Tuesday, June 7, 2016

३० वर्षाचा जुना हिशोब



ठाणे स्थानिय संस्थांच्या मतदारसंघातून विधान परिषद निवडणूकीत शिवसेनेचे रविद्र फ़ाटक विजयी झाले. अर्थात ते सेनेचे म्हणण्यापेक्षा सेना-भाजपा युतीचे उमेदवार म्हणून जिंकले आहेत. कारण त्यांना एकदिलाने युती म्हणून दोन्ही पक्षांनी पाठींबा दिला होता आणि मतेही दिली आहेत. हा ‘डाव’ ‘खरे’ तर आपल्या बाजूने पडणार नाही, हे वसंतरावांना आधीपासून माहिती असायला हवे होते. कारण आज कधी नव्हे इतकी भाजपाला सेनेशी जवळीक करायची गरज आहे. म्हणूनच मते फ़ुटण्याची शक्यता नव्हती. आणि समिकरण बघितले तर जिंकण्याइतकी हुकमी मते युतीच्या दोन्ही पक्षांपाशी होती. तरीही डावखरे काही चमत्कार घडवतील, अशी आशा खुद्द शरद पवार यांनाही होती. म्हणूनच त्यांनीही आपले वजन डावखरे यांच्या पारड्यात टाकले होते. पक्षाचे अनेक बलाढ्य नेते प्रचारात उतरवले होते. निवडणूक कशी जिंकावी, ते डावखरे यांना कळते असेही विधान पवारांनी केले होते. पण त्याचाही उपयोग झाला नाही. पाच वेळा याच मतदारसंघातून विजयी झालेले वसंतराव यांना फ़ाटकांनी ‘दार’ दाखवले. अर्थात हा जसा आजच्या राजकीय परिस्थितीचा परिणाम आहे, तसाच जुन्या एका हिशोब चुकता करण्याचाही विषय आहे. पण आज त्याचे स्मरण कुणाला फ़ारसे उरलेले नाही. डावखरे यांनी शिवसेनेला दणका देण्याने सुरू झालेला हा व्यवहार, सेनेनेच त्यांना दणका देऊन संपला आहे. त्यासाठी आपल्याला डावखरे यांच्या विधान मंडळातील कारकिर्दीपेक्षाही मागे जावे लागेल. कारण तिथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आरंभ होत असतो. डावखरे तीस वर्षापुर्वी फ़ारसे कोणाला माहिती नव्हते. त्यांची किर्ती पसरली ती ठाण्याचे महापौर झाल्यानंतर! १९८६ सालात त्यांनी सेनेच्या समिकरणाला धुळ चारून ठाण्याचा दुसरा महापौर व्हायची किमया घडवली होती. पवार त्याचेच स्मरण करून आजही बोलले असावेत.

तेव्हा ठाणे महापालिका नव्याने स्थापन झाली होती आणि पहिल्याच फ़ेरीत सेनेने त्या महापालिकेत सत्तेपर्यंत मजल मारली होती. सहाजिकच सेनेला महापौरपद मिळणे अनिवार्य होते. १९६७ पासून नगरसेवक असलेले सतीश प्रधान ठाण्याचे पहिले महापौर झालेले होते. मग दुसर्‍या वर्षी महापौर निवडायची वेळ आली, तेव्हा सेनेला कुठलाही धोका नव्हता आणि कॉग्रेस उमेदवार असलेले वसंतराव डावखरे पडायलाच उभे आहेत, अशी सर्वांची समजूत होती. पण तसे झाले नाही. मतदान होऊन मोजणी संपली, तेव्हा सेनेचा उमेदवार पराभूत झाला आणि डावखरे ठाण्याचे दुसरे महापौर म्हणून विजयी झाले होते. त्यातून मोठी खळबळ माजली होती. कारण त्या विजयासाठी चिरेबंद मानल्या जाणार्‍या शिवसेनेची काही मते फ़ोडून डावखरे विजयी झाले होते. त्या पराभवाने शिवसेनाप्रमुखांना कमालीचे विचलीत केले होते. पण त्यांनी फ़ारकाही केले नाही आणि डावखरे राजकारणात नावारूपाला येण्याची प्रक्रिया सुरू झाली. पुढल्या वर्षी त्याचीच पुनरावृत्ती झाली आणि हाताशी बहूमत असतानाही सेनेचा उमेदवार पराभूत झाला होता. डावखरे यांच्या जागी कॉग्रेसचा साळवी नावाचा उमेदवार महापौरपदी निवडून आला आणि त्यात खोपकर नावाच्या कुणा सेना नगरसेवकाने गद्दारी केल्याचे निष्पन्न झाले. तेव्हा बाळासाहेबांनी त्या पालिकेतील तमाम सेना नगरसेवकांचे राजिनामे घेतले होते. मग पुढली तीन वर्षे ठाणे महापालिकेत सेनेचा एकही नगरसेवक नव्हता. तेव्हा अनेकांनी सेनाप्रमुखांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. पण उपयोग झाला नाही आणि नगरसेवक सत्तेबाहेर राहिले. मात्र पुढल्या सार्वत्रिक निवडणूकीत सेनेने बहूमत व सत्ता संपादन केली. वसंत डावखरे यांचा उदय असा सेनेला मोठा दणका देऊन झालेला आहे. तो हिशोब तीस वर्षांनी चुकता झाला म्हणायचा काय?

तसे म्हणायला वाव आहे. कारण शिवसेना व भाजपाची या मतदारसंघात जितकी मते आहेत, त्यापेक्षा फ़ाटक यांना अधिक मते मिळालेली आहेत. या मतदारसंघात एकूण १०६० मते होती आणि त्यापैकी १०५७ इतके मतदान झाले. यात सेना-भाजपाची मते ५१२ इतकीच होती. म्हणजेच युतीची नाहीत अशी मते बहुसंख्य होती आणि त्यामुळेच ती डावखरे मिळवतील, अशी पवारांचीही अपेक्षा होती. किंबहूना युतीचीही काही मते डावखरे फ़ोडून विजयी होतील, अशी अपेक्षा असल्यास वावगे मानता येत नाही. कारण तेच तर वसंतरावांचे आजवरचे कौशल्य राहिलेले आहे. युतीची मते फ़ुटली नाहीत, तरी ५४८ मते एकगठ्ठा मिळवूनही डावखरे जिंकू शकत होते. कारण नव्या मुंबईचे गणेश नाईक व विरार वसईचे हितेंद्र ठाकूर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते. मात्र गणित मतमोजणीत पुरते बारगळले. कारण फ़ाटक यांना तब्बल ६०१ इतकी मते मिळाली. याचा अर्थ सरळ असा, की युतीबाहेरची ८९ मते फ़ाटक घेऊन गेले. जी मते मिळवण्याची क्षमता हेच डावखर्‍यांचे कौशल्य मानले जात होते, तिथेच दगाफ़टका झाला. कारण आपली मते टिकवून इतरांची मते फ़ोडणे. हे अशा लढाईतले कौशल्य असते. त्यात डावखरे अपेशी ठरले. त्यांना युतीची मते फ़ोडणे शक्य झाले नाहीच. पण उलट त्यांच्याच हक्काच्या मतांना युतीच्या रविंद्र फ़ाटक यांनी सुरूंग लावला असे दिसते आहे. म्हणजे तीस वर्षापुर्वी महापौर होताना जे कौशल्य डावखरे यांनी आत्मसात केले होते, त्यात भारी पडणारा डाव कोणीतरी खेळला आहे किंवा डाव कोणीतरी उलटवला आहे. अर्थात पराभवाची शक्यता असती तर डावखरे प्रतिष्ठा पणाला लावून लढलेच नसते. पण तोडफ़ोडीची शक्यता व कौशल्य हाताशी असल्यानेच त्यांनी सहाव्यांदा ही निवडणूक लढवली होती. त्यातून आपल्या जुन्या हिशोबाची पुर्तता करण्याची संधीच त्यांनी शिवसेनेला दिली असेच म्हणावे लागते ना?

खरे तर डावखरे आणि दिवंगत आनंद दिघे ठाण्यातले जुने प्रतिस्पर्धी व तितकेच खास मित्र होते. त्यांच्यात राजकीय लढाई अथक होती. पण दोघांची मैत्रीही तितकीच खुली होती. आज दिघे हयात नाहीत. डावखरे यांनीही पाचदा जिंकलेल्या मतदारसंघात आपली प्रतिष्ठा पणाला लावण्याचा जुगार खेळण्यात अर्थ नव्हता. कारण सगळे राजकारण सध्या गढूळ झालेले आहे. कुठल्याही पक्षाला आपल्या हुकमी व निष्ठावान कार्यकर्त्यांची हमी देण्याची सोय उरलेली नाही. ज्यांच्या मतांवर डावखरे आजवर विधान परिषदेत जाऊन बसले, त्यातले अनेक जुने कॉग्रेस व राष्ट्रवादी नगरसेवक सध्या भाजपाचे नगरसेवक झालेले आहेत. काही शिवसेनेत गेलेले आहेत. अधिक हल्ली हायकमांड वा श्रेष्ठी यांनी सौदे करायचे दिवस संपले आहेत. नगरसेवक किंवा आमदार मंडळी आपल्या अशा मतांची सौदेबाजी स्वत:च करत असतात. त्यांना भुलवणे व खेळवणे पुर्वीसारखे सोपे राहिलेले नाही. डावखरे यांच्या कारकिर्दीचा उदय झाला, तेव्हाची पोरे आता राजकारणातले नवे नेते झाले आहेत. दिघेंचे समकालीन अस्ताला गेले आहेत. मग त्याच जुन्या जमान्यातील डावपेच किती खरे ठरतील? त्या सर्व काळात पवार किंवा अन्य कॉग्रेस नेत्यांखेरीज सत्तेचे पान हलत नव्हते. आज तेच तमाम कॉग्रेस नेते निकामी झाले आहेत आणि कॉग्रेसी राजकारणाला देशभरात उतरती कळा लागली आहे. कसोटी क्रिकेटचा बादशहा समजल्या जाणार्‍या गावस्करला मर्यादित षटकाच्या जमान्यातले डावपेच कळत नव्हते आणि मर्यादित षटकांच्या एकदिवसीय खेळाचा सम्राट मानल्या जाणार्‍या सचिनला २०-२० षटकांच्या खेळाचा आवाका येण्यापुर्वीच निवृत्त व्हावे लागले. डावखरे यांचा पराभव तसाच आहे. नव्या दमाच्या पोरांशी स्पर्धा करण्याच्या नादात त्यांनी पराभव ओढवून आणला. पण त्यात शिवसेनेचा तीस वर्षे जुना हिशोब मात्र त्याच ठाण्यात चुकता झाला.

4 comments:

  1. I refresh my memories of those days shreedhar Khopkar.
    Entire episode elaborate very nicely for new generation.

    ReplyDelete
  2. fail peoples in front of shivsena Rane,naik,pawar,bhuhbal,shah,modi ani atta Davkhare
    Before 30 years & after 30 years Managment works

    ReplyDelete
  3. भारी आहे हे सगळं. राजकारणातील जुन्या गोष्टी नव्याने समजल्या!

    ReplyDelete