पृथ्वीतलावर जितके सजीव प्राणी आहेत, त्यात माणसाची गणना सर्वात श्रेष्ठ प्राणी अशी होते. कारण निसर्गाने माणसाला बुद्धी नावाचे एक साधन वरदान म्हणून दिले आहे आणि त्याला जोडून प्रतिभाही बहाल केलेली आहे. त्याच प्रतिभेच्या बळावर माणसाने निसर्गालाही कब्जात घेण्यापर्यत मजल मारली. ही मजल मारताना माणसाच्या बुद्धीने केलेला मोठा अविष्कार म्हणजे भाषा! दोन प्राणीमात्रांना परस्परांशी संपर्क करायचा असेल, तर अतिशय मर्यादित सोय आहे. पण माणसाने त्यावर मात करून विविध भाषांचा अविष्कार केला. परस्परांच्या संपर्कातून ज्ञाना़ची देवाणघेवाण करीत निसर्गालाही मागे टाकण्यापर्यंत मजल मारली. या वाटचालीत एकाला काही समजले आणि सांगायचे होते, त्यात भाषा ही सुविधा खुप उपयोगी झाली. पण त्यातली खुबी अशी आहे, की एकाला काही सांगायचे आहे आणि दुसर्याला तेच समजून घ्यायचे आहे, अशा स्थितीत संवाद होऊ शकतो. पण त्याच्या विपरीत घडले, तर अन्य पशूप्राण्यांसारखे नुसते आवाज होतात. निष्पन्न काहीच होत नाही. संवादामध्ये एकाने सांगावे आणि दुसर्याने समजून घ्यावे अशी अपेक्षा असते. त्याचा अभाव संवादाला मारून टाकतो आणि मानवी वाटचालीत तीच मोठी बाधा होऊन जाते. पहिल्याला सांगायचे असेल आणि दुसर्याला समजूनच घ्यायचे नसेल, तर विषयच संपून जातो. दुर्दैवाने अलिकडे प्रगत माणसांच्या समाजात त्याचा अनुभव सातत्याने येऊ लागला आहे. त्यामुळे संवादाच्या निमीत्ताने विसंवाद आणि चर्चेच्या जागी भांडणांचा कल्लोळ सतत अनुभवाला येत असतो. एकमेकांना मुर्ख ठरवायला बोलले जाते किंवा कसे, अशी शंका येण्यासारखी स्थिती सतत वाढत चालली आहे. मजेची गोष्ट अशी, की भाषा हेच ज्यांच्या पेशाचे साधन आहे, त्यांच्याकडूनच भाषेला पायदळी तुडवले जात आहे. अन्यथा मोहन भागवत यांच्या विधानावरून इतका गहजब कशाला झाला असता?
कुठल्याशा समारंभानंतर रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना एक प्रश्न विचारला गेला. भारतातल्या वाढत्या मुस्लिम लोकसंख्येचा किंवा हिंदूंच्या घटत्या संख्येशी संबंधित अशा प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी एक विधान केले. भारतीय कायद्यांनी हिंदूंच्या जननक्षमतेला पायबंद घातलेला नाही. असे त्यांचे उत्तर होते. त्यातून त्यांनी हिंदूंनी वाढत्या संख्येने मुले जन्माला घालावीत, असा फ़तवा काढला असल्यासारखी टिकेची झोड उठलेली आहे. खरेच भागवत यांना तसे म्हणायचे आहे काय? की ते तथाकथित टिकाकारांचे गृहीत आहे? संघाचे मुस्लिमप्रेम जगजाहिर आहे. हिंदूहितासाठीच स्थापन झालेल्या व चालणार्या संघटनेकडून हिंदू लोकसंख्या हा विषय चर्चेत आणला गेल्यास गैर काहीच नाही. कारण जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात परागंदा व्हायची वेळ आली, मग त्यांना भारत नावाचा देश आठवतो. आश्रय घ्यायला प्रत्येक हिंदू भारतातच येत असेल, तर इथल्या हिंदूहिताचे कंकण बांधलेल्या संघटनेने काय करावे? हा देश सेक्युलर आहे असे मानले जाते. म्हणूनच त्याला हिंदूंचा देश मानण्याला आक्षेप घेतला जातो. कायदेशीर घटनात्मक बाबतीत ते सत्यही आहे. पण हा देश सेक्युलर कशामुळे आहे, त्याचाही संदर्भ विचारात घ्यावाच लागेल. दिल्लीच्या शाही इमामांचे मत लक्षात घ्यायचे, तर हा देश इथल्या सेक्युलर नेते पक्षांमुळे सेक्युलर राहिलेला नाही. इथे हिंदू बहुसंख्य आहेत, म्हणुन भारत सेक्युलर राहू शकला आहे, असे त्या इमामांनी ठामपणे सांगितलेले आहे. सहाजिकच भारत सेक्युलर राखायचा असेल, तर तिथे हिंदू बहुसंख्य असले पाहिजेत, याची काळजी घेणे हा सेक्युलर विचार होत नाही काय? भागवत यांच्या विधानाकडे त्याच संदर्भात बघितले, तर अर्थ वेगळाच निघू शकतो. पण आपल्या सेक्युलर असण्याला हिंदूविरोधी असणे मानणार्यांना ते मान्य नाही. त्यातून असे बिनबुडाचे वाद निर्माण होतात.
भारतातले कायदे हिंदूंच्या जननक्षमतेला पायबंद घालत नाहीत, असे म्हटले म्हणजेच हिंदूंनी नित्यनेमाने मुले पैदास करून हिंदूंची लोकसंख्या वाढवत नेलीच पाहिजे, असेच भागवतांना सुचवायचे आहे काय? काही लोकांचे हे एक सेक्युलर गृहीत आहे. दुसरे गृहीत असे, की मुस्लिमांची लोकसंख्या वाढत असल्याने त्याला काटशह म्हणुन हिंदूनी आपली लोकसंख्या वाढवत नेली पाहिजे, असेच भागवत अप्रत्यक्षपणे सुचवित आहेत. समजा तसेही असेल तर त्यात गैर काय आहे? जगाचा इतिहास बघितला तर स्थानिकांची लोकसंख्या विरळ होत गेल्याने अनेक देश डबघाईला गेलेले आहेत. दुसर्या महायुद्धानंतर ख्रिश्चन असलेल लेबेनॉन नावाचा देश अलिकडल्या काळामध्ये मुस्लिम देश होऊन गेला. तिथल्या जिहादी हिंसाचाराला कंटाळून तिथले ख्रिश्चन मोठ्या संख्येने पाश्चात्य देशात स्थलांतर करीत गेले आणि तो देश मुस्लिम बहुसंख्य होऊन इस्लामी देश ठरू लागला. आज तशा अनेक देशातील मुस्लिमेतरांना जीव मूठीत धरून जीवन कंठावे लागते आहे. दुसरे उदाहरण मलेशियाचे देता येईल. ब्रिटीश गेल्यावर बहुसंख्य ख्रिश्चन लोकसंख्या असलेल्या प्रदेशाला वेगळे व्हायला भाग पाडले गेले. त्यातून सिंगापूर अस्तित्वात आला. आजही मलेशियाची घटना भारताइतकी सेक्युलर आहे, पण तो देश इस्लामी म्हणून ओळखला जातो. ही मुस्लिम लोकसंख्येची जागतिक समस्या आहे. ठराविक लोकसंख्या झाली, मग तिथे इस्लामी कायदा लागू करण्याच्या मागणीला जोर येतो आणि उत्पात सुरू होतात. त्यातून हा लोकसंख्येचा विषय जगभर चिंतेचा झालेला आहे. कालपरवा इसिसच्या अराजकामुळे मध्य आशियातून लक्षावधी परागंदा निर्वासितांना युरोपिय देशात आश्रय घ्यावा लागला. त्यातून तिथे ज्या समस्या उभ्या राहिल्या आहेत, त्याकडे पाठ फ़िरवून अशा प्रश्नांची उत्तरे सापडू शकत नाहीत, की वक्तव्य विधानांचे संदर्भ मिळू शकत नाहीत.
संघाला भारत हे हिंदूराष्ट्र करायचे आहे. हा अजेंडा त्यांनी कधी लपवलेला नाही. पण त्यांना हवे असलेले हिंदूराष्ट्र स्थापन करायला इथला हिंदूधर्मिय समाज कधी पुढे सरसावलेला नाही. ही सुद्ध तितकीच पक्की गोष्ट आहे. मग संघाच्या अशा वक्तव्यांसाठी आक्रोश करणारे किती मुर्ख आहेत, त्याची प्रचिती येऊ शकते. फ़ार कशाला अलिकडेच नेपाळ या शेजारी राष्ट्रामध्ये नवी राज्यघटना आणली गेली. तिथे त्यावेळी ज्या संघटना रस्त्यावर उतरल्या, त्यातल्या काहींनी पुन्हा नेपाळला हिंदूराष्ट्र घोषित करण्याची मागणी केलेली होती. त्यामध्ये तिथल्या मुस्लिम मुल्लामौलवींच्या संघटनेचाही समावेश होता. त्याचे कारण देताना त्यांनी हिंदूराष्ट्र मुस्लिमांसाठी सुरक्षित असल्याचा दावा केला होता. पण त्याच्याही पुढे जाऊन सेक्युलर राज्यव्यवस्था म्हणजे ख्रिस्चन मिशनर्यांना धर्मविस्ताराचे मुक्त आमंत्रण, असाही आरोप मुस्लिम संघटनांनी केलेला होता. असे अनेक संदर्भ घेऊन अशा विषयांकडे बघणे अगत्याचे आहे. हिंदू सहसा इतरांचे धर्मस्वातंत्र्य अबाधित राखतात, इतकाच निष्कर्ष त्यातून काढता येतो. पण तितकीच संघाची चिंता नाही. काश्मिर सध्या पेटलेला प्रदेश आहे. तिथे काश्मिरीयतची चिंता सर्वांना आहे. त्या काश्मिरी अस्मितेमध्ये फ़क्त मुस्लिम लोकसंख्याच येते काय? गेली तीन दशके त्याच काश्मिरातील लक्षावधी हिंदू पंडित परागंदा होऊन मायदेशातच निर्वासित म्हणून जगत आहेत. त्यांचा कोणी विचार केला आहे काय? त्यांच्यावर अशी मायदेशात परागंदा होण्याची पाळी कशामुळे आली? तर त्या प्रदेशात त्यांची लोकसंख्या नगण्य आहे. अनेकपटीने मुस्लिम संख्या अधिक आहे. पण तशीच अल्पसंख्या असूनही जम्मू प्रदेशातून मुस्लिमांना परागंदा व्हावे लागलेले नाही. म्हणजेच लोकसंख्येचा विषय निरर्थक नाही. त्याला सुरक्षा व राजकीय अस्तित्व असेही संदर्भ आहेत.
असे वास्तविक संदर्भ सोडून मोहन भागवत यांच्या विधानाचा समाचार घेणेच मुर्खपणाचे आहे. निव्वळ हिंदूंची लोकसंख्या वाढवून भारताला हिंदूराष्ट्र करण्याचा त्यांचा मनसुबा असता तर नव्वद वर्षे ही संघटना त्यासाठी राबली असती आणि त्याचे फ़ळ देशाच्या एकूण लोकसंख्येतही दिसले असते. पण तुलनेने आजही हिंदूंची संख्या मर्यादितच राहिली आहे आणि जननक्षमतेचा विषय घेतल्यास मुस्लिमांची लोकसंख्या तुरळक प्रमाणात का होईना, विस्तारतेच आहे. लोकसंख्येचा धोका लक्षात आणुन देणे गैरलागू कसे असू शकते? पण त्यासाठी मुलांची पैदास वाढवा असे आवाहन केलेले नाही. त्याला कोणी हिंदू प्रतिसादही देणार नाही, याची संघालाही खात्री आहे. कारण धर्मासाठी वेडाचार करण्याची प्रवृत्ती हिंदूंमध्ये मुळातच नाही. हा इतिहास आहे. तसे असते तर जगातल्या कुठल्याही धर्माचे अनुयायी इथे आढळून आले नसते. ज्यांना अशी लोकसंख्येची चिंता आहे त्यांना कायदा अडवत नाही. त्यांनी आपल्या जननशक्तीचा वापर करावा, इतकाच त्याचा अर्थ घेता येईल. पण असे करणार्यांची संख्याही नगण्य असेल. त्यामुळे अशा विषयांचा किंवा विधानांचा गहजब करण्यासारखे काहीच नाही. त्याचे लांबलचक अर्थ काढण्यातही तथ्य नाही. पण संघाला दोषी ठरवायचे असेल, तर अशी विधाने उपयुक्त असतात. त्यांचा उपयोग काहूर माजवण्यासाठी करता येतो. मुळात हिंदू समाजात संघाचे अनुयायी किती प्रमाणात आहेत आणि त्यापैकी कितीजण संघाच्या अशा भूमिकेचे पालन करणारे आहेत? नसतील तर त्यावरून काहूर माजवण्याची तरी गरज आहे काय? त्यापेक्षा देशाला सतावत असलेल्या अनेक समस्या आहेत आणि त्याबद्दल समाजाचे प्रबोधन करण्याची खरी गरज आहे. ते कुणी करत नाही आणि अशा गोष्टींना अकारण हवा दिली जाते. कारण मुळातच हे भागवत यांनी केलेले विधान नसून, एका प्रश्नाला दिलेले उत्तर आहे. त्याला संघाचा अजेंडा वा कार्यक्रम ठरवून डंका पिटणेच गैरलागू आहे.
पण त्यामुळेच एक शंका अशी येते, की अशा गदारोळ करण्यामागे काही हेतू दडलेला आहे काय? गर्भपाताला विरोध करणार्या मदर तेरेसांचे गुणगान करणार्यांनी भागवत यांच्या लोकसंख्यावाढीच्या विधानावर टिकेची झोड उठवणाचा हेतू काय असू शकतो? धर्मांतराने आपल्या धर्माच्या लोकांची संख्या वाढवण्याच्या धर्मगुरू पोप यांच्या आवाहनाविषयी असे विद्वान मौन धारण करतात. तेव्हा त्यांच्या ‘भागवती’ प्रवचनाविषयी संशय घेणे अपरिहार्य होऊन जाते. जगाला सध्या भेडसावणार्या अशा लोकसंख्या वा स्थलांतराच्या प्रश्नाविषयी लोकांन जागरूक करायची जबाबदारी कोणी पार पाडायची? आज युरोपात निर्वासित म्हणून प्रवेश केलेल्या मुस्लिम संख्येने तिथले लोक चिंतेत पडलेले आहेत. कारण दिवसेदिवस मुळनिवासी युरोपियनांची लोकसंख्या घटते आहे. त्यामुळे आणखी काही वर्षांनी त्या देशांना आपली ओळखही शिल्लक ठेवता येणार नाही. आसाम वा मणिपुरची समस्या काय आहे? बलुची वा पख्तुनी समस्या काय आहे? त्या सर्व समस्या लोकसंख्येच्या प्रमाणाने निर्माण केल्या आहेत. हे जागतिक वास्तव आहे. त्याकडे पाठ फ़िरवून नुसत्या तत्वज्ञानाच्या गप्पा कामाच्या नाहीत. ज्यांना इतकाच विश्वास असेल, त्यांनी आपलेच सिद्धांत सिद्ध करण्यासाठी इराक-सिरीया किंवा काश्मिरी प्रदेशात वास्तव्य करून त्याची ग्वाही द्यायला कोणाची हरकत नाही. इथे सुखरूप कवचामध्ये बसून लोकसंख्येवर प्रवचने झाडून उपयोग नसतो. कारण भागवत इथे भारतात आहेत आणि युरोपात संघाला स्थान नाही. पण तिथेही आता हीच समस्या भेडसावते आहे आणि वाढत्या मुस्लिम लोकसंख्येने तिथले समाज विचलीत होत चालले आहेत. कुठल्याही लहानमोठ्या देशाची प्रदेशाची ओळख पुसली जाणार असेल, तर तो आपोआपच चिंतेचा विषय होतो. त्यापासून सुटका नसते. मग तो भागवतांनी मांडलेला असो, किंवा युरोपातल्या कुणा नेत्याने मांडलेला असो. सिद्धांताच्या अनौरस संततीने राष्ट्र निर्माण होत नाही की माणुसकी टिकत नाही.
छान निरीक्षण भाऊ.झोपलेला माणूस उठवता येतो सोंग घेतलेला कसा उठवणार??? हे आधीच विकले गेलेत आता धर्म;देश बाटवुन विकायला चाललेत.
ReplyDeleteभाऊ या चाटुंच अस होइल बघा there was secular of India Who smiled as they rode on a tiger;
ReplyDeleteThey returned from the ride
With the seculars are inside,
And the smile on the face of the tiger.