Tuesday, December 22, 2015

मेथड इन मॅडनेस



खरेच जो माणूस बुद्धीमान असतो, त्याला आपल्या बुद्धीचे प्रदर्शन मांडण्याची गरज नसते. उलट ज्यांना बुद्धीमत्तेचा आजार जडलेला असतो, त्यांना मात्र वारंवार आपल्या बुद्धीमत्तेची ‘लक्षणे’ जगासमोर मांडण्याचा मोह आवरत नाही. आपल्या देशात केजरीवाल, दिग्विजयसिंग वा चिदंबरम यांच्यापासून अमित शहापर्यंत अनेकांना अशा आजाराची बाधा झालेली असल्याने त्यांना सातत्याने मुर्खपणा करण्याशिवाय रहावत नाही. म्हणून केजरीवाल यांना आपण भ्रष्टाचाराच्या कसे कट्टर विरोधात आहोत, त्याचा धमाका केल्याशिवाय चैन पडत नाही. चिदंबरम मोजक्या शब्दात तशीच लक्षणे अनेकदा दाखवतात. मात्र माध्यमांना हवी तशी ती चटपटीत भाषेत नसल्याने, त्याचा गाजावाजा होत नाही. म्हणून ते फ़ारसे प्रकाशझोतात नसतात. अन्यथा चिदंबरम यांच्यापुढे दिग्विजय सिंगही तोकडे पडतील, अशी वेडगळपणाची त्यांची खास शैली आहे. कदाचित त्याची जाणिव असल्यानेच त्यांनी एका इंग्रजी दैनिकात तशा आशयाचा लेख लिहीला आहे. इंग्रजीत एक उक्ती आहे, ‘मेथड इन मॅडनेस’ म्हणजे वेडगळपणाचीही एक शैली असते. आजच्या राजकारणाचे विश्लेषण करताना चिदंबरम यांनी त्याच उक्तीचा आधार घेतला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी खटला व केजरीवाल यांच्या सरकारी कार्यालयावरील सीबीआयच्या धाडीला त्यांनी वेडगळपणा ठरवले आहे. शिवाय त्यातही सत्ताधारी पक्षाचा वेडगळपणा शोधला आहे. मग त्यावर पांडित्य झाडले आहे. नाकातोंडात पाणी जाऊन युपीए सरकारचे तारू बुडायच्या अवस्थेत गेल्यावर चिदंबरम यांना सोनियांनी कामाला जुंपले होते आणि आपला पांडित्याचा अधिकचा बोजा चढवून या महाशयांनी ते तारू पुरते बुडवून दाखवले होते. तिथेच न थांबता बुडणार्‍या जहाजातून प्रथम उंदिर पळतात, या उक्तीप्रमाणे हेच चिदंबरम सर्वात आधी पळालेले होते.

मागल्या लोकसभा निवडणूकीत कॉग्रेस बुडणार हे निश्चित झालेले होते, तेव्हा आपल्या मतदारसंघातून उमेदवारी करायलाही चिदंबरम यांनी खुप आधीच नकार दिला होता. कारण आपल्या बुडवेगिरीमुळेच पक्ष पुरता बुडणार, याची त्यांना खात्री होती. कारण त्यांच्याच कार्यकाळात अनेक भानगडी अशा झाल्या होत्या, की त्यातून युपीए सरकार नामशेष होण्याची पाळी आली. ज्या दोन मोठ्या घोटाळ्यांनी ते सरकार बुडाले, त्यात कुठलाही घोटाळा नसल्याचे पांडित्य सांगायला तेव्हा चिदंबरमच समोर आलेले होते. ज्या कोळसा खाण घोटाळ्याचा गाजावाजा झाला आणि खाणवाटप कोर्टानेच रद्दबातल झाले, त्यात दमडाही घोटाळा झाला नाही असा युक्तीवाद चिदंबरम यांनी तेव्हा केला होता. कारण सोपे होते. एकाही पैशाची देवाणघेवाण झालेली नसेल, तर घोटाळा होईलच कसा, हा या महाशयांचा सवाल होता. दिसायला खराही होता. कुठल्याही खाणीतून कोळशाचे उत्खनन सुरूच झाले नसेल, तर भ्रष्टाचार कुठून होणार? कोळसा खोदण्याचा सवाल नव्हता, तर त्याचे परवाने मिळाल्यावर कंपन्यांनी भविष्यातील नफ़्याचे गाजर दाखवून कागदावरच्या कंपनीचे शेअर्स अनेकपटीने विकले व परस्पर पैसे कमावले. त्यातला भ्रष्टाचार चर्चिला जात होता. नंतर पुन्हा त्याच खाणी लिलावात काढल्यावर हजारो कोटी रुपयांचा महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला. तो आधीच्या खाणवाटपात गोळा झालेला नव्हता. म्हणजेच सवाल कोळसा खोदण्याचा नव्हता, तर त्या खाणीची रॉयल्टी सरकारजमा करण्याच्या पैशाचा होता. म्हणजेच अर्थमंत्री असताना चिदंबरम यांनी माध्यमांपुढे केलेल युक्तीवाद वेडेपणाचा होता. हे त्यांनाही ठाऊक होते. पण त्या वेडेपणामागे एक शैली वा पद्धत होती. शहाण्यापुढे वेडे ठरू, पण सामान्य जनतेची तर दिशाभूल होऊन जाते ना? वेडेपणातली शैली म्हणजे लबाडी असते. चिदंबरम तेच करत होते.

अर्थात त्यांच्या वेडेपणाला पुरोगामीत्वाची झिंग चढलेले संपादक वा पत्रकार भुलले, तरी सामान्य जनता फ़सली नाही आणि युपीए सरकार बुडायचे वाचले नाही. नेहमीच असे होते. शहाणे नसलेल्यांनी लबाडी म्हणून शहाणपणाचा आव आणून ‘पद्धतशीर’ वेडेपणा केला, म्हणून लोक त्याला शहाणा समजत नाहीत. सुटसुटीत जड जड शब्द वापरून लोकांना नेहमीच भुलवता येत नाही. बुद्धीमत्तेचे प्रदर्शन मांडूनही लोकांना फ़सवता येत नाही. उलट त्या भंपक शहाणपणाच्या आहारी जाऊन केलेले युक्तीवाद अनेकदा अंगलट येतात. अर्थमंत्री असताना महागाईविषयी असाच युक्तीवाद चिदंबरम यांना नडला होता. पंधरावीस रुपयांची पाण्याची बाटली खरेदी करणार्‍यांनी महागाई म्हणून टाहो फ़ोडण्यात अर्थ नाही, असे विधान याच शहाण्यांनी तेव्हा केले होते आणि उलटले होते. तर आताही तेच चिदंबरम नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया-राहुल यांच्या बचावाला पुढे सरसावले आहेत आणि त्यातही त्यांनी तोच कोळसा घोटाळ्यातील फ़सवा युक्तीवाद केलेला आहे. कॉग्रेसने यंग इंडीयन कंपनीला पैसे दिले आणि त्या कंपनीने नॅशनल हेराल्ड कंपनीचे शेअर्स त्यातून विकत घेतले. यात कोणीही कोणाला प्रत्यक्षात रुपयाही दिला वा घेतलेला नाही. नुसताच गुंतवणूकीचा विषय आहे. मग देवाणघेवाण नसलेल्या व्यवहारात भ्रष्टाचार कुठून होणार, असा चिदंबरम यांचा सवाल आहे. तेव्हा खाणीत दबलेल्या कोळश्याचा सवाल होता आणि आज नॅशनल हेराल्डच्या मालकीच्या कित्येक कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या बाजारी किंमतीचा आहे. ९० कोटीमध्ये जी बुडीत कंपनी सोनिया व राहुल यांच्या हाती आली आहे, तिच्या तिजोरीत दमडाही नाही, हे सत्यच आहे. पण कंपनीची मालमत्ता विकायला काढल्यास हजारो कोटी रुपये मिळू शकतात. थोडक्यात २० रूपयांची नोट एक रुपयात खरेदी करण्यासारखा व्यवहार यात झालेला आहे. मग २० च्या नोटेला वस्तू म्हणून दाखवणे फ़सवणूक नाही काय?

चिदंबरम तोच वेडेपणा करीत आहेत. नॅशनल हेराल्ड कंपनीच्या शेअर्सची बाजारात किंमत नसेल. पण त्या कंपनीच्या मालमत्तेची बाजारातील किंमत महत्वाची आहे. पण कॉग्रेसला ते सत्य बोलायचे नाही वा बघायचे नाही. पक्ष चालवण्यासाठी मिळालेले निधीचे पैसे करमुक्त असतात आणि म्हणूनच त्याचा धंदेवाईक वापर होऊ नये अशी सक्ती असते. पण इथे कंपन्या व शेअर्समध्ये करमुक्त पैसे घालून कंपनीवर खाजगी मालकी मिळवण्याची पळवाट काढली गेली आहे. बुडालेली दिवाळखोर कंपनी पक्षाचा निधी गुंतवून सोनिया-राहुल खरेदी करतात, हाच मुळात वेडेपणा नाही काय? पण त्या वेडेपणात एक शैली वा पद्धत आहे. ज्याला इंग्रजीत मेथड इन मॅडनेस म्हणतात. तेच वेड पांघरून जावईबापू हरयाणातील जमिनी खरेदी करतात आणि पुन्हा विकतातही. आणि आता तेच वेड पांघरून चिदंबरम आपल्या शहाणपणाचे प्रदर्शन मांडतात. मजेची गोष्ट म्हणजे सोनियांनी त्यांना वकील असूनही कोर्टात आपल्या वतीने वकीली करायला उभे केलेले नाही. ज्यांना वकील म्हणून नेमले आहे, त्यांनीही चिदंबरम यांच्यासारखे शहाणपण पाजळलेले नाही. कारण असला युक्तीवाद कोर्टात केला, तर युपीए प्रमाणेच सोनियांना बुडायला वेळ लागणार नाही. अर्थात चिदंबरम यांच्या अशा वेडेपणातही एक शैली वा मेथड आहे. आपण अर्थशात्री व कायदेपंडित असल्याचा तोरा त्यांना मिरवायचा असतो. म्हणून मग असे फ़सवे युक्तिवाद त्यांना करावे लागतात. अशाच शहाण्यांच्या सल्ल्यामुळे समन्सला सामोरे जाण्यापेक्षा सोनियांनी हायकोर्टात आव्हान दिले आणि तोंडघशी पडायची पाळी आली. चिदंबरमना सरकार वा मोदींच्या वेडगळपणात मेथड दिसते आहे. पण त्याचा परिणाम युपीए व कॉग्रेसची सत्ता जाण्यात झाल्याचे अजून उमजलेले मात्र दिसत नाही. नाही तर मोदींच्या कार्यपद्धतीत, मेथडमध्ये वेडगळपणा शोधण्यात त्यांनी बुद्धी खर्ची घातली नसती.

1 comment:

  1. ह्या सर्व प्रकरणात नेमका कुठे गुन्हा घडलाय त्याची कायदेशीर बाजू कोणालाच समजून घ्यायची नाहीये, उगाचंच राजकीय सूडा चे दावे करीत वेळ काढून न्यायचा आहे.
    पुढील निवडणूकीत इंदीरा बाईं सारखे पुन्हा निवडून येवू ही एक वेडी आशा ह्या मागे दिसते ! पण जनता अजूनही मुर्ख आहे ही समजूत काही जात जात नाही आणि ती भरवून देणारे भाट आहेतच पुढे मागे .

    ReplyDelete