Monday, August 22, 2016

पटावरची मुत्सद्देगिरी



बुद्धीबळाच्या पटावर जो खेळ चालतो, त्यात राजा वजीर यांच्यासह हत्ती घोडे उंट अशी मोठी फ़ौज असते. त्यात प्रत्येकाची चाल वेगवेगळी असते आणि प्यादीही खुप असतात. पण किमान चालीत कमाल मोहर्‍यांना संपवणाराच त्यातला बाजीगर असतो. शिवाय हा खेळ हाणमारीचा अजिबात नसतो. म्हणूनच मोहरे प्यादे यांना मारण्यात वेळ व बुद्धी खर्ची घालणार्‍याला त्यात बाजी मारता येत नाही. उलट किमान खेळी करून प्रतिपक्षाच्या राजाची कोंडी करू शकणारा त्यात बाजी मारत असतो. मजेची गोष्ट म्हणजे, त्यात राजाला कधीच मरण नसते. मारली जातात मोहरे किंवा प्यादी. समोरचा खेळाडू हुशार असेल तर तो प्यादी मोहरे मारले जाण्याने विचलीत होत नाही, तर खेळीतून बाजी मारण्यासाठी बुद्धी वापरत असतो. त्याला पटावरचे युद्धच म्हणतात. पण ते बुद्धीने खेळले जाते आणि मुत्सद्देगिरी सुद्धा बहुतांशी तशीच असते. कुणापाशी किती मोठी फ़ौज आहे आणि किती सज्ज शस्त्रास्त्रे आहेत, यावर मैदानातले युद्धही जिंकता येत नाही. अन्यथा अफ़गाणिस्तान वा इराकमध्ये अमेरिका इतकी जेरीस आली नसती. किंवा गडाफ़ी सद्दामला संपवणार्‍या अमेरिकन मुत्सद्देगिरीला सिरीयाचा बशर अल असद भारी पडला नसता. यामागे कोण काय खेळी खेळला, त्याला महत्व असते. भारत-पाक यांच्यातले डावपेचही त्यापेक्षा वेगळे असू शकत नाहीत. युद्धात पाकिस्तानला कधीच बाजी मारता आलेली नाही. म्हणून तर त्यांनी जिहादी नावाची प्यादी मोहरे उभे करून अघोषित युद्ध चालवले आहे आणि वाटघाटी बैठका बोलण्यांच्या पटावर भारताला जेरीस आणलेले आहे. त्यातून बाजी पलटवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पाकिस्तानची कोंडी करणे इतकाच होता आणि आहे. पण दुर्दैवाने भारताने त्याकडे इतक्या चतुराईने कधी बघितले नाही आणि पाकिस्तान त्यात नेहमी शिरजोरी करीत राहिला.

सव्वा दोन वर्षापुर्वी भारतात सत्तांतर झाले आणि प्रथमच नव्या दमाचे नेतृत्व उदयास आले. नरेंद्र मोदी हा माणूस आजवरल्या दिल्लीतील प्रस्थापित राजकारणापासून पुर्णपणे अलिप्त असलेला नेता देशाचा पंतप्रधान झाला. तिथूनच त्यांची टिंगल चालू झाली होती. कारण त्यांनी आपल्या शपथविधीला सार्क देशांचे राष्ट्रप्रमुख अगत्याने आमंत्रित केले होते. त्यातही पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ़ यांच्याशी मोदी अतिशय सलगीने वागत होते. एका प्रसंगी तर त्यांनी शरीफ़ यांच्या घरगुती समारंभातही व्यक्तीगत हजेरी लावून टिकेची झोड अंगावर ओढवून घेतली होती. त्याखेरीज शरीफ़ मोदी जवळिक हा भारतातही टिकेचा विषय झाला. कारण जितके शरीफ़ यांच्याशी जवळीक करताना मोदी दिसत होते, तितका पाकिस्तान काश्मिरात स्थितीचा गैरवापर करताना दिसत होता. सहाजिकच मोदींनी भारताच्या पाक विषयक धोरणाचा बट्ट्याबोळ केला, असा आरोप होण्याला पर्याय नव्हता. कारण क्रमाक्रमाने पाकिस्तान शिरजोरी करताना दिसत होता. जसा पटावरच्या खेळात प्यादी मोहरे मारणारा आक्रमक वाटतो, त्यापेक्षा शरीफ़ यांचे यश वेगळे नव्हते. उलट याच काळात मोदी सरकार पाकिस्तानशी दोस्ती वाढवण्याचे व संयमाचे धोरण राखताना दिसत होते. पण अशा खेळातली प्यादी पाकिस्तान मोठ्या खुबीने वापरत होता. त्यांची काश्मिरातील व भारतातील प्यादी मोहरे मोदींची खिल्ली उडवण्यात रमलेले होते. तर मोदी देशातही थांबत नाहीत आणि दर महिन्यात परदेशी दौर्‍यावर जातात, अशीही टिका सतत चालली होती. पण आज दोन वर्षांनी पाकने याच काळात जगातले बहुतांश मित्र व सहकारी समर्थक गमावल्याचे सिद्ध होत आहे. विविध जागतिक व्यासपीठावर पाकला कुणाचेच समर्थन मिळेनासे झालेले आहे, अगदी मुस्लिम अरबी देशही पाकिस्तानपासून दुरावलेले आहेत. हीच आजवरच्या जागतिक पटावरची पाकिस्तानची प्यादी होती ना?

पाक काश्मिरातील प्यादी मोहरे वापरत असताना मोदींनी आपल्या परदेश दौर्‍यातून जागतिक पटावरचे पाकिस्तानचे अनेक मोहरे व प्यादी कधी मारून टाकली, त्याचा पाकिस्तानला पत्ताही लागला नव्हता. म्हणून तर गेल्या काही महिन्याभरात पाकिस्तानला जागतिक राजकारणात एकाकी पडावे लागले आहे. त्याचा चीनसारखा मोहराही निकामी ठरू लागला आहे. सौदी अरेबिया दुबई अशा मुस्लिम देशांकडूनही पाकिस्तानचे समर्थन दुबळे झाले आहे. म्हणूनच बालुचिस्तान पेटला व स्वातंत्र्यदिनी मोदींनी जाहिरपणे बलुची लढ्याला समर्थन देण्याचा पवित्रा घेतल्यावर पाकिस्तान चिंतेत पडला आहे. काश्मिरचा विषय जगासमोर मांडून भारताला शह देण्याची खेळी आता जुनी झाली आहे. बलुचिस्तान हा भारताकडून दिला जाणारा काटशह ठरू लागला आहे. ज्या बलुचिस्तानला लष्कराच्या पोलादी टाचेखाली चिरडून मस्तवालपणा चालू होता, त्याच बलुची नेत्यांना वाटाघाटीने प्रश्न सोडवू; असे आवाहन आता पाकिस्तान करू लागला आहे. कारण आजवर एकाकी दुर्लक्षित असलेल्या व्याप्त काश्मिर व बलुची स्वातंत्र्य लढा व असंतोषाला आता भारताच्या रुपाने आश्रयदाता लाभला आहे. काश्मिरी असंतोष ही बाब जुनी झाली आहे आणि जागतिक व्यासपीठ असलेल्या राष्ट्रसंघासह अमेरिकेनेही फ़ेटाळून लावली आहे. पण बलुची व व्याप्त काश्मिरातील असंतोष व मानवी हक्कांचे प्रश्न नवे व जिव्हाळ्याचे आहेत. भारताने त्या संदर्भात आवाज उठवला, तर त्यांना मोठे वजन येणार आहे. त्याशिवाय मोदींनी वाढवलेल्या मित्र देशांचाही त्यासाठी पाठींबा मिळणार आहे. सहाजिकच काश्मिर मागे पडून बलुची पख्तुनी स्वातंत्र्याला चालना मिळू लागली आहे. तसे झाले तर काश्मिर हाती लागणे दुरची गोष्ट. उलट हातात असलेल्या पाक प्रदेशाचेच तुकडे पडायला जगात सहानुभूती मिळण्याचे भय आता पाकिस्तानला सतावू लागले आहे.

इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. पंतप्रधान पदावर आरूढ होताच मोदींनी आपल्या पाकविरोधी पवित्र्याचा अवलंब सुरू केला असता आणि पाक विरोधातली राजकीय लढाई छेडली असती, तर भारत त्यात एकाकी पडला असता. पण दोन वर्षात मोदींनी इतके दौरे केले, त्यात पाकिस्तानी मित्र समर्थकांना जोडण्याचा प्रयास अगत्याचा होता. अमेरिका, चिन व अरबी देशांशी मैत्रीपुर्ण संबंध जाणिवपुर्वक असे निर्माण केले, की त्यांनी पाकिस्तानच्या खोडसाळपणाचा विरोध करावा. निदान त्याचे समर्थन करायला उभे राहू नये. ह्या दौर्‍याचा हेतू तसा होता, हे मोदींनी कधी सांगितले नाही आणि पंतप्रधान अनिवासी भारतीय होत असल्याची टिंगलही सहन केली. आपला हेतू उघडपणे सांगून कुठली मुत्सद्देगिरी होत नाही. मोदींनी अंतस्थ हेतू लपवून असे दौरे करताना शरीफ़ यांच्याशी जिव्हाळ्या्च्या मैत्री संबंधाने प्रदर्शन केले. पण प्रत्यक्षात पाकच्या विविध मित्रांना तोडण्याचे डावपेच यशस्वीरित्या खेळले. तशी खात्री होईपर्यंत त्यांनी बलुची वा पख्तुती, व्याप्त प्रदेशातील काश्मिरी इत्यादींच्या प्रश्नाविषयी मस्तपैकी मौन धारण केले होते. पण पाकिस्तानी मुत्सद्देगिरीच्या पटावरची परदेशी मित्रांची प्यादी व मोहरे नामोहरम केल्यावर बलुची काश्मिरी असंतोष व लढ्यांना समर्थन जाहिर केले आहे. याचा अर्थ असा, की आजवर छुप्या पद्धतीने भारताने अशा असंतोषाला व लढ्यांना मदत केलीच आहे. आता उघडपणे त्यांची वकिली व जगासमोर त्यांना मदत करण्याचे आवाहनच भारत करायला सिद्ध झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानी सेना, राज्यकर्ते व मुत्सद्दी चक्रावून गेले असतील, तर नवल नाही. कारण दोस्तीच्या जाळ्यात ओढून आपण मोदींना गुंडाळले अशीच त्यांची समजूत होती. पण स्वातंत्र्यदिनाचे भाषण आणि त्याच दरम्यान पाकिस्तानच्या विविध प्रांतात उठलेले असंतोषाचे आगडोंब, खर्‍या भारतीय खेळीचे दर्शक आहेत.

2 comments:

  1. भाऊ आजच तिकडे लोकसत्ताने अकलेचे तारे तोडले आहेत।"बलुचिस्तानातील निदर्शनांमध्ये भारताची कुठलीही भूमिका आहे की नाही याबाबत आतापर्यंत स्पष्टपणे काही सांगितले जात नव्हते. त्यामुळे तेथील संघर्षांत भारताचा संबंध असल्याचा आपण आतापर्यंत इन्कार करू शकत होतो, पण आता ते झाकणच उडाले आहे. भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याचे आवतणच अप्रत्यक्षपणे पंतप्रधानांनी त्यांच्या वक्तव्यातून दिले आहे. मानवी हक्कांचे भारतात उल्लंघन होत असेल तर पाकिस्तानने हस्तक्षेप करायला हरकत नाही, असा त्यांच्या वक्तव्याचा दुसरा अर्थ होता. दलितांवरील अत्याचार, मुस्लिमांना धमकावणे, त्यांच्या अन्नसेवनाच्या सवयींवर बोट ठेवणे, लैंगिक हिंसाचार, बालविवाह या मुद्दय़ांवर जर भारतात मानवाधिकारांचे उल्लंघन होत असेल तर त्यावर बोलण्याची मुभा आपण पाकिस्तानला दिली असेही त्यातून सूचित होते." यांना अस वाटते की पाक धुतला तांदुळ आहे इतकी दरिद्री बुद्धि आजवर बघितली नाहीं

    ReplyDelete
  2. Dear Bhau
    It always very informative & enjoyable to read your thoughts, views.
    Can you spread your valuable views on larger scales may be in some TV debates, It will definitely help allot Indians to know the facts as they are.
    I know its not easy game & must have some lobbying etc. involved in it, but i want to request you to look at this aspect for betterment of our fellow Indians.
    Majorly the people on TV debates (Marathi Majorly) are like you can easily make that they are puppets & talking the paid agenda. Neither they know facts nor they have ability & willingness to present it.
    There is need of some one who talks sense, So please think over it.

    Our Best wishes are always with you.

    Regards
    Abhijeet Joshi

    ReplyDelete