Monday, January 25, 2016

पठाणकोटचे उत्तर पेशावर ????



बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या पख्तुनवा प्रांतामध्ये एका विद्यापिठात सशस्त्र जिहादी घुसले आणि त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. तेव्हा इथे ३००० हजाराहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. प्रवेशद्वारात उभ्या आलेल्या रखवालदारालाच गोळ्या घालून त्याचा आरंभ झाला आणि विविध वर्गात इमारतीत बॉम्ब फ़ोडून जिहादींनी धमाल उडवून दिली. लोक शिस्तीत असले तर स्फ़ोटकांचा परिणाम कमी होतो. लोक बेशिस्त असले, मग कमी स्फ़ोटकात अधिक लोक मरतात. जिहादींची धर्मयुद्धाची कल्पना त्यावर आधारलेली आहे. जी कल्पना पाकिस्तानी हेरखाते व लष्करानेच साकारलेली आहे. त्यासाठी त्यांनी धर्मयुद्ध म्हणून आपल्याच देशातील मुस्लिमांना प्रशिक्षित केलेले आहे. आरंभी त्यांचा उपयोग भारताशी अघोषित युद्ध खेळण्यासाठी चालू झाला आणि नंतर जसजशी त्यांची शक्ती वाढत गेली, तसतसे हेच जिहादी पाकिस्तानवर उलटत गेलेले आहेत. मुजाहिदीन म्हणून सुरू झालेल्या अघोषित युद्धाला आता अराजकाचे रूप आलेले असून, त्याच्या शेकडो चिरफ़ळ्या उडालेल्या आहेत. कोणीही मौलवी किंवा इमाम उठतो आणि आपल्या अर्थानुसार धर्मग्रंथाचे उतारे समोर ठेवून अशा माथेफ़िरूंना चिथावण्या देवू शकतो. ज्यांचे आयुष्य त्यातच गुरफ़टून गेले आहे, त्यांची आता हिंसा हीच जीवनशैली झालेली आहे. कोण मरतो वा मारायला कोणाकडून शस्त्रे वा पैसा मिळतो, याला अर्थ उरलेला नाही. म्हणजेच पाकिस्तानने भारताला सतावण्यासाठी जे हिंसाचाराचे जिहादी भूत निर्माण केले, त्याला आवरण्याची क्षमता त्याच्यातच राहिलेली नाही. त्याच्यावर पाकिस्तानी हेरखाते वा लष्कराचे नियंत्रण राहिलेले नाही. मग एक टोळी उठते आणि भारतीय हद्दीत घुसते, तर दुसरी उठते व पाकिस्तानातच हिंसेचा उच्छाद घालू लागते. पेशावर पाकिस्तानातील ताजी घटना म्हणूनच पठाणकोटशी जोडून बघायला हवी.

निवडणूक काळात किंवा पंतप्रधान नसताना मोदी मोठे छाती फ़ुगवून बडबडत होते. मग आता पाकिस्तानला धडा कशाला शिकवत नाही, असा सवाल अनेक वाचाळांनी गेल्या दोन आठवड्यात विचारलेला आहे. त्यांना पेशावरमध्ये तहरिके तालिबान पाकिस्तान या संस्थेने चोख उत्तर दिले आहे. कारण त्या संघटनेने पेशावरच्या हिंसेची जबाबदारी घेतली आहे. पण आपण हे कृत्य कशासाठी केले, त्याचा कुठला खुलासा नाही. ही संघटना कित्येक वर्षे पाक लष्कराला सतावते आहे. त्यांना पाक लष्कराच्या विरोधात कोणीही मदत दिली, तर ते घेणारच. मग ती मदत भारताने दिलेली असो, किंवा इराणने दिलेली असो. अशा किरकोळ घटना घडवण्यासाठी प्रचंड पैसा आवश्यक नाही. काही लाखांची रक्कम मोजली तरी पाकिस्तानात शेकडो लोक त्याचे टेंडर घ्यायला रांगेत उभे असतात. मग त्यांचा वापर भारताने करायला काय हरकत आहे? आता ही घटना घडली असेल, तर त्यामागे भारताची चिथावणी वा मदत नसेल, याची कोणी हमी देवू शकत नाही. पण पाकिस्तानचे दुर्दैव असे आहे, की त्याबद्दल भारताला दोषी ठरवण्याला कुठलाही पुरावा पाकिस्तानकडे नाही. गेल्या दोनतीन आठवड्यात भारताच्या अनेक राज्यातून अनेक पाकिस्तानी हस्तक पोलिसांनी ताब्यात घेतले. हे पाकिस्तान करू शकत असेल, तर भारताने तसेच काही करू नये, असा आग्रह धरता येईल काय? अर्थात त्याची जबाबदारी उघडपणे भारत घेत नाही किंवा पठाणकोटची जबाबदारी पाक सरकार घेणार नाही. कारण हे सावल्यांचे युद्ध असते. त्यात कोणी अधिकृत व्यक्ती वा पदाधिकारी समोर येत नाहीत. त्यांचे हस्तक वा अनुयायी सूचने बरहुकूम उचापती करीत असतात. पेशावरच्या बच्चाखान विद्यापिठातील हिंसाचार म्हणूनच पठाणकोटला दिलेले उत्तर नाही, असे आपल्याला ठामपणे म्हणता येईल काय? त्यासाठी मग सूचक संकेत शोधावे लागतात.

पठाणकोटच्या हल्ल्यानंतर चोख उत्तर द्या, अशी मागणी जोरात चालू झाली होती. याला उत्तर देताना भारताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर काय म्हणालेले होते? घडले आहे त्याच भाषेत पाकिस्तानला उत्तर दिले जाईल. कुठलाही संवाद किंवा संभाषण परस्परांना समजणार्‍या भाषेत होत असते. तामिळी भाषेतच बोलणार्‍याला हिंदीतून उत्तर देता येत नाही, की संवाद साधता येत नाही. त्याचा हट्ट तामिळी भाषेचाच असेल, तर तामिळीतच त्याच्याशी संवाद करावा लागणार ना? पाकिस्तानला हिंसेचीच भाषा उमजत असेल आणि त्यासाठी घातपाती मार्गच योग्य असेल, तर त्याच मार्गाने संवाद करणे भाग आहे. पाकिस्तानने कधीही जिहादची जबाबदारी घेतली नाही वा तसे करणार्‍यांना रोखण्याचे उपाय योजले नाहीत. म्हणजे जिहाद चालू ठेवून बोलण्यांचाही आग्रह धरायचा, हाच पाकिस्तानचा खाक्या राहिला आहे. म्हणजेच वाटाघाटी एका बाजूला व हिंसाचार दुसर्‍या बाजूला; अशी पाकची दुटप्पी भाषा आहे. मग त्याच्याशी संवाद करणे भाग असेल, तर भारतालाही त्याच दुटप्पी भाषेत व्यवहार करावा लागणार ना? पठाणकोटनंतर पेशावरकडे म्हणूनच संवादाचे ‘पुढले पाऊल’ म्हणून बघणे भाग आहे. पाकिस्तान हुर्रीयत वा भारतातील मुस्लिमांना चिथावण्या देत असेल तर भारताने बलुची वा पख्तुनी नाराजांना चिथावण्यात गैर ते काय? पठाणकोट ही पाकिस्तानची भाषा असेल, तर त्याला पेशावरची भाषा सहज लक्षात येऊ शकते ना? पर्रीकर पठाणकोटनंतर काय म्हणाले होते? जिथे वेदना होतील व त्या वेदना पाकिस्तानला कळतील, तिथेच त्यांना उत्तर दिले जाईल. त्याचा अर्थ म्हणुनच समजून घ्यावा लागतो. त्याचा अर्थ पाकिस्तानात अतिरेकी पाठवणे वा लष्कराचे कमांडो पाठवणे असा होत नाही. जे तिथे सहज उपलब्ध आहे, त्याचा वापर करूनही पाकला ‘समजावता’ येते ना? जेव्हा ही भाषा पाकिस्तानला नेमकी समजू लागेल, तेव्हाच बोलणी यशस्वी होऊ शकतील.

अर्थात आताही पेशावरचा धुरळा खाली बसला, मग पाकिस्तानी माध्यमातून पेशावरच्या हल्ल्यामागे भारतीय हेरखात्याचा हात असल्याचे आरोप होणार आहेत. नेहमीच होत असतात. जे कोणी बारकाईने पाकिस्तानी वर्तमानपत्राच्या वेबसाईट इंटरनेटवर बघत असतील, त्यांना माझे हे मत लगेच पटू शकेल. कारण त्यात आता नाविन्य राहिलेले नाही. पाकिस्तानात कुठेही घातपात झाले, मग त्याचे खापर भारतीय हेरखाते ‘रॉ’च्याच माथ्यावर फ़ोडले जात असते. त्यात पकडले जाणार्‍या आरोपींवर कोर्टातही रॉ संघटनेचे हस्तक म्हणून खटले भरले जातात. म्हणूनच पेशावरचा हल्ला वा घातपात भारतानेच दिलेले चोख उत्तर आहे, असे आपणही मानायला हरकत नसावी. कारण तो उद्या होणारा आरोप आहे. सवाल इतकाच आहे, की आजवर असे वा इतक्या गतीने पाकिस्तानात घातपात होत नसत. अलिकडे म्हणजे मागल्या दिड वर्षात त्याचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. क्वचितच एखादा दिवस असा जात असेल, की पाकिस्तानात कुठेच हिंसक हल्ले झालेले नाहीत. यातल्या अनेक संघटना जिहादी वा मुजाहिदीनांच्याच आहेत. ज्यांना मुळात पाकिस्तानी लष्कराने व सरकारी आशीर्वादानेच प्रशिक्षण मिळालेले आहे. त्यांच्यापाशी हत्यारेही पाकिस्तानीच आहेत. मात्र आता त्यांना पाकिस्तानी हेरखाते वा लष्कराच्या मर्जीवर अवलंबून रहावे लागत नाही. कंत्राट पद्धतीने हे मारेकरी कामे करीत असतात. पंजाब प्रांत सोडला तर जवळपास उर्वरीत पाकिस्तानात त्यांचा मुक्त वावर आहे. म्हणूनच त्या उर्वरीत पाकिस्तानात कुठेतरी नित्यनेमाने घातपात होताना दिसतील. पठाणकोटनंतर डझनावारी लहानमोठ्या घटना घडल्या आहेत. पेशावर ही त्यातली मोठी व साहसी कारवाई म्हणता येईल. कारण विद्यापिठात घुसून जिहादींनी लष्कराला वेढा देवून लढाई करण्यापर्यंत वेळ आणली गेली. विनाविलंब त्याची जबाबदारी तहरिके तालिबानने घेतली.

याचा परिणाम काय होऊ शकतो? पाकिस्तान यातून धडा घेऊन आपल्या भूमीवर असलेल्या जिहादी प्रशिक्षण छावण्या मोडीत काढणार काय? इतक्या झटपट असे काही होऊ शकणार नाही. त्यासाठी पेशावरसारख्या घटना अधिकाधिक व्हाव्या लागतील. म्हणजे कुठल्या छावणीत शिकलेला प्रशिक्षित जिहादी पाकिस्तानवर उलटला, त्याचा अंदाजही येणार नाही, तेव्हाच सर्वच्या सर्व छावण्या सरसकट मोडीत काढाव्या लागतील. सौदीच्या आशीर्वादाने पाकिस्तानात सुन्नी वहाबी पंथाचे लोक शियांच्या शिरकाणासाठी वापरले जातात. पाक हेरखात्याला हवे असलेले व भारतात हिंसा माजवणारेही तिथेच प्रशिक्षण घेतात. एकदा प्रशिक्षण मिळाले मग बाजू बदलून कुठेही धुमाकुळ घालायला मोकळे होतात. त्यांच्यावर कुणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. फ़टाक्याच्या कारखान्यात अकस्मात कुठलाही फ़टाका पेट घेऊन भडका उडतो, तशी आजकाल पाकिस्तानची स्थिती झालेली आहे. कोण जिहादी आपला व कोण गद्दार त्याचा पत्ता कोणाला उरलेला नाही. म्हणूनच पाकिस्तानला आतूनच धोका निर्माण झालेला आहे. पन्नासहून अधिक लहानमोठे जिहादी गट आता तयार झाले असून, गरजेनुसार त्यांच्यात सहकार्य चालते किंवा बेबनाव सुरू होतो. अशा लोकांमध्ये सतत वावरून पाकसेनेतील व हेरखात्यातील अनेकांची सरकारवरील निष्ठा व बांधिलकी गडबडली आहे. तहरिके तालिबान ही पाकनेच उभ्या केलेल्या मुळच्या तालिबान संघटनेची फ़ुटीर शाखा आहे. पण आता त्यांनी पाकसेनेवरच डुख धरला आहे. काही वर्षापुर्वी बलुची नेता बुगती याची पाकसेनेने हत्या केल्यापासून अफ़गाण सीमावर्ति भागातल्या टोळ्यांनी पाकशी हाडवैर सुरू केले आहे. तीन वर्षे अखंड कारवाया करूनही त्यांना पायबंद घालणे पाकसेनेला शक्य झालेले नाही. एक बलुची बंडखोर नेता तर भारताने पाकपासून त्याचा प्रांत मुक्त करावा, अशी मागणी करीत असतो.

थोडक्यात पाकिस्तानात आज पुर्णपणे अराजक माजलेले आहे.वपंजाब प्रांत सोडल्यास उर्वरीत पाकिस्तानात कोण कुठल्या जिहादी कारवाया करतो, त्याचा अंदाजही येत नाही. अशा स्थितीत त्याच हिंसक टोळ्यांना पाकच्या विरोधात कोणीही थोडे पैसे खर्चून वापरू शकतो. सैनिकी कारवाई पाकिस्तानात घुसून करण्यापेक्षा अशा बंडखोरांना भारताने हाताशी धरायचे धोरण राबवले, तर स्वस्तात काम होऊन जाईल. पाकिस्तानला तीच भाषा समजत असल्याने त्यांना अशा बंडखोर गद्दार जिहादींचा नायनाट आपल्याच भूमीत करावा लागेल. तो करताना सर्वच जिहादी छावण्या उध्वस्त कराव्या लागतील. त्यात किती यश मिळेल माहित नाही. पण निदान तशी पावले तरी उचलावी लागतील. त्यातून पाकिस्तानला आपल्याच मायभूमीत चक्क यादवी युद्ध करावे लागेल. कारण एका बाजूला असे घातपाती व दुसर्‍या बाजूला त्यांचे धार्मिक समर्थन करणारे मुल्लामौलवी, अशा कैचीत पाकिस्तान सापडलेला आहे. त्याच्यावर लष्करी आक्रमण करण्यापेक्षा भारताने पेशावरसारख्या घटना सातत्याने घडवण्याला सहाय्य दिले तरी पाकिस्तानी सेनेला दाती तृण धरून शरणागत व्हावे लागेल. आपणच उभे केलेले जिहादी गट व त्यांना तयार करणार्‍या छावण्या उध्वस्त करण्याचे काम हाती घ्यावे लागेल. पर्यायाने त्यात मारले जाणारे जिहादी कमी होत जातील आणि नव्या जिहादींचे उत्पादन थांबल्याने पुढल्या काळात शांतता प्रस्थापनेला पाक सरकारच प्रोत्साहन देवू लागेल. कारण होणार्‍या हानीतून नव्याने देश उभारण्याचे संकट त्याच्या पुढे उभे असेल. मनोहर पर्रीकर ‘काट्याने काटा काढण्याची भाषा मध्यंतरी बोलले होते. अलिकडे त्यांनी ‘वेदना जाणवेल’ अशी कारवाई करण्याची भाषा बोलली होती. त्याचा व्यापक अर्थ असे अनेक संदर्भ एकत्र करून शोधणे भाग आहे. पेशावरच्या घटनेला म्हणूनच पठाणकोट विसरून बघता येणार नाही.

(पूर्वप्रसिद्धी  तरूण भारत नागपूर)
रविवार   २४/१/२०१६

7 comments:

  1. पाकिस्तानी मंत्री हाच आरोप करत आहेत

    ReplyDelete
  2. भाऊ ही हुशारी आहे,हे लोक डीप असेटची माहिती देणारे नाहित तर डीप असेट तयार करणारे आहेत हा फरक लोकांनी लक्षात घेतला पाहिजे

    ReplyDelete
  3. itakya ughadpane sanrakshan khatyache kinva guptachar khatyache vishleshan yogya nahi... kahi goshti muthitach band asayla havya.. karan tya kharach baher aalya tar tyatun bharatachya image var nakkich vaet parinam hotil...
    baherachya lokanchya manatil image tar soda pan gharatale gaddarach yacha vapar deshvighatak goshtinsathi kartil...

    ha blog jar Rajdeepsardesao konva barkha datt chya hatat laagalaa tar yala purava mhanun debate madhe sadar karaylahi kami karnar nahit he gaddar...

    baki aapan sudnya ahatach... (hi post share nahi karu shakat)

    ReplyDelete
  4. I fully agree with the sentiments expressed by Shri Vishal Deshpande

    ReplyDelete
  5. Bhau Evhadhya ughad vishleshanachi poorna khatrilayak mahiti asalyashivay garaj aahe kay?

    ReplyDelete
  6. ज्या अर्थी भाऊ तोसरेकरांना ही माहीती आहे त्या अर्थी बरखा दत्त व राजदीप सरदेसाई यांना व ईतरांना पण ह्या सर्व बाबी नक्कीच माहीती असतात.सर्व राजकारण्यांना पण माहीती असते

    ReplyDelete
  7. बरखा दत्त व राजदिप सरदेसाई यांना ही बाब माहीत नसेल असे नाही.राजकारण्यांना पण माहीत असते.

    ReplyDelete