Saturday, August 27, 2016

बिचारे राहुल गांधी

Image result for rahul gandhi

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभ्यासवर्ग किंवा शिबीरे असतात, तशीच पुरोगाम्यांचीही शिबीरे होत असतात. त्यात खोटे कसे बोलावे आणि तेच रेटून सतत कसे बोलावे, याचे प्रशिक्षण दिले जाते की काय अशी शंका येते. कदाचित ही मानसिकताही असावी. सर्वसाधारणपणे आपल्याला जे पटले आहे, तेच सत्य असल्याची ठाम समजूत अशा प्रवृत्तीमागे असते. त्याची ग्वाही हेनरीख हायने नावाचा जर्मन कवी तत्ववेत्ताही देतो. तो म्हणतो, एखाद्याला सत्य गवसले अशी त्याची ठाम समजूत झाली, मग तेच सत्य असल्याचे सिद्ध करण्यासाठी असा माणूस बेधडक खोट्याचाही आधार घेऊ लागतो. याचा अर्थ सत्य सिद्ध करण्यासाठी असत्याचा आधार घेणे. आजवर सतत एक खोटेपणा जगासमोर सातत्याने पुरोगामी सत्य म्हणून इतक्या वेळा मांडण्यात आला आहे, की नव्याने पुरोगामीत्वाची दिक्षा घेणार्‍यांना तेच खोटे सत्य म्हणून सांगताना किंचीतही चलबिचल होत नाही. मात्र जोवर अशा सत्याची झाडाझडती न्यायालयात कायद्याच्या कसोटीवर तपासून बघितली जात नाही, तोवर तेच खपून जात असते. जितकी ही थापेबाजी चालू रहाते तितका तोच खोटेपणा बालबुद्धीच्या लोकांना खराही वाटू लागतो. बिचारे राहुल गांधी त्याच जंजाळात फ़सले आहेत. पण कोर्टाचा बडगा बसला आणि त्यांना आपली कातडी बचावण्याची पाळी आली. आपल्या नेहमीच्या बेछूट शैलीत त्यांनी मागल्या लोकसभा निवडणूक प्रचारात संघावर तोच आरोप केला, जो पुरोगामी सातत्याने करीत आले आहेत. गांधीजींची हत्या संघाने केली. यावेळी त्या आरोपाला आव्हान देण्याची सुबुद्धी कुणाला तरी झाली आणि राहुल गांधी कायद्याच्या कचाट्यात सापडले. मग त्यातून सहीसलामत सुटण्यासाठी त्यांची केविलवाणी कसरत सुरू झाली आहे. पण कोर्ट म्हणजे संघ नव्हे हे लक्षात यायला थोडा वेळ लागणार आहे. तोपर्यंत अनेकाचे पितळ उघडे पडणार आहे.

समाजवादी वा कम्युनिस्टांचे संघाशी कधी जमले नाही. त्यांच्यातला राजकीय विरोध समजू शकतो. पण त्या विरोधासाठी सरळ खोटारडेपणा करण्याला काही मर्यादा असतात. आपल्याला पटले नाही, तर ते विचार तत्वाने व मुद्दे मांडूनही खोडता येतात. सामान्य जनता नेहमी विवेकी व तारतम्याने विचार करणारी असते. म्हणूनच तिला काही काळ उल्लू बनवता येत असले, तरी दिर्घकाळ खोटारडेपणा चालत नाही. मग तो पुरोगाम्यांचा असो किंवा प्रतिगाम्यांचा असो. सामान्य माणसाला सत्याचा शोध घेण्यासाठी तत्वांची किंवा विचारसरणीची गरज लागत नाही. ती अनुभवातून सत्याचा सतत वेध घेत असते आणि सत्य गवसले मग खोटेपणाला आश्रय देत नाही. पुरोगाम्यांया सध्याच्या दुर्दशेला तेच ह कारण झाले आहे. दिर्घकाळ पुरोगाम्यांनी जो दांभिकपणा केला आणि पुरोगामीत्वाचा नावाखाली खोटेपणा केला, त्यात सातत्याने काही खोट्या गोष्टी सामान्य माणसाच्या गळी मारलेल्या होत्या. गुजरातची दंगल आणि तिथल्या हिंदूत्वावर उडवलेली राळ त्याचाच पुरावा होता. पण जेव्हा त्यातल्या खोटेपणाची खात्री समाजाला येत गेली, तेव्हा त्यांनी प्रतिगामी म्हणून शिक्का मारलेल्या नरेंद्र मोदींना बहूमत देऊनच सत्याची ग्वाही पुरोगाम्यांना दिलेली होती. पण कुठल्याही अनुभवातून शिकणारा पुरोगामी असू शकत नाही आणि विवेकबुद्धीशी तर पुरोगामीत्वाचा ३६ चा आकडा असतो. म्हणूनच हा खोटेपणा चालत राहिला. यावेळी राहुल गांधींना कोर्टात खेचून कोणीतरी सत्याला समोर आणण्याचा चंग बांधला. अन्यथा राहुल गांधींची अशी तारांबळ कशा उडाली असती? हा खटला भिवंडी येथील भाषणाशी संबंधित आहे. त्याला दडपून टाकण्यासाठी राहुलनी हायकोर्टात धाव घेतली. पण उपयोग झाला नाही, तेव्हा सुप्रिम कोर्टाचे दार ठोठावले. त्याच्यापुढे कुठले कोर्ट असते, तरी तेही दार ठोठावण्याची वेळ आलीच असती.

सुप्रिम कोर्टाने राहुल गांधी यांच्या भाषणातील आरोपाला आक्षेप घेऊन कान पकडला. नुसता कान पकडला नाही, तर अशा बेछूट खोट्या आरोपासाठी रा. स्व. संघाची माफ़ी मागण्याचा पर्याय राहुल समोर ठेवला. राहुल आजकाल पुरोगाम्यांचे (मुर्खनाम) शिरोमणी आहेत. सहाजिकच त्यांनी संघाची माफ़ी मागणे म्हणजे पुरोगामीत्वाला हरताळ फ़ासणेच झाले असते ना? कारण संघाला शिव्याशाप देण्याला आजकालच्या भारतात पुरोगामी मानले जाते. सहाजिकच राहुलना कोर्टाने सांगितलेली माफ़ी मागून पळ काढण्याचा कायदेशीर मार्ग पुरोगामी राजकारणाने बंद केलेला होता. त्यामुळे सारवासारव करून कातडी बचावण्याचा राजकीय मार्ग कायदेशीर अडचणीसाठी शोधला गेला. कुणा एका व्यक्तीच्या कुठल्याही कृतीसाठी संपुर्ण संघटनेवर गंभीर आरोप करणे गैरलागू असल्याची ठाम भूमिका घेऊन कोर्टाने संघाची माफ़ी मागण्याचा पर्याय राहुलना दिलेला होता. म्हणजेच गांधीहत्येला संघ जबाबदार असलेला सार्वत्रिक पुरोगामी प्रचार व आरोप तद्दन खोटाच असल्याचे एकप्रकारे कोर्टाने मान्यच केले होते. त्याचा दुसरा अर्थ असा, की दिर्घकाळ संघावर गांधीहत्येचा चालू असलेला आरोप म्हणजे पुरोगाम्यांच्या सतत खोटे रेटून बोलण्याच्या वृत्तीवर झालेले कायदेशीर शिक्कामोर्तबच होय. पण ते नाकारण्याची सोय कोर्टाने ठेवलेली नव्हती. माफ़ी मागावी किंवा खटल्याला तोंड द्यावे, असा पर्याय राहुलसह पुरोगाम्यांसमोर ठेवलेला होता. वास्तविक हा आरोप खुप जुना व सातत्याने झालेला आहे, की तमाम पुरोगाम्यांनी एकजूटीने राहुलच्या मागे उभे रहायला हवे होते. संघाविरुद्धचे तमाम पुरावे आणि युक्तीवाद करण्याची उत्तम सोय त्यामुळे झालेली होती. पण कोर्टात खोट्याच्या आधारे सत्य सिद्ध करण्याची पुरोगामी व्यवस्था नसल्याने, सर्व पुरोगाम्यांनी शेपूट घालून राहुलना वार्‍यावर सोडून दिले. बिचार्‍याला एकट्यानेच आपला बचाव करण्याची नामुष्की आली.

आता सुप्रिम कोर्टात त्याच खटल्याची सुनावणी झाली असून, राहुलनी शेपुट घालणारा खुलासा सादर केलेला आहे. आपण सरसकट संघावर आरोप केला नाही, असली पळवाट राहुलने प्रतिज्ञापत्रातून काढली आहे. त्याचा अर्थ आजवर जितक्या पुरोगामी साहित्यातून, लिखाणातून वा भाषणातून संघावर हा आरोप झाला; तो प्रत्येकजण धडधडीत खोटारडेपणा करीत होता. एकाने खोटारडेपणा करायचा आणि मग बाकीच्यांनी त्याचीच री ओढत खोटी पोपटपंची करीत रहायचे, ही मोडस ऑपरेन्डी असायची. अर्थाचा अनर्थ करायचा वा शब्दांची हेराफ़ेरी करायची आणि मग त्यावरून काहुर माजवून खोटेपणाचा कळस करायचा, हीच रणनिती राहिलेली आहे. हिंदूत्ववादाचा राजकीय मुकाबला करता येत नसेल, तर खोटेपणा करून चिखलफ़ेकीने हिंदूत्वाला बदनाम करायचे. सामान्य लोकही त्याला कंटाळून गेले, कारण त्या खोटेपणात आता कुठलाही दम उरलेला नाही. तसे नसते तर लोकांनी इतक्या मोठ्या संख्येने भाजपाला लोकसभेत निवडून दिले नसते. किंबहूना असल्या खोट्या आरोपांना मतदानातून खोटे पाडण्यात आधी जनतेच्या कोर्टाने पुढाकार घेतला आणि आता न्यायव्यवस्थेलाही तोच मार्ग चोखाळावा लागला आहे. मात्र त्यामुळे पुरोगामी खोटारडेपणा आवरला जाईल, अशी अपेक्षा करणे मुर्खपणचे होईल. कारण आता पुरोगामीत्वाला आपली मुळची विचारसरणी व तत्वज्ञान कोणते याचेही विस्मरण झाले आहे. संघाच्या द्वेषाने भारावून गेलेल्या पुरोगाम्यांना आता जिहादी व दहशतवादी भारतविरोधी प्रवृत्तींनी काबीज केले असून, मुल्लामौलवी, फ़ादरमंडळी किंवा परकीय हस्तकांकडून आपल्या सेक्युलर असण्याची प्रमाणपत्रे व दाखले मिळवावे लागतात ना? बिचारे राहुल गांधी त्यातच वहावत गेले.

3 comments:

  1. भाऊ, लेख उत्तम.

    ReplyDelete
  2. भाऊ;हे लोक, मिडीया परदेशी ताकतींना विकले गेलेत यामुळेच हे संघावर आरोप करतायत गांधी वध ही घटना १९४८ मधील आहे ९०% मतदार हे १९५५ नंतर जन्मलेले आहेत व बहुतांश मतदाता हे २ वेळ खायची वांदी असलेले आहेत.खांग्रेस नेते खाऊन मोठे झाले पण जनता उपाशी आहे यामुळे मतदानात जनता मोठी झाली खांग्रेस नेते कायमचे मतांना उपाशी झाले.अब बिकीहुइी मिडीयाकी presstitute की बारी...

    ReplyDelete
  3. भाऊ;हे लोक,मिडीया अस लिहीले आहे.हे लोक,मिडीया विकले गेले आहेत नाहीतर यात भाऊ आपणास गोऊन Breaking news करतील हे देशद्रोही

    ReplyDelete