पठाणकोटच्या हल्ल्यानंतर भारताने, म्हणजे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दात इशारा दिल्याच्या अनेक बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यानंतर अल्पावधीतच पाकिस्तानात काही हालचाली झाल्या. अमेरिकेनेही पाकिस्तानला बोलण्यापेक्षा कृती करा असा इशारा दिला आहे. सहाजिकच पाकिस्तानात जे काही चालू आहे, त्याचा अर्थ मोदींच्या इशार्याने पाक जागा झाला असा लावला जात आहे. पण म्हणून ती वस्तुस्थिती आहे काय? आजवर अनेकदा असे इशारे भारताने दिलेले आहेत किंवा अमेरिकेनेही पाकला ‘समजावले’ आहे. पण म्हणून पाकिस्तानने कधीच कुठल्या जिहादी अतिरेकी संघटनेला वेसण घालायला काहीही केलेले नव्हते. फ़ार कशाला, कुठल्याही आरोपांना झिडकारण्या पलिकडे पाकने काही हालचाल केलेली नव्हती. पण यावेळी आरोप नाकारण्याचेही धाडस पाकला झालेले नाही आणि राजकीय नेतेच नव्हेतर पाक हेरखात्यासह लष्करानेही पाठाणकोटच्या हल्ल्याविषयी तपासात सहभागी व्हायची तयारी दर्शवली आहे. म्हणून मग त्याचा अर्थ पाकला घाम फ़ुटला, असा लावला जाणे स्वाभाविक आहे. त्यात घाम फ़ुटला हे सत्य असले तरी भारताच्या इशार्यामुळे पाकला घाम फ़ुटला असे समजणे मुर्खपणाचे होईल. कारण दोन्ही देश अण्वस्त्रधारी असल्याने त्यांच्यात थेट कुठल्या युद्धाची शक्यता नाही. ही खरी पाकिस्तानची खुमखुमी आहे. म्हणुनच मग मोदींच्या इशार्याला घाबरण्याची पाकिस्तानला अजिबात गरज नाही. मग घाबरल्यासारखी कृती कशाला चालली आहे? जिहादींचे पोशिंदेच त्यात पुढाकार कशाला घेत आहेत, असा प्रश्न पडतो. त्याची उत्तरे व संदर्भ शोधण्याची गरज आहे. अनेकदा शत्रूपेक्षा मित्र आप्तेष्टांपासून मोठा धोका असतो, हेच त्यामागचे खरे कारण आहे. पाकिस्तान मोदींना घाबरलेला नसून सौदी अरेबियाच्या राजकारणाला घाबरलेला आहे. सौदीचे पंथवादी राजकारण भरकटले, तर त्याचे दुष्परिणाम पाकला भोगावे लागतील, हे भितीचे खरे कारण आहे.
अणुयुद्धाला देश व सरकारे घाबरतात. जिहादी वा घातपात्यांचा हेतूच विनाशकारी असल्याने, त्यांना जगाचा विनाश होईल याची फ़िकीर नाही. हे जगच मिथ्या असून अल्लाहने जन्नत आपल्यासाठी राखून ठेवलेली आहे, अशी ज्यांची श्रद्धा आहे, त्यांना पृथ्वीचा विनाश होण्याचे भय कशाला असेल? सहाजिकच त्यांना अणुयुद्धाची भिती नाही. पण त्यांना धर्माच्या नावाने जिहादची झिंग चढवून आपल्या आक्रमक डावपेचात वापरणार्यांना मात्र जन्नतपेक्षा याच जगात यश मिळवायचे असते. म्हणूनच अशा जिहादच्या पोशिंद्यांना जगाचा विनाश नको असतो. पाकिस्तानचे राजकीय नेते व सेनाधिकारी त्यातलेच आहेत. भारतामध्ये उच्छाद मांडायला त्यांना जिहाद हवा असला, तरी पृथ्वी नष्ट व्हावी अशी त्यांची इच्छा नाही. कारण तिच्यासह आपणही नष्ट होऊ, पाकिस्तानही नाष्ट होईल, हे त्यांना कळते. त्याच भयाने पाकिस्तानच्या राजकीय नेत्यांना व सेनाधिकार्यांना पछाडले आहे. पण त्यांनी पोसलेल्या जिहादींना त्याची पर्वा नाही. म्हणून मग त्या जिहादींना वा तत्सम युद्धाची खुमखुमी असलेल्यांना अणुयुद्धाची भिती घालता येत नाही. तशी भिती भारताला घालता येते, जिहादींना नाही. हे पाकिस्तानच्या भयाचे खरे कारण आहे. पाकिस्तानला भारताकडून हल्ल्याची भिती नसली तरी पाकिस्तानातच आतुन पंथिक दंगेधोपे व हिंसाचार भडकला तर? त्याला सेना किंवा अण्वस्त्रे पायबंद घालू शकत नाहीत, ही पाक नेत्यांची चिंता आहे. ती एकट्या नवाज शरीफ़ वा नागरी नेत्यांची फ़िकीर नाही, तर पाकसेना व हेरखात्यालाही भेडसावणारी समस्या आहे. कारण पुर्वेला जसा भारत हा पाकचा शेजारी आहे, तसाच पश्चिमेला अफ़गाण व इराण पाकिस्तानचे शेजारी आहेत. प्रामुख्याने त्यातल्या इराणशी वैर पाकिस्तानला नको आहे. कारण तसे झाल्यास पाकचा सिरीया व शरीफ़ यांचा बशर अल असद व्हायला वेळ लागणार नाही. आणि सौदी अरेबिया तसलेच काही डावपेच खेळतो आहे.
पश्चिम आशियातील मुस्लिम देशांची विभागणी शिया-सुन्नी अशी झालेली असून त्यात सुन्नी देशांचे नेतृत्व सौदी करतो आहे आणि शियांचे म्होरकेपण इराणकडे आहे. त्यातल्या सुन्नी आघाडीत पाकिस्तानने सहभागी व्हावे, यासाठी सौदीने दबाव आणलेला आहे. पण तसे केल्यास पाकिस्तानातील शिया मुस्लिम नाराज होतील. त्यांच्या नाराजीला खतपाणी घालून इराण त्यांचा उठाव घडवून आणायचे काम हाती घेईल. बलुचिस्तान व व्याप्त काश्मिरच्या प्रदेशातील बरेच मुस्लिम शियापंथीय असून आधीच पाकच्या सुन्नी राज्यकर्त्यांवर चिडलेले आहेत. अधिक जिहादींनी सतत शियांवर घातपाती हल्ले चालविलेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानात शिया-सुन्नी असा भडका उडाला, तर आधीच घातपात हिंसाचाराने गांजलेल्या पाकिस्तानचा सिरीया व्हायला वेळ लागणार नाही. त्या आगीत भारत तेल ओतायची संधी सोडणार नाही आणि इराणशी भारताची जवळिक त्यासाठी आधीपासून झालेली आहे. ही पाकच्या नेत्यांची चिंता आहे. पण त्यांनीच आजवर पोसलेल्या जिहादींना त्याची कुठलीही फ़िकीर नाही. अफ़गाणमार्गे इसिस पाकिस्तानात शिरकाव करून घ्यायला उतावळा आहे. अशा अनेक समस्यांचे स्फ़ोटक रसायन तयार झाले असून, त्याला अण्वस्त्रे उत्तर देवू शकणार नाहीत. भेदक अस्त्राची भिती जगायला उत्सुक असलेल्यांना भासते. मरायला उतावळे झालेल्यांना विनाशाचे मृत्यूचे भय नसते. पाकने आजवर पोसलेले जिहादी त्यातलेच असून, त्यांना पाकिस्तानचा सिरीया झाला वा विनाश ओढवला, म्हणुन फ़िकीर करायचे कारण नाही. पण पाक नेते व सेनाधिकार्यांना पाकिस्तान संपायला नको आहे. तेव्हा आपला देश जिहादी व शिया-सुन्नी आगडोंबापासून वाचवणे पाकिस्तानची आज प्राथमिकता झालेली आहे. इराण, भारत व अंतर्गत शिया-सुन्नी अराजकाला एकाचवेळी पाक सेनाही उत्तर देवू शकणार नाही, याची जाणिवच पाकनेत्यांना कार्यरत करू शकली आहे. मोदींचा इशारा शब्दातला नाही, तर सांकेतिक आहे.
कठोर कारवाई करा असे मोदींनी पाकिस्तानला बजावले तो शाब्दिक इशारा आहे. नुसती बडबड नको, दिसेल अशी कृती हवी, असे मोदी म्हणाल्याचे प्रसिद्ध झाले आहे. आणि त्या इशार्याला पाकिस्तानने जुमानले नाही, तर भारत काय करणार आहे? सीमा ओलांडून सैनिकी कारवाई भारत करणार आहे काय? शक्य नाही! पण पाकिस्तानात शिया-सुन्नी बेबनाव आहे, त्याला खतपाणी घालायच्या कारवाया भारत नक्कीच करू शकतो. त्यातच सौदीने शियाविरोधी आघाडीमध्ये सहभागी व्हायचे दडपण पाकवर आणलेले आहे. सौदी व इराणच्या पंथीय संघर्षाची झळ पाकिस्तानला बसू लागली आहे. त्यांच्या दडपणाखाली पाक असताना भारताशी वैर वा संघर्ष पाकिस्तानला परवडणारा नाही. हे ओळखूनच भारताचे डावपेच चालू आहेत. अन्य दबावाखाली असलेल्या पाकिस्तानला जिहादला पायबंद घालणे स्वार्थासाठी आवश्यक बनलेले आहे. ते कळते म्हणूनच शरीफ़ यांच्या बैठकीला पाक सेनापती व हेरखात्याचे प्रमुख हजर झाले आणि सर्व यंत्रणा कामाला लागलेल्या दिसत आहेत. त्यामागे भारताशी मैत्री हवी किंवा भारताच्या हल्ल्याचे भय नाही. तर आजवर आपणच पोसलेल्या जिहादी भस्मासूराचा वापर इराण, सौदी वा भारत करील, अशा भयगंडाने पाकिस्तानला सतावलेले आहे. म्हणूनच पाकिस्तानच्या माध्यमात पठाणकोटपेक्षा सौदी व इराणच्या दडपणाची चर्चा अधिक आढळते. ह्या जिहादी अतिरेकाला वेसण घालणे आता पाकिस्तानलाही सोपे राहिलेले नाही. तशी शंका आली तरी तेच जिहादी पाकसेनेच्या विरोधात जिहाद पुकारतील. सवाल इतकाच आहे, की त्यांना कोण वापरणार? भारत, इराण की सौदी अरेबिया? प्रथमच पाक राज्यकर्ते, हेरखाते व सेना एकत्रित होऊन पर्याय शोधताना दिसतात. कारण ते मोदींना घाबरलेले नसून सौदीच्या दबावाला आणि सौदीच्या शियाविरोधी राजकारणाला घाबरलेले आहेत. इराणच्या शियावादी आक्रमकतेने भयभीत झाले आहेत. आपणच पोसलेल्या जिहादी घातपात्यांना घाबरले आहेत.
छान भाऊ मस्त लेख पण हे सर्व मोदी सत्तेत असताना घडत आहे यामुळे मोदींना याचे थोडेकाहोईना श्रेय आहे हे मानावेच लागेल
ReplyDeleteमी कालच तुमच्या "विषय पठाणकोट पुरता नाहीच " http://jagatapahara.blogspot.in/2016/01/blog-post_84.html या ब्लॉग वर प्रतिक्रिया देताना गील्गीत बाल्टीस्तान विषयी जे मुद्दे उपस्थित केले बरोबर तशीच प्रतिक्रिया यासिर मलिक याने दिली आहे.
ReplyDeletehttp://www.dawn.com/news/1232674/provincial-status-for-gb-to-jeopardise-kashmir-cause-warns-yasin-malik
भाऊ ........... फार सुंदर विश्लेषण !! लेख आवडला !! सौदीचा संरक्षण मंत्री हा २९ वर्षांचा राजपुत्र असून त्याच्या आक्रमक राजकारणाने अनेकजण भयग्रस्त झाले आहेत. ह्या आक्रमक राजकारणामागे सौदीच्या राजपरिवारातील अंतर्गत राजकारण हि आहे. थोडक्यात ' पूर्व मध्य ' भाग हा ' अतिसंवेदनशील व स्फोटक झाला आहे. येथे कधीही ' ठिणगी ' पडू शकते. कालच अमेरिकेची दोन जहाजे इराण जवळील समुद्रात घुसली व त्यांना इराणने अडवले. रशियाचा ' मध्य पूर्व ' अखातातील आक्रमक वावर अमेरिकेला जाचक वाटत आहे. त्यामुळेच ' प्याद्यांची ' हलवाहलव सुरु आहे. पुढील काही आठवडे त्या दृष्टीने उत्कंठावर्धक आहेत.
ReplyDeletepan congress satte madhe asti tar congress ne ya rajkiya paristhiticha fayda ghenyacha prayatna kela nasta.........modi hi sandhi sondnar nahi.........
ReplyDeleteमस्त …!
ReplyDelete""पण त्यांना धर्माच्या नावाने जिहादची झिंग चढवून आपल्या आक्रमक डावपेचात वापरणार्यांना मात्र जन्नतपेक्षा याच जगात यश मिळवायचे असते. म्हणूनच अशा जिहादच्या पोशिंद्यांना जगाचा विनाश नको असतो.""
भाऊ जबरदस्त विवेचन. हे इंग्रजीत जायला हवे आहे.
ReplyDeleteaapan khup mast lihita... salaaaaaaam
ReplyDelete