Monday, August 22, 2016

उतावळेपणाचा अपशकून



सिंधू या मुलीने बॅडमिंटन स्पर्धेत ऑलिम्पीकचे रुपेरी पदक जिंकले आणि देशात एकच जल्लोश सुरू झाला. खरे तर शेवटचा सामना होण्यापुर्वीच तसा जल्लोश सुरू झाला होता. मात्र तो गदारोळ रुपेरी पदकासाठी नव्हता, तर सुवर्ण पदकासाठी होता. पण त्याच गदारोळाने सुवर्णाला रुपेरी करून टाकले असे म्हणावे लागते. कारण तसा अतिरेकी जल्लोश झाला नसता, तर कदाचित शुक्रवारी रात्री आपण सुवर्ण पदकाचा आनंद उपभोगला असता. सिंधूने प्रतिकुल परिस्थितीत अंतिम सामन्यापर्यंत मुसंडी मारली. त्यामुळे तिचे रुपेरी पदक निश्चीतच झालेले होते. अंतिम सामना हरली तरी तिला रुपेरी पदकापासून कोणी वंचित ठेवू शकले नसते. ते मिळवण्यासाठी तिची पाठ थोपटली जाण्यात काहीच गैर नव्हते. पण अंतिम सामना व्हायचा असताना, तिच्या बाबतीत इतका कल्लोळ इथे सुरू झाला, की सिंधूचे चित्त विचलीत व्हायला हवे. अशा खेळामध्ये आणि अटीतटीच्या सामन्यामध्ये खेळाडूची एकाग्रता त्याच्या कौशल्या इतकीच महत्वाची असते. आधी जिंकलेले सर्व सामने किंवा स्पर्धा दुय्यम असतात. तेव्हा आणि तोच सामना निर्णायक असतो. म्हणूनच त्यापासून खेळाडूला विचलीत करण्यासारखे पाप नसते. खेळाडूची एकाग्रता म्हणजे नेमके काय, ते वाहिन्यांवर अखंड पोपटपंची वा वाचाळता करणार्‍यांना ठाऊकही नसावे. पण सिंधूचा प्रशिक्षक पुलैला गोपिचंद याला नेमकी समस्या ठाऊक होती. म्हणून की काय, त्याने सिंधूला जगात कोणाशी संपर्क साधण्यालाही प्रतिबंध घातला होता. कारण अतिरेकी कौतुकही तिची एकाग्रता भंग करू शकेल, याची त्याच्यासारख्या जाणकाराला कल्पना होती. पण खुपच कल्लोळ झाला मग त्याचा कुठून तरी पाझर होणारच आणि तेच इथे झालेले असणार. त्यामुळे सिंधूचे सुवर्णपदक तिच्यावर अतिरेकी कौतुकाचा मारा करणार्‍यांनी हिसकावून घेतले असे म्हणावे लागेल.

ऑलिम्पीक स्पर्धेच्या बातम्या दोन आठवडे चालू होत्या. त्यात कुठे फ़ारशी सिंधूची बातमी झळकत नव्हती. अगदी साक्षी मलिकने कांस्य पदक मिळवण्यापर्यंत तिचाही उल्लेख फ़ारसा कुठे झाला नाही. एकूणच भारतीय क्रिडा चमू कसा मागे फ़ेकला गेला आहे आणि भारतीय नेते व प्रशासकीय अधिकारी रिओला मौजमजा करायला गेले आहेत, त्याचेच पुराण चघळले जात होते. मग एकामागून एक खेळात भारत कसा पिछाडला, त्याचे रडगाणे जोरात चालू होते. पण दिपा कर्माकर, ललिता बाबर वा साक्षी-सिंधू यांनी काय मजल मारली; त्याचे कुठल्याही माध्यम वा वाहिनीला सोयरसुतक नव्हते. भारतासाठी पदकांच्या कसा दुष्काळ आहे, त्याचीच उजळणी सुरू होती. इतक्यात कुस्तीमध्ये साक्षीने बाजी मारली आणि पहिले पदक भारतीय खात्यात जमा झाले. तिथून अकस्मात खेळातल्या राजकीय बातम्या मागे पडल्या आणि सुवर्ण वा अन्य पदकांचा गदारोळ सुरू झाला. विविध भारतीय मंत्री वा राजकीय पुढारी वाहिन्यांच्या पडदयावरून गायब झाले आणि साक्षी व तिच्या कुटुंबासह शेजारी पाजारी लोकांचे गुणगान सुरू झाले. त्याला अर्धा दिवस उलटण्याच्या दरम्यान सिंधूने बॅडमिंटनमध्ये उपात्य फ़ेरी जिंकून, अंतिम फ़ेरीत मुसंडी मारल्याची घटना घडली. तिथून मग साक्षी मागे पडली आणि सिधूंच्या सुवर्ण पदकासाठी धावा सुरू झाला. मग तिच्या मातापित्यांसह मिळेल त्या संबंधितांना शोधून त्यांच्या मुलाखतींचा वाहिन्यांवर रतीब सुरू झाला. एका वाहिनीच्या तावडीतून सुटला की त्यातला कोणीही दुसर्‍या कॅमेराच्या जाळात अडकत होता. नशीब यापैकी कोणालाही सिंधूपर्यंत पोहोचण्याची मुभा नव्हती. अन्यथा त्यानी तिला अंतिम सामनाही खेळायला सवड न ठेवता मुलाखतीच घेऊन सिंधूचा तो दिवस खाऊन टाकला असता. कशाचे किती अवडंबर माजवावे, याला काहीही धरबंद उरला नसल्याचे हे लक्षण आहे. पण त्यात सिंधू व देशाचे नुकसान मात्र होऊन गेले.

पुलैला गोपिचंद हा सिंधूचा प्रशिक्षक! त्याने मागले तीन महिने तिला मोबाईल फ़ोनपासूनही वंचित ठेवले होते. कशाला तिच्यावर हा प्रतिबंध त्याने घातला होता? अंतिम सामना संपल्यावर एका बातमीतून ही बाब उघडकीस आली. तिला फ़क्त स्पर्धेतल्या ध्येयावर एकग्र करणे, यापेक्षा त्यामागे अन्य कुठला हेतू असू शकत नाही. कुठलेही कारण तिला आपल्या ध्येयापासून विचलीत करू शकेल. म्हणूनच ऑलिम्पीक क्षेत्रात घडणार्‍या गोष्टींच्या पलिकडे तिला अन्य मार्गाने काहीही कळू द्यायचे नाही, हाच त्याचा हेतू असणार. ज्यांनी विक्रमवीर गावस्करला फ़लंदाजी करताना बघितले असेल, त्यांना एक गोष्ट नक्की आठवेल. अनेकदा गोलंदाज धावत येत असताना गावस्कर अचानक स्टंप सोडून बाजूला व्हायचा आणि पंचाला समोर हात करून इशारा द्यायचा. गोलंदाजाच्या मागचा जो साईटस्क्रीन असे, त्याच्याजवळ किंचीतही हालचाल झाली तरी गावस्करला खपत नसे. कारण गोलंदाजाच्या हातून चेंडू सुटत असताना त्याला नेमकी दिशा व टप्पा यांचा अंदाज बांधता येत असे आणि काही सेकंदात तो चेंडू अंगावर येत असे. त्या चेंडूखेरीज अन्य कुठेही लक्ष जाऊ नये, म्हणून गावस्कर ही काळजी घेत असे. अशावेळी नेमका गोलंदाजाच्या मागे कुठलीही हालचाल त्या फ़लंदाजाला विचलीत करू नये, म्हणूनच तो स्क्रीन असे. पण त्याच्या आसपास असणारे प्रेक्षक-रक्षक हलले, तरी विचलीत होणे स्वाभाविक असते. खेळातील एकाग्रता म्हणजे काय त्याचा अंदाज यातून येऊ शकतो. अशा जागतिक स्तराच्या खेळामध्ये एक सामना एक चेंडू वा एक सेकंद निर्णायक ठरत असतो. म्हणूनच त्यात खेळत असलेल्या स्पर्धकाला विचलीत करणे म्हणजे अपशकूनच असतो. मग ते कौतुकासाठी केलेले कृत्य असो किंवा त्रास देण्यासाठी केलेली कृती असो. सिंधूच्या बाबतीत अंतिम सामन्याच्या दरम्यान तोच अपशकून भारतीय माध्यमांनी केला नाही काय?

तिथे सिंधू आपल्या भारतीय सहकार्‍यांसह वावरत होती आणि भारतीय वाहिन्यांचे प्रतिनिधी त्यातल्या कोणाला तरी पकडून मुलाखती घेत होते. त्यांच्या माध्यमातून मातृभूमीतल्या घडामोडींची वार्ता क्रिडाचमूत पाझरत होती. सहाजिकच उपांत्य फ़ेरी जिंकलेल्या सिंधूला मायदेशी आपले होत असलेले कौतुक आणि व्यक्त होत असलेल्या अपेक्षा कळत असणार. संपुर्ण देशात संचारलेले असे वातावरण त्या खेळाडूच्या मनावरचा बोजा वाढवत असते. मुक्तपणे उपांत्य फ़ेरीत सिंधू खेळली, तेव्हा तिच्यावर कुठलेही अपेक्षांचे ओझे नव्हते. पण एका दिवसात देशभरच्या माध्यमांनी इतके काहुर माजवले, की सिंधूला खेळापेक्षा अपेक्षांच्या बोजाचा ताण जाणवू लागणे स्वाभाविक होते. अख्खा देश तिच्याकडून सुवर्णपदक मागतो, ही कल्पनाच किती दडपण आणणारी असते याची नुसती झलक पुरेशी आहे. आपण खेळायचे नसून जिंकणेच आवश्यक आहे आणि जिंकलो नाही तर संपले़च. असे काहीसे ते दडपण असते. तसे कुठलेही दडपण नसताना खेळाडू जिद्दीने व सर्वस्व पणाला लावून खेळू शकतो. ती सुविधा सिंधूला नाकारली गेली. कारण तिचा मोबाईल काढून घेणे गोपिचंदला शक्य असले तरी बाकीच्या बाजूने येणारी माहिती वा बातम्या रोखणे शक्य नव्हते. आपले आईवडील वाहिन्यांना मुलाखती देत आहेत, बालाजीच्या दर्शनाला गेले आहेत, सगळा देश देव पाण्यात बुडवून बसला आहे. आपणच काही केले पाहिजे, हे ओझे होऊन जाते. तो बोजा घेऊन खेळताना चित्त विचलीत होणे अपरिहार्य असते. वारंवार गुणफ़लकाकडे लक्ष जाणे, अशा गोष्टी त्रासदायक असतात. त्यातून खेळापेक्षाही परिणामांना महत्व येते आणि सामना गडबडत जातो. सिंधूवर अपेक्षांचा बोजा चढवणार्‍यांनी म्हणूनच तिचे सुवर्णपदक हिरावून घेतले असे म्हणावे लागेल. माध्यमांसाठी ती एका दिवसाची खळबळ माजवणारी बातमी होती. पण सिंधू व गोपिचंद यांच्या काही वर्षाच्या मेहनतीवर त्यातून पाणी सांडले गेले.

1 comment: