Friday, July 1, 2016

गद्दार आणि त्यांच्यावरच मदार



आपल्या मंत्रीपदाचा राजिनामा दिल्यापासून मौन धारण केलेल्या नाथाभाऊ खडसे यांनी जळगाव मुक्कामी आपले तोंड बंद ठेवून उघडले आणि स्वपक्षाला काही इशारा दिला आहे. त्यांना सत्तेतून बाजुला करण्याचे कारस्थान शिजवले गेले आणि त्यामागे पक्षातले गद्दार असल्याचा नाथाभाऊंचा दावा आहे. किंबहूना त्या गद्दारांपासून पक्षाला धोका असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. तो इशारा कुणाला आहे, त्याचा अंदाज येत नाही. कारण धोका कुणाला व कशाला आहे, त्याचेही स्पष्टीकरण खडसे यांनी दिलेले नाही. धोका सत्तेला असेल, तर तो मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांना लागू होतो आणि धोका पक्षाला असेल तर नाथाभाऊंचा इशारा अवघ्या पक्षाला लागू होतो. यापैकी सत्तेला धोका कायम आहे, कारण आजही भाजपाकडे स्वत:चे हक्काचे बहूमत नाही. म्हणून शिवसेनेचे लोढणे गळ्यात घेऊन चालावे लागते आहे. अशावेळी सेनेला तलाक घेण्याचे आवाहन पक्षाच्या मुखपत्रातूनच होते आहे. मग तसे आवाहन करणार्‍यांना गद्दार म्हणायचे काय? कारण ते बहूमताला म्हणजेच सत्तेला धोका निर्माण करीत आहेत. नाथाभाऊंचा इशारा पक्षाच्या ‘मनोगताशी’ निगडित आहे काय? ते अर्थातच नाथाभाऊंनी तोंड उघडल्याशिवाय कळणार नाही आणि सध्या तरी तसे तोंड उघडणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनीच दिलेली आहे. मग येऊ घातलेला धोका कोण कसा टाळू शकणार आहे? बातम्या बघितल्या तर सरकार धोक्यात नसल्याचीच खात्री पटेल. कारण प्रथमच मुख्यमंत्री आत्मविश्वासाने मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचाली करू लागले आहेत. म्हणजेच त्यांना गद्दारांची भिती वाटताना दिसत नाही. उलट त्यांची त्याच गद्दारांवर अधिक मदार दिसते. नुकत्याच विधान परिषदेच्या निवडणूकांचे निकाल बघितले, तर जुन्या निष्ठावंतांना खड्यासारखे बाजूला सारून अन्य पक्षाशी गद्दारी करून भाजपात आलेल्यांची वर्णी लागली आहे.

म्हणूनच नाथाभाऊ कोणाला गद्दार म्हणतात, त्याला महत्व आहे. अन्य पक्षातून भाजपात येऊन शिरजोर झालेल्यांकडे नाथाभाऊंचा इशारा आहे, की जुने स्वपक्षातलेच कोणी गद्दार आहेत, असे त्यांना सुचवायचे आहे? राजकारणात गद्दार हा शब्द संदर्भाने तपासला जातो. आज ज्याच्या हाती सत्ता व अधिकार आहे, त्याच्याशी दगा करणार्‍याला गद्दार संबोधले जाते. ते करत असताना जुन्या सत्ताधीशाला वा वरीष्ठाला दगा देण्याला राजकीय शहाणपणा मानले जाते. त्यामुळेच एकाच वेळी इथे गद्दार असतात, ते दुसरीकडे राजकीय शहाणे मानले जात असतात. यापैकी कुठल्या अर्थाने नाथाभाऊ गद्दारीचा इशारा देत आहेत? त्यात माधव भंडारी हे भाजपाचे दिर्घकाळ प्रवक्ते म्हणून काम करत आहेत. त्यांना प्रत्येकवेळी विधान परिषदेच्या आमदारकीचे गाजर दाखवण्यात आले. मात्र प्रत्यक्ष उमेदवारी देण्याची वेळ आली, मग माधव भंडारी यांना बाजूला सारून भलत्याच कुणाची वर्णी लागत राहिली आहे. वर्षभरापुर्वी जळगावच्या वाघांना जागा देण्यासाठी भंडारी मागे राहिले आणि यावेळी अन्य पक्षातून आलेल्यांना पंगतीत बसवताना भंडारी यांना उपास घडवला गेला. असे जे उपरे वा ऐनवेळी पक्षात आलेले असतात, त्यांना नाथाभाऊ गद्दार संबोधत आहेत, की त्यांचा इशारा अन्यत्र आहे? ही जळगावातील बहूजन-महाजन अशी लढाई आहे काय? आपण युती तोडली नसती आणि युतीच निवडणूकांना सामोरी गेली असती, तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता, असेही खडसे यांनी स्पष्टपणे बोलून दाखवले आहे. त्याचा अर्थ कसा लावायचा? युती तोडून त्यांनी किती जुन्या प्रामाणिक भाजपा कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली होती? की अन्य पक्षातले गद्दार आपलेसे करून मुख्यमंत्रीपद मिळवण्याचे डावपेच खेळले होते? पक्षात असे उसनवारीचे उमेदवार आणण्यातून गद्दारांची भरती कोणी केली होती?

ऐनवेळी वा विपरीत परिस्थितीतही पक्षाचा किल्ला हिमतीने लढवणारे माधव भंडारी मोठे असतात, की कालपरवा वहात्या गंगेत हात धुवून घ्यायला आलेले अन्य पक्षाचे दांडगे लोक निष्ठावान असतात? गद्दाराची नेमकी व्याख्या तरी काय? अशा अन्य पक्षीय गद्दारांना सन्मानाने पक्षात आणायचा पुढाकार कोणी घेतला होता? किंबहूना अशाच गद्दारांच्या शक्तीवर स्वबळाचा मुख्यमंत्री आणण्याचे मनसुबे कोणी रचले होते? गद्दारांना स्वपक्षात सन्मानित करण्याचे राजकारण कोण खेळला होता? नुसते शब्द वापरून चालत नाही. सवाल व्यक्तीचा नसतो, तर पक्षाचाही असतो. राजकीय पक्ष वा संघटनेत निष्ठा कशावर असली पाहिजे? नेत्याशी निष्ठा असावी की पक्षाच्या भूमिका विचारांशी असावी? जिंकण्यासाठी तुमच्या पक्षात कोणी आले तर त्यांनी आपल्याच आजवरच्या पक्षाशी दगाफ़टका केलेला असतो आणि उद्या प्रसंग आलाच तर तसाच दगा तुमच्याही असा माणूस करू शकतो. त्या प्रवृत्तीला प्रोत्साहन कोणी दिले होते? पक्षात अशा गद्दारांचा भरणा करण्यात कोणाचा पुढाकार होता? नाथाभाऊंनी गद्दार शब्द वापरलाच आहे, तर निदान त्याचे परिशीलन तरी करावे. आपणच सत्तेच्या हव्यासापोटी गद्दारांना पक्षाची दारे खुली केलेली असतील, तर पक्षाला गद्दारांपासून धोका असल्याची बोंब ठोकण्यात काय अर्थ आहे? आपल्या डझनावारी आमदारांनी टांग मारून भाजपात प्रवेश केला, म्हणून शरद पवार एका शब्दाने तरी नाराज झालेले होते काय? त्यांनी कोणाला गद्दार म्हणून हिणवले काय? कशाला हिणवतील? त्यांनी आपला पक्षच मुळात इतर पक्षाचे गद्दार गोळा करून उभारलेला आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी आपले निष्ठावानही दगाफ़टका करून पळून जातील, हे अशा राजकारणातले गृहीत साहेबांनी मान्य केले आहे. पण नाथाभाऊंना अजून त्याचे लाभ ठाऊक असले, तरी तोटे उमजायचे आहेत ना?

दुसर्‍या पक्षातले गद्दार जेव्हा मतलबाने आपल्या पक्षात येतात आणि त्याला आपण मतपरिवर्तनाचे प्रमाणपत्र देतो, तेव्हा आपल्याही पक्षातले निष्ठावंत त्याच रोगाची बाधा होऊन बदलू लागतात. त्याग वगैरे उदात्त गोष्टी बाजूला पडतात आणि स्वार्थाला वैचारिक रंगभूषा चढवण्याची स्पर्धा सुरू होते. मग कोण गद्दार आणि कोण निष्ठावंत, याचाच संभ्रम होऊ लागतो. नाथाभाऊंची तीच गडबड झालेली आहे. ते सत्तेच्या इतके आहारी गेले, की त्यांना राज्यात सत्ता परिवर्तन करण्यामागचा हेतूही लक्षात राहिला नाही आणि त्यांनी सत्तेसाठी कुठलाही झेंडा खांद्यावर घेणार्‍या गणंगांची फ़ौज निवडणूकीच्या मोसमात उभारली. एक लढाई जिंकून सत्ता हाती आली. पण विचारांचे तत्वांचे युद्ध कुठल्या कुठे विस्मरणात जाऊन लुप्त झाले. या निमीत्ताने लोकशाही अमान्य असलेल्या एका ऐतिहासिक व्यक्तीचे शब्द नाथाभाऊंना मुद्दाम आठवण करून द्यावेसे वाटतात. मग त्यांना गद्दार शब्दाचा अर्थ कदाचित उलगडून बघता येईल.

 ‘कार्यकर्त्यांना चळवळीतून जोवर आर्थिक वा अन्य प्रकारचे लाभ होत नाहीत, तोवरच त्या चळवळीचा आवेश टिकून रहातो. एकदा का अशा प्रकारचे लाभ मि्ळू लागले, की कार्यकर्ते त्या लाभाला चटावतात आणि चळवळीच्या मुळ उद्दीष्टांची त्यांना विस्मृती होते. भावी पिढ्य़ांकडून होणारा सन्मान आणि भविष्यात होणारी किर्ती हेच फ़क्त आपल्या कार्याचे बक्षिस, या भावनेने कार्यकर्ते जोवर चळवळीसाठी खपतात; तोवरच चळवळीच्या कार्यावर त्यांचे लक्ष रहाते. प्राप्त परिस्थितीचा जास्तीत जास्त फ़ायदा उठवायचा या हेतूने प्रेरित झालेल्यांचा ओघ चळवळीकडे सुरू झाला, की चळवळीचे मुळ उद्दीष्ट बाजूला पडू लागले आहे असा अंदाज करायला कोणतीच हरकत नाही.’ (अडॉल्फ़ हिटलर, माईन काम्फ़)

1 comment: