इथे सोशल मीडियात मी व्यक्तीगत व खाजगी गोष्टींचा सहसा उल्लेख करीत नाही. व्यक्तीगत जीवनातील घडामोडींचा सामाजिक हितासाठी काही उपयोग नसेल, तर त्याचा उगाच बोभाटा करण्यात अर्थ नाही, असे माझे मत आहे. म्हणूनच घरातल्या कौतुकाच्याही गोष्टींचा उहापोह इथे सहसा माझ्याकडून झालेला नाही. पण काही मित्रांनी कॉमेन्टमधून वा मेसेज द्वारे अशा गोष्टींना उजाळा अनेकदा दिलेला आहे. कुठे व्याख्याने वा कार्यक्रम असला तरी मी इथे त्याचा गाजावाजा करीत नाही. कालपरवा युपीएससी परिक्षेचे निकाल लागले आणि त्यात माझ्या कन्येने यश संपादन केले, त्याबद्दलही म्हणूनच इथे काहीही लिहीले गेले नाही. पण काही चतुर मित्रांनी सदरहू मुलगी ही माझी कन्या असल्याचा अंदाज बांधून अभिनंदनही केले. अर्थात माझे अभिनंदन करण्यात काहीही अर्थ नाही. कारण तिच्या यशात माझा काडीमात्र हिस्सा नाही. बालपण आणि शाळकरी वय सोडले, तर तिचे कर्तृत्व संपुर्णपणे तिचे आहे. त्यात आमची कुठलीही ढवळाढवळ राहिलेली नाही. हस्तक्षेप नाही, की आपले मत लादण्याचा प्रयत्न झाला नाही. तिने मागितलेला सल्ला वगळता आमचे योगदान तिच्या यशात जवळपास शून्य आहे. त्यामुळेच तिच्या यशाचे घरगुती कौतुक होऊन विषय मागे पडला. पण काही जवळचे मित्र-परिचित आणि इथले मित्र यांच्या आग्रहाखातर मुलांच्या जोपासनेचा विषय मांडणे भाग पडले आहे. मुलीचे यश तिचेच असले, तरी तिला स्वयंभू बनवण्यापर्यंतची जबाबदारी पालक म्हणून मी व तिच्या आईने यशस्वीरित्या पार पाडली, हे नाकारता येत नाही. त्याचा मुलीने कितपत उपयोग केला, हे तीच सांगू शकेल. स्वतंत्रपणे निर्णय घेण्यापासून आपले स्वतंत्र विचार असण्यापर्यंत तिची वाटचाल होताना बोट धरून चालवावे, इतकीच काय ती आमची त्यातली भागिदारी!
पण हा विषय अन्य काही कारणास्तव इथे मांडण्याची गरज वाटली, ती पालक म्हणून केलेल्या कसरतीची कहाणी कथन करण्यासाठी! कदाचित त्याचा आजच्या पिढीतील नव्या पालकांना उपयोग होऊ शकेल, म्हणून हा उहापोह करावासा वाटला. एक पालक म्हणून मी वा माझ्या पत्नीने कोणत्या गोष्टी मुलीसाठी अगत्याने केल्या, ते सांगायला हरकत नसावी. त्या भले व्यक्तीगत जीवनातील खाजगी गोष्टी आहेत. पण त्यातल्या बहुतांश गोष्टी सार्वत्रिक व प्रत्येकाला अनुभवाव्या लागणार्या आहेत. म्हणूनच कदाचित आमचा अनुभव नव्या पालकांना उपयुक्त ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसा मी खुप सुदैवी आहे. कारण कोवळ्या वयापासून मुलीचे लालनपालन तिच्या आईपेक्षा मलाच करावे लागले. किंबहूना माझ्यापलिकडे तिचा संभाळ त्या कोवळ्या वयात अन्य कोणी करू शकणार नव्हता. म्हणून ती जबाबदारी मलाच उचलावी लागली. नोकरी व पत्रकारिता सोडून तिच्यासाठी घरी बसावे लागले. त्या दिडदोन वर्षांच्या अनुभवाने मला खराखुरा पालक-पिता बनवले. तीन महिन्याच्या वयापासून तब्बल दिड वर्षाची होईपर्यंत, मला मुलीचा अखंड संभाळ करावा लागला होता. सहाजिकच मुलांच्या वर्तनाचे सवयीचे बारीक निरीक्षण करून मी माझे काही निष्कर्ष काढू शकलो आणि अनवधानाने निरीक्षणे करीतच राहिलो. त्याचा उपयोग मग तिच्या शाळकरी जीवनात अभ्यास घेताना, तिला चांगल्या सवयी लावताना किंवा शिक्षण देताना होऊ शकला. पण प्राथमिक शालेय वयात तिला त्यातून जी अभ्यासाची गोडी लागली, त्याचा लाभ पुढल्या आजवरच्या शिक्षणात होऊ शकला. ही तिची जमेची बाजू आहे. कारण मी कुठली सक्ती केली नाही, तर तिला कोवळ्या वयापासून विचार करायला भाग पाडत गेलो. तिचे निर्णय तिने घ्यायची वेळ आणली, त्याचे लाभ तिला मिळत गेले.
खरे सांगायचे तर मी तिला काही शिकवण्यापेक्षा आणि तिने शिकण्यापेक्षा, मीच तिच्याकडून अनेक गोष्टी शिकत गेलो. बालके अजाण असतात, असे आपल्याला वाटते. पण त्या कोवळ्या वयातही मुले खुप विचार करत असतात आणि प्रत्येक क्षणी काहीतरी नवे शिकत असतात. आपण पालक वा ज्येष्ठ म्हणून त्यात अडथळा आणला नाही, तर मुले उत्तम शिकतात, हे मला मुलीची जोपासना करताना तिने शिकवले. लहानसहान गोष्टीतून व वागण्या बोलण्यातून तीच मला शिकवत होती. अर्थात त्याला औपचारिक शिकवणे म्हणता येणार नाही. ती अनाधानाने जे बोलत वागत होती, त्याचा अर्थ लावताना मी तिच्याकडून खुप गोष्टी शिकत गेलो. आपण बापाला शिकवतोय, हे त्या कोवळ्य़ा जीवाला तरी कुठे माहिती होते? मुले शिकतात म्हणजे काय, किंवा अभ्यासाला कंटाळतात कशामुळे, याचा पहिला साक्षात्कार मला त्यातून होत गेला. मग अभ्यास, ज्ञानार्जन किंवा शिक्षण यांचा तिला कंटाळा येऊ नये वा भिती वाटू नये, याची मी काळजी घेऊ लागलो. शाळेपासून युपीएससीच्या परिक्षेपर्यंत तिचा अभ्यास वा प्रयास तिचा तिनेच केला. त्याचा पाया त्या कोवळ्या वयात अनवधानाने घातला गेला होता. कितीही अभ्यास असला म्हणून घाबरण्याचे कारण नाही, हे तिच्या डोक्यात कोवळ्या वयात घातल्याचा तिला लाभ झाला असेल, तर त्याचे त्रोटक श्रेय माझे आहे. हे सांगताना एक गोष्ट अगत्याने सांगितली पाहिजे, की आजही प्रत्येक नवजात मुलामध्ये मला तेच बाळ दिसते आणि त्याचीही गुणवत्ता तितकीच असते, यावर माझा विश्वास आहे. काही मुले जन्मजात प्रतिभावंत असतात. पण हे अपवाद वगळले तर प्रयत्नांनी गुणवत्ता संपादन करण्याची कुवत प्रत्येक सुदृढ बालकामध्ये असू शकते, असे माझे ठाम मत आहे. माझी मुलगीही तशी होती, जशी लाखो मुले असतात. सवाल त्यांच्या जोपासनेचा असतो.
नेमके सांगायचे तर नुकताच निकाल लागलेल्या युपीएससीच्या ४४० क्रमांकाने उत्तीर्ण झालेली वसुद तोरसेकर ही मुलगी म्हणजे माझी एकुलती एक कन्या! अर्थात असे काही कानावर पडले, मग तिच्या मेहनतीचे श्रेय कमी लेखले जाते. पत्रकार म्हणून अनेक चहाते मला बुद्धीमान समजतात. सहाजिकच माझ्या कन्येने यश मिळवणे, हे अपरिहार्य मानले जाते. किंबहूना मी तेच होऊ दिले नाही. तिलाही कधी माझी कन्या म्हणून काही मोठा पल्ला मारावा, अशी सक्ती केली नाही. तिने असे कुठलेही जोखड मान्य केले नाही. तिच्या यशाचे तेच बहुधा प्रमुख कारण असावे. मातापित्यांच्या छायेत जगण्याचे नाकारणे, हा तिच्यातला सर्वात चांगला गुण मानता येईल. आम्हा पालकांच्या बाबतीत म्हणाल, तर आम्ही आमच्या प्रतिष्ठा तिच्यावर बोजा म्हणून पडू दिल्या नाहीत. तिला स्वतंत्र व्यक्तीमत्व म्हणून आपले आयुष्य साकारू देण्याचे औदार्य म्हणाल, तर आमचे नक्की आहे. मुल म्हणून तिची जोपासना करण्यात पहिली दहाबारा वर्षे गेली आणि तीच आमची तिच्यातली गुंतवणूक! बाकी तिच्या भवितव्य किंवा भविष्याला आकार देण्यासाठी आम्ही काही खास केले असे म्हणता येत नाही. किंबहूना शक्य असूनही तिला अनाठायी सोयीसुविधा देण्यातही कंजुषी केली, हे सत्य मान्य करायला हवे. हे सर्व आज लिहीणे आवश्यक अशासाठी वाटले, की ज्यांना वसुद माझी कन्या म्हणून हुशार असल्याचा समज आहे, तो दूर व्हावा. कुठलेही सुदृढ बालक तितकेच हुशार असू शकते आणि असे यश मिळवू शकते. सवाल त्याच्या जोपासनेचा आहे. किंबहूना त्या बालकाच्या विकासात पालकांचा हस्तक्षेप किती कमी असेल, त्यावर त्याचे यशस्वी भवितव्य अवलंबून असते. हेच सांगण्याचा यामागे हेतू आहे. या निमीत्ताने येत्या काळात काही सविस्तर अनुभव लिहीण्याचा माझा मानस आहे. ‘जोपासनापर्व’ अशी ही लेखमाला जशी लिहीत जाईन, तशी इथे पोस्ट करीत जाईन. भावी पालकांना त्यातून काही शिकता आले तर उत्तम! (अपुर्ण)
===========================
जोपासनापर्व
ज्यांच्या घरात कुटुंबात मुले दहाबारा वर्षाच्या आतल्या वयोगटात आहेत आणि ज्यांना त्यांच्या जोपासनेविषयी चर्चा करावी असे वाटते, त्यांच्यासाठी हा फ़ेसबुक समुह सुरू करीत आहे. आपल्याला मुलांविषयी पडलेले प्रश्न, सतावणार्या समस्या, यांची चर्चा, त्यातले अनुभव वाटून घेता यावेत, अशी त्यामागची कल्पना आहे. अनेकदा एकाचा अनुभव दुसर्याला मार्गदर्शक ठरू शकतो. काहीवेळा अनेकजण मिळून समान समस्येवर विचारविनिमयातून उपाय शोधू शकतात. कारण पौगंडास्थेतील मुले हा आता निव्वळ त्यांच्या शिक्षण व संस्काराचा विषय राहिला नसून, आर्थिक, सामाजिक व व्यवहारी प्रश्न बनला आहे. त्यासाठी हा समूह हे व्यासपीठ व्हावे ही अपेक्षा! ज्यांना आवश्यक वाटते त्यांनी त्याचे सदस्य व्हावे. आपल्या पालक मित्रांनाही आमंत्रित करावे. मी सध्या लिहीत असलेल्या ‘जोपासनापर्व लेखमालेतील लेख इथेही पोस्ट केला जाईल. - भाऊ तोरसेकर
अभिनंदन भाऊ
ReplyDeleteMany congratulations, Bhau. Looking forward to your ‘जोपासनापर्व’.
ReplyDeleteMany many Congratulation.
ReplyDeleteअतिशय समर्पक! तसेच आपण सर्वांचे मनः पूर्वक अभिनंदन!
ReplyDeleteCongratulations
ReplyDeleteBhau, tumhala amchya manatla kasa kalta?
ReplyDelete😃
ReplyDeleteभाऊ तुमच्या कन्येचे उभयतांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
ReplyDeleteAmool Shetye
अभिनंदन भाऊ आणि वसुदचेपण
ReplyDeleteजोपासनापर्व या लेखमालेची मनापासून आतुरतेने वाट पाहत आहोत
ReplyDeleteनमस्कार भाऊ.तुमच व तुमच्या कन्येच अभिनंदन! तुमचे लेख खरोखर वाचनीय असतात व आपलेच विचार व्यक्त करता अस जाणवतं.
ReplyDeleteताज्या लेखातला मुलांकडून शिकण्याचा उल्लेख रास्त आहे.मुलांना शिकवाव लागत नाही,ती स्वता: अनुकरणाने शिकतात,तिथेच पालकांची कसोटी असते.
नविन लेखाची वाट पहात आहे.
congrats!!! great
ReplyDeleteEven this may be the Best..... As pappa
ReplyDeleteदिशा उद्याची नव्या युगाची।
ReplyDeleteसशक्त,सम्पन्न बालमनाची ।