर बेडूक’ अशा निकषावर चालत असते. कारण बहुतांश विश्लेषक कुठलाही अभ्यास करीत नाहीत. म्हणूनच त्यांना मतदाराचा मानस वा हेतूही कधी उमजत नाही. उदाहरणार्थ आता कल्याण-डोंबिवली व कोल्हापूरच्या निकालाचे अर्थ लावले जात आहेत आणि त्यावर महाराष्ट्रातील भाजपाची लोकप्रियता वा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर भाकिते केली जात आहेत. पण त्यात काडीचेही तथ्य नाही. कारण हे विश्लेषक जसे आपल्या राजकीय भूमिका वा तर्काला बांधील असतात, तसा मतदार अजिबात गुलाम नसतो. मुठभर मतदार तसा बांधील असतो. पण बहुतांश मतदार कुठे, कशासाठी व कोणाला मतदान करायचे, हे त्या त्या परिस्थिती व वेळेनुसार ठरवत असतो. पक्षांचीही झुंबड त्यासाठीच उडालेली असते. कुठल्याही पक्षाला म्हणूनच मतदाराला गृहीत धरून चालत नाही. प्रत्येक निवडणुक हा वेगळा सामना असतो. म्हणूनच प्रत्येक निवडणूकीचे निकाल भिन्न असतात. लोकसभा, विधानसभा वा स्थानिक संस्थेसाठी तोच मतदार भिन्न मत व्यक्त करतो.

उदाहरणार्थ लोकसभेसाठी मतदान करताना आपण देशाचे नेतृत्व कोणाच्या हाती देतोय, याचा सामान्य माणुस विचार करून मतदान करतो. बुद्धीमंत अभ्यासकांप्रमाणे अमुक विचारांचा आहे म्हणून त्या पक्षाला वा नेत्याला, कोणी जागृत मतदार कौल देत नाही. अत्यंत पुढारलेल्या विचारांचा नेता बुजगावणे असेल, किंवा धरसोडवृत्तीचा असेल, तरी लोक त्याच्याकडे पाठ फ़िरवून खमक्या नेत्याला वा किमान सत्ता चालवू शकेल अशा नेत्याची निवड करतात. मग त्याचा पक्ष वा विचार कुठलाही असो. उलट तोच मतदार विधानसभा व नगरपालिकेच्या वेळी भिन्न पक्ष व नेत्याला मत देवू शकतो. याचे कारण असे असते, की निवडलेल्याचा उपयोग काय, ते पाहूनच मत दिले जात असते. नगरसेवक वा तालुका पंचायतीचा सदस्य हा अधूनमधून हाक मारता येण्यासारखा संपर्कातला हवा, इतकी अक्कल विश्लेषकाला नसली तरी स्थानिक नागरिक असलेल्या मतदाराला असते. त्याचप्रमाणे राज्यात वा देशात सरकार चालवणार्‍याचे हात मजबूत करू शकणारा आमदार-खासदार असावा, अशीही जाण नागरिक नेमकी बाळगून असतात. म्हणून मग नवी मुंबई वा विरार वसई महापालिका निवडताना मतदार भरभरून गणेश नाईक वा हितेंद्र ठाकूर यांना मते देतो. कारण तिथे फ़डणवीस वा मोदींना हाक मारून कामे होणार नसतात. मुख्यमंत्री वा पंतप्रधान हे देशाची राज्याची धोरणे ठरवण्यासाठी असतात. तर गल्लीतला हक्काचा नगरसेवक नेता हा स्थानिक कर्मचारी अधिकार्‍याला प्रसंगी कानफ़टीत मारून समस्या सोडवणारा असावा लागतो. हे ज्यांची समस्या वास्तविक असते, त्या मतदार नागरिकाला नेमके उमजते आणि त्यानुसार तो मतदान करतो. उलट विश्लेषकाला कुठलीच वास्तविक समस्या नसते. त्याच्या सर्व समस्या पुस्तकी व छापील असतात. म्हणूनच विश्लेषक लोकांना तत्वांचा उमेदवार वा पक्ष हवा असतो, ज्याला समस्येची जाण नसली तरी चालते.

विधानसभा व लोकसभा निवडणूकीत भाजपाला वा शिवसेनेला यश मिळाले आणि कॉग्रेस राष्ट्रवादी नाकारले गेले, त्याची मिमांसा अशा रितीने केली, तरच महापालिका वा नगर परिषदात फ़रक कशामुळे पडला ते लक्षात येऊ शकेल. गल्लीत शिवसेनेची शाखा स्थानिक समस्या सोडवण्यासाठी अगत्याची असते. किंबहूना गल्लीत ज्याचा जोर म्हणजे दबदबा असतो, तोच वा तसाच नगरसेवक लोकांना हवा असतो. स्थानिक यंत्रणेकडून काम करून घेणारा म्हणजे कधीही हाक मारता येईल, असाच नगरसेवक लोकांना हवा असतो. तर आमदार हा आपल्या क्षेत्रात सरकारी योजनेचे पैसे आणुन सरकार दरबारी स्थानिक समस्या घेऊन जाणारा लागतो. म्हणजेच अधूनमधून संपर्क करत राहिल असा आमदार लागतो. पण खासदार हा व्यक्तीगत असण्यापेक्षा पक्षाचा म्हणून निवडला जात असतो. साधारण कुठल्या पक्षाची सत्ता येऊ शकेल आणि कुठल्या पक्षाचा नेता पंतप्रधान म्हणून खंबीरपणे देश चालवू शकेल, असे मत झुकत असते. कल्याण-डोंबिवली, ठाणे, मुंबई अशा भागात तशी शिवसेनेची ख्याती आहे. नेमकी तीच पात्रता विरार वसईत हितेंद्र ठाकुर वा नव्या मुंबईत गणेश नाईक यांची आहे. म्हणूनच मोठ्या निवडणूकीत भाजपाला तिथे यश मिळाले व पालिकेत भाजपाला मार खावा लागला. मुंबई ठाण्यात त्यापेक्षा वेगळे जाही होणार नाही. ताज्या निकालांनी मोदींची हवा संपली असा दावा म्हणूनच मुर्खपणाचा असतो. पण इथे महाराष्ट्रात मोदींचे सहकारी चांगले सरकार देवू शकतात काय, याविषयी या मतदानाने शंका व्यक्त केली आहे. मोदींना पंतप्रधान करण्यासाठीच हाच मतदार लोकसभेत कमळावर शिक्का पुन्हा मारू शकतो. पण विधानसभेत मोदींनी प्रचार केला तरी भाजपा इतके यश पुन्हा मिळू शकेल काय, यावर मात्र ताज्या निकालांनी प्रश्नचिन्ह लावले आहे. तुमच्यापाशी गल्लीबोळात ठामपणे उभे राहून काम करणारे नेतृत्व नाही, असा धडा त्यातून मतदाराने दिला आहे.

मुंबईत सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फ़ासण्यापासून गुलाम अली यांना पळवून लावण्याने काय झाले, त्याचा हा दाखला आहे. शिवसेना तेवढ्यासाठीच लोकांना हवी असते. जे काम भाजपा वा अन्य पक्ष सत्तेत बसल्यावर करू शकणार नाहीत, तिथे कायदा हाती घेण्याइतकी शिवसेना प्रबळ राहिली पाहिजे, याकडे लोकांचा कटाक्ष असतो. कालपरवा औरंगाबादेत खासदार चंद्रकांत खैरे यांनी कोर्टाच्या आदेशानुसार मंदिरे पाडणार्‍या अधिकार्‍यावर हात उचलला, त्याला शिवीगाळ केली. त्यावरून काहूर माजले. अशा वेळी आपल्याला माध्यमे व बुद्धीमंत शिव्याशाप देणार हे खैरे यांनाही पक्के ठाऊक आहे. पण त्यामुळेच पालिका व स्थानिक मतदानात सेनेची मते वाढतात, हेही खैरे जाणुन आहेत. म्हणूनच ती कृती त्यांनी माध्यमांच्या चित्रणासाठी केली नाही वा देशभर सेनेच्या बदनामीसाठी केली नाही. त्यांना स्थानिक मतदार आपल्यात गुंतवून ठेवायचा असतो, म्हणूनच अशा सभ्य लोकांना नावडणार्‍या कृती कराव्या लागतात. असेच शेकडो खैरे शिवसेनेत दिसतील. पण म्हणूनच तर कल्याण डोंबिवलीत सेनेला बाजी मारता आली. जिथे असे स्थानिक नेतृत्व राष्ट्रवादी, कॉग्रेस वा भाजपापाशी आहे, तिथे त्यांनाही दाद मिळालेली दिसेल. म्हणून त्यावरून पुर्वीच्या राजकीय निवडणूक निकालांची तुलना करणे निव्वळ मुर्खपणा आहे. ड्रायव्हर म्हणून नोकर ठेवायचा, तर कसा हवा आणि शाळेत कचेरीत शिपाई म्हणून नोकर घ्यायचा तर कसा हवा, त्यात फ़रक पडत असतो. प्रसंगी ड्रायव्हरच्या तोंडी अस्सल इरसाल शिवी आपोआप येते. म्हणून त्याला हाकलून तिथे सत्शील मास्तरांना गाडी चालवा म्हणून बसवता येत नाही. गरजेनुसारच मतदार मतदान करतो व कौल देतो. ते लक्षात घेतले तर ताज्या निकालांचा अर्थ लावणे सोपे जाईल. सामान्य माणुस तो लावू शकतो. विश्लेषकांना इतका वास्तव विचार करून सामान्य बुद्धीचे प्रदर्शन मांडायची लाज वाटते ना? प्रत्येक मतदान व मतमोजणी एक धडा शिकवत असते. पण तो शिकायचा कोणी व कसा?

7 comments:

  1. भाउ,लेख चांगलं विश्लेषण करणारा आणि निवडणुकांमधला फरक समजाउन सांगणारा आहे.जे सामान्य मतदार समजतो ते बुद्धिमान विश्लेषक समजत नाहीत कि उगाच चर्चा तापवायला असं करतात? मात्र आणखी एक, दोन्ही महापालीकांमध्ये भाजप ने आपल्या जागा पटींमधे वाढवल्या (कल्याण मधे परत मिळवल्या) याचा कुठेही उल्लेख नाही हे खटकले.निदान ह्या यशाचे "देय श्रेय"(due credit) फडणवीस आणि दादा पाटील यांना द्याल (अन्य कोणी दिसलेच नाहीत) अशी अपेक्षा होती.डाळींचे भाव, भीषण दुष्काळ अशा परीस्थीतीत हे यश उल्लेखनीय नाही का? तसेही सेना-भाजप मधे आपण नेहमीच सेनेचे पक्षपाती असल्याचे जाणवते. पण ह्या वेळी अपेक्षा होती इतकेच.






    ReplyDelete
  2. भाऊ,तुमचे विष्लेषण नेहमीच परखड व सत्य असते. ही बाजू अन्य विष्लेषकांना कळत नाही कारण स्टुडिओत बसून न्यूज करणारे हे बातमीदार!

    ReplyDelete
  3. नेहमी प्रमाणे उत्तम विश्लेषण.

    ReplyDelete
  4. भाऊ, यथायोग्य...
    अगदी परफेक्ट..!!

    ReplyDelete
  5. bhau tumhi itar rajkiy vishleshakanvar tika kartana he visarla ki tumhihi tyatlech ek ahat. Hech logic tumhalahi lagu hot....
    Aso...Chhan vishleshan

    ReplyDelete