Saturday, August 6, 2016

नावड-निवड निर्णायक असते

गुजरातचे नवे मुख्यमंत्री विजय रुपानी

Vijay Rupani

अजून तरी आपल्या देशात इतकी सुबत्ता आलेली नाही, की लोकांना प्रत्येक गोष्ट मनासारखी मिळू शकेल. सहाजिकच त्यातल्या त्यात सुविधा व सुटसुटीत असेल, अशा गोष्टींकडे लोकांचा ओढा असतो. म्हणून काय नको आहे, त्याच निकषावर लोकांची आवडनिवड अवलंबून असते. सर्वसाधारण ग्राहक म्हणून लोकांची जी मोजपट्टी आहे, तिच मग सार्वजनिक जीवनातही कायम असते. म्हणूनच अनेकदा लोक कुठल्या पक्षाला वा कुणा नेत्याला कोणत्या कारणास्तव निवडून सत्ता बहाल करतात, त्याचा अंदाज भल्याभल्या राजकीय अभ्यासकांनाही बांधता येत नाही. लोकसभेत नरेंद्र मोदींना प्रचंड यश व बहुमत देणारा मतदार दिल्लीत विधानसभेत त्याच भाजपाला पुरता भूईसपाट करीत केजरीवालना इतके मोठे यश कशाला देतो? अवघ्या नऊ महिन्यात हा चमत्कार कसा घडतो? त्याचा जितका अर्थ केजरीवाल यांना लागलेला नसतो, तितकाच विश्लेषकांनाही लागलेला नसतो. मग त्यातून प्रत्येकजण आपापल्या सोयीचे अर्थ काढत असतात. मात्र वस्तुस्थिती तशीच असते असे नाही. मात्र असे सोयीचे अर्थ लावणार्‍यांचे त्यातून अधिक हाल होतात. कारण असे करणार्‍यांमुळे अन्य कोणी फ़सत नसला, तरी तेच आपल्या भ्रामक आकलनाच्या आहारी जाऊन चुका करत रहातात. त्याचे परिणामही त्यांना भोगावे लागतात. जसे दिल्लीतल्या आरंभीच्या यशाने फ़ुशारलेल्या केजरीवालांना लोकसभा मतदानात भोगावे लागले होते. नंतर लोकसभेच्या यशाने झिंगलेल्या भाजपाला त्याच दिल्लीत सपाटून मार खावा लागला होता. त्याचे कारण लोकांनी दिलेल्या कौलाचा नेमका अर्थ समजून घेण्यातली टाळाटाळ इतकाच असतो. अनेकदा लोक तुम्हाला मत देत नसतात, तर अन्य कोणी नको म्हणून तुमची निवड करीत असतात. त्याला आपलाच मोठेपणा वा जनतेपुढील अपरिहार्यता समजणे म्हणूनच घातक असते.

लोकसभेत भाजपाला यश मिळण्यापुर्वी दिल्लीत विधानसभांची निवडणूक झाली, तेव्हा भाजपाला ३३ टक्के मते मिळाली होती आणि कॉग्रेसचा पराभव होत असताना नवा असा आम आदमी पक्ष भागिदार म्हणून पुढे आलेला होता. त्याला २८ टक्के मते मिळाली होती. मात्र केजरीवाल यांच्या घाईमुळे तो मतदार नाराज झाला आणि नऊ महिन्यात त्याने केजरीवालना दणका देऊन भाजपाला दिल्लीतल्या सातही जागा देऊन टाकल्या. ३३ वरून भाजपा मतांच्या टक्केवारीत ४४ टक्क्यापर्यंत पोहोचला होता. या वाढलेल्या मतांना सदिच्छा म्हणतात. ती तुमच्या हक्काची मते नसतात. त्यांना आपल्यापाशी राखण्यात महत्व असते. पण भाजपाला त्याचाच विसर पडला आणि शत-प्रतिशत भाजपा करण्याचा उर्मटपणा त्याला कारणीभूत झाला. कुठल्याही पक्षातून इच्छुक गोळा करून त्यांना शेंदुर फ़ासण्याचा खेळ सुरू झाला, तेव्हा त्याच वाढलेल्या मतदाराने भाजपाकडे पाठ फ़िरवली. अवघ्या नऊ महिन्यात दिल्लीचे राजकीय पारडे फ़िरले होते. तेव्हा केजरीवाल लोकांना आवडले नव्हते. पण यशाने मस्तवाल झालेल्या भाजपाला धडा शिकवण्याची दिल्लीकरांना अनिवार इच्छा झालेली होती. ते करताना समोरचा पर्याय कॉग्रेस नव्हती, तर लोकसभेत सपाटून मार खाल्लेला आम आदमी पक्ष होता. मात्र निर्णय घेताना भाजपाचा उमेदवार पडला पाहिजे, अशी लोकांची निवड होती. त्याला पाडण्यास अन्य कोणी पक्ष तितका समर्थ नसेल, तर असेल त्या समर्थ उमेदवार पक्षाच्या पारड्यात मत टाकणे भाग होते. म्हणून दिल्लीत केजरीवाल यांना अभूतपुर्व यश मिळू शकले. पण तसाच चमत्कार लोकसभेतही घडला होताच ना? भाजपाला देशाच्या अनेक राज्यात लोकांनी प्रचंड मतदान केले ते भाजपावरील प्रेमासाठी नव्हते, तर कॉग्रेसला पाडू शकणारा एकमेव पक्ष भाजपा होता म्हणून! पण अमित शहा किंवा भाजपावाले त्याला लोकांची अगतिकता समजून बसले.

केजरीवाल असोत किंवा मोदी-भाजपा असोत, त्यांना मागल्या दोनतीन वर्षात मिळालेला कौल बघता लोक आपल्या आवडीचे पक्ष किंवा उमेदवार निवडतांना दिसत नाहीत. त्यापेक्षा नावडत्याला बाजूला करणारा जो कोणी उपलब्ध असेल, त्याला कौल देऊन टाकत आहेत. हे दुर्दैव असले तरी वास्तव आहे. कारण कुठल्याही पक्षाला विचारसरणी वा तत्वाचे वावडे राहिले नसून सत्तेच्या मागे धावत सुटलेल्यांचे घोळके, अशी सर्व पक्षांची अवस्था झालेली आहे. मार्क्सवादी पक्षाचा बंगालमध्ये जो दारूण पराभव नुकताच झाला, त्याचेही तेच कारण आहे. आयुष्यभर ज्यांनी कॉग्रेस विरोधात आपले राजकारण केले, त्यांनी यावेळी थेट कॉग्रेसशी जागावाटप केले. त्याचा फ़टका त्यांना बसला आणि कॉग्रेसचा मात्र लाभ झाला. बिहारमध्येही तेच झालेले दिसेल. मोदी लाटेच्या विरोधात लालू नितीश एकत्र आले, तरी त्यांना यशाची खात्री वाटत नव्हती. म्हणून त्यांनी कॉग्रेसला सोबत घेतले. त्यांच्यापेक्षा तिथे कॉग्रेसला अधिक लाभ होऊन नामशेष झालेल्या कॉग्रेसच्या जागा अनेकपटीने वाढल्या. त्यामागेही नकारात्मकताच अधिक होती. भाजपाने तिथेही मिळेल त्याला पक्षात आणून सत्तेची साठमारी सुरू केली होती. अशा भाजपाला दणका देण्यासाठीच मतदाराने नितीश लालूंना कौल दिला. ही आजच्या काळाची वस्तुस्थिती झाली आहे. लोकांना आज कुठल्या पक्षाविषयी आपुलकी उरलेली नाही की विश्वास वाटेनासा झाला आहे. म्हणूनच त्यांची बडबड किंवा तत्वाचा आव आणण्याला लोक किंमत देत नाहीत की कौल देत नाहीत. त्यापेक्षा समोर आहेत त्यात कोण अजिबात नको त्याचा निर्णय घेऊन मग त्याला पराभूत करू शकणार्‍याला कौल देत असतात. लोकसभेतील यशानंतरच्या मस्तवालपणाने भाजपाही त्याच पठडीत जाऊन बसला. शत-प्रतिशत सत्ता मिळवण्याचा मनसुबा त्याला कारणीभूत झाला आहे.

लोकसभेच्या निवडणूकीत भाजपाने ५९ टक्के मते गुजरातमध्ये मिळवली होती. पण गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या स्थानिक संस्थांच्या मतदानात किती मोठा फ़रक पडला होता? भाजपाला ४४ टक्के मते मिळाली. म्हणजे दिड वर्षात १५ टक्के मते भाजपाने गमावली आहेत. त्याचा परिणाम गुजरातच्या ग्रामिण सत्ता रचनेमध्ये स्पष्टपणे दिसून आला आहे. २३ पैकी २१ जिल्हा परिषदांत कॉग्रेसने बहुमत संपादन केले आणि महापालिका व नगरपालिकातच भाजपाचे वर्चस्व राहिले. खरे तर तोच भाजपाला इशारा होता. पण घरात आग लागली असताना अमित शहा मात्र देशात शत-प्रतिशत भाजपाचे झेंडे फ़डकावण्यात गर्क होते. आठ महिन्यापुर्वीच्या मतदानात भाजपाने ४४ टक्के मते मिळवणे महत्वाचे नाही, इतकी कॉग्रेसला मिळालेली संजीवनी भाजपाचे डोळे उघडणारी होती. पण डोळे उघडण्याची इच्छाच नसली तर व्हायचे काय? त्या स्थानिक संस्थांच्या मतदानात कॉग्रेसने ५२ टक्के मतांचा पल्ला होता. तोच धोक्याचा इशारा होता. पण अशा बातम्या किंवा आकडे ज्यांना ठाऊक नसतात, त्यांना मोदींच्या झळकणार्‍या बातम्यांमध्ये रमून जायला आवडते. तीनचार वर्षापुर्वी वाहिन्यांवर अखंड झळकणार्‍या राहुल गांधींकडे बघून कुठल्या कॉग्रेसवाल्याला सत्य बघण्याची हिंमत राहिलेली होती? मग गुजरात किंवा देशातला सामान्य मतदार कसा कौल देतो आहे आणि त्याचे दुरगामी परिणाम काय संभवतात, त्याकडे भाजपाच्या समर्थकांनी डोळे उघडून बघण्याचा संबंधच कुठे येतो? लोकसभा गमावल्यानंतरही राहुल समर्थकांना जाग आली नाही, तर मोदीभक्तांना इतक्या लौकर जाग येण्याचा विषयच नाही. हे असेच चालते. त्यात धोक्याचा इशारा देणारा शत्रू वाटतो आणि भ्रमात वावरण्याचा आनंद अवर्णनीय असतो. कॉग्रेस नको म्हणून लोकांनी आपल्याला सत्तेवर आणून बसवले, याचा विसर पडल्याचा हा परिणाम आहे आणि त्याची झिंग सत्ता गमावल्याशिवाय उतरत नसते.

2 comments: